Thursday, 8 February 2018

फुगे .. !



आज सकाळी आरव चक्क चोरी करतांना पकडला गेला. काही दिवसांच्या आरवच्या वागण्यानं शशांक वैतागला होता. आज त्यानं आरवला चांगलाच चोप दिला. त्याच्या गालावर पाठीवर वळ उमटून आले होते.. एरवी ६ वर्षाच्या त्याच्या लाडक्या लेकाला काही कमी पडू नये म्हणून राबणारा शशांक कालपासूनच जरा जास्तच चिडला होता. काल टीचर-पॅरेण्ट मीटिंग होती शाळेत. निकाल घसरला होताच शिवाय 'हल्ली आरवचं शाळेत अजिबात लक्ष नसतं, तो त्याच्याच तालात मग्न असतो' या  टिचरच्या शब्दावरूनही जरा वाईटच वाटलं त्याला. आपण कुठे कमी पडतोय का म्हणून त्यालाच गिल्ट यायला लागलं. असं गिल्ट आलं कि तो जास्तच चिडचिड करायचा. त्यात आज हा प्रताप आरवनं केला होता. आरवला खिशातून गुपचूप  पैसे काढतांना पाहून शशांकचा पारा पार बिघडला, तापला आणि आरवला त्याने नको तेवढे चोपले. मालतीचा जीव कळवळत होता, ती दोघांमध्ये बचावाला आली तर शशांक  संतापून ओरडला... '' थांब आई .. तुझ्याच  लाडानं शेफारलाय तो..आज ह्याला सरळच करायचंय, अजिबात जेवायला द्यायचं नाही त्याला आज. आणि काही गरज नाही त्याच्याशी बोलायची देखील ...ताकीद समज हवतर ''

आरव रडत खोलीत पळाला.

दुपार झाली .. शशांक दिवाणखान्यातून हलेना. आरवच्या खोलीत जायचा रस्ता दिवाणखोलीतूनच जात होता.
त्याला कुठं कुठं लागलं असेल..उपाशी झोपला असेल का म्हणून मालतीचा जीव खालीवर होत राहिला. पिल्लाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याला असा मार खायला लागला म्हणूनही तिला वाईट वाटत होते. 

शशांकचा राग माहिती होता तिला... तरीही जरा हिम्मत करून ''थांब मीच विचारते त्याला जाब, असं कसं वागला हा कार्टा' म्हणत आरवच्या खोलीत जाण्याचा प्रयत्नही केला. शशांकन डोळे काढले तशी ती परत फिरली.

दुपारचे ३ वाजले. मालतीच मनच लागेना, फार चलबिचल व्हायला लागलं. काय करावे उपाय सुचेना. आरवचा निरागस चेहेरा डोळ्यासमोर येत राहिला. त्याला कुशीत घेऊन त्याचा आवडता मऊ वरणभात जेऊ घालावा म्हणून कळवळत होती ती. आरवच्या आठवणीने तिचा कंठ राहून राहून भरून येत होता.. शशांक त्याच्या टॅबमध्ये डोकं घालून बसला होता. कसं उठवावं बरं ह्याला.

ती बाहेर आली, ''शशांक अरे छातीत दुखतंय रे थोडं.. घाबरल्यासारखंच होतंय, बीपीच्या गोळ्या संपल्यात काल.. आज घेतलीच नाही म्हणून असेल का रे? ''

''तुझ्या गोळ्या संपल्या आणि तू मला आता सांगते आहेस? तुला कितीदा सांगितलंय आई गोळ्या संपायच्या आत सांगत जा..तुला कळत नाही का तुझं चांगलं असणं किती महत्वाचं आहे ते''
इतकं बोलून शशांकनं किस्टॅन्ड वरून गाडीच्या चाव्या घेतल्या आणि औषध घ्यायला तो बाहेर पडला.

मालतीनं लगेच चीजपोळीचा रोल आणि थोडा वरणभात थाळीत घेतला अन भरभर आरवच्या खोलीत आली.

आरव छताकडे पाहत शांत बेडवर पहुडला होता.

'मिंटू' .... तिनं लाडात हाक घातली, तसा शहाण्या मुलासारखा आरव उठून मांडीघालून बसला.
तिनं त्याला जवळ घेतलं.. फार लागलं का बाळा म्हणत त्याच्या माथ्याचा पापा घेतला.

आरवनं मानेनंच नाही म्हंटलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

चल पटकन जेऊन घे ह शोनु ..तुझ्या आवडीचं आहे बघ सगळं''

'आज्जी.....' आरवचा निरागस आवाज

दोन मिनिट शांतता

'आज्जी, मला नाही जेवायचं... त्याबदल्यात मला २० रुपये देशील ? '

मालतीला धस्स झालं..आज सकाळच्या ह्याच्या प्रतापामुळे शशांकनं ईतका मार दिला तरी ह्याला अजून पैसेच हवे आहेत. तिलाही जरा रागच आला.

'आरव काय हट्ट चाललाय, कशाला हवेत तुला पैसे ?' तीनही डोळे वटारून आवाज चढवला

'आज्जी मला नं गॅस फुग्गे घायचे आहेत'

'फुग्यांसाठी आरव, अश्या फुटकळ गोष्टीसाठी तू पैसे चोरत होतास, एवढ्यासाठी ईतका मार खाल्ला ? असा कसा  निर्ढावलास रे ..'
आजी नाराजीनेच जायला निघाली.

आरवनं तिचा हात धरला ''आज्जी, मला नं त्या फुग्यांवर 'सॉरी' लिहून आभाळात सोडायचे आहे.. उद्या माझा वाढदिवस आहे ना..माझा जन्म झाला म्हणून आईला वेदना सहन कराव्या लागल्या होत्याना गं, म्हणूनच ती सोडून गेली नं आपल्याला, मला तिची माफी मागायची आहे ...एकदाच''

मालती थिजली तिथेच .. इवल्याश्या आरवच्या तोंडून इतके मोठे शब्द ऐकून तिचे काळीज पाघळत गेले.
 तिनं चटकन खेचून त्या बिनआईच्या लेकराला कुशीत ओढले ...

आणि आजी-नातवाने मग बराच वेळ अश्रूंना आकाश मोकळे करून दिले.....

 
रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...