तो उपाशीच निघून गेलाय म्हणून दिवसभर तिचं मन लागलं नाही. आपण फार दुखावलं त्याला विचार करून तिच्या मेंदूचा भुगा झाला होता.
तिची संध्याकाळही तशीच धुरकट होत गेली. अक्ख्खा दिवस ओघळता गेला बाहेर आकाशी मेघ दाटलेले अन इकडे मनात मळभ, डोळ्यात ओल साठली राहिली दिवसभर. अश्रूंचा पाऊस कोसळत राहिला. कालरात्री त्याचं अन तिचं असं भांडण झालं. तो सकाळी न बोलताच निघून गेला. निघून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली. त्यानं एकदाही पाठी वळून पाहिलं नाही. 'रात्रभर माझी अवस्था काय झाली असेल ह्याच्याशी ह्याला कसलेही देणेघेणे नाही' तिला हुंदका आवरला नाही अन मग सगळंच ओसंडून वाहू लागलं. 'माझ्या भावनांची किंमतच नाही याच्या लेखी' तिला पुन्हा भळभळून आले.
काल प्रसंगच तसा घडला होता ..
त्याला आवडते म्हणून कित्तेक दिवसांनी तिने हातभर मेहेंदी लावली होती. स्वतःच्या हातांकडे अन त्या गडद रंगलेल्या मेहेंदीने खुललेल्या सौंदर्यास बघून तिलाच कसलं अप्रूप वाटत होतं. सकाळी ती कुठली कुठली कारणे शोधून त्याच्या पुढे पुढे करत राहिली पण तो त्याच्या टॅबमध्ये तोंड खुपसून बसलेला. कामात प्रचंड मश्गुल झालेला.
मग तिने शक्कल लढवली. .. तिला मोगरा आठवला ...
मोगरा त्याला कित्ती आवडायचा... लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातले ते मोहमयी गंधाळलेले दिवस आठवले. तिच्या लांब केसांत माळलेला मोगरा पाहून तो वेडावून जायचा. कित्तेक वेळ तिच्या जवळ जवळ करत असायचा, तिच्या केसात मान घालून मोगऱ्याच्या गंधान धुंद व्हायचा .... तिला आठवलं, चेहेऱ्यावर खट्याळ स्मित आलं. धावत अंगणात जाऊन ओंजळभर मोगऱ्याची फुले ती घेऊन आली. छनछन करत आत येऊन त्याच्या पुढ्यात उभी झाली अन मेहेंदीने रंगलेली मोगऱ्याची ओंजळ त्याच्या पुढ्यात धरली. त्याने वर न बघताच त्यातली दोन फुले वेचली, नाकाशी नेली हुंगली अन पुढ्यात ठेवलेल्या टी-पॉयवर ठेवून दिली. ती
फारच हिरमुसली, उदास झाली. मेहेंदी भरल्या हाताकडे कटाक्ष टाकला आणि वळून जायला लागली तेवढ्यात त्याने आवाज दिला.
'मने'
'आह्ह ! त्यानं बघितलंय'
तिच्या गालात हसू खुललं.. ती वळली ...
तो म्हणाला
"अगं ऐक ना, आपली आता यावेळची ही २५ लाखांची बिजनेस डील पूर्ण झाली ना की आपण मोठी गाडी घेऊया मस्त प्रशस्त आपल्या स्टेटसला शोभेल अशी...त्याचेच फोटो बघतोय .. कसली साली सुंदर कार आहे बघ .."
तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं... त्याच्या २५ लाखाच्या स्वप्नात तिचे २५ रुपयांचे सत्य विरून गेले होते. मनभर पसरलेला आनंद करपून निघाला होता आणि त्याला जाणीवही नव्हती. तिने टी-पॉयवर ठेवलेल्या फुलांना हाताने चुरगाळून फेकून दिले अन ती रडतच निघून गेली. अर्ध्यारात्री कधीतरी त्याने तिच्या अंगावर हात ठेवला अन तिचा बांधच फुटला.
"मला विकलं तर कित्ती पैसे मिळतील रे... तेवढ्या पैशात तुझ्या स्टेटसला शोभेल अशी कार येईल का?"
तिने ओघळत्या आसवासह प्रश्न केला अन तोही चिडलाच ..
"आता आता कुठे यश मिळायला लागलंय खुपतंय का ग तुला?? बघवत नाहीये का??"
तिला बोलले ते शब्द अन मग सारेच विस्कटले. संपूर्ण रात्र गडद अधिक गडद होत गेली.
******************************
ती तशी स्वप्नाळू. आयुष्याच्या लहान लहान गोष्टींमध्ये सुख शोधणारी. प्रेम हाच जगण्याचा आत्मा समजणारी. 'तो' म्हणजेच तिचं सारं विश्व. त्याच्यासोबत हातात हात घेऊन आली तेव्हा संसाराचे किती किती स्वप्न पाहिले होते तिने. राजाराणीचा संसार. त्यानं कमावून आणलेल्या चार आन्यातही संसार थाटू एक भाकरी मिळाली तरी वाटून खाऊ पण दोघात अंतर येता कामा नये. प्रेमात गळती होता नये. नंतरही कित्तेक अडचणी आल्या, संकट ठाण मांडून बसले पण तिचे सगळे वागणे सगळ्या क्रिया प्रतिक्रिया त्याच्यासाठीच असायच्या. त्याच्याच अवती-भवति तिचं आयुष्य फिरायचं. त्याचं मात्र वेगळं होतं. तिला मिळवायला जितकी धडपड त्याने केली होती ती मिळताच ती संपली. टार्गेट पूर्ण झाले होते. त्यानंतर त्याचा प्रवास सुरु झाला तो पैसा, प्रेस्टिज आणि प्रोग्रेस मागे धावण्याचा. पुढली सगळी धडपड मोठा माणूस होण्याची. त्याच्या मोठमोठ्या स्वप्नात तिची छोटी छोटी स्वप्न झाकोळली गेली. पण तरीही ती खुश होती, संसार सांभाळत जपत जगत होती. थोडा पैसा मिळाला कि संपेल आपली हि जगण्याची तगमग ती स्वतःला समजवायची. पण थोडा पैसा आला कि सुरु व्हायचा प्रवास दुसरे टार्गेट पूर्ण करण्याचा. त्याचा प्रवास श्रीमंतीकडे आणखी पुढे आणखी पुढे न संपणारा ....आणि तिचा प्रवास मात्र संपला होता ती थिजली होती जागीच त्याची वाट पाहण्यात. सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलेला नवरा येऊनही परत यायचाच नाही तो मनाने तिथेच असायचा कामाच्या भाउगर्दीत, पैशांच्या हिंदोळ्यावर झुले घेत. त्याच्याच आसपास वावरणारं तिचं अस्तित्व तर कित्तेकवेळा त्याला जाणवायचंही नाही. खरतर त्याच्या लेखी या सगळ्याचं महत्वही नव्हतच. तिच्या लेखी सुख पैशान मिळणार नव्हतच. ते तिथेच पडलं होतं घरात त्यांच्या शयनकक्षेच्या कोपऱ्यात खितपत.... दुर्लक्षित.
दाराची बेल वाजली तिची विचारांची तंद्री भंगली, अंधारलं होतं सगळीकडे.... 'बापरे, अक्खा दिवस असाच निघून गेलाय ...विचारात' तिने लगबगीने डोळे पुसले. दिवे लावले अन ती दार उघडायला धावली.. दाराजवळ जाउन उंच श्वास घेतला स्वतःला सावरलं अन दार उघडले .... पुढ्यात तो उभा होता तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघत, लाल झालेले डोळे त्याचीही अवस्था दिवसभर तिच्यासारखीच असल्याचे सांगत होते. तो सुखरूप होता न कळत तिच्या मनात समाधानाची कळ पसरली ... थोडं संकोचतच ती वळली अन आत आली. त्याच्यासाठी काहीतरी खायला करावं म्हणून स्वयंपाक घरात गेली. दोन पाच मिनिटे गेली असतील त्याचा स्पर्श जाणवला तिला. तिच्या लांब सडक केसांत तो मोगऱ्याचा गजरा माळत होता. तिचे डोळे भरून आले. त्याने तिला डायनिंगच्या खुर्चीवर बसवले. तिचे मेहेंदीने रंगलेले दोन्ही हात हातात घेतले. ते डोळ्याला लावले अन स्वतःचा चेहेरा त्या हातांनी झाकून घेत उर भरून श्वासात तो गंध भरून घेतला. ती हे सगळं अवाक होऊन बघत होती .... त्याने शेजारच्या खुर्चीतली पळसाची फुले उचलली अन तिच्या ओंजळीत ठेवली. पळसाची फुले बघताच तिचे सगळे अवसान गळून पडले. ती हमसून हमसून रडू लागली ......... हि पळसाची फुले तिच्या आवडीची. लग्नाआधी ती दोघं भेटायची त्या स्थळी असलेल्या एका झाडाला येणारी ..शहरापासून २५ किमी दूर असलेले. तो तिथे जाउन आलाय आपल्या विरहात तोही तितकाच व्याकूळ होता हे लक्षात आले तिच्या अन रडतच तिने मिठी मारली त्याला .... पळसाच्या केसरी रंगात गैरसमजाचे सगळे रंग उडून गेले होते. अन मोगऱ्यासारखी दोघांचीही मनं शुभ्र गंधमय होऊन फुलून आली होती ....
आणि तिच्या मनात अमृता प्रीतमच्या ओळी रुंजी घालू लागल्या
जिंदगी के उन अर्थो के नाम _ जो पेडों के पत्तों की तरह चुपचाप उगते हैं और झड जाते है!!!!
दूर कुठेतरी रेडिओ वाजत होता ....
मेरे घर आना ... आना जिंदगी .... जिंदगी
No comments:
Post a Comment