Sunday, 6 December 2015

जरतारी वस्त्र



लोकलच्या गेटवर उभी रितू शून्यात बघत होती. नवऱ्यानं दगा दिला आपल्याला या दुःखानं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकलं होतं तिचं. गाडीच्या वेगाचे, अंगावर येउन भिडणाऱ्या सुसाट वाऱ्याचे, वेगात मागे पडणाऱ्या झाडांचे, बाहेर दिसणाऱ्या परिसराचे, गाडीच्या आतल्या कोलाहलाचे कसले कसले भान नव्हते तिला. भरदुपारची वेळ, गर्दीही नव्हतीच फारशी …. गाडी थांबली कि जरा बाजूला व्हायला लागायचं आणि गर्दीचा डोंब आत उसळायचा तेवढ्यापुरतंच काय ती तंद्री तुटायची. हे असेच चालले होते महिन्यांपासून. मागल्या कित्तेक महिन्यात ती खळखळून हसली नव्हती. मैत्रिणींशी मज्जा मस्ती केली नव्हती. मनमोकळं बोलली नव्हती, रडली नव्हती. अजब अवस्था होती मनाची कुणी कुणीच नको असायचं भोवताल. अलिप्त करून घेतलं होतं तिनं स्वतःला. जणू एकटीच वावरते आहे जगात.…त्यातल्या त्यात लोकलने प्रवास करतांना हा मधला दीड तास तिचा आवडता वेळ. जगापासून तुटण्याचा.गाडीच्या वेगात स्वतःला वाहवून घेण्याचा. आपल्याच विचारांत. नको त्या हव्या त्या विश्वात गढून जाण्याचा.


अधून मधून कधीतरी एक साठीतली आजी बसायची वडाळा स्टेशन वरून. सगळे केस पिकलेले. ओठांवर मात्र सतत स्मित. असेल नसेल त्या साऱ्यांची मस्करी करत, बोलत.. नेहेमीच्या सख्यांची विचारपूस करत आजी खुश असायची. या वयातही सुंदर दिसायची. ........ रितूला फार अप्रूप वाटायचं आजीचं. स्टेशन कमी होत गेले तशी गर्दी ओसरली आज आजी आणि रितू दोघीच उरल्या. कापसाच्या वाती करण्यात मग्न आजीच्या शेजारी रितू येउन बसली. ती मुसमुसत होती.

आजीनं विचारलं तिला 'बाळा काय झालंय, रोज असा जीव जाळतांना का दिसतेस ?'
अन रीतुचा बांध फुटला…रडून घेतलं तिन मनसोक्त, म्हणाली ''आजी कुणाला सांगावं वाटतंय म्हणून सांगतेय तुम्हाला, पण जगावंसं वाटत नाही हो मला. ज्याच्या आधारानं तग धरून होते त्यानंच दगा दिला, ६ महिन्यात नवरा सोडून निघून गेला . आईवडिलांना सोडून आले होते. आता त्यांच्याकडेही परत जावसं वाटत नाही. एकटं जगतेय,कशासाठी-कुणासाठी काहीच माहिती नाही. कुठे जातेय का जगतेय काहीच कळत नाही. नको वाटतं हे सगळं … तुमचा हसरा चेहेरा बघते रोज आणि विचार येतो मनात वयाच्या पंचविशीत मी वैतागलेय आयुष्याला, …. आणि आयुष्याचे इतके वर्ष इतकी दशकं अन कितीतरी उन्हाळे पावसाळे पाहिल्यावरही तुम्हाला निराशा नाही का आली कधी? दुःखाचे वलय चिकटून नाही बसले… अडचणींचे ओझे नाही आले डोईवर?? का दुःखच नाहीये तुम्हाला कसले ??'



आजीनं रितुचे डोळे पुसले. जवळच्या बाटलीतले पाणी दिले तिला प्यायला आणि मंद स्मित करत मवाळ आवाजात बोलती झाली. आजी, ''वेदना अडचणी समस्या नसतात असे नव्हे राणी, ते का कुणाला चुकले आहेत ? ते असतातच …. अगदी प्रत्येकाला. ते असतात तेव्हा आपण त्यांना कसे वागवतो यावर त्यांचे आपल्यासोबत राहणे किंवा निघून जाणे ठरले असते. दुःखाचेही बघ तान्ह्या बाळासारखे असते अगं, ओंजळीत घेऊन सतत गोंजारले कि ते बाळसे धरू लागते. जितके कोड-कौतुक तितके ते चिकटून बसते. वेदनेचा हात धरून हिंडू नये… ते येतंय का मागे सतत वळून वळून बघू नये सोडून द्यावं मागे तसंच … आपण आपल्याच मस्तीत शिळ वाजवत चालत राहावं पुढे मागं मागं यायचा कंटाळा आला कि मागल्या मागे ते कधी निघून जाईन कळणार हि नाही. दुःखालाही शोध असतो गं … त्यालाही फटकारनारा नको, गोंजारणारा हवा असतो…. दुःख गोंजारण सोडून दे, अन बघ मग काय होतंय?''


आजीने रीतुचा हात थपथपला डोळ्यानेच स्मित करत ती बाहेर खिडकीकडे बघत गुणगुणू लागली …


'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे
करी जरतारी वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे'



रितू गाण्यांच्या ओवीत गुंतत गेली अन लोकलच्या वेगात मुग्ध होऊन जरतारी वस्त्र विणण्याच्या योजना आखू लागली.

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...