Tuesday 4 September 2018

बँडवॅगन इफेक्ट !!



याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळच्या एका छोट्या गावात तांदूळ आणि खाण्याच्या वस्तू चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना  पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथे घडली होती. नंतरही कधी मोबाईल चोरीच्या संशयावरून तर कधी मुलं चोर समजून, गोहत्या केली म्हणून तर गोरक्षक आहे म्हणून कुठलीही शहानिशा न करता पुढे कुणीतरी दिसतंय म्हणून, संधी मिळालीय म्हणून, गम्मत वाटतेय म्हणून, सगळेच मारताहेत म्हणून गर्दी जमत राहिली आणि मारमार मारून एकट्या तावडीत सापडलेल्या माणसांना गलितगात्र करून, अर्धमेले करून किंवा जीव जाईपर्यंत मारत मज्जा पाहत राहिली. २०१२ मधली दिल्लीच्या निर्भयाशी, मुंबईच्या शक्तीमिलच्या पीडितेशी, काश्मीरच्या आसिफा आणि कितीतरी अश्या केसेस, एकावेळी अनेक माणसांनी मिळून केलेले क्रूर कर्म कुणालाही विसरता येणार नाही.


कुठून येत असेल एवढं क्रौर्य हा संशोधनाचा विषय आहे. पण...मला पडलेला प्रश्न असा कि एकावेळी अनेकजण एखाद्या चुकीच्या गोष्टीत शामिल होतात तेव्हा त्यातल्या एकालाही कुठल्याश्या शुल्लक कारणावरून आपण काहीतरी चुकीचं करतो आहे, वागतो आहे याची जाणीव होत नसेल? 

"बँडवॅगन इफेक्ट" नावाचा एक प्रकार आहे मानसशास्त्रात. यामध्ये व्यक्तिंचा समूह इतर व्यक्ती कशा वागत आहेत त्यानुसार वागायला लागतात.मोठ्या प्रमाणावर इतर लोक काय करत आहेत तसंच लोकं करायला लागतात. चार लोकांसारखं वागलं नाही तर आपण चूक ठरू ही भीती, अतार्किक, कुठलाही सबळ पुरावा नसलेल्या गोष्टींना पाठींबा देण्यास भाग पाडते. यात मग वेळोवेळी खूप साऱ्या घटना येतात जसे की फॅशन, निवडणुकांमधल्या लाटा, गाजलेले सिनेमे, एखाद्या गोष्टीविरुद्ध प्रचंड चीड, संताप…
मनुष्य हा मुळात विक्षिप्त प्राणी आहे. सामाजिक नितिमत्तेने आणि संस्कार मूल्यांमुळे तो त्यांच्यासारख्याच इतर माणसांमध्ये समतोल राखून एकत्र राहतो आणि जगूही शकतो. अनेकदा असा तर्क लावला जातो कि जो पकडला जातो तो गुन्हेगार ठरतो म्हणजे माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक; बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी आहेतच जन्मतः जी तशी नाहीयेत त्यांना खरतर तसे काही करण्याची  कधीच संधी मिळाली नसते म्हणून त्यातून विनासायास सुटू शकलेले असतात. गुन्हा करायची संधी मिळाली तर कुठलाही मनुष्य ती सोडणार नाही. जसजशी  मानवाची  शक्ती आणि क्रौर्य वाढत जातंय, तसतशी बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी कमी होत जाते आहे अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे.. या साऱ्या संसारात सगळा पसारा त्याने स्वतःशीच खेळता यावं म्हणून मांडून ठेवलाय आणि तो पसराच आता त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या विनाशाला आणि पर्यायाने सुरक्षित जगण्याच्या विश्वासाला तडा देणारा ठरतो आहे.  सध्या इथे एकच कायदा आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!! म्हणून कट थ्रोट स्पर्धाही या स्पर्धेत टिकाव धरायला माणूस कुठलाही स्तर गाठायला तयार झालाय आणि या मानवी मानसिक बदलांची पडझड आता झपाट्याने वेग घेते आहे. 

युगोस्लावियाची सुप्रसिद्ध कलाकार मरीना अब्रोमोविक हिने १९७४ मध्ये अशीच माणसांची मानसिकता तपासून पाहायला ''रिदम झिरो'' नावाने एक प्रयोग केला. ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज उपलब्ध होईल अश्या जागी उभी झाली. तिच्या पुढ्यात ठेवलेल्या टेबलवर ७२ प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. या वस्तू दोन भागात विभागल्या होत्या एक हानी पोचवणाऱ्या ज्यात ब्लेड, सूरी, काटे, पिस्तूल अश्या बऱ्याच वस्तू होत्या, दुसऱ्या बाजूने आनंद देणाऱ्या वस्तू होत्या उदाहरणार्थ गुलाब फुले, चॉकलेट आणि बरंच काही. मरिनाने घोषित केले ती पुढली ६ तास अशीच उभी राहणार आहे आणि लोकांना तिच्यासोबत वाटेल ते करण्याचा अधिकार आहे. या ६ तासात तिच्यासोबत जे काही होईल त्याला फक्त ती स्वतः जबाबदार राहील. त्यानंतर काय झाले हे जाणून घेतले तर माणसाच्या मनातल्या अतृप्त विकृत इच्छा या स्तरापर्यंत जातात जाऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. सुरुवातीला काही माणसांनी तिला स्पर्श करून पहिला ती हालत नाही, काहीच बोलत नाही हे पाहून ते निर्ढावत गेले, तिला नको नको त्या ठिकाणी स्पर्श होऊ लागले, पुढल्या अर्धा तासात एकाने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला, नंतर कुणीतरी तिला निर्वस्त्र केले, तिच्या शरीरावर काही माणसे चावा घेऊ लागले, एका इसमाने तिच्या हातात पिस्तूल दिला आणि गनपॉईंट तिच्या गळ्यावर करून उभे राहायला सांगितले. कुणीतरी तिच्या शरीरावर सुरीने घाव केले. नंतर माणसे एकत्र येऊ लागली एकावेळी ४-६ माणसांनी तिला उचलून लेटवले तिच्या अंगावर काटे टोचवले, कचरा टाकला तिच्या संपूर्ण शरीरावर स्पर्श करून नाजूक ठिकाणी सुरीने भोसकून रक्तही काढले.

मरिना सांगते जसजसा वेळ जात होता लोक गटाने येऊन कृती करायला लागले होते. त्यांना एकमेकांचा संकोचाही उरला नव्हता. याकाळात तिने क्रूरतेचा पराकोटीचा अनुभव घेतला.. शेवटचे दोन तास तर तिला असह्य वेदनेच्या   दुष्टचक्रातून जावे लागले. मानवतेवरचा विश्वासच उडावा इतका धक्कादायक प्रकार घडत होता. संधी मिळाली आणि त्याचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाहीयेत हे ठाम झाल्यावर पशूहून पाशवी झालेल्या माणसांनी असा उच्छाद मांडला होता. यात बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी तिला गुलाबफूल अन गालावर किस दिले होते. 



विषय माणूस कुठल्या स्तरावर जाऊन अत्याचार करतो हा नाहीच आहे, विषय मानसिकतेचा आहे. एका बाजूला सकारात्मक बाबी असतांना दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नाकारात्मकतेकडे बहुतांश लोकं आकर्षित होतात आणि एकत्र येऊन कुठलाही संकोच न बाळगता नकारात्मक किंवा समाजमान्यते बाहेरील चुकीच्या गोष्टी मग  त्या इतरांसाठी घातक असल्या तरी बेहत्तर बेधडक  करतात आणि त्यातून मनोरंजन करून घेऊन, विनोद घडवून आणून आनंद घेतात, प्रक्रियेचा भाग नसले तरी बरेच बघ्यांच्या भूमिकेतही निष्क्रिय असतातच तेव्हा या विकृत मनोवृत्तीने आपण किती ग्रासले गेलो आहे, आपल्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे लक्षात येते.

हल्ली यातलाच एक नवा जमान्याचा नवाच ट्रेंड सुरु झाला आहे 'व्हर्च्यूवल मॉबलिंचिंग'

  परवा सचिन पिळगावकरांच्या 'मुंबई अँथम' या गाण्यावरून आणि नंतर त्याने त्याच्या पानावर दिलेल्या स्पष्टीकरणावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग करून जो काही गदारोळ चालू आहे ते पाहून फार अस्वस्थ व्हायला झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत प्रचंड जागृत असलेले आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृत असणे सोडाच सहिष्णूदेखील होऊ शकत नाही हे एकत्र एक समाज म्हणून जगतांना किती घातक आहे ह्याची कल्पना आपल्याला का येत नाही ? हि फक्त सुरुवात असेल तर ह्याचे भविष्य किती भयावह असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. एखादा कलावंत त्याच्या कलेला आणि प्रोफेशनलाही बांधील असतो हे समजण्याइतकीही समजूतदार हल्ली बाळगली जात नाहीये. कलाकार माणूसही असतो, त्यालाही परिवार बायको मुलं, आई-वडील  असतात आणि आपल्या माणसाशी जग इतकं घाण इतकं वाईट पद्धतीने वागतंय याच किती लोकांना दुःख असेल याच जराही वैषम्य हल्ली हि व्हर्च्यूवल गर्दी बाळगताना दिसत नाही.  एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर उभे कि आडवे फटके मारावे, एखाद्या गायकाने-संगीतकाराने कुठला सूर कुठला ताल आळवावा, एखाद्या लेखकाने कुठल्या विषयावर पुस्तक लिहावे खरतर हा सल्ला देणे वेगळे. एखादी कलाकृती आवडली नसेल तर तसे निक्षून सांगणे वेगळे... पण एखादी कलाकृती आपल्याला न आवडणे किंवा न पटणे हा एव्हढा मोठा गुन्हा असतो कि त्यासाठी हजारोने माणसे एकत्र येऊन तासनतास त्या कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, अगदी खालच्या दर्जाच्या शब्दांचा वापर करून, गलिच्छ भाषेचा उपयोग करून सतत अपमान करीत राहतात. आणि एवढेच नाही तर स्माईलीच्या मागे दडून हजारो बघे दात काढत करमणूक करवून घेतात.

त्या व्हर्च्युअल पडद्यामागेही एक जिवंत व्यक्ती बसली आहे हे का विसरतो आपण? एखाद्याविषयी इतका विखार इतका वाईटपणा पसरवायचा अधिकार कुणी दिला आपल्याला ?? इंटरनेटने सोय करून दिली आहे म्हणून आणि एखाद्याच्या हाताने झालेल्या चुकीने संधी प्राप्त झाली आहे म्हणून शाब्दिक मार हाणणारे..अपमानास्पद शब्द शस्त्रांनी वार करून गर्दीपुढे एकट्या पडलेल्या पुढल्याच्या मनोबलाचे चीरहरण करून त्याला पूर्णतः त्याच्या क्षेत्रातून संपवण्याचा प्रयत्नच तर करतोय .. आणि   आपण काहीतरी चुकीचे करतो आहे असे हजारोच्या संख्येतल्या एकालाही वाटू नये किंवा ज्याला वाटेल तोही यात भरडला जाईल इतकी हि विखारी प्रखरता आम्ही वाढवून अधिक शक्तीने वार करू हि छुपी धमकी.

पुन्हा प्रश्न पडतो तो इतकाच संधीचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा नकारात्मकतेकडे झुकाव वाढतो आहे. जिथे चांगले करायची संधी असेल तिथून अनेक निमित्त्य सांगून पळ काढणारे नकारात्मकता वाढवणाऱ्या, समाजासाठी घातक असणाऱ्या गोष्टीत आवर्जून सहभागी होताना दिसतात. दीर्घकालीन फायद्यांपेक्षा किंवा भविष्यात नुकसान होणाऱ्या गोष्टींचा विचार पूर्वक स्वीकार-अस्वीकार करण्यापेक्षा, वैचारिक समजूतदारीचा, इतरांच्याबाबतीत सहिष्णू होण्याची क्षमता वाढवण्याचा कल संपुष्टात येऊन क्षणाच्या करमणुकीला जास्त महत्व दिलं जात आहे. या मानसिकतेची लागण होणं किंवा संक्रमण होणं आजच्या आणि पुढच्या पिढीलाही फायद्याचे ठरू शकत नाही.   
 तेव्हा आता थांबलं पाहिजे ... थांबवलं पाहिजे.
रश्मी पदवाड मदनकर 
२ सप्टें. २०१८
(लेख कॉपी राईट आहे. सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन)

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...