महिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली. एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला लागला आहे. या संधीचे सोने करायला आता पुढली पिढीही सरसावली आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय महिलांचा चेहेरा झळकू लागला आहे.
अगदी परवा परवाच फोर्ब्सने 50 टेक कंपन्यांच्या अमेरिकन शीर्ष महिला अधिकार्यांची यादी घोषित केली. या गटात काही चेहऱ्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ते चेहेरे होते कष्टाळू, कणखर, तेजस्वी आणि बुद्धिमान स्त्रियांचे ! भारतीय स्त्रियांचे. यंदा एक दोन नव्हे तर तब्बल चार भारतीय महिलांचा समावेश फोर्ब्ज ने जाहीर केलेल्या पन्नास प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. कोण आहेत या स्त्रिया? यशोशिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी कोणकोणते कष्ट उपसले, आव्हाने पेलली? सिस्को कंपनीची पूर्व चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पद्मश्री वॉरियर, उबर कंपनीची सीनियर डायरेक्टर कोमल मंगतानी, कॉन्फ्लुएंट ची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि को-फाउंडर नेहा नरखेड़े, आइडेंटिटी मैनेजमेंट कंपनी ड्रॉब्रिज ची कामाक्षी शिवरामकृष्णन या भारतीय महिलांनी हे उत्तुंग यश मिळवून अभिमानाचे क्षण देशाच्या झोळीत घातले आहेत.
पद्मश्री वॉरिअर :- आंध्रप्रदेशच्या विजयवाड्याला जन्म झालेली पद्मश्रीने दिल्ली आईआईटीतुन शिक्षण पूर्ण केले त्या ५८ वर्षांच्या आहेत. त्या सध्या चीनची कंपनी नियोच्या यूएस हेड आहेत. याआधी अमेरिकी टेक कंपनी सिस्को सिस्टम्समध्ये चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर होत्या त्यांनी सिस्कोसाठीच्या अधिग्रहण व्यवहारांमध्ये महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावली होती.
कोमल मंगतानी :- धर्मसिंह देसाई इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुजरात येथून शिक्षण पूर्ण करणाऱ्या ४३ वर्षीय कोमल सध्या उंबर कंपनीच्या सिनियर डायरेक्टर आहेत. त्या बिजिनेस इंटेलीजेंस सेक्शनच्या सर्वोच्च अधिकारीही आहेत. एवढेच नाहीतर उबरच्या महिला एनजीओच्या बोर्डमध्येही सामील आहेत.
नेहा नरखेड़े :- महाराष्ट्रातल्या पुणे शहरात वाढलेली आणि शिकलेली मराठमोळी नेहा लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत असतांनाच तिने कॉफ्लुएंटसाठी 'अपाचे काफ्का' सॉफ्टवेयर तयार करायला मदत केली. या डेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेयरमुळे कॉफ्लुएंट कंपनीचा बिजिनेस प्रचंड वाढला आणि हीच विदेशात नेहाची ओळखही ठरत राहिली.
कामाक्षी शिवरामकृष्णन :- मुंबईतून शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत स्थायिक असणारी कामाक्षी आर्टिफिशियल इंटेलीजेंसशी संयोजित कंपनी ड्रॉब्रिजची सीईओ आणि फाउंडर आहे. लोकं कामानिमित्त कुठकुठले डिवाइस वापरतात हे ड्रॉब्रिज ट्रॅक करण्याचे काम करते. हि कंपनी त्यांनी २०१० साली निर्मिली होती. या कंपनीत आतापर्यंत 6.87 करोड़ डॉलरची गुंतवणूक विदेशातून झाली आहे. या आधी मोबाइल अँड प्लेटफॉर्म एडमोब मध्ये निव्वळ डेटा साइंटिस्ट असलेली कामाक्षी आज यशाच्या अनेक पायऱ्या चढत या मानबिंदूची मानकरी ठरली आहे.
या आणि अशा अनेक स्त्रिया विदेशात मोठ्या जबाबदारीची कामे पार पाडत देशाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवत आहेत. तिथे मिळणाऱ्या संधी स्त्रियांना आपले कौशल्य, बुद्धी आणि चमक दाखण्यास कारणीभूत ठरत आहेत. या सर्व स्त्रियांनी आपले कुटुंब, स्वास्थ्य आणि आपले काम यांची कसरत अनुभवली आहे. अनेक आव्हाने पेलत त्या देशाला आणि समस्त स्त्रियांना अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. दीपस्तंभासारख्या या निगर्वी आणि तेजस्वी स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी विविध क्षेत्रात पुढेही येतील यात काही शंका नाही!
रश्मी पदवाड मदनकर
1 dec. 2018
No comments:
Post a Comment