'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय श्रावणी.. हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज '
'…… हम्म '
'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस'
श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला'
बराच वेळ कॉटवर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली
तोंडावर
उतरलेले केस मनगटाने
मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत
लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन
उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.
तिने
नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन
उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच
उपयोग झाला नाही. डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले.
भरलेल्या
डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव
दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवाज
सावरत बोलु लागली
' रावी हे बघ ऐक एकदा माझे…हे बघ मला राहवत नाहीये गं , तू तरी
समजून घे, अक्खी रात्र पालटली आता दुपार झालीय पण तनुलचा काहीच पत्ता नाही… काहीतर बोल गं '
' हे बघ श्रावणी या विषयाला काहीच अर्थ नाहीये आता … जे व्हायचं ते होऊन गेलंय'
' अस नको म्हणूस ना ग … प्लीज … माझ्यासाठी एकदा तू … हेलो हेलो … रावी… हेलो रावी'
ती
पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. हातातला फोन तिने बेड वर फेकून दिला … रडत
रडत खाली बसली आणि भिंती लगत डोकं मागे टेकून शून्यात ध्यान लावून बसून
राहिली तशीच कितीतरी वेळ … डोळ्यातून अश्रू वाहत राहिले तसेच .डोळे सताड
उघडे …
दरवाजा वाजला … तिची पापणी सुद्धा
हलली नाही… दरवाजा जोरजोरात वाजू लागला. ती नाही हलली जागची
आईने आवाज दिला बराच अन बाहेर ये अशी ताकीद देऊ लागली….
विजेच्या
ताकदीने श्रावणी उठली जागची… झपझप पावले टाकत दाराजवळ आली, झर्रकन हात
कडी जवळ नेत कडी उघडली आणि हवेच्या गतीने दार उघडलं …. आई
भयचकित होऊन दारात उभी होती. श्रावणीने लालेलाल अश्या भरल्या डोळ्याने
काळीज चिरत जाणारी करारी पण रागीट नजर टाकली आईवर …. काही सेकंद तसेच
खिळलेले …. आणि आईला काही कळायच्या आत तिने तेच दार प्रचंड वेगाने भिरकावले
बंद करण्याकडे …. खा~~डड असा आवाज झाला आणि ते पुन्हा त्याच वेगाने सुरु
होण्याआधी तिने दुसऱ्या हाताने लगेच कडी लावून घेतली. दाराच्या पलीकडल्या
आईची काय
मनःस्थिती झाली असेल ह्याची जणू तिला जराही पर्वा नव्हती.
जेवढ्या
वेगाने गेली तेवढ्याच संथपणे ती हुंदके देत कॉट जवळ आली. विखुरलेले केस
हाताने वर करून तिने फोन उचलला आणि पुन्हा श्रेयस ला फोन लावला. फोन उचलला
गेला हे कळताच ती रडतच बोलू लागली
'श्रेयस ऐक
रे एकदा फोन ठेवू नकोस … प्लीज जीव जाईल माझा '
'काय बोलायचं शिल्लक ठेवलायेस श्रावणी ? आणि का ऐकायचं तुझं? कोण आहेस तू ?'
'श्रेयस अरे मी मैत्रीण आहे तुझी निदान आजपर्यंत मैत्रीच्या खातर तरी …'
'मैत्री~ ~ मैत्री …. तू बोल् तेयेस हे श्रावणी ?'
'श्रेयस अरे चुकले रे मी, माझा
नाईलाज झालेला आई- बाबांसमोर, त्यांच्या बोलण्यात आले. त्यांचा त्यांच्या त्या सो कॉल्ड समाजाचा विचार केला ,…. आणि … आणि '
'आणि
तनुलला चक्क तुझ्या घरच्या लोकांसमोर अपमानित केलंस, तुझ्या आईने नको नको
ते काय काय घालून पाडून नाही बोलून घेतलं त्याला…. आणि तू … तू गप्प होतीस
? घरच्यांनी अपमानित केलं म्हणून नाही ग तो दुखावला … तुझं वागणं … तुझं
वागणं
दुखावून गेलं त्याला, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय काहीही
सुचायचं नाही त्याला तुझ्या सुखासाठी, चैनीसाठी पैसा हवाय त्याला म्हणून
नौकरी साठी धडपडत राहिला तो … तीच जगण्याचं एकमात्र माध्यम असणारी त्याची
जिवलग त्याला ऐन वेळेवर निघून जा सांगते?? मी माझ्या पालकांच्या शब्दाबाहेर
नाही अस बोलते…. तुझा माझा संबंध नाही यापुढे … मला विसरून जा म्हणते?? ….
कसं , कसं
जमलं गं हे सर्व तुला? '
'श्रेयस
अरे मला कळलंच नाही रे हे सर्व कसं घडून गेलं, मी घाबरले होते… त्याच्या
जीवाला काही नको व्हायला होतं मला … मला वाटलं तनुल सावरेल स्वतःला … पण
काल संध्याकाळी हे सगळं घडल्यापासूनच त्याचा काहीच पता नाहीये, तो फोनही
उचलत नाहीये, त्याच्याशिवाय जगण्याचे हे काही तास मी मरण यातना सहन
करतेय…. माझा तनुल मला परत कर रे … सांग एकदा तो कुठे आहे ? सुखरूप आहे तो
बोल एकदा … एकदाच हवं तर'
'अगं
जा~~ गं, तुझ्या कुठल्याच शब्दांवर आता विश्वास ठेवावा वाटत नाही…. फक्त
तनुलचंच नाही माझं अन ओवीचहि मन तोडलंय तू… तनुल चे अश्रू बघवले नाही
आम्हाला त्याला एकांत हवा होता म्हणूनच त्याला तसेच सोडून निघून आलोय आम्ही
सकाळी तृष्णेवरून …. त्यानंतर तर त्याने आमचाही फोन उचलला नाहीये. ……
हेल्लो … ह … हेल्लो श्रावणी'
श्रावणी
ने फोन ठेवला होता … तिला आता निव्वळ तृष्णा दिसत होती. अंगावरल्या
घरच्याच कुर्त्यावर तिने नुसताच स्कार्फ ओढून घेतला, खोलीच्या दाराबाहेर
पडतांना टेबलवरच्या गाडीची किल्ली उचलुन घेतली आणि 'कुठे निघालीस' अस
विचारणाऱ्या आईच्या एकही शब्दाला उत्तर न देता धावतच घराबाहेर पडली.
'तृष्णा'
तनुल-श्रावणीचा आवडता स्पोट. एका चौकोर तलावाच्या मध्यभागी हिरवाई असणारी
बाग, छोटेखानी बेटंच जणू … तिथल्या पुलावरील तालावाशेजारच्या झाडांच्या
सावलीतल्या दगडांवर बसायला फार आवडायचं तनुलला…श्रावणीची वाट बघत आणि ती
उशीरा
आल्यावरही न रागावता तिचा हात हातात घेऊन तासान तास बसायचा तो तिथे.
तो
पूल ते एकावर एक रचलेले दगड श्रावणीच्या डोळ्यासमोर गिरक्या घेऊ लागले.
१५ KM दूर … पण श्रावणीच्या डोळ्यांना आणि गाडीच्या चाकांना आज वेग लागला
होता. दोघांनाही काही केल्या थांबता येईना…. तृष्णेवर पोचायला लागेल तेवढा
संपूर्ण वेळ
तिच्या भरलेल्या डोळ्यासमोर तनुल दिसत राहिला, आपल्या चेहेर्यावर एक स्मित
दिसावं म्हणून धडपडणारा तनुल…. सालस -समंजस-हुशार तनुल, मित्रांमधला लाडका
तनुल … आई-बाबांनी एवढा अपमान केल्यावरही एका शब्दानेही त्यांना उलट न
बोलणारा तनुल …. मी आई बाबांचं ऐकायचं ठरवलंय अस सांगितल्यावर मौन झालेला
आणि दुखावला गेलेला तनुल.'
ती
तृष्णेवर पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर तापलेलं उन्ह
उतरणीला आलेलं. पश्चिमेला जरा जरा तांबड फुटलं होतं. आणि तृष्णे वरून
वाहणाऱ्या वाऱ्यांत जरा गारवा जाणवत होता…या कशातही लक्ष नसणाऱ्या
श्रावणीचे डोळे फक्त तनुलला शोधत होते. मिळेल त्या जागेवर गाडी पार्क करून
ती
धावतंच आत शिरली. पुलापर्यंत जायला आणखी पाच मिनिट लागणार होते. तेवढा
त्राणही आता
तिच्यात उरला नव्हता. ती पोचली पुलावर तिची नजर भिरभिर शोधत राहिली तनुलला
…. पण नाही … नाही दिसला तनुल. नजर जाइल तिथपर्यंत शोध घेऊन झाला आणि
श्रावणीचे उरले सुरले सगळेच धैर्य खचले. ती गुढग्यांवर मट्टकन खाली बसली
…. आणि 'तनुल~~ ' अशी आर्त हाक घालून हुंदके देऊन रडू लागली. वातावरणात
प्रचंड शांतता, पाण्यावरून वाहणाऱ्या हवेचा हलकासा हुंकार आणि हुंदक्याचा
आवाज ……….
……… शाणु
श्रावणी च्या कानावर शब्द पडलेत तिने मान उचलली …. पुढ्यात तनुल उभा होता. त्याला बघून ती अधिकच हुंदके देऊन रडू लागली.
तनुलच्या डोळ्यातूनही टपकन थेंब ओघळला गालावर …. त्याने दोन्ही हात
पुढे केले अन भरल्या डोळ्याने स्मित दिले तिला …
(सकाळ जळगाव एडिशनच्या 'शब्ददीप 2016' दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा.)
No comments:
Post a Comment