सगळे हिशेब संपवायला जरा उशीरच झाला
रात्र पालथी पडून ... जरा उजेडायला आले होते
किर्र्र्र अंधार चिरत बारीकशी किरणे डोकावू पाहत होती ... पण
अजून अंधार कायम होता.
अंगावरच्या सगळ्या चिघळट खाणाखुणा,
भळभळणाऱ्या जखमा, खदखदणारी व्रण, ठसठसणारे स्पर्श
तिनं पदरानं रगडून पुसून काढलीत.
त्या पदराची झोळी केली न खोचली कंबरेत
दोन्ही हाताच्या तळव्याने वाहते डोळे पुसले अन
साठवून घेतले ते अश्रू ओंजळीतच.
उंबरठा ओलांडला ....
चालत राहिली रस्ता नेईल तिकडे
आकाशात मेघ दाटून यायला लागले होते.
तिच्या मनातले मेघ आज धो धो बरसून साठले होते .. तिच्या तळव्यात. रिमझिम रिमझिम सुरु झाली तशी ओंजळ अधिक पुढे केली तिनं
पावलागणिक पाऊस ओंजळीत साठत होता... ती मात्र, ... ती मात्र
ओंजळ ओसंडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेत, ठार कोरडी होत चालली होती.
ओलाव्याच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या होत्या तिला... शरीराच्या अन मनाच्याही
चालता चालता ध्यानात येणाऱ्या ..
उरात उचंबळणाऱ्या लाटा, आयुष्यातल्या उभ्या आडव्या सरी, डोळ्यातला पूर, मनातला पाऊस
भावनांचा ओघळ, नात्यांची ओल, आठवणीतला पाझर सगळं साठवून थेंब थेंब झोळीत ओतत राहिली . ...तळे तळे साठत राहिली ..
पोचली समुद्र किनारी ...
जरा शांत केलं स्वतःला .. दूरवर नजर फिरवली .
लाटा पायाशी घुटमळू लागल्या ... तशी अंगभर शिसारी आली तिला
सगळी घाण वेचून तिच्या तळाशी आणून टाकणाऱ्या अन तरी कुठलेच वैषम्य न बाळगता अथांग तोरा मिरवणाऱ्या; क्षणात फसफसून क्षणात नाहीश्या होणाऱ्या अस्तित्वहीन लाटेच्या ओल्या-खाऱ्या स्पर्शाची.... शिसारी आली तिला...
दुसऱ्या उचंबळून आलेल्या लाटेत एका श्वासासरशी ओंजळ रिक्त केली तिने...
पदराची झोळीही ओतली तिथेच ... पिळून काढली गच्चं
अन होतं नव्हत ते सगळं दिलं समुद्राच्या स्वाधीन करून ...
विसर्जन
समर्पणाचं विसर्जन ...
वाहून जाऊ दिले सारे सारे ...डोळ्यादेखत ... नजरेआड होईपर्यंत
भंपक ओलाव्याचा समस्त भार शिरवून टाकला होता...
पुढल्या लाटेसरशी तिनं जोरात किंकाळी फोडली .. धायमोकलून रडून घेतलं
तसे कानाकोपऱ्यात अडकलेले उरले सुरले शिंतोडेही मोकळे झाले.....हलकं हलकं झालं सारं
डोळे गच्चं मिटून, हात पसरून लांब श्वास घेत आकाशाकडे पहिले तिने आणि वळली ... निघाली नव्याच प्रवासाला
तिच्या वाटेत अडथळुन बसलेल्या धोंड्याला टेचात उडवून लावला अन शीळ वाजवत चालत राहिली रस्ता दाखवेल त्या वाटेवर..
लक्ख उजाडलं होतं आता .... बाहेर अन आतही !!
Umbarth olandala....
ReplyDeleteTila swatahachi olakh patali ..nowbsky is the limit...
Khup sunder lihiles.
thnk u dear
DeleteWell said
ReplyDeletethnks Pankaj
DeleteWell said
ReplyDelete