Monday, 30 April 2018

कवडसे ...

#लघुकथा


खिडकीतून थेट येऊन फरशीवर लांब पसरलेल्या दोन कवडश्यांशी मितालीचा खेळ चालला होता. खिडकीच्या गजांनी विभागलेले, भुरभुर दिसणारे सोनरंगी-चमचमते दोन कवडसे...  दोन बाजूने दिवाण खोलीत पसरले असायचे. त्या दोहोत पडलेल्या दुहित उभे राहून दोन कवडश्यांना एकहाती पकडण्याचा खेळ खेळण्यात चार वर्षांची चिमुकली दंग व्हायची. दोन कवडश्यांना कधीचे तिला एकत्र आणायचे होते. कधीतरी हे दोन्ही कवडसे हाताने धरून एकत्र करूया अशी निरागस मनाची स्वप्नील कल्पना नितळ आरस्पानी डोळ्यात डोकावत दिसायची.  त्या दोहोंच्या मधोमध उभ राहून पाय फाकवुन हात पसरून दोहोंना एकत्र स्पर्शायची धडपड रोज दुपारी करत राहायची. एक कवडसा हातात आला कि दुसरा दूर राहायचा, मग ती महत्प्रयासाने पुन्हा दोन्ही पाय अधिकाधिक पसरून..  हात लांबवून कवडसे मुठीत घेऊ बघायची. ते तसे हातात येतच नाहीयेत हे लक्षात यायचे मग ती खाली बसून..कधी लोळून जमेल तसे ते दोन्ही कवडसे एकाच वेळी स्पर्शण्याचा तिचा वेडगळ चाळा अखंड सुरु  ठेवायची. दुपारी दीडेक वाजेपासून डोकावणारे कवडसे जागा बदलत ऊन-सावली होत फिके पडत अखेर जागा सोडायचे तोवर दोन कवडसे जोडायची अन मुठीत धरून ठेवायची लगबग संपायचीच नाही. जरा उतरणीवर  उन्ह कलायला लागली कि  जाता जाता काही क्षण दोन्ही कवडसे जरा जवळ आल्यागत व्हायचे आणि तेव्हाच मिताली समाधानाने तिथेच जमिनीवर त्यांच्या मध्यात कुशीत शिरल्यागत शांत प्रसन्न व्हायची.

उन्ह उतरून सांज व्हायची .... आणि मग रात्र ..

आपापली काम आटोपून घरी परतलेल्या आई बाबांना एकत्र एकहाती धरून ठेवायची तिची धडपड पुन्हा सुरु व्हायची ... सुरु राहायची

त्या दोघांमधील तप्त उन्ह उतरणीची वाट पाहतच  ...  दोघांच्या मध्ये कधीतरी मग एकटीच झोपी जायची...


(C)रश्मी पदवाड मदनकर
26 एप्रिल 18

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...