Friday, 10 May 2019

गेले द्यायचे राहून ...


बारा, साडेबारा झाले असतील. थंडीच्या दुपारच्या उबदार सोनजर्द उन्हासारखा आजचा दिवस तिला हवाहवासा उगवला होता. कोपऱ्यातल्या रेडिओत मंद आवाजात किशोरींची रागदारी सुरु होती 'अवघा रंग एक झाला...', शब्द वातावरणात भरून राहिले होते. गुणगुणतच आभानं पुन्हा एकदा आरशात वाकून पाहिलं. साडीच्या निऱ्या नीट केल्या. खांद्यावर घेतलेला पदर एकेरी करत हातावर पसरून घेतला. हातातल्या कंगनाची किणकिण झाली. कानातले डूल हळूच हलले, डोळ्यांची लकलक अन ओठांवर स्मित पसरलं. आज तिच्या मनभर चांदणं फुललं होतं. ती आरशाजवळ अगदी जवळ आली हाताने केस नीटशे करीत अगदी पुढ्यात दिसणाऱ्या पांढऱ्या केसांना उगाच लपवण्याचा प्रयत्न केला ...आणि आपण हे काय वेडे चाळे करतोय म्हणून परत तिचे तिलाच हसायला आले.


जसजशी वेळ जवळ यायला लागली तिला अधिक बेचैन व्हायला लागले, आज जणू तिचा चातक झाला होता. ती पुन्हा पुन्हा जाऊन डायनिंगवरची जेवणाची भांडी नीट करू लागली. फ्लॉवरपॉटमधल्या निशिगंध फुलांना पुन्हा रचून ठेवू लागली. लक्ष सारं दाराकडे लागून होतं. आज सारं सारं त्याच्या आवडीचं असावं याची विशेष काळजी तिनं घेतली होती, त्याला आवडतात म्हणून निशिगंधाची फुलं फुलदाणीत सजवली होती. त्याच्यासाठी म्हणून पुरणपोळी अन पुडाची वडी तयार होती. त्याच्या आवडीच्या लिंबूरंगाची सुती साडी नेसली होती. खूप वर्षांनी तो येणार होता, जवळ जवळ २० वर्षांनी. तिच्या हृदयाचे ठोके वाऱ्याच्या गतीने धडकत होते. वारंवार नजर घड्याळीकडे जात होती. तिची अस्वस्थता तिच्याच लक्षात आली आणि ती पुटपुटली

'काय हे विभा, वयाच्या पन्नाशीत नवतरुणीसारखी काय वागतीयेस. गेले अगं तुझे ते दिवस सावर स्वतःला' तिला उगाच हसायला आलं. तिनं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. सोफ्यावर बसत पुढ्यात ठेवलेलं मासिक हातात घेत ती ते चाळत बसली. पण मन लागेना .. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या अंगणात सांडलेल्या अर्धमरगळल्या पिवळ्या-पांढऱ्या चाफे फुलांकडे पाहत तंद्री लागली आणि विचारांच्या आवर्तनात मागले २५ वर्ष भरभर सरकत गेले...

'आपली अवस्था या चाफ्याहून वेगळी नाही. पूर्ण फ़ुलण्याआत आयुष्यात वादळ घोंगावत आलं, नाही सावरून धरता आलं आपल्याला सगळं एकत्र आणि अखेर गळूनच पडलं सारं.. न धड फुलता आलं न पूर्ण वाळून, चुरगाळून जाता आलं. फक्त विस्कळत गेलं सगळं...'


बाहेरच्या ओसरीवर त्याच्या पावलांचा आभास ..दाराची बेल वाजली... तंद्री भंगली. डबडबलेल्या डोळ्याच्या कडा पुसत शांतपणे साडी सावरत ती दाराकडे चालत गेली.

एक लांब श्वास .. दाराची कडी उघडली.


काही मिनिटं गेली तशीच ....एकमेकांकडे पाहत, हृदयाची धाकधूक सांभाळत.

व्याकूळ हालचाली सावरत ..दोघंही भानावर आलीत.

''ये आत'' ती

तो आत येऊन बसला. अवखळत-संकोचत.

तिनं पाणी आणलं. पुढ्यात ठेवलं. अन समोरच्या सोफ्यावर बसली.

संपूर्ण घरात एक निरव शांतता कोंदून राहिल्याचा भास.

''कसायेस ?'' ती

''ठीक....तू?''

''बरीये ! कुठे होतास एवढे दिवस ?''


काही सेकंड अशीच .. त्याची नजर शून्यात , एक निश्वास टाकत तो म्हणाला

''हरवलो होतो ...''

ती .... साश्रू निशब्द

काही क्षण पुन्हा शांतता..


बराच वेळ तसाच गेला... शांत..स्तब्ध


त्याने संकोचत प्याला उचलला घटाघटा पाणी प्यायला अन पुन्हा ठेवून दिला

त्यानं एकदाही तिच्या डोळ्यात डोळे घालून पहिले नाही. ती मात्र त्याच्याकडे टक लावून पाहत होती.


पूर्वीचे राजबिंडे स्वरूप लोप पावले होते ....डावीकडे झुकती त्याच्या ओठांची हास्यरेषा आठवली तिला, डाव्या गालावर खळी पडायची..डोळ्याची चमक आणि गालातली खळी एक प्रसन्न मुद्रा परावर्तित व्हायची. बघत राहावं वाटायचं, वाटायचं हे स्मित असंच राहावं कायम आणि आपण हरवले जावं या मुद्रेच्या गावात आयुष्यभर. जगण्याचं रसरशीत बेफाम वेड, व्यसनात जगणं आणि नंतर जगण्याचंच व्यसन करत गेलेला हा, असं बेबंद वागणं ह्याला कुठल्या मार्गावर घेऊन गेलंय, कि आपल्या अपेक्षांच्या ओझ्यानं अन नंतर वियोगानं विखुरलाय हा? रणरणत्या उन्हात भटकून भटकून पार रुक्ष होऊन त्वचा काळवंडली जावी तशी त्याच्या तनामनाची अवस्था झाली होती. याचं असं तुकड्या तुकड्यात बोलणं, नजरेला नजर न देणं.. डोक्यावर भूतकाळातल्या स्मृतीचं प्रगाढ ओझं घेऊन हा ओढतोय जगणं बहुदा ..




तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं...




खालच्या मानेने टेबलवर उगाचच रेघोट्या ओढत काही क्षण भयंकर शांततेत गेले... पापण्यांआड पाण्याच्या लाटांवर लवलवणा-या बिंबाकडे एकटक पहात हरवली ती, तो पुढ्यात असूनही तिचं मन त्याच्या भूतकाळातल्या प्रतिमेभोवताल पिंगा घालत होतं. पुन्हा विचारांची आवर्तनं

'हे काय झालंय याच? एकेकाळी ह्याच्या राजसी रुपावरच तर भाळलो होतो आपण? त्याचं बहारदार बोलणं, चालण्यातली ढब, गोरंपान रुबाबदार रूप सगळं सगळं आपलं व्हावं अगदी हक्काचं म्हणून घरी झगडलो होतो. अतिशय सुसंस्कृत घराणेशाहीतून वाढलेली आपण त्याच्या अगदीच साधारण निम्नवर्गीय घरात जायला तयार झालो होतो... नाही किंबहुना आसुसलो होतो. आपलाच तर निर्णय होता ह्याच्याशी लग्न करण्याचा. किती स्वप्न होतीत आपली संसाराची, जोडी-गोडीच्या आयुष्याची. पण काच फुटायला अन स्वप्न तुटायला कितीसा वेळ लागतो ... संसार मोडायलाही तेवढाच वेळ लागला... यालाही असेल का त्या संसार मोडण्याचे दुःख, ह्याच्या मनाचा काहीच थांग लागत नाही..अजूनही तसाच..आत्ममग्न.'




एक सुस्कारा.. आसपास नीरव शांतता, तिनं त्याच्याकडे पाहिले... सोफ्याला टेकून डोकं मागे रेटून वर छताकडे पाहत तो कुठल्या विचारांच्या हिंदोळ्यावर होता कुणास ठाऊक. दोघं आपापल्या विचारात गढली होती. कुठल्या क्षणी नीटनेटक्या संसाराची घडी चुरगळायला लागली कुठला होता तो घातक क्षण जेव्हा एकमेकांची साथ सोडत दोघांनाही पायउतार व्हावे लागले. ती आठवत राहिली. पुन्हा तिच्या विचारांचे चक्र गरगर फिरत राहिले.




'हा असाच आहे ..होता, समजायला वेळच लागला आपल्याला. लग्नाआधी उमेदीच्या काळात याच्या ज्या ज्या गोष्टी आकर्षक वाटल्या त्याच संसार करताना खटकत राहिल्या. संसार दोघांचा नव्हताच तो. हा असूनही कुठं होता .. मी एकटीनंच तर निभावत होते. आयुष्याचा मोठ्ठा प्रवास एकटीनं पार करणं जिकीरीचंच नव्हतं का? पलीकडे, त्या टोकाला पोहोचायचं असतं सगळे खाचखळगे पार करत ... साथ नको ? फक्त प्रेम आहे म्हणून कसा ओढायचा एकटीनं रहाटगाडा? चूक झाली होती आपण दोन ग्रहावरची दोन नक्षत्र काय सिद्ध करायला एकत्र आलो होतो कोण जाणे ... पण अपयशी झालो ना रे...

चूक करण्यासाठी काही क्षण पुरतात, पण ती चूक पेलत राहावी लागते सबंध आयुष्य !! इकडे हा वाहवतच चालला होता. आशेचे एक एक दार बंद होतांना दिसत होते....खूप खूप तडजोडी करूनही, खूप प्रयत्न करूनही हा सुधारू शकेल असे वाटले नाही. अंशू झाल्यावर तर याच्या वाईट वागण्याची सावली देखील तिच्यावर पडू द्यायची नव्हती. खूप संधी दिल्या आपण, पण याला नव्हतेच जमत सुधारायचे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जाऊ लागली, नाही निभावता आले आपल्याला. मन मारून, इच्छा आकांक्षा दडपून, मनाची दारं घट्ट बंद करून आतल्या आत हुंदके देत बसण्याचा, क्षणोक्षणी पराभूत होऊन जगण्याचा कंटाळा आला होता, त्याच्या निम्नस्तरीय वागण्या बोलण्याच्या तऱ्हा, वाहवत गेलेल्या, व्यसन जडलेल्या, कर्जाने पिचलेल्या ह्याला मग एक दिवस सोडूनच देण्याचा निर्णय घेतला. नाती-गोती, घरदार सगळं सोडून नोकरीच्या भरवशावर फक्त अंशुला सोबत घेऊन पुण्यातून मुंबईत दाखल झालों आपण...त्यानंतर नाहीच वळून पहिले कधी... हो आठवण येत नव्हती असे नाही, पण कशालाच काही अर्थ राहिलेला नसताना त्याच्या अश्या अर्थहीन क्षुल्लक कृतींची मीच आवर्जून दखल घेण्याला अन त्यात ताटकळत पडण्याला काहीच अर्थ नव्हता. पुन्हा पुन्हा नव्यानं जखमी होऊन पुन्हा पुन्हा त्याच्या कुंपणाच्या आत निमुट परतायची ताकद संपली होती माझी. आणि मग माझ्या आयुष्यातला तुझा अध्याय मी कायमचा बंद करून टाकला.' तिच्या मनात विचारांचे वावटळ सुरूच होते, डोळ्यातून अश्रू वाहू लागले..



पण, आज त्याच्याकडे पाहून तिचे मन कारुण्याने भरून गेले होते... ह्याला असे एकट्याला सोडून देण्यापेक्षा ह्याला सावरायला हवं होतं का आपण? ह्याच्या या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत का?' खूप कंठ दाटून आला तिचा...



तो अजूनही आढ्यावरचा गरगरता पंखा पाहत, कुठल्याश्या विचारात मग्न होऊन बसला होता.



डोळ्यातले पाणी लपवायला ती उठली डायनिंग जवळ जाऊन उभी राहिली...


''चल जेवून घेऊया, भूक लागली असेल ना तुला ?''


''नाही भूक नाहीये अजून, तुला पाहून भूकच गेली माझी'' तो तिच्याकडे बघत अवखळत बोलला.


''पण मला लागलीय ना तुला बघून भूक... आज..ये आधी जेवून घेऊ मग बसुया निवांत बोलत.'' ती त्याच्या डोळ्यात बघत.


अन्न गरम करायला म्हणून ती आत गेली. तो जागचा उठला. घर न्याहाळू लागला. फुलदाणीतल्या निशिगंधाला स्पर्श केला. बाजूला ठेवलेल्या अंशू अन आभाच्या फोटोकडे एकटक बघत राहिला. फार बदललं होतं सारंच, अंशू तर तिच्या आईसारखीच सुंदर आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. एवढ्याश्या वयात मिळवलेल्या अनेकानेक यशाची आभा तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टच दिसत होती.. अंशू अन आभा सोडली तर निशिगंधाच्या फुलांचाही त्याला विसर पडला होता.

पाण्याने भरलेला जार तिने डायनिंगला आणून ठेवला त्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. अन तो हात धुवायला वॉशरूमकडे वळला.

..........


व्यसनं, कर्ज ह्यानं पिंजून जनावरासारखं वागणं घरातली चिडचिड, आभा-अंशुवर हात उचलणं .. भुतकाळातील हे सगळं आठवून दिवाकर भावुक झाला होता. हा त्रास टाकून आभा निघतानाचा तो दिवस ते क्षण दिवाकरच्या नजरेसमोर उभे राहिले. तिचं हवं नको ते सारं सामान तीनं भावाच्या मदतीनं आधीच पाठवून दिल होत. जायच्या दिवशी देवाला हात जोडून एक बॅग हाती घेऊन अंशुला घेऊन ती निघाली होती. रेल्वे स्थानकावर आभा पुढे पुढे चालत होती आणि दिवाकर पावणे चार वर्षाच्या अंशुला छातीशी घट्ट पकडून आभाला थांबवण्याचा प्रयत्न करत तिच्या मागे मागे. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. दिवाकरने अंशूचे पटापट पापे घेतले अन आभाला ऐकायला जाईल या भाषेत म्हणाला


''तुझा बाबा तुला लवकरच घ्यायला येणार आहे..पण तोवर आईला त्रास देऊ नको बाळा, मी आजवर दिला तो त्रासच फार झालाय तिला '' आभानं वळूनही पाहिलं नाही..आणि गाडी अंतर वाढवत दूर निघून गेली.



त्याचे हे शेवटचे वाक्य मात्र आयुष्यभर अखंड त्रास देत राहिले आभाला. त्या दिवसानंतर तो कुठे आहे, कसा आहे ह्याची साधी विचारपूसही तिनं केली नाही. उलट कुणीच त्याचा विषय काढू नये कारण त्यामुळे अंशुला आठवण येऊन त्रास होऊ नये.. आणि तिला स्वतःलाही एकट्यानं खंबीर उभं राहता यावं म्हणून ती झटत राहिली.


''मी निघून गेल्यावर काय केलंस रे, कधी पुन्हा लग्न करावं नाही वाटलं? '' आभाच्या प्रश्नानं त्याची तंद्री तुटली.


एक लांब सुस्कारा .. ''तू गेल्यावर तुला परत आणायला म्हणून सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होतो, दारू सोडून दिली.. कर्ज मात्र माझी पाठ सोडत नव्हते खूप गुंतत चाललो होतो. तुझ्या परत येण्याच्याही साऱ्या आशा नाहीत जमा झाल्या. मी आतल्या आत खंगत होतो. मग एक दिवस त्वेषात येऊन ते घर, शहर सारं सोडून निघून गेलो.. भटकत राहिलो पाय आणि मन नेईल तिकडे.. तुम्हा दोघींचा शोध घेत वणवण झाली जीवाची. नाहीच भेटल्या तुम्ही कुठेच; हळू हळू जीव तुटणं बंद होऊ लागलं, आपले हक्काचे जिवाभावाचे कोणीच नाही, आपण एकटेच उरलोय या विक्राळ जगात हे मान्यच करून टाकलं होतं. खूप भिरभिरलो, टक्के टोणपे खाल्ले, हाल-अपेष्ठा सहन केल्या आणि तेच सारं मग अंगवळणी पडलं.'' हे सगळं सांगतांना दिवाकरची नजर अंगणात विखुरलेल्या पाचोळ्यांकडे लागली होती. आभाचे डोळे मात्र पूर्णवेळ पाझरत राहिले.



पुन्हा दोघात शांतता ..


आभाचे मन पुन्हा भूतकाळाच्या हिंदोळ्यावर सवार झाले 'हे काय करून बसलो आपण .. ह्यानं त्या त्या वेळी अगदी आपल्या कोवळ्या वयात, उमेदीच्या काळात केलेल्या अनेक चुका नव्हे गुन्हाच, आपण माफ करू शकलो असतो का ? ह्याचा संसार न मोडता सहन करत आपल्याला जगता आले असते का असे प्रश्न ती स्वतःलाच विचारत राहिली .. मनात आले नाही नाही नसतेच झाले सहन, आणि का म्हणून सहन करायचे. फक्त आपण प्रेम केले होते याच्यावर म्हणून ? पण आपण सहन करत राहिलो असतो तर सुधारला असता का हा? ... आशूच्या असण्यानं आपल्या जगण्याला एक ध्येय तरी होतं.. पण आपल्या जाण्यामुळे फाटका झालेला संसार आणि वणवण झालेल्या जगण्याने पार नासवून टाकलं एका आयुष्याला' विचार करतच तिनं पदर डोळ्याला लावला.


''तुला नाही आली कधी आठवण ?''


दिवाकरांच्या प्रश्नानं ती जरा बावचळली, स्वतःला सांभाळत स्मित करत बोलती झाली.


''आठवण...अनेकदा यायची..माझ्यासाठी नव्हे पण अंशूसाठी. मी तिचा बाबा हिरावून घेतलाय हे तिच्या डोळ्यात दिसायचे; पहिले पहिले अनेक वर्ष तेच शल्य टोचत राहिलं. तिचा कुठलाही गुन्हा नसताना ती शिक्षा भोगतेयं ह्याचं दडपण असायचं सतत.. पण नंतर जसजशी मोठी होत गेली हळूहळू स्वीकारत गेली परिस्थिती .. पण मला न सांगता ती तुझा शोध घेत असते हे पाहिलंय मी ... आठवण अश्या सहज पुसल्या जात नाहीत रे. त्रासदायकच असतात त्या. ''


झोपाळ्यावर बसून गप्पा मारता मारता संध्याकाळ होत आली. तांबड फुटलं होतं. सूर्य कलायला लागला होता.



दिवाकर आता खूप शांत झालेला जाणवत होता. त्याच्या श्वासाची गती शांत झाली होती. आभाच्या मनात त्याच्याविषयीची करुणा, माया, ममता, प्रेम, जिव्हाळा सगळं एकत्र दाटून आलं होतं. आपल्या जाण्यानं ह्याच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण भरून काढायची .. निदान आयुष्याच्या उत्तरायणात तरी सोबत करायची असा निश्चय करून तीने त्याचा हात थोपटला, केसात हात फिरवला अन ती चहा करायला म्हणून आत निघून गेली.



चहाचे कप हातात घेऊन परत आली तेव्हा दिवाकर तयारीत बसला होता..अगदी शांत चित्तानं त्यानं आभाच्या हातातला चहाचा कप घेतला. आभाच्या मनाची मात्र घालमेल चालू झाली. चहा घेऊन झाल्यावर दिवाकरने आभाचे दोन्ही हात हातात घेतले. ''माझ्या पूर्वीच्या सगळ्या चुकांना माफ कर आभा..माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठीच. तुम्ही दोघी आनंदात आहात हे बघूनच मी भरून पावलोय. तुझ्यासोबत मनाजोगता संसार करण्याची इच्छा अखेरपर्यंत अपुरी राहिल, ही खंत शेवटपर्यंत पाठ सोडणार नाही...पण....आता ती सवय नाही राहिली " दोन थेंब घरंगळून तिच्या हातांवर सांडले.



आणि मग तिच्यासारखाच तो निघून गेला ....



रश्मी पदवाड मदनकर
15.11.2018


















1 comment:

  1. अप्रतिम . भावनांचा गुंता खूप छान मांडला आहेस. डोळे पाणावले.. साधे सरळ शब्द मनाला गुंतवतात.

    ReplyDelete

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...