माझं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर लागलेलं. काहीतरी छान वाचत होती. तंद्री लागलेली, गालातल्या गालात हसणं सुरु होतं. तेवढ्यात काच वाजली. ती काचेबाहेरून काहीतरी बोलत होती. हातवारे करत होती.
तिशीतली असेल, नाकीडोळी नीटशी पण जरा मळलेली. रापलेला चेहेरा. ठिगळ लागलेली साडी. विस्कटलेले केस. फारसे लक्ष न देता सिग्नल सुटायची वाट बघत मी पुन्हा मान खाली करत नजर फोनमध्ये घातली. तिने पुन्हा काच वाजवली, आवाज डोक्यात गेला ..रागच आला जरा. काच खाली ओढत ठणकावलेच मी.
''क्या है, दो मिनिट का सिग्नल लगा नही कि आ जाते हो भीक मांगने..शरम नही आती, निकलो यहांसे''
''नाही ताई भीक नग, गजरा हाये.. घ्या कि दहाला तीन लावते.. छान दिसेन तुमास्नी'' ती
मी बघत राहिले तिच्याकडे .. तेवढ्यात सिग्नल सुटले. ड्रायवरने गाडी पुढे घेतली. मागे वळून पहिले. ती धावत होती शेजारी लाल झालेल्या दिव्यात थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने, कुठल्याश्या गाडीचा काच खणखणत 'छान दिसेन तुमास्नी' म्हणत होती. तिचे शब्द कानात घोळत राहिले... माझे मलाच गिल्ट आले. घराच्या प्रशस्थ खोलीत किंवा एअरकंडिशन ऑफिसात बसून टाईमपास करायला पाठवलेले जोक, सुविचार, फॉरवर्ड मेसेजेस वाचण्यात दंग आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून भिकारी आणि काय काय बोलून गेलोय आपण तिला, या गजऱ्याच्या सुगंधावर कुणास ठाऊक कुणाकुणाची पोटं भरतेय ती'
''सचिन, गाडी वळ्व .. युटर्न घे जरा''
त्याच सिग्नलला पोचले. गाडी कडेने लावायला सांगितली. उतरले अन चालतच गेले तिच्याजवळ.
ओळखल्याचा संकेत एक छानसं स्मित देऊन दिला तिनं..
''धाचे देऊ का ताई? बांधून देऊ का लावता हितच ''
मी तिच्या टोपलीतले ३ गजरे उचलले, माझ्या केसांची क्लिप काढली, अन तिच्या पाठी जाऊन तिच्या अस्ताव्यस्त बांधलेल्या केसात माळले. तिच्या केसात मोगरा अधिकच फुलून आल्याचा भास झाला.
''हे काय करता ताई, अव मी गजरे लावून काय करू?''
हातात काढलेली १०० ची नोट तिच्या हातात कोंबली
'लाव गं, छान दिसते तुमास्नी' म्हणत तिला स्मित दिले अन गाडीकडे वळले.
अजून हाताला घमघमाट येतोय तेव्हापासून ....
--
sushrut :- अहा! खूप छान
ReplyDeleteThank u :)
ReplyDelete