खाडकन झोपडीचे दार वाजले. सुंता सनसनतच आत शिरली. रम्या डोळे चोळत उठून बसला.
चुलीजवळ जाउन बसलेल्या मायला म्हणाला,
'कशी व तू? सकायपासून गेली मले एकट्याले टाकून, कै खायलेबी करून न्हाई ठिवलं, केवढी भूक लागली मले...मरतो का काय वाटे"
सुंता गप्पच होती. मनात काहीतरी भयान जाळ पेटला होता,जवळची चूल मात्र निवांत थंड पडली होती.
रमेसची भुकेने कासावीस झालेली बडबड चालूच होती.
ती चुलीजवळचा डब्बा हुसकू लागली. पिठाच्या डब्याला काठाशी लागलेलं पीठ काढायला म्हणून डबा जमिनीवर आपटू लागली हाताने खरडून खरडून पीठ पडते का पाहू लागली.
"काई बी नाई ना वो त्या भगोण्यात..डाळ-भात कर, मले पोटभर जेवाले पायजे वो माय काल रात्च्याले बी तूनं पिठाचं पाणी प्याले देल्तं तवा पासून कायबि खाल्ल नाई, पोट तोडून रायल मायवाल'' रम्या
सुंता तशीच उठली पिशवी उचलली अन बाहेर जायला निघाली तसाच ७ वर्षाच्या रमेशन तिचा पदर धरला.
'माय पयले जेवाले दे ना वो, तू जाशीन मंग कवा येशीन पत्ता नाई तवापरंत म्या कसा राऊ वं .. लई भूक लागली व माय ??"
सुंता रागानं डाफरली त्याच्या कानाखाली सटकन दिली. पहिले एक मग दुसरी ..
"मसण्या, मले खा भूक लागली तं, अर्धी त त्या भडव्या कंत्राटान खाल्ली रोज थोडी थोडी.. तीन दिसापासून त्याच्या समोर गोधडीवाणी बिछली लक्तर तोडले माहे त्यानं, त्याउपर राब राब राबून काम बी करून घेत्लन पण तरीबी माही रोजंदारी नाई देल्ली कुत्र्यानं. मजा नाई आली म्हने त्या भाडखाऊले. ...बाकी अर्धी तुह्या बापानं खाल्ली दारूसाठी..रोज खाऊ रायला, आन तरीबी काही उरली आसन त खाउन घे तू बी. तितकी बी कायले शिल्लक ठीवता संपवून तरी टाक ना यक्दाची, माह्या मागची लगलग तरी संपन" म्हणून तिने पायानेच झटका दिला. लेकरू गोधडीवर जाउन पडलं हुंदके देऊ देऊ रडू लागलं.
सुंतान पिशवी भिरकावली दूर अन गप्पकन खाली बसली. दोन पायात मुंडक घालून हमसून हमसून रडू लागली.
थोडा वेळ गेला असेल .. कोवळा नाजूक हात तिच्या डोक्यावरून फिरायला लागला.
" माय रडू नगस, गेली माही भूक पाय, खरच माय गेली माही भूक'' हुंदके देऊन म्हणू लागला.
मायनं ओढून त्याला कुशीत घेतलं. त्याचे दोन पापे घेतले. उठली अन निर्धारानं लगबगीनं चुलीजवळचा उरलेला एकुलता पिठाचा डबा पिशवीत घातला अन......
डबा विकून लेकरासाठी काय काय आनायचं विचार करतच पदराने डोळे पुसत बाहेर पडली.
रश्मी
१४/०४/२०१६
खूप सुंदर कथा आहे...🙂
ReplyDelete