Tuesday, 25 December 2018

माणसे ...

माणसे ... 

पाळली जातात
टाळली जातात
चाळली जातात
गाडली जातात 

माणसे ... 
पकडली जातात
जखडली जातात
अडवली जातात
नडवली जातात
रडवली जातात

माणसे ... 
घेरली जातात
पेरली जातात 
पीडली जातात
रेटली जातात

माणसे ... 
ढवळली जातात
खवळली जातात
सतवली जातात
बधवली जातात

माणसे ... 
वापरली जातात
चाळवली जातात
नाचवली जातात
नागवली जातात

माणसे ... 

आवरता येतात
सावरता येतात
घडवता येतात 
स्विकारता येतात.. 

जपली जाऊ शकतात
आपली राहू शकतात .. 

माणसे माणसे असतात !!

रश्मी मदनकर
21 डीसे. 18

Saturday, 22 December 2018

काय कळाले कळले नाही, असेच झाले जगणे
नजरी काही भिडले नाही असेच झाले बघणे !

डोहमनाच्या खोलीचा मज थांगच कळला नाही
उथळ मोहाच्या खेळामधे असेच झाले फसणे !

गणगोतास देऊन अंतर,जगलो वेड्यावानी
चरणस्पर्श मज घडले नाही उगाच झाले तगणे !

चांगल्या  वाईटामधला, भेद आकळला नाही
पस्ताव्याचे अश्रू ढाळत उगाच झाले रडणे !

सोबतीची बातच सोडा , कुणीच थांबले नाही
प्रताडणेची भोगून पिडा, असेच झाले खचणे !

रश्मी मदनकर.
12 डीसे. 18

Wednesday, 12 December 2018

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...



जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्नाची.. अंबानी कुटुंब घरातून निघून कुठे पोचतात, कोणकोणत्या देवळात दर्शनाला जातात, पत्रिका कशी छापली आहे, लग्नात कुठले सेलिब्रिटी कोणता डान्स करणार, पाहुणे कोण आले, कसे दिसले, कुठे बसले, कसे नाचले..  सोनमच्या लग्नात कोण काय नेसणार, अनुष्काचं लग्न कोणत्या देशात होणार, दीपिकाने काय काय आणि कुठून कुठून शॉपिंग केलीय ते प्रियांका कुठल्या कुठल्या पद्धतीने लग्न करतेय .. या सगळ्यांच्या लग्नात कोणी हजेरी लावली, कुणाला निमंत्रण होतं, कुणाला नव्हतं ते लग्न लागताना कोण कसं हसलं कोण कसं दिसलं इथपर्यंत. लग्न आटोपले ..त्या नंतरही  कोण कोण कुठे हनिमूनला गेले, जातांना हातात हात होते का गालात स्मित होतं कि नाही अश्या बिनबुडाच्या ब्रेकिंग बातमीनं प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया तुडुंब डुंबून गेला होता.

माध्यम समूहात कोणत्या बातम्या विशेषत्वाने गाजतात त्यावरून वर्षभऱयाचा आलेख तयार केला जात असतो.  म्हणजे गेल्या वर्षाची ओळख त्या बातम्यांवरून ठरते.  किती जणांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले. देशाबद्दल विदेशात झालेल्या काही घडामोडी. आरक्षणाच्या बातम्या, निवडणुकीचा धुराळा अश्या बातम्यांनी वर्ष वर्ष गाजत असतात. यंदाचं वर्ष मात्र सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष म्हणूनच गाजतंय. सोनम कपूर, अनुष्का शर्मा आता दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोनमन आनंद आहुजाशी, अनुष्काने देशाच्या लाडक्या खेळाडू विराट कोहलीशी गाठ बांधली, दीपिका पदुकोण हिने अभिनेता रणवीर सिंग याच्याशी तर देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्राही  अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप पाडणाऱ्या Slumdog Millionaire या चित्रपटातील 'लतिका' या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली फ्रिडा लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमसमूहात झळकायला सुरुवात झाली आहे. म्हणजे वर्ष जाताजाताही लग्नाचीच बातमी भाव खाऊन जाणार.

परीकथेत शोभावे अशा सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले असले तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडण्याची शक्यता असते. कोट्यवधी खर्चाचे ओझे विनाकारण झेलावे लागणे, लोकांच्या महत्वाच्या वेळेचा अपव्यय, विनमहत्वाच्या घटनांना वेळ दिल्याने महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष, हा यातला मुख्य लूपहोल आहे.
पर्यटन आणि रिटेल व्यवसाय विवाहामुळे भरात असले तरी सामान्य जनतेच्या खिशातून काढूनच हा सोहळा पार होत असतो.. यातील सगळ्यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेवर करण्यात आलेला असतो. एकंदरीत समाजात आपण नट-नट्याना अवास्तव महत्व देऊन नको इतके लाडावून ठेवले आहे. अनेक माध्यमांतून त्यांचा उदो उदो होत असतो. त्यांची प्रेम प्रकरणे, विवाह-सोहळे, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंध इ. गोष्टी ‘राष्ट्रीय घटना’ असल्यागत सतत चघळले जातात. ज्या नटांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असतात त्यांच्या चित्रपटांचा गल्ला कितीशे कोटी करण्याचा जणू विडाच जनता उचलते. काही नटांच्या आयकर थकबाकीबाबत बातम्याही ‘टीआरपी’ साठी प्रसिद्ध होतात आणि चवीने पहिल्या जातात. एक दिवसाचीही समाजसेवा न करता ही नटमंडळी जेव्हा थेट लोकसभेच्या निवडणुकीस उभी राहतात तेव्हाही आपण विचार नं करता त्यांना निवडून का देतो? सगळेच असे असतात असेही नाही अगदी मोजके अभिनेते सामाजिक भान ठेऊन वागतात. त्यांच्यात चांगल्या नागरिकाची लक्षणे जरूर असतात. परंतु ते नको त्या मंडळींच्या झगमगाटात झाकोळले जातात खरे. आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे.

रश्मी पदवाड मदनकर
१०. १२. १८


(दैनिक सकाळ विदर्भ आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


Thursday, 6 December 2018

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे
उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी
ठेऊन द्यावी उशाशी ..
कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल
भावनांचा उद्रेक होईल, मग
ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि
नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर
शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,
 नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील
अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात
उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच
मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी ..

कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि ..
डोळे पाझरायला लागले कि
अन उबेचे शब्दही भिजले कि,
डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर
आणि
डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
पुन्हा ... पुन्हा





कातरवेळ !

हि कविता म्हणजे एका निराशेने ग्रासलेल्या सखीने दुसऱ्या तश्याच हळव्या सखीला उद्देशून केलेला संवाद आहे. अनुभव समांतर असला की ते दुःख आपलं वाटतं. खरंतर समदुःख हे परानुभूती सहजतेनं देत असेल .. म्हणून नभ भरून आलं कि, पाऊस बरसून गेल्यावर, रात्र दाटून आली कि बरेचदा सारखे फीलिंग असतात, म्हणूनतर कविता आवडतात त्या बरचजणांना सारखंच रडवतात कुणीतरी तयार केलेली गाणी ऐकताना , चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, मनाच्या घालमेली तश्याच अनुभवताना, जवळून बघत जगताना खूप कठीण आणि त्रासदायक होत जातं, असं मन घेऊन जन्माला येणं प्राक्तनच म्हणायचं..  पण आता आपल्यात बदल होत नाहीच हे समजावून घेउन स्वतःलाच सांभाळून घ्यावं लागतं कारण आपल्या मनाची त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीला होणारी अवस्था समजून घेणारा सहयोगी प्रत्येकवेळी तश्याच मनाचा असतो असे नव्हे, तश्या मनाचा असला तरी त्याचे तुमचे प्राक्तन सारखे असतेच असे नाही आणि म्हणून तो त्या त्या प्रत्येकवेळी सोबत असतोच असे नव्हे..एकसारख्या मनाची माणसं एका विशिष्ट घटनेत विशिष्ट वेळी एकाठीकाणी सेम अनुभवातून जात असणे किंवा निदान मनाने तीथे अवैलेबल असणे हे योगायोगानेच घडत असावं आणि हे जेव्हा घडतं तो काळ डीवाईन होतो त्या विशिष्टांसाठी अजरामर ठरतो. कदाचित नियती त्यांना अश्या अजरामर ऐतिहासिक क्षणांसाठी क्षणैक भेटवत असेल पण असाही अनुभव दुर्मिळच... म्हणून अश्याच कुठल्याश्या हळव्या मनाच्या, समजून घेणाऱ्या सखीला हि आर्त मानभावनी आहे.

सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

हे आभाळ कसं दाटून सावळं झालंय बघ, सावळ्याची सावळीच सावली पसरलीय  ..सगळीच पानंफुलं सृष्टी सावळ्याच रंगात झाकोळली जाते आहे .. या वातावरणानं मन गहिवरून येतंय... कुणाला काय सांगू ? शब्दांमधल्या कंपनातून अंतरात दडून बसलेले सारे गुपित उकलतील म्हणून भीती वाटतेय .. आभाळ आणि मन गहिवरून ओसंडेस्तोवर संध्याकाळ अवतरते आहे...आणि सखी , मी लिहू लागलेय या आभाळाचं दुःख !

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

सखी , तशीतर ही संध्याकाळ , अशावेळी डोळ्यातून आसवे वाहून किनाराही आपोआप ओला होतो .. ढग भरुन आलेत मनातल्या पावसाची रिपरिप सुरु झालीय, इकडे निळाई उतरून आता केशरीया सूर्यकिरणं सप्तरंगात न्हावून धरतीवर उतरलीत ..आणि त्या सोनेरी किरणांची एक नाजूकशी तेजस झळाळी निसर्गाच्या गात्रागात्रात शिरूनही कातरवेळेची खिन्नता पाठ सोडत नाही..मळभ दाटतंय, काळ सरकतोय अंधाराचे सावट चोर पावलाने सर्वत्र पसरेल आता.

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

सखी , सांज मावळून रात्र होत जाते, या सांजवेडीला रातराणीची भूल अलगद वेढत / चढत जातेय  .. अगं , माझ्या सख्याची आठवण या चंद्रसख्याला पाहून होतेय ..आणि चांदण्या चंद्राला अलिंगन देताहेत तशा माझ्या अनिवार आठवणी त्याच्याभोवती रुंजी घालताहेत.

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।

घन म्हणजे ढग ते मयूरपंख लेवून अंगणात अक्षरशः थयथय नाचताहेत आणी माझे श्वास अनावर झालेत . इतका आवेग वाढला की त्याच्या ओढीनं अंगातून श्वासातून अक्षरशः वीज धावल्याचा भास होतो आहे.
 
सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।





Wednesday, 5 December 2018

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!



हिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात  समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.  एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला लागला आहे. या संधीचे सोने करायला आता पुढली पिढीही सरसावली आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय महिलांचा चेहेरा झळकू लागला आहे.

अगदी परवा परवाच फोर्ब्सने 50 टेक कंपन्यांच्या अमेरिकन शीर्ष महिला अधिकार्यांची यादी घोषित केली. या  गटात काही चेहऱ्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ते चेहेरे होते कष्टाळू, कणखर, तेजस्वी आणि बुद्धिमान स्त्रियांचे ! भारतीय स्त्रियांचे. यंदा एक दोन नव्हे तर तब्बल चार भारतीय महिलांचा समावेश फोर्ब्ज ने जाहीर केलेल्या पन्नास प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. कोण आहेत या स्त्रिया? यशोशिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी कोणकोणते कष्ट उपसले, आव्हाने पेलली? सिस्को कंपनीची पूर्व चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पद्मश्री वॉरियर, उबर कंपनीची सीनियर डायरेक्टर कोमल मंगतानी, कॉन्फ्लुएंट ची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि को-फाउंडर नेहा नरखेड़े, आइडेंटिटी मैनेजमेंट कंपनी ड्रॉब्रिज ची कामाक्षी शिवरामकृष्णन या भारतीय महिलांनी हे उत्तुंग यश मिळवून अभिमानाचे क्षण देशाच्या झोळीत घातले आहेत.

पद्मश्री वॉरिअर :- आंध्रप्रदेशच्या विजयवाड्याला जन्म झालेली पद्मश्रीने दिल्ली आईआईटीतुन शिक्षण पूर्ण केले त्या ५८ वर्षांच्या आहेत. त्या सध्या चीनची कंपनी नियोच्या यूएस हेड आहेत. याआधी अमेरिकी टेक कंपनी सिस्को सिस्टम्समध्ये चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर होत्या त्यांनी सिस्कोसाठीच्या अधिग्रहण व्यवहारांमध्ये  महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावली होती.

कोमल मंगतानी :-  धर्मसिंह देसाई इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुजरात येथून शिक्षण पूर्ण करणाऱ्या ४३ वर्षीय  कोमल सध्या उंबर कंपनीच्या सिनियर डायरेक्टर आहेत. त्या बिजिनेस इंटेलीजेंस सेक्शनच्या सर्वोच्च अधिकारीही आहेत. एवढेच नाहीतर उबरच्या महिला एनजीओच्या बोर्डमध्येही सामील आहेत.

नेहा नरखेड़े :- महाराष्ट्रातल्या पुणे शहरात वाढलेली आणि शिकलेली मराठमोळी नेहा लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत असतांनाच तिने कॉफ्लुएंटसाठी 'अपाचे काफ्का' सॉफ्टवेयर तयार करायला मदत केली. या डेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेयरमुळे कॉफ्लुएंट कंपनीचा बिजिनेस प्रचंड वाढला आणि हीच विदेशात नेहाची ओळखही ठरत राहिली.

कामाक्षी शिवरामकृष्णन :- मुंबईतून शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत स्थायिक असणारी कामाक्षी आर्टिफिशियल इंटेलीजेंसशी संयोजित कंपनी ड्रॉब्रिजची सीईओ आणि फाउंडर आहे. लोकं कामानिमित्त कुठकुठले डिवाइस वापरतात हे ड्रॉब्रिज ट्रॅक करण्याचे काम करते. हि कंपनी त्यांनी २०१० साली निर्मिली होती.  या कंपनीत आतापर्यंत 6.87 करोड़ डॉलरची गुंतवणूक विदेशातून झाली आहे. या आधी मोबाइल अँड प्लेटफॉर्म एडमोब मध्ये निव्वळ डेटा साइंटिस्ट असलेली कामाक्षी आज यशाच्या अनेक पायऱ्या चढत या मानबिंदूची मानकरी ठरली आहे.



या आणि अशा अनेक स्त्रिया विदेशात मोठ्या जबाबदारीची कामे पार पाडत देशाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवत आहेत. तिथे मिळणाऱ्या संधी स्त्रियांना आपले कौशल्य, बुद्धी आणि चमक दाखण्यास कारणीभूत ठरत आहेत. या सर्व स्त्रियांनी आपले कुटुंब,  स्वास्थ्य आणि आपले काम यांची कसरत अनुभवली आहे. अनेक आव्हाने पेलत त्या देशाला आणि समस्त स्त्रियांना अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. दीपस्तंभासारख्या या निगर्वी आणि तेजस्वी स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी विविध क्षेत्रात पुढेही येतील यात काही शंका नाही!

रश्मी पदवाड मदनकर
1 dec. 2018



Monday, 26 November 2018

या दिवाळीत माझं लिखाण वाचा -
> विदर्भ 'सकाळ' आवृत्तीच्या दिवाळीअंकात 'सौभाग्याची लेणी' ही कविता -
> 'झी मराठी'च्या दिवाळी अंकात 'फुगे' कथा
> 'विकासकर्मी अभियंता मित्र' या वार्षिकांकात नागपूर मेट्रो प्रवासावरील लेख.
> 'चारचौघी' वार्षिक अंकात 'अंतरीच्या गुढ गर्भी' कथा ..
> 'कोकणदिप' दिवाळी अंकात '306' ही कथा..
एरवी टीव्ही पाहायला अजिबात वेळ नसतो .. सलग एखादी सिरीज पाहील्याचं आठवतं ते एपीक चानलवर ठाकुरजींच्या कथांवर अनुराग बासूनं दिग्दर्शित केलेली संपुर्ण सिरीज झपाटून गेल्यासारखी पाहीली होती दोन वर्षांपूर्वी... त्यानंतर दोनचार चुटूक पुटूक चित्रपट सोडले तर टीव्ही पाहणं फारसं शक्य होत नाही. पण अलिकडे मस्त सरप्राईज मिळालं काही दिवसाआधी नवरयानं तुझ्यासाठी छान काहीतरी सुरू झालंय बघ सांगत एक चानल सबस्क्राईब करून दिलं... टाटास्कायवर काही दिवसांपासून 'टाटास्काय थीएटर' हे स्पेशल पेड चानल सुरू झालंय. देशातल्या सर्व प्रांतात सर्व भाषेत गाजलेली नाटकं ते अत्यंत कसदार कलावंतांनी अभिनय केलेल्या नाटकांच्या खास फिल्मस बनवून थीएटर रूपात हिंदी भाषेत आपल्यासाठी सादर करीत आहेत.. यात वैचारीक नाटक आहेत, संस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री, चाईल्ड अब्युज, मनोरंजन, विनोदी असे सगळेच प्रकार आहेत विशेष म्हणजे ड्रामा मेकींगच्या त्याच्या कंसेप्टबद्दल अभिनय करताना आलेला अनुभव, पात्रांची वैशिष्ट्ये, परदे के पिछे का ड्रामा यावर मधून मधून चर्चा होते.. दिवसाला एकतरी नाटक यावर पाहायचं असं ठरवलं होतं पण वेड लागलंय चक्क..सुट्टी मिळाली की झपाटून गेल्यासारखी थीएटरला चिकटून बसते ... पारायणं चालली आहेत. खुप शिकायला मिळतंय.
आतापर्यंत पाहीलेली नाटकं
1. सच कहूँ तो
2. डाॅल हाऊस
3. अग्नीपंख
4. जाना था रोशनपुरा
5. Wrong turn
6. डबल गेम
7. नाईट राईडर
दर आठवड्याला नविन नाटक सामील होतात आता येतंय हमिदाबाई की कोठी आणि मा रीटायर होती है आणि पीया बेहरूपीया.

एक मतला दोन शेर ..

एक मतला दोन शेर ..


काय फासे टाकतो तू काय खेळी मांडतो
लागल्या वेडापरी का सांग ना तू भांडतो !


आपुलीती माणसे वैरी तुला का भासती
गाडले ते ऊखरूनी काढतो अन् कांडतो !


हर्ष ना वाटे तुला ना आस दाटतसे मनी
फसवतो खेळात तू नी रडवुनीचं थांबतो !


Friday, 28 September 2018




मी एक अख्खा काळ नेसून घेतलाय
स्वतःभोवती..माझा माझ्यापुरतं असलेला
एक काळ माझ्या आयुष्याएवढा .. किंवा
आयुष्य एका काळाएवढं..
आयुष्यापलीकडचा काळ मला माहीत नाही
काळापलीकडचे आयुष्यही ठाऊक नाही...


नेसलेल्या काळात मी रंगवलंय माझं एक आकाश
माझ्या वाट्याचा उजेड सांडत राहावा म्हणून
त्यात टाचलाय एक सुर्य, एक चंद्र थोडे तारे
पेरले आहेत काही बियाणे थोडं धनधान्य
टीचभर पोटासाठी जन्मभर लागणार्या अन्नासाठी...

विदग्ध आत्म्याला विसावा म्हणून
टीचभर परिघातल्या चंद्रमौळी घरात
अशक्यतेचं अफाट विश्व सामावलंय
ते मी माझंच मानून घेतलंय कायमचं

जगण्यासाठी मनाच्या रखरखत्या जमिनीवर
मारत असते भावनेच्या ओलाव्याचा शिडकावा
उगवत राहते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वगैरे
जपून ठेवते काही खाणाखुणा जगण्यासाठी
विदीर्ण आत्म्याला लावत असते संवेदनेचा लेप वगैरे

भिरभिरणाऱ्या अस्तित्वाचा गुंता  सोडवण्यात,
आणि विखुरलेल्या स्वप्नांची चुंबड जमवण्यात
निघून चाललाय हा जन्म वगैरे
हव्या त्या माणसांचे गर्दीतले चेहेरे शोधत
धुमसत राहतो जीव अखंड
अल्पकाळ परीघ ओलांडून आत येणाऱ्या माणसांनी
 दिलेल्या तात्पुरत्या दुःखाचे कढ सोसत
आयुष्याला पुरेल एवढ्या जखमा झोळीत जमा केल्या आहेत
त्या कुर्वाळण्यात या काळाची लक्तरं होणार आहेत

मी नेसलेला काळ असाच जीर्ण होत जाणार आहे
सुरकुत्यांच्या कातडी आड .. मोहवणाऱ्या जगण्याच्या संभावनांशी
संघर्ष करीत मी माझ्या जगण्याचे सांत्वन करीत राहायचे ?

नाही .. नको ..

मी नेसलेला काळ सोडून देऊन
निर्वस्त्र आत्ममग्न अनभिज्ञ
नग्नच अज्ञात प्रवासाला निघणार आहे.
 नश्वर देहभोगाच्या सत्य आभासापलीकडे
चिरशांतीच्या शोधात ...








Tuesday, 11 September 2018

ठरवले आहे ..

तुझा उल्लेख मी टाळायचे ठरवले आहे
नियम हा एक मी पाळायचे ठरवले आहे ।

तुला ते शोधतात मी गायल्या गझलांमधुनी
तुझे तर नावही गाळायचे ठरवले आहे ।

 नवा चल डाव मांडू मागचे विसरून जाऊ
आपला व्याप सांभाळायचे ठरवले आहे ।

नसे कोणी कुणाचे जीव ओवाळून कळले
छबीवर आपुल्या भाळायचे ठरवले आहे ।

नको आधारही अता कुणाचा शब्दानेही
तुझ्या पत्रासही जाळायचे ठरवले आहे ।

कलेवर आठवांचे अंगणी या पुरुन टाकू
उगवेल मोगरा माळायचे ठरवले आहे ।

रश्मी पदवाड मदनकर
जुलै 18

(मात्रावृत्तात लिहीण्याचा एक प्रयत्न)

Friday, 7 September 2018

नक्की कुणाचा दोष आहे ??

चला कोणीतरी बोललं म्हणायचं - न भिता, न घाबरता, कोपऱ्यात बातमी न लावता कुठल्याही राजकारणाचे दडपण न ठेवता - माध्यमाची जबाबदारी बाळगत सत्य ठामपणे उघडावं वाटलं.... हितवाद तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.



स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झालेल्या त्या तीन विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत शहरभर गदारोळ माजला, राजकारण पेटले, आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि काय काय.. त्या दिवशी पूर्णसत्य माहिती नसल्याने बातम्यांचे पेव उठणे, वाऱ्याच्या वेगाने खोट्या अफवा पसरणे साहजिक होते, त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या .. मान्य. पण नंतर सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं इतकं सगळं स्पष्ट झालं. प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट आणि पोलीस तपासणीतूनही अनेक बाबी समोर आल्या. इतकं सगळं खरं-खोटं कळाल्यावर आणि अपघातग्रस्त मुलींची नुसती चूकच नव्हती तर दखलपात्र गुन्हा होता हे लक्षात आल्यावरही कुठल्याच दुसऱ्या वृत्तपत्रांना त्यावर सत्य प्रकाशात आणणारी बातमी करावी वाटली नाही ?? अपघाताच्या दिवशी जे काही राजकारण झाले मृतदेहाला कार्यालयात ठेवून पैश्यांसाठी बारगनिंग करत व्यापार मांडण्यात आला, मृतदेहाच्या नावानं नोकऱ्या देण्यासाठी धमक्या देण्यात आल्या त्यावर कुणालाच आक्षेप घ्यावा वाटू नये?? पैसे एकदा ठीक आहे, पण... नोकरी का ? एखाद्या कामगाराचा कार्याच्या ठिकाणी जीव गेल्यास त्याच्या पाठी राहणाऱ्या घरच्या मुख्य व्यक्तीस नोकरी दिली जाते कारण गेलेली व्यक्ती हि त्यांच्या घरची उपजीविका चालवणारी मुख्य व्यक्ती होती असे गृहीतच असते...ह्याला आक्षेप असण्याचे कारणच नाही ..पण अपघात झाला म्हणून नोकरी ?? हा कोणता नवा नियम आहे?? एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये हे आपले संस्कार आहेत हे मान्य असले तरी, जाणारा व्यक्ती गुन्हा करून जात असेल आणि त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दुसरं कुणाला तरी भोगावे लागणार असतील तरीही बोलू नये का ?? कॉलेज मधून बंक करून पळून जाणाऱ्या ३ मैत्रिणी, लायसन्स नसतांना एका गाडीवर ट्रिपल सीट बसून हेल्मेट न घालता ८० च्या वेगाने मागल्या ५० गाड्यांना ओव्हर टेक करत रस्त्याच्या शेवटच्या टोकावरून धुंदीत मस्तीत गाडी पळवत आणतात, वेग इतका कि रस्त्याच्या फुटपाथला टेकलेल्या अगदी टोकाशी असलेल्या नाल्याच्या झाकणापर्यंत आल्यावर वेगावर कंट्रोल करता येत नाही मग पुढे असलेला विजेचा खांब आणि ऑटोला ओलांडताना ब्रेक लागत नाही वेगावर कंट्रोल होत नाही, तोल जातो आणि पोरी भरधाव गाडीसह घसरून घासत सरळ क्रेनच्या खाली फेकल्या जातात, आपल्या सरळ मार्गाने ठराविक वेगात जाणाऱ्या क्रेनखाली.
जीव गेले .. एक नाही तीन तीन .. दुःख आहे खूप आहे सगळ्यांना आहे ... गेलेला जीव कशानेही भरून देता येत नाही पण, दाक्षिण्य नावाचा प्रकार असतो म्हणून शासन किंवा संस्था दवाखान्याचा होणारा खर्च वगैरे भरून देतात ... पण मृतदेह दारात ठेवून आत्ताच्या आत्ता एक करोड आणि नोकरीचे कागद हातात द्या असं शिवीगाळ करत सांगणारा भाऊ आणि दुसऱ्या मुलीचे आईवडील कशाच्या बदल्यात नोकरी मागतात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
घरच्यांनी मुलींना कधीही नियमात राहा असं खडसावलं नाही किंवा त्या रहदारीचे नियम पाळतात का याकडे लक्ष दिले नाही याची बक्षिसी हवीये का ?? कि मुलींनी भर रस्त्यावर एक सोडून अनेक चुका केल्या त्यांच्या त्या चुकीने पुढल्या मागच्या अनेक जणांचेही जीव जाऊ शकले असते... त्याबदल्यात त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ त्यांच्या घरच्यांना नोकऱ्या द्यायच्या ?? नोकरी कुणाला द्यावी ... जो डिझर्विंग कॅन्डिडेड आहे त्याला कि त्याला जो आयुष्यभर सगळ्या सरकारी सोयी सवलती मिळूनही ना शिक्षणासाठी ना स्वतःला कशाच्या लायकीचे बनवायला मेहेनत करतात फक्त संधीची वाट पाहतात .. संधी मिळाली कि लगेच त्याचे भांडवल करून स्वतःचे भविष्य सेक्युर करून घेतात.. अगदी अगदी बहिणीच्या किंवा मुलीच्या मढ्यावर बसून बोली लावावी लागली तरी चालणार असतं त्यांना.. कारण असंच नाकारात्मकतेची राजनीती करून एक एक पायरी वर चढून बसलेली राजकारणातली बांडगुळे असतातच कि मदतीला. या राजकारण्यांच्या खिशातलं काय जाणार असतं.. यांचं काय नुकसान आहे यात ? राजकारणातून तमाशे उभे करून कुणाच्यातरी खिशातून ५० जणांचं काढायचे आणि पुढे दोघांची झोळी भरायची, मग त्या दोघांच्या जातीवर पुन्हा भाकऱ्या भाजायच्या, संपूर्ण समाजाचे समर्थन आणि मतं लाटत राहायचे जन्मभर. बाकी जातीयवादी किती आंधळे असतात हे वेगळे सांगायला नकोच... पण या साऱ्यात प्रामाणिक कष्ट उपसून अभ्यास करून, कुठल्याही राजकारणात न पडलेल्या, नाकाच्या सरळ रेषेवर चालून स्वतःला सक्षम बनवण्यात आयुष्याचे अनेक वर्ष खर्ची घातलेल्या अनेक डिझर्विंग कॅन्डीडेटचे हक्क हिसकावले जातात त्याचे काय ??
कसलं उदात्तीकरण चाललंय हे ? कुठला समाज .. काय वातावरण निर्मिती करतोय आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी ? काय शिकवण घ्यावी आजच्या पिढीने यातून ? चूक हि चूकच असते आणि चुकीला बक्षीस नाही शिक्षाच मिळते ... कि मग रोहित वेमुला सारख्यांनी आत्महत्या केली कि त्यांना घरोघरी दारोदारी प्रसिद्धी प्राप्त होते, ते लोकांसाठी हिरो ठरतात ... तुम्ही चुका चुका, चुकत राहा आणि मृत्यू जा.. काही फरक पडत नाही तुमचे ना सही तुमच्या कुटुंबाचे पुढल्या पिढीचे भविष्य सेक्युर होईल ?? मग उद्या त्यांना अभ्यास मेहनत करून, कष्ट उपसून नोकरी मिळवण्यापेक्षा, काहीतरी चांगले करून नाव कमावण्यापेक्षा .. नाव कमावण्यासाठी अपघाती मृत्यूचा किंवा आत्महत्येचा मार्ग सोपा नाही का वाटणार ? चुका झाल्यावर सरकार, राजकारणी मदत करणार असतील, नोकऱ्या मिळवून देणार असतील तर कशाला करा मेहनत, कशाला स्वबळावर जग जिंकण्याचे स्वप्न बाळगा .. स्वाभिमान-स्वसन्मान घालूया खड्ड्यात,, देऊया ना एखाद्याचा बळी किंवा स्वतःचाच देऊया कुटुंबासाठी तेवढंच पुरे... हेच नाही का उदाहरण कायम होतंय ? आपण आपल्या हाताने आपली पुढली पिढी नासवतोय का ? विचार करा जरा..
कुठे जाते आहे आजची पिढी. घरात मिळणारे संस्कार, घरातल्या मोठ्यांच्या वागणुकीतून दिसणारे आत्मसात होणारे तत्वमूल्य संपुष्टात आले का? आणि म्हणून समाजात राहण्यासाठी सगळ्यांसाठी सोयीचे असणारे कायदे जाचक वाटू लागले आहेत. आम्हाला आमचे अधिकार फार प्रखरतेने ठाऊक आहेत आणि आम्ही त्यासाठी आग्रही देखील आहोत पण कर्तव्याचे काय?? संस्कार-मूल्य-तत्वांनाही जातपात, भगवा-निळा-हिरव्याशी जोडण्यापर्यंत राजकारण आमच्या बैठकीतून शयनकक्ष आणि माजघरापर्यंत येऊन पोचला आहे. राजकारण आमच्या घरात शिरले नाहीये, कदाचित आम्हीच राजकारणात गरज नसतांना नको तितके हस्तक्षेप करू लागलो आहे.. आमची मानसिकता बरबटली, तशीच मानसिकता सेट होत चाललीय का आजच्या पिढीत .. आम्ही पालक म्हणून कुठेतरी चुकतोय आणि त्यात राजकारणातल्या कोणत्याही पार्टीचे नाहीतर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होत चाललेय हे लक्षात का येत नाहीये कुणाच्या ? आजच्या पिढीतल्या मुलांच्या वैचारिक बौद्धिक, मानसिक जडणघडणीत या साऱ्यांचा फार विपरीत परिणाम होत आहे हे कधी कळेल आम्हाला ??
हे सगळं खरतर कुणीतरी लिहायला, प्रकाशित करून लोकांपुढे आणायला हवं होतं... कुणीतरी तर राजकारण कोपऱ्यात ढकलून अनवट वाट धरावी .. खऱ्याची सत्त्याची बाजू मांडण्याचे जिगर ठेवावे. पण असे होतांना दिसत नाही. जेव्हा जेव्हा वातावरण तापेल तेव्हा आम्ही फक्त आमच्या भाकऱ्या भाजून घेणार .. वातावरण तापवणाऱ्याच्या विरोधात कसे बोलायचे बरे.. बऱ्याचअंशी कमाई त्याच्यावर पण तर अवलंबून आहे ना.. तत्व बाळगणारे पत्रकार आणि तत्वांवर चालणारे माध्यम कल्पनेतच उरणार आहेत एकदिवस. लोकांचा पूर्ण विश्वास गमावल्यावरच डोळे उघडून परतीचा मार्ग धरेल पत्रकारिता असं वाटू लागलंय.
तर ...असो ...

उजेडाचा मिलन 'स्पर्श' !

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं )

एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ...
एक अत्यंत आवडलेला लेख.
.................................................
उजेडाचा मिलन 'स्पर्श'!
संजय आर्वीकर
उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो...
नवजीवन अंध विद्यालयाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं. त्यानंतर स्वतःच्याच कोषात राहणाऱ्या कविताला शाळेच्या कामात जणू नवे जीवन-प्रयोजन गवसलेले. पण कविताची गुंतवणूक आता फक्त शाळेपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनिरूद्ध आणि कवितामध्ये नाजूक भावबंध निर्माण झाले आहेत. दोघांनाही याची जाणीव झालेली आहेच. पण अजून दोघांनाही आपण निखळ प्रेमभावनेने एकत्र येत आहोत, हे महा-ज्ञान व्हायला बराच पल्ला गाठायचा आहे.
दोघे एकत्र आलेली अशीच एक संध्याकाळ -
अनिरुद्ध : मै एहसान से घबराता हूं, कविता... और दिन ब दिन तुम्हारे एहसानों का बोझ भारी बनता जा रहा है.
कविता : कैसा एहसान? दो पराठे और एक केक?
अनिरुद्ध : तुम्हारा स्कूल मे आना ही एक एहसान है, हमारे बच्चों के लिये.
कविता : आपने कहा था, कि मै उन्हे कुछ दुंगी, तो वो भी मुझे कुछ देंगे.
अनिरुद्ध : वे किसे क्या देंगे बेचारे?
कविता : यह लब्ज मना था... ‘बेचारा’
अनिरुद्ध : दुसरों के लिये मना था... आखिर मैं भी तो उनमे से हूं - एक बेचारा!
कविता : दुसरा कोई हमदर्दी दिखाये, तो आप कितना चिढ उठते है. बट् यू आर फूल ऑफ सेल्फपिटी... सच, जितनाही आपको अधिक जानती हूं, उतनाही कम समझ पाती हूं.
अनिरुद्ध : मुझे समझनेकी कोशिश मत करो कविता. लीव्ह मी अलोन. अपनी अंधेर नगरीमें मुझे रहने दो.
कविता : अंधेरे में आप अकेले नही है, मैं भी तो अंधेरे में ही रहती हूं.
अनिरुद्ध : हां! लेकिन तुम्हारे और मेरे अंधेरे मे फर्क है.
कविता : क्या हमारा उजाला, एक नही हो सकता?
‘क्या हमारा उजाला एक नही हो सकता?’ हे ‘स्पर्श’ या या चित्रपटातलं भरतवाक्य आहे आणि या वाक्याचा आशय अनिरुद्ध-कविता या परस्परसंबंधांपुरता मर्यादित नाही. चित्रपटाबाहेरचा मोठा अवकाशही. ते आपल्या कवेत घेतं.
आश्वस्त करणाऱ्या प्रकाशमान दिव्यांशी एखादी माळ असावी, अशी एकमेकांना प्रकाश देणारी नितांतसुंदर प्रसंगमालिका ‘स्पर्श’मध्ये लुकलुकत - ‘आम्ही आहोत... आम्ही आहोत’ असं सांगत राहते. लहान मुलांचे हळूवार प्रसंग. हा प्रकाश थेट आपल्या काळजात उतरवतात... चित्रपटाच्या प्रारंभी पपलू हा डोळस मित्र रामप्यारेला मिडास राजाची गोष्ट सांगतो. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, रामप्यारे पपलूला गोष्ट सांगतो, ब्रेलमध्ये कविताने तयार केलेल्या पुस्तकाच्या आधारे. हिशेबही जुनाच. एका गोष्टीसाठी दोन चॉकलेटस्. या दोन दृश्यांच्या आंतरक्रियेतून पडलेला प्रकाशझोत थेट कविता-अनिरूद्ध यांच्या आता काहीशा औपचारिक झालेल्या संबंधांवरही पडतो; कारण अटीतटीच्या एका प्रसंगी मुलांसाठी ब्रेलमध्ये गोष्टीची नवी पुस्तकं का नाहीत, असा प्रश्न विचारलेल्या कविताला-तिनं आतापर्यंत ब्रेल शिकणं आवश्यक का मानलं नाही? असा प्रतिप्रश्न अनिरुद्धनं केलेला असतो. या नात्याची सुंदरता अशी आहे, की काहीशा वादावादीच्या सुरात घडलेल्या या प्रसंगाची परिणती कवितानं मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं ब्रेलमध्ये तयार करण्यात होते. या प्रसंगातून उमललेल्या स्निग्ध प्रकाशात कविता-अनिरुद्ध यांच्यातले नाजूक भावबंध पुन्हा क्षणभर उजळून जातात.
अगदी कविता नवजीवन अंध विद्यालयाकडे कशी आकर्षित झाली, हा प्रसंगही अंध आणि डोळसांनाही एकमेकांच्या प्रकाशात न्हाऊन टाकणारा आहे.
दिवाळीचे दिवस. कविताची मैत्रीण मंजुळ दिवाळीसाठी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर रंगीबेरंगी मेणबत्त्यांच्या खरेदीसाठी कवितासह आलेली. रुपेरी पडद्यावर खूप साऱ्या झगमगत्या मेणबत्त्या. मंजुळ त्या बघून हरखून गेलेली. एक भलीथोरली मेणबत्ती घेऊन मंजुळ पैसे देण्यासाठी जात असतानाच दोन अंध विद्यार्थ्यांमध्ये, कोणी तयार केलेली मेणबत्ती विकत घेतली, जाते याबद्दल विलक्षण उत्सुकता. आपली मेणबत्ती विकली न गेल्यामुळे रामप्यारे हिरमुसलेला. कविता रामप्यारेकडे जाते-
कविता : ये पिलीवाली मोमबत्ती आपने बनायी है?
रामप्यारे : हां जी.
कविता : (स्नेहार्द्र आवाजात) अरे ये तो बहोत खूबसुरत है, बहुतही सुंदर!
कविताची बोटं जणू मेणबत्तीला गोंजारताहेत. नंतर त्यालाही ती प्रेमभरानं कुरवाळते.
कविताच्या साडीचे पोत कुरवाळत,जणू बोटांच्या स्पर्शाने बघत -
रामप्यारे म्हणतोय, ‘आपकी साडी बहुत सुंदर है.’
यानंतरच्या दृश्यात कविता एकदम प्रिन्सिपॉल अनिरुद्धच्या केबिनमध्ये दिसते.संभाषणाच्या दरम्यान, तिने आपला इरादा बदलून अंध विद्यालयात येण्याचं कसं ठरवलं? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ती सांगते. ‘कुछ चेहरे... कुछ मोमबत्तीयाँ... कुछ स्पर्श...’
चित्रपटात खूप नंतर, अनिरुद्धशी साखरपुडा ठरल्यानंतर कविता आणि मंजुळ साडी खरेदीसाठी जातात. कविता डोळ्यांनी बघून साडीची निवड करण्याऐवजी तिला डोळे बंद करून फक्त स्पर्श करून, साडीची निवड करते; तेव्हाही रामप्यारेबरोबरच्या त्या प्रसंगातील मेणबत्त्यांचा प्रकाश या प्रसंगावर आणि त्यानंतरच्या अनिरुद्धबरोबरच्या सुंदर क्षणांवरही पडलेला असतो.
आपण डोळस आहोत म्हणून आपल्यावर या आंधळ्यांच्या शाळेत अन्याय होतोय.कविता आंटी आपल्याकडे पुरेसे लक्ष न देता रामप्यारेचेच लाड करते, अशा भावनेने घेरलेला पपलू - रामप्यारेच्या घरी सगळेच आजारी पडलेत, असं खोटंच सांगतो. रामप्यारेला खरं कळताच दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरू होते, दोघांची मारामारी सुरू असतानाच, आपल्याला दृष्टी असल्याने आपण वरचढ ठरतोय, याची जाणीव पपलूला होऊन तो डोळे बंद करून पुन्हा मारामारी करू लागतो. पपलूच्या मनात ही जाणीव निर्माण होणं, हा त्याचा नवा प्रकाश सापडण्याचा - ‘डोळस’ होण्याचा क्षण आहे. समान न्यायासाठी, हा ‘असलेले डोळे’ बंद करून घेण्याचा क्षण एखाद्या अक्षय प्रकाश-कुपीसारखा मनात साठवून ठेवावा असा आहे. जेव्हाही मन काळोखाने घेरले जाईल, पपलूने मुद्दाम बंद करून घेतलेले डोळे आपल्याला या प्रकाश-कुपीकडे नेईल.
‘स्पर्श’मधील अनिरुद्ध आणि कविता यांच्यातले एक प्रेम-दृश्य भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील विलक्षण सुंदर, अर्थसमृद्ध दृश्य ठरावे.
हिरवळीवर निवांत बसलेले अनिरुद्ध आणि कविता.
कविता : क्या सोच रहे हो?
अनिरुद्ध : सोच रहा हंू तुम कितनी सुंदर हो!
कविता : कैसे मालूम?
अनिरुद्ध : नही हो क्या?
.....
कविता : हा... हूं. कहते है-
अनिरुद्ध : (हळुवार हसत) तो क्यूं कहते है जो कहते है?
अनिरुद्ध तिच्यानजीक आलेला. तिच्या खांद्यावर त्याची मान.
कविता : क्योंकि मेरी आखे बडी और भुरी है.
अनिरुद्ध तिच्या डोळ्यांवरून बोटं फिरवतो.
कविता : मेरे बाल घने है,
अनिरुद्ध तिच्या केसांवरून हळुवार हात फिरवतो.
कविता : मेरे होठ... (एक अस्फुट हुंकार...) और मेरा रंग गोरा है.
.....
{ आता अनिरुद्ध त्याच्या दृष्टीने तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो.
‘पता है कि तुम मुझे सुंदर क्यू लगती हो? क्योंकि तुम्हारे बदनकी, बालोकी महक लुभावनी है. इसलिए तुम सुंदर हो, निशिगंधा के फुल की तरह... तुम्हारी आवाज भावस्पर्शी है... सतार की झंकारकी तरह... और तुम्हारा स्पर्श बहोत कोमल है... इसलिए तुम सुंदर हो मखमल की तरह... और इस सबसे ज्यादा तुम्हारापन...
संपूर्ण भारल्यागत आवाजात कविता त्याला ‘बस... बस... बस...’ म्हणत थांबवते.
दोघेही एकमेकांत संपूर्ण. या दृश्यातच अनिरुद्धपणे मूर्तिमंत कविता साकारत असते.
स्त्री सौंदर्याचं समतोल-तत्व जणू दोघे मिळून साकारताहेत पंचेंद्रियांचे एकात्मीकरण साधून.
‘स्पर्श’ हा चित्रपट त्यातील बदणाऱ्या मनोवस्था एका सुंदर गाण्यानं बांधल्या आहेत.कविता एकटेपणाच्या काळोखात असते तेव्हा तिचे गाणे असते -
खाली प्याला धुंधला दर्पन
खाली खाली मन...
आणि अनिरुद्ध बरोबरच्या, अंध विद्यालयात तिला ‘नवजीवन’ देणाऱ्या सहप्रवासात हे गाणे होऊन जाते -
प्याला छलका उजला दर्पन, प्याला छलका उजला दर्पन
जगमग मन आंगन जगमग मन आंगन
इंदू जैन यांच्या ओळींमधला हा पुनर-उच्चार, मन भरून टाकणारा हा प्रकाश साऱ्या जगाबरोबर वाटून घ्यावा, या भावनेची पुनरुक्ती आहे. या प्रकाशात अनिरुद्धचा अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती आणि त्यागाच्या आवरणाखाली लपलेले तिचे प्रेम सूर्यफूलासारखे उमलण्याची शक्ती आहे. पण या प्रकाशापर्यंत तिला आणि आणि अनिरुद्धलाही आणले आहे, तिच्या सुरांनी-ध्वनीनं, म्हणूनच सौंदर्यशास्त्रज्ञ विदुषी सुसान लँगर म्हणते, सर्व कलांना संगीत व्हायचं असतं...
- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com

Tuesday, 4 September 2018

बँडवॅगन इफेक्ट !!



याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळच्या एका छोट्या गावात तांदूळ आणि खाण्याच्या वस्तू चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना  पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथे घडली होती. नंतरही कधी मोबाईल चोरीच्या संशयावरून तर कधी मुलं चोर समजून, गोहत्या केली म्हणून तर गोरक्षक आहे म्हणून कुठलीही शहानिशा न करता पुढे कुणीतरी दिसतंय म्हणून, संधी मिळालीय म्हणून, गम्मत वाटतेय म्हणून, सगळेच मारताहेत म्हणून गर्दी जमत राहिली आणि मारमार मारून एकट्या तावडीत सापडलेल्या माणसांना गलितगात्र करून, अर्धमेले करून किंवा जीव जाईपर्यंत मारत मज्जा पाहत राहिली. २०१२ मधली दिल्लीच्या निर्भयाशी, मुंबईच्या शक्तीमिलच्या पीडितेशी, काश्मीरच्या आसिफा आणि कितीतरी अश्या केसेस, एकावेळी अनेक माणसांनी मिळून केलेले क्रूर कर्म कुणालाही विसरता येणार नाही.


कुठून येत असेल एवढं क्रौर्य हा संशोधनाचा विषय आहे. पण...मला पडलेला प्रश्न असा कि एकावेळी अनेकजण एखाद्या चुकीच्या गोष्टीत शामिल होतात तेव्हा त्यातल्या एकालाही कुठल्याश्या शुल्लक कारणावरून आपण काहीतरी चुकीचं करतो आहे, वागतो आहे याची जाणीव होत नसेल? 

"बँडवॅगन इफेक्ट" नावाचा एक प्रकार आहे मानसशास्त्रात. यामध्ये व्यक्तिंचा समूह इतर व्यक्ती कशा वागत आहेत त्यानुसार वागायला लागतात.मोठ्या प्रमाणावर इतर लोक काय करत आहेत तसंच लोकं करायला लागतात. चार लोकांसारखं वागलं नाही तर आपण चूक ठरू ही भीती, अतार्किक, कुठलाही सबळ पुरावा नसलेल्या गोष्टींना पाठींबा देण्यास भाग पाडते. यात मग वेळोवेळी खूप साऱ्या घटना येतात जसे की फॅशन, निवडणुकांमधल्या लाटा, गाजलेले सिनेमे, एखाद्या गोष्टीविरुद्ध प्रचंड चीड, संताप…
मनुष्य हा मुळात विक्षिप्त प्राणी आहे. सामाजिक नितिमत्तेने आणि संस्कार मूल्यांमुळे तो त्यांच्यासारख्याच इतर माणसांमध्ये समतोल राखून एकत्र राहतो आणि जगूही शकतो. अनेकदा असा तर्क लावला जातो कि जो पकडला जातो तो गुन्हेगार ठरतो म्हणजे माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक; बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी आहेतच जन्मतः जी तशी नाहीयेत त्यांना खरतर तसे काही करण्याची  कधीच संधी मिळाली नसते म्हणून त्यातून विनासायास सुटू शकलेले असतात. गुन्हा करायची संधी मिळाली तर कुठलाही मनुष्य ती सोडणार नाही. जसजशी  मानवाची  शक्ती आणि क्रौर्य वाढत जातंय, तसतशी बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी कमी होत जाते आहे अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे.. या साऱ्या संसारात सगळा पसारा त्याने स्वतःशीच खेळता यावं म्हणून मांडून ठेवलाय आणि तो पसराच आता त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या विनाशाला आणि पर्यायाने सुरक्षित जगण्याच्या विश्वासाला तडा देणारा ठरतो आहे.  सध्या इथे एकच कायदा आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!! म्हणून कट थ्रोट स्पर्धाही या स्पर्धेत टिकाव धरायला माणूस कुठलाही स्तर गाठायला तयार झालाय आणि या मानवी मानसिक बदलांची पडझड आता झपाट्याने वेग घेते आहे. 

युगोस्लावियाची सुप्रसिद्ध कलाकार मरीना अब्रोमोविक हिने १९७४ मध्ये अशीच माणसांची मानसिकता तपासून पाहायला ''रिदम झिरो'' नावाने एक प्रयोग केला. ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज उपलब्ध होईल अश्या जागी उभी झाली. तिच्या पुढ्यात ठेवलेल्या टेबलवर ७२ प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. या वस्तू दोन भागात विभागल्या होत्या एक हानी पोचवणाऱ्या ज्यात ब्लेड, सूरी, काटे, पिस्तूल अश्या बऱ्याच वस्तू होत्या, दुसऱ्या बाजूने आनंद देणाऱ्या वस्तू होत्या उदाहरणार्थ गुलाब फुले, चॉकलेट आणि बरंच काही. मरिनाने घोषित केले ती पुढली ६ तास अशीच उभी राहणार आहे आणि लोकांना तिच्यासोबत वाटेल ते करण्याचा अधिकार आहे. या ६ तासात तिच्यासोबत जे काही होईल त्याला फक्त ती स्वतः जबाबदार राहील. त्यानंतर काय झाले हे जाणून घेतले तर माणसाच्या मनातल्या अतृप्त विकृत इच्छा या स्तरापर्यंत जातात जाऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. सुरुवातीला काही माणसांनी तिला स्पर्श करून पहिला ती हालत नाही, काहीच बोलत नाही हे पाहून ते निर्ढावत गेले, तिला नको नको त्या ठिकाणी स्पर्श होऊ लागले, पुढल्या अर्धा तासात एकाने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला, नंतर कुणीतरी तिला निर्वस्त्र केले, तिच्या शरीरावर काही माणसे चावा घेऊ लागले, एका इसमाने तिच्या हातात पिस्तूल दिला आणि गनपॉईंट तिच्या गळ्यावर करून उभे राहायला सांगितले. कुणीतरी तिच्या शरीरावर सुरीने घाव केले. नंतर माणसे एकत्र येऊ लागली एकावेळी ४-६ माणसांनी तिला उचलून लेटवले तिच्या अंगावर काटे टोचवले, कचरा टाकला तिच्या संपूर्ण शरीरावर स्पर्श करून नाजूक ठिकाणी सुरीने भोसकून रक्तही काढले.

मरिना सांगते जसजसा वेळ जात होता लोक गटाने येऊन कृती करायला लागले होते. त्यांना एकमेकांचा संकोचाही उरला नव्हता. याकाळात तिने क्रूरतेचा पराकोटीचा अनुभव घेतला.. शेवटचे दोन तास तर तिला असह्य वेदनेच्या   दुष्टचक्रातून जावे लागले. मानवतेवरचा विश्वासच उडावा इतका धक्कादायक प्रकार घडत होता. संधी मिळाली आणि त्याचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाहीयेत हे ठाम झाल्यावर पशूहून पाशवी झालेल्या माणसांनी असा उच्छाद मांडला होता. यात बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी तिला गुलाबफूल अन गालावर किस दिले होते. 



विषय माणूस कुठल्या स्तरावर जाऊन अत्याचार करतो हा नाहीच आहे, विषय मानसिकतेचा आहे. एका बाजूला सकारात्मक बाबी असतांना दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नाकारात्मकतेकडे बहुतांश लोकं आकर्षित होतात आणि एकत्र येऊन कुठलाही संकोच न बाळगता नकारात्मक किंवा समाजमान्यते बाहेरील चुकीच्या गोष्टी मग  त्या इतरांसाठी घातक असल्या तरी बेहत्तर बेधडक  करतात आणि त्यातून मनोरंजन करून घेऊन, विनोद घडवून आणून आनंद घेतात, प्रक्रियेचा भाग नसले तरी बरेच बघ्यांच्या भूमिकेतही निष्क्रिय असतातच तेव्हा या विकृत मनोवृत्तीने आपण किती ग्रासले गेलो आहे, आपल्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे लक्षात येते.

हल्ली यातलाच एक नवा जमान्याचा नवाच ट्रेंड सुरु झाला आहे 'व्हर्च्यूवल मॉबलिंचिंग'

  परवा सचिन पिळगावकरांच्या 'मुंबई अँथम' या गाण्यावरून आणि नंतर त्याने त्याच्या पानावर दिलेल्या स्पष्टीकरणावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग करून जो काही गदारोळ चालू आहे ते पाहून फार अस्वस्थ व्हायला झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत प्रचंड जागृत असलेले आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृत असणे सोडाच सहिष्णूदेखील होऊ शकत नाही हे एकत्र एक समाज म्हणून जगतांना किती घातक आहे ह्याची कल्पना आपल्याला का येत नाही ? हि फक्त सुरुवात असेल तर ह्याचे भविष्य किती भयावह असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. एखादा कलावंत त्याच्या कलेला आणि प्रोफेशनलाही बांधील असतो हे समजण्याइतकीही समजूतदार हल्ली बाळगली जात नाहीये. कलाकार माणूसही असतो, त्यालाही परिवार बायको मुलं, आई-वडील  असतात आणि आपल्या माणसाशी जग इतकं घाण इतकं वाईट पद्धतीने वागतंय याच किती लोकांना दुःख असेल याच जराही वैषम्य हल्ली हि व्हर्च्यूवल गर्दी बाळगताना दिसत नाही.  एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर उभे कि आडवे फटके मारावे, एखाद्या गायकाने-संगीतकाराने कुठला सूर कुठला ताल आळवावा, एखाद्या लेखकाने कुठल्या विषयावर पुस्तक लिहावे खरतर हा सल्ला देणे वेगळे. एखादी कलाकृती आवडली नसेल तर तसे निक्षून सांगणे वेगळे... पण एखादी कलाकृती आपल्याला न आवडणे किंवा न पटणे हा एव्हढा मोठा गुन्हा असतो कि त्यासाठी हजारोने माणसे एकत्र येऊन तासनतास त्या कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, अगदी खालच्या दर्जाच्या शब्दांचा वापर करून, गलिच्छ भाषेचा उपयोग करून सतत अपमान करीत राहतात. आणि एवढेच नाही तर स्माईलीच्या मागे दडून हजारो बघे दात काढत करमणूक करवून घेतात.

त्या व्हर्च्युअल पडद्यामागेही एक जिवंत व्यक्ती बसली आहे हे का विसरतो आपण? एखाद्याविषयी इतका विखार इतका वाईटपणा पसरवायचा अधिकार कुणी दिला आपल्याला ?? इंटरनेटने सोय करून दिली आहे म्हणून आणि एखाद्याच्या हाताने झालेल्या चुकीने संधी प्राप्त झाली आहे म्हणून शाब्दिक मार हाणणारे..अपमानास्पद शब्द शस्त्रांनी वार करून गर्दीपुढे एकट्या पडलेल्या पुढल्याच्या मनोबलाचे चीरहरण करून त्याला पूर्णतः त्याच्या क्षेत्रातून संपवण्याचा प्रयत्नच तर करतोय .. आणि   आपण काहीतरी चुकीचे करतो आहे असे हजारोच्या संख्येतल्या एकालाही वाटू नये किंवा ज्याला वाटेल तोही यात भरडला जाईल इतकी हि विखारी प्रखरता आम्ही वाढवून अधिक शक्तीने वार करू हि छुपी धमकी.

पुन्हा प्रश्न पडतो तो इतकाच संधीचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा नकारात्मकतेकडे झुकाव वाढतो आहे. जिथे चांगले करायची संधी असेल तिथून अनेक निमित्त्य सांगून पळ काढणारे नकारात्मकता वाढवणाऱ्या, समाजासाठी घातक असणाऱ्या गोष्टीत आवर्जून सहभागी होताना दिसतात. दीर्घकालीन फायद्यांपेक्षा किंवा भविष्यात नुकसान होणाऱ्या गोष्टींचा विचार पूर्वक स्वीकार-अस्वीकार करण्यापेक्षा, वैचारिक समजूतदारीचा, इतरांच्याबाबतीत सहिष्णू होण्याची क्षमता वाढवण्याचा कल संपुष्टात येऊन क्षणाच्या करमणुकीला जास्त महत्व दिलं जात आहे. या मानसिकतेची लागण होणं किंवा संक्रमण होणं आजच्या आणि पुढच्या पिढीलाही फायद्याचे ठरू शकत नाही.   
 तेव्हा आता थांबलं पाहिजे ... थांबवलं पाहिजे.
रश्मी पदवाड मदनकर 
२ सप्टें. २०१८
(लेख कॉपी राईट आहे. सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन)

Friday, 17 August 2018

सांगायचे होते मला जे
ते तुला कळलेच नाही
शब्द होते लाख ओठी
गीत पण जुळलेच नाही

स्पर्शातून का वेदनेचा
दाह हा नडतो कधी
कळवायचे होते तुला जे
कळले पण वळलेच नाही

पेटले विरहात अन
मज वाटले सुटले अता
शांत झाला ताप पण 
पोळले परी जळलेच नाही

का असा आलास अन
अर्ध्यातूनी गेलास तू
पाठ फिरता रे तुझी
मी जगी रुळलेच नाही

रश्मी मदनकर

Thursday, 16 August 2018

जुनेच इशारे जुन्याच खुणा त्या पानावर कोरलेल्या
जुनीच कपाटे जुनाच खणा त्या पानांनी भरलेल्या

तू अजूनही तिथे तसाच आहे जिव्हाळ्याने जपलेला
तो थेंब सुना लांघून गुन्हा नयनांमध्ये लपलेला

भिजले शब्द जुनेच गाऱ्हाणे, भावुकतेच्या लाटेने
एकटीच निघाले मी वेडी मग आठवणींच्या वाटेने !

रश्मी मदनकर
४/०३/२०११

Wednesday, 8 August 2018

वृत्त:- मंजुघोषा
लगावली:- गालगागा गालगागा गालगागा !
--------------------------------------------------------
गोंदलेल्या वेदनेला नाव नाही
घाव झाले खोल का ते ठाव नाही


हारते हा खेळ जिंकाया नव्याने
मी रडीचा मांडलेला डाव नाही


ओढ मज आहे नभाची ध्येयवेडी
कुंपणा , माझी तुझ्यावर धाव नाही


आटले कोठे उमाळे अंतरीचे
प्रेम नाही वा कुठे सद्भाव नाही


पाडले फासे जरी आता मनाने
प्राक्तनाशी खेळण्याला वाव नाही


लाख भांडू दे कुणीही दैवताशी
होतसे जे व्हायचे बदलाव नाही


#मराठीगझल
रश्मी पदवाड मदनकर
28 जुलै 18

Friday, 3 August 2018

टीमटीम तारे .. !

निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना
पहाटे स्फुरण चढतं..मग 
रात्रीची खुंटीला टांगलेली रिकामी
स्वप्नांची थैली तो झटकून तपासून घेतो..
इच्छा, आकांक्षा, अर्धउन्मलित स्वप्ने.. 
कोंबून भरतो पुन्हा उमेदीने
निघतो पुर्ततेच्या प्रयत्नाच्या प्रवासाला..
पुन्हा कालसारखाच ..

रणरण वणवण करून रात्री परतल्यावर
घरात शिरण्याआत पिशवीतली सारी अपुर्ण स्वप्न
त्वेषात भिरकावून देतो आकाशात..
चेहेरयावर हसू ओढतो.. थैली खुंटीला टांगतो.
आनंदी वावरतो .. आणि
दमला भागला जीव करतो झोपेच्या हवाली 
अर्ध्यारात्री कधीतरी...

इकडे नाऊमेदीचे अर्धगळके थेंब डोळ्यात..अन
भंगलेल्या स्वप्नांचे तयार झालेले तारे आकाशात
टीमटीमत राहतात रात्रभर.. 

निजल्या देहाच्या शिणलेल्या गात्रांना पुन्हा
पहाटे स्फुरण चढतं.. मग ... 

Tuesday, 24 July 2018

पहाटसमयी अंगणात नेत्राकर्षक पखरण दिसते खरी .. पण
रात्रीच्या अंधाराचे गुपित तुला माहित नाहीत रे ..
गळताना प्राजक्ताच्या हुंदक्यांचे रंग लवंडले असतात  ..
खुडतांना अबोलीच्या चित्कारण्याचे फवारे उडाले असतात  ..
आणि तुला ..
तुला मात्र सूर्योदयाच्यावेळी आसमंतात पसरलेल्या लाल-केसरी रंगाची भूल पडते ...

मग मला सांग, मला आवडतो तो काळा रंग अधिक प्रामाणिक नाहीये का रे ?

रश्मी पदवाड मदनकर
२४ जुलै १८



Tuesday, 17 July 2018

धडा -


जात-धर्माच्या महाकाय पाषाणाखाली
ते समजतात सुरक्षित स्वतःला
बिनबुडाच्या अस्मितेचा प्रश्न
जगण्याहूनही पसाभर मोठाच झालाय
पिढ्यागणीक उद्धाराचा हेतू
वळचणीखाली झाकोळला गेलाय

संस्कृती रक्षणाचा भार पाषाणावर
आणि...खाली
तकलादू अस्मितेच्या चिघळट घसरंडीचा
तोल बिघडत चाललाय..
प्रत्येकाजवळ जातीच्या कुबड्या असल्या तरी
दावणीला लावलेला पाय घसरलाच.. आणि
महाकाय पाषाण आदळलाच...तर ?
तर आम्ही आमचेच एकत्र आत चेपले जाऊ
दडले जाऊ...गाडले जाऊ.
मग आमच्या धर्म संस्कृतिचा मोहेन जोदाडो- हडप्पा
काय करू नये याची साक्ष
भविष्यातल्या इतिहासाच्या पानावर देत राहील
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावत राहील..
अभ्यास तर दुर ते वाचायलाही हात लावणार नाहीत
इतके रटाळ अन टुकार वाटत राहतील धडे ..



रश्मी मदनकर
4 एप्रिल 18
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..

आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..

दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..
सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.

दिवसभर केसात माळून ठेवलेला गजरा
तू येईपर्यंत वाट पाहून दमला, चिमला
आणि तू येता येता.. तसाच पायवाटेवर गळून पडला
.
.
.
तू येतांना त्याच फुलांवरून चालत आलास
.
.
एवढंच काय ते त्यांनी पाहायचं बाकी होतं
मग काय .. कायमचे डोळे मिटूनच घेतलें त्यांनी ...
चांदण्यांचे वर्ख सारे देहभर मी गोंदते,
चंद्र असतो साक्षिला अन मी नभाशी बोलते !


पारिजाताच्या फुलांचे रंग घेते ओढुनी,
गंध होतो देह सगळा मी अशी गंधाळते !


उंबऱ्यापाशी घराच्या रात्र का अंधारली,
ओंजळी घेउन उजेडा काजव्यांशी डोलते !


छेडता जेव्हा कधी मी जीवघेणा मारवा,
मखमली आलाप ते मग गीत जन्मा घालते !


सांजवेडे दुःख मग सुर्यास देते अर्पुनी,
ध्येयवेडे स्वप्न मी घेउन उराशी चालते !




* रश्मी पदवाड मदनकर - ४ एप्रिल १८
#मराठीगझल
तुलाच बघते तुझाच दर्पण करते आहे
तुझेच देणे तुलाच अर्पण करते आहे


तुझाच मी राग छेडता शब्दावाचूनी
तुझेच गाणे तुलाच तर्पण करते आहे


विलीन केले तुझ्यात मी अन झाली कृष्णा
तुझीच मीरा तुला समर्पण करते आहे..



*रश्मी - 15.04.18

Friday, 13 July 2018

भास !

जेव्हा फार एकटे असतो तेव्हा एकटे नसतो आपण
गोतावळा होतो.. कोलाहल झोंबतो
जीव गुदमरतो
खूप गर्दीत असतो तेव्हा गर्दीत कुठे असतो आपण ?
फार एकटे असतो .. आतली हाक पोचतच नाही कुणापर्यंत
आतच विरते .. जीव चडफडतो

असल्या नसल्या जाणिवांचे सगळे नुसतेच भास असतात.

आहे तसे नसतेच काही
नसलेले असते पण बरेच काही
असल्या-नसल्या वाटण्याचे सगळे भास ठरतात शेवटी.

ध्यानीमनी दिसते ते भास असतात
किंवा नुसतीच आस असते.

सगळी दुनियाच जगते आहे एकतर आस लावून
किंवा भास ओढून ..

मग ..वस्तू दिसतात, माणसे दिसतात, रस्ते दिसतात
हे सगळं खरंच आहे .. की हेही सगळे भास ?
की मी निर्मनुष्य एखाद्या बेटावर भासमयी विश्वाच्या पसाऱ्यात
एकटी जगते आहे ?

मी दिसणारी मी तरी आहे का
की आहे एखाद्याचा भास ..
की ..मग, मी माझाच भास
कुणाच्याही विश्वात नसणारा
तात्पुरता मनःपटलावर उमटलेला ..

भास आहे तोपर्यंतच जगून घेऊ का
एकदिवस पाण्यावरचा बुडबुड्याप्रमाणे विरून जाईन मग

बुडबुडा - खरंच असतो ?


(c)रश्मी पदवाड मदनकर
१३ जुलै १८








Thursday, 21 June 2018

आज चंद्र विझणार
याचं केवढं अप्रूप केवढा उत्साह
फाटक्या संसाराची फाटकी लक्तरं वेशीवर टांगून
नसणाऱ्या श्रद्धेचा बाजार मांडून
उदास खिन्न रात्रीला.. विझल्या उजेडाच्या
पिकल्या अंधाराचे भांडवल करून
पोटाची खळ बुजवायला मिळणं
हे क्वचित घडतं...कधीतरी ...
तसेही
श्रद्धा-अंधश्रद्धेची..पुण्य-पापाची, देवा-राक्षसाच्या भीतीची
उतरण मिळवून काहिवेळच्या पोटापाण्याची आग विझणार असेल
तर ...
विझता चंद्र-सूर्य येऊ देत दर महिन्याला
कोणाचं काय बरं अडतंय ??

"दे दान तर सुटे ग्रान !!"

रश्मी पदवाड मदनकर
19 jun 18

Saturday, 2 June 2018

शेवटी काय ना सगळ्यांचेच पाय मातीचे असतात. आदर्शवत वगैरे असं काही नसतच..म्हणूनच व्यक्तीपुजा मुर्तीपुजेइतकीच फसवी असते. नकोच करायला कुणाचीही.
कानावर पडणारे आणि मनाला भिडणारे स्वर हे खूपदा वेगवेगळे असतात. खरं तर मनाला भिडणाऱ्या गोष्टी व्यक्त स्वरूपातल्या असव्यातच असेही नाही. त्या सोन ओळींमधल्या रिकाम्या जागेसारख्याही असू शकतात, ज्या ना सांगताही कळतात-भिडतात मनात ठाण मांडून बसतात. व्यक्त केलेल्या गोष्टीही बरेचदा दिसतात तश्या असतात कुठे?? ओठांची एखादी तिरकी रेषा, डोळ्यातली चमक किंवा मलूल दिसणारे डोळे, आर्त स्वर, कातर झालेले शब्द, पडलेला-फुललेला चेहेरा, दिलेलं-न दिलेलं स्मित अश्या किती किती गोष्टी असतात पुढच्याच्या मनातलं समजून घ्यायला.. पण मनातलं समजून घ्यायला आधी मन दिसायला हवं आपलं वाटायला हवं, त्यासाठी ते आपलं करून घ्यावं लागतं त्यासाठी आयुष्यातला वेळ-ऊर्जा इन्व्हेस्ट करावी लागते ..दोन्ही बाजूने..ते न देताच फक्त मिळत राहण्याची अपेक्षा फोल ठरणारच. म्हणूनच तर मैत्रीचे नाते असे व्याख्येपलीकडे असते कारण इथे दोन्ही बाजूने समान देवाण घेवाण झालेली असते.....साऱ्याच नात्यात हि इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी ... ती ती नाती जपायची असेल तर ...  खरया समाधानासाठी....
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..

आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..

दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..

सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
अंतर्यामाच्या सागरडोहात ..अथांग खोलात उतरत जाते. तेव्हा आठवणींच्या गडद प्रतिबिंबाशी भेटी होतात. प्रेमाचं हतबलतेशी फार गहिरं नातं आहे म्हणतात, त्या क्षणांशी आत्म्याचे मिलन होतांना अंतरात्म्याची होणारी तडफड थांबवण्याचे धारिष्ट्य कुणातच नसते. या क्षणांचा गंध झिंग रूपात चढत जातो. आत्म्यात झिरपत देहात पसरतो..रोम रोम गंधावत नेतो. त्याक्षणात - गंधात तादात्म पावणार काहीतरी खास असतंच ना ?

 काही क्षणांच्या आठवणींचं व्यसन जडतं रे ...

Rashmi.

(एका दीर्घ ललितलेखाचा छोटा भाग)

विषय !

ते कपाळावर आठ्या आणतात
विचारतात... 
काय गं, तू हेही करतेस
तू तेही करतेस..
दिवसरात्र लगलग करत
बरंच काय काय करत असतेस..
कसंच बाई जमतं तुला ?

ती खमकं हसते ..
उत्तरते...

खरं सांगू,
मला बरंच काय काय करायचं नसतं..
टाळायचंच असतं खरंतर ..
ते करण्याची उर्मी दाटून येऊ नये
आसक्ती उफाळून त्रास देऊ नये
म्हणून
बरंच काय काय करत असते

काही काही विसरायला
काहीबाही आठवत असते. 

विषय आठवून, जमवून करण्याचा नसतोच हो
विषय विसरून हसून जगण्याचा असतो ..
तेच करत असते .. 

रश्मी मदनकर
16 मे 18.
कधी लाट वाटे जरा आपुलीशी
कधी भास तिचा जशी सावलीशी
जरा ओल येतो तुशारात शिंपून
अकस्मात होते जरा बावरीशी

मी .....उभी एकटी बोलते सागराशी !!




Friday, 1 June 2018

दुनियेत मुखवट्यांचा सूकाळ फक्त आहे
वठवावयास सोंगे तय्यार तख्त आहे l

मेंदूत खलबते नी ओठात जप हरीचा
बाजार देवतांचा मांडून भक्त आहे

भासे अखंड प्रीती भेटीत आर्ततेच्या
नाती मनामनाची आतून रिक्त आहे l

आहे जरा दिलासा माणूसपण मरेना
किमया खरेपणाची अजूनी सशक्त आहे l

कोणी म्हणे मनीचे सांगून मोकळे हो
जखमा मनातल्या पण, माझ्या अव्यक्त आहे l

रपम / 12.5.18

#मराठीगझल

Friday, 18 May 2018

वेड्या माणसांच्या गोष्टी

सालं..! तर आयुष्य म्हणजे नेमकं असतं काय सांगू ... आपल्या सारखीच वेडी, अवलिया, आपापल्या छंदांना वाहून घेतलेली पॅशनेट माणसं आयुष्याच्या टप्प्याटप्प्याला भेटत राहणं .. ती भेटलीत कि त्यांच्या लाभलेल्या सहवासानं आयुष्य ढवळून बिवळून ज्या ज्या काही अंतर्गत मानसिक-बौद्धिक हालचाली होतात आणि त्यातून जो जो काही छोटा मोठा आंतरिक आनंद मिळतो ते म्हणजेच खरे आयुष्य, आणि सुख बिख काय म्हणतात ते ...बाकी सब तर मोह-माया आहे.

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे एक वेडं कुटुंब आहे. यातली हि गोंडस मुलगी आमची सक्खी मैत्रीण तृप्ती आणि तो तिचा सक्खा नवरा इंद्रनील, यांना एक यांच्यासारखंच गोडुलं लेकरू पण आहे तिचं नाव चिन्मयी.. आमची चिनू आणि विशेष म्हणजे सवयीने ती डिक्टो यांच्यावरच गेली आहे. हि तिघेही पूर्ण वेडी माणसं आहेत. उच्चशिक्षित असतांना नोकरीच्या,व्यवसायाच्या, मशिनींच्या, गाडीघोड्याच्या मागे पाळायचे सोडून ह्यांनी स्वतःला पूर्णपणे निसर्गाला बहाल केलंय.

पोटापाण्यापुरतं कमावणारी .. पैश्याच्या मागे मरमर न करता छंद जोपासण्यात पूर्ण वेळ मन भरून आनंद लुटणारी हि लोकं. इंद्रनील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, विशेषतः पक्ष्यांचे फोटो काढण्यात तरबेज. तृप्ती अगदी त्याची सावली. हि मंडळी रात्री झोपण्यापुरतं छत शोधत असावीत. बाकी सगळा वेळ ज्या देशात ज्या शहरात ज्या मोहोल्ल्यात असतील तिथले जंगल शोधून त्यात शिरून भटकत असतात. सूर्य उगवायच्या आत हे जंगलात पसार होतात तहान भूक विसरून निसर्गातले बारकावे टिपत बसतात..घरातल्या कामांची स्वयंपाकाची तमा नाही कारण त्यासाठी आपला जन्म नाही.. २ वेळचं जेवण माणूस कसाही कुठेही मिळवू शकतोच हे दोघांच्याही डोक्यात ठाण आहे... जे मिळेल ते जिथून मिळेल तिथून खायचं आणि पुन्हा मनसोक्त हवं ते जंगलात टिपता येत नाही तोपर्यंत जंगल पालथं घालायचं... एकदा आम्हीही असेच बर्ड वॉचिंगला गेलेलो तेव्हा गोगलगायसारखा यांचा सगळा संसार म्हणजे दुर्बिणी, कॅमेरा त्यांचे स्टँड्स वगैरे या दोघांच्या खांद्यावर आणि हे सगळं घेऊन एका जंगलातून दुसऱ्या जंगलात ते आम्हाला भेटायला आलेले.... इथे काय बघावे कसे बघावे याचा कोणताही मोठा बडेजाव न आणता मुलांना धडा देऊन पुन्हा दोघे संसार उचलून दुसऱ्या जंगलाकडे पसार झाले. निसर्गाला वाहिलेली यांची नैसर्गिक जडणघडण आणि तसेच साधे वागणे बोलणे अचंभित करणारेच तर आहे.

मला खूप कौतुक वाटत यांचं छंद सगळ्यांनाच असतात..त्यातल्या बऱ्याच जणांना त्याचं पॅशनही असतं पण सारेच छंद या पोटतिडकीने आणि वेडाने झपाटून जोपासता येतातच असे नाही.. ते न जोपासण्यामागे अनेक कारणं असतात. आयुष्याचा रहाटगाडा ओढतांना बऱ्याच गोष्टी मागे सुटतात त्या परत धरायला मग जमत नाही आणि सुटलेले न जमलेलं मग जमेत जमा होतच नाही.. आयुष्याच्या तडजोडी आणि संसाराची कधीही सुबकन बसणारी घडी बसवण्याच्या नादात मग वय निघून जातं, प्रकृती साथ देत नाही मग रिकामपण येत जरूर पण वेळ निघून गेलेली असते ..अश्या एकना अनेक गोष्टीच भांडवल करत माणूस पुढे पुढे निघत राहतो आणि हातच्या गोष्टी सुटल्या म्हणून पुढे हळहळत राहतो आयुष्यभर. पण तृप्ती-इंद्रनील सारखी काही माणसं असतात जी आयुष्याचं ध्येय काय, कशातून आनंद मिळतो .. नेमकं आयुष्यात कशासाठी जगायचं आहे हे स्पष्ट मनात ठेवून, ठरवून ठामपणे तसेच जगत असतात..कुठलेही एक्सक्युज न देता.

सध्या तृप्ती आणि इंद्रनील चिन्मयीला त्यांनी अनुभवलेल्या आयुष्याच्या आनंदाचे गणित शिकवत आहेत. चिन्मयी वयाच्या तेराव्या वर्षी बाबाएवढीच एक्स्पर्ट आणि अभ्यास व कलागुणात आईसारखीच हुशार झाली आहे. तिचा सुद्धा स्वतःचा ब्लॉग आहे. https://ignitedimages.com/portfolio/wildlife/#jp-carousel-४५२ ज्यात तिच्या सगळ्या कलागुणांचा स्पष्ट प्रतिबिंब दिसतं.. इंद्रनील यांनी काढलेले फोटो पाहणे हि एक पर्वणी आहे...जरूर पहा.  त्यांचे फोटो खालील लिंकवर प्रत्यक्ष पाहता येतील. 

१)  https://www.facebook.com/IgnitedImages/?timeline_context_item_type=intro_card_work&timeline_context_item_source=100009659080433

२)  https://ignitedimages.com/portfolio/wildlife/#jp-carousel-४५२








Wednesday, 9 May 2018

भयभितांचा तांडा आणि दुर्दैवाचा दशावतारी देश - सीरिया !!




 मी इकडेच का आहे ? इथे म्हणजे महाराष्ट्रात ? 
इथे याच प्रदेशात का जन्म झाला असावा ? तिकडे बिहार-आसाम एखाद्या आदिवासी नक्सली भागात जिथे स्त्रियांवर पदोपदी अन्याय होतात जीला कस्पटापेक्षाही हीन दर्जा दिला जातो जी जिवंत मरणयातना भोगते … तिकडे का नाही ? किंवा मग उग्रवाद्यांच्या, बगदादिंच्या,  तावडीतल्या भूप्रदेशात का नाही ? मी ज्यू होऊन नाझींच्या अत्याचाराला बळी पडले नाही.. सिरीया इराक जिथली महिला आज अब्रू अन जीव मुठीतला सुटू नये म्हणून एका मुठीत उरलेला संसार आणि दुसऱ्या मुठीत बंदूक घेऊन फिरतेय. 
नशीब म्हणावं का ? 

इथे जिथे मी रोज नवनवीन अनुभवातून जात असते ... विविधरंगी सुखदुःखे भोगत असते. तिथे कुठेतरी दूर माझ्याचसारखी 'ती' जीवाच्या आकांताने अब्रू हातात घेऊन जन्मापासून मरेपर्यंत लढत असते. पण मग हे सगळं उघड्या डोळ्याने बघावे वाचावे ऐकावे लागते तेव्हा आणि त्यामुळे संवेदनशील मनाला मानसिक भावनिक त्रास होत राहतो. त्याहून अधिक लिहिण्याशिवाय आपण त्यांच्यासाठी अधिक काहीच करू शकत नाही याचेही वैषम्य बोचत राहते ..तिची तिथली दशा पाहून इथला माझा जीव कळवळतो … हे कुठले ऋणानुबंध असतील तिचे आणि माझे... 


दुसऱ्या महायुद्धाच्या छाया पसरल्या तेव्हा नाझींनी ज्यू संप्रदायांच्या केलेल्या कत्तली इतिहासात काळ्या अक्षरात कोरल्या गेल्या आहेत .. त्यावेळी ६० लाखांपेक्षा जास्त ज्यू मारले गेले. या हत्याकांडाचा सरपोतदार एडॉल्फ हिटलर संपूर्ण जग पादाक्रांत करायच्या वेडाने पछाडला होता, त्याला जगजेता व्हायचे होते, पण त्यासाठी त्याने जो मार्ग निवडला तो असंख्य ज्यूंच्या यातनांमधून, वेदनेनं पिळवटून हत्या करून रक्ता-मांसाने बरबटलेला होता. वंशशुद्धी आणि राष्ट्रश्रेष्ठतेच्या आंधळ्या अहंकाराने वेड्या झालेल्या नाझींनी ज्या लाखो-कोट्यवधींचा अनन्वित छळ केला त्या सर्वांचीच  कथा भयंकर व्यथांनी भरलेली आहे. त्याच्या छळछावणीत महिला अन लहान मुलांची प्रचंड वासलात केली गेली ..कुणालाही दयेची भीक नव्हती, करुणेची आशा करता येत नव्हती. ज्यू बायका एका चक्रातून सुटायला दुसऱ्या पुरुषी सिंहाच्या जबड्यात सापडत होत्या आणि तेथेच भरडल्या-चिरडल्या जात होत्या. त्या आठवणी आजही अंगावर शहरे आणत असले तरी, आता तो भूतकाळाचा इतिहासजमा भाग झालाय...पण क्रौर्याचे दृष्टचक्र मात्र संपलेले नाही, आज या भीषण क्रूर हिंसाचाराची पुनरावृत्ती घडतेय असे वाटावे त्या इतिहासाची आठवण करून देणारा तसाच मृत्यूचा थयथयता तांडव सीरिया नावाच्या छोट्याश्या देशात घडतो आहे.

भयानक! मरण स्वस्त आहे, त्यातही स्त्रियांचे, गरिबांचे, निराधारांचे, मग लहानग्यांचे..त्यातही साऱ्या जगात स्त्री वर्गाचे आभाळ तर फारच फाटले आहे. ज्यू महिलांच्या दुर्दैवाच्या दशावतारासारखेच आज इतक्या वर्षांनी सीरिया सारख्या देशातल्या याझिदी महिलांची दुरावस्था पहिली तर स्त्रीत्वाच्या समान प्रारब्धाचा एक चेतातंतू असा कसा जीवघेणा खेचला गेलाय...याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. 

दक्षिण - पश्चिम आशिया खंडाचा एक भाग असणारा सीरिया हा छोटासा देश. १९६३ पासुनच इथे आपातकाल लागु केले आहे. तेव्हापासुनच खरतर सीरियामधे गृहयुध्द पेटण्यास सुरुवात झाली होती परंतु आजच्या घडीला परिस्थिती जितकी चिघळली गेली आहे , हजारो माणसे ठार होताहेत, लहान मुलांची आणि महिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तितकी ती कधीच नव्हती. एकंदरीतच परिस्थिती गम्भिर आहे..आज लहान मुले स्त्रिया देखील हातात बंदुकी, दारुगोळे घेऊन जिवाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेले दिसताहेत. इस्लाम अंतर्गत असणाऱ्या दोन पंथांच्या वर्चस्वाची लढाई, जगभरात सुरु असलेली आर्थिक वर्चस्वाची लढाई, आंतरराष्ट्रीय राजकारण हि देखील या रक्तरंजित घटनेची मुख्य कारणे आहे. सिरिअन शिया सत्तेची मुजोरी, बंडखोर, इसीस आणि संलग्न इतर सुन्नी अतिरेकी संघटना अश्या तिहेरी पेचात तेथील सामान्य माणूस होरपळत आहे. आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात मोठे रक्तरंजित, नृशंस, अमानवी नरसंहार या गृहयुद्धात घडून आलाय. दुर्दैवाने सीरियाचे भोगोलिक स्थानही युरोप आणि आशिया दोन्हीवर प्रभाव टाकणारे आहे. युद्धामुळे विस्थापित झालेले नागरिक, थेट ख्रिस्चन बहुल युरोपात आश्रय घेताहेत. मुस्लिम असल्याने स्थानिकांना त्यांच्याबद्दल वाटणारी अढी कायम आहे. अश्यात त्यांचा सहज स्वीकार होत नाहीये, त्यांना आश्रित म्हणून जगणेही कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच बऱ्याच अंशी नागरिक देश सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून सोसत का होईना लढण्यासाठी शस्त्र उचलून सज्ज होत आहे. विशेषतः स्त्रियांना स्वतःच्या जीवांसोबतच कुटुंबातल्या लहान मुलांच्या रक्षणासाठी रणचंडिकेचे रूप धारण करावे लागत आहे. 

या घटनांचे राजकीय आणि सामाजिक परिणाम तर आहेतच. पण होणारे मानसिक परिणाम अधिक घट्ट आहेत. घर आणि शहरांसोबतच मन आणि मानवतेवरचा विश्वासही कोलमडून पडतो आहे.. कुर्दीश महिलांचा संघर्ष, मध्यमवर्गीयांवर झालेले दूरगामी परिणाम, हजारो स्थानिकांचे स्थलांतरण, त्यांचे निर्वासित होणे, त्यांच्यातील सगळे व्यापून उरलेली असुरक्षिततेची भावना, जिहादींशी संघर्ष, उत्तर इराकमध्ये इसिसशी झुंज अशा अनेक घटना सीरिया होरपळून निघत असल्याचे दाखले देत आहेत. हे सगळं बातम्यांमधून निव्वळ वाचून-पाहून   आपण असे अशांत होत असेल; अस्वस्थ झालो असेल ; अंतरबाह्य ढवळून निघालो असेल. मेंदूच्या ठिकऱ्या उडवणारा, मनाच्या जाणिवा गोठून टाकणारा, हृदयाच्या संवेदना कोळपून टाकणारा हा अनुभव तिथले सगळे  कसे सहन करत असतील याची कल्पनाही करवत नाही. किंबहुना सीरियाचे युद्ध पेटण्याआधी हा देश केवळ समृद्ध नव्हता तर अनेक बाबतीत पुढारलेला देखील होता. युद्धाच्या आधी २०१० साली घेतलेल्या आकडेवारीत या देशाचे ९०% लोक मुस्लिम समुदायाचे असूनही महिलांची संख्या ४९.४%  आणि त्यातही महिला साक्षरतेचे प्रमाण, 74.2% होते. १९१९ मध्ये महिला हक्काच्या चळ्वळीनंतर स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहू लागले आणि १९६३ येतायेता कामगार आणि सरकारी-निमसरकारी क्षेत्रातही समानता कायम होत गेली. विकासाच्या मार्गावर अग्रेसर होणाऱ्या या देशाचे अचानक ग्रह फिरले. ६ वर्षाआधी  राष्ट्रपति बशर अल-असद यांचा शांतीपूर्ण विरोध करताना देशात गृहयुद्ध पेटत गेले आणि त्याचा फायदा घेत इसिसने देशभर पाय पसरून ताबा घेतला. त्यानंतर  दुर्दैवाचे दृष्ट चक्रच सुरु झाले. 

२०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना इसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. याझिदी महिलांवर बळजबरी, छळवणूक आणि लैंगिक शोषण करत क्रौर्याच्या सर्व सीमा लंघून पाशवी अत्याचार केले गेले. गैरमुस्लिम असल्याने याझिदी समाजाच्या महिलांना मरणयातना दिल्या गेल्या. आयएसच्या ताब्यात असलेल्या शहरांमधील अर्धा लाखभर महिला गर्भवती असून त्यांची मुलं आयएसचे दहशतवादी होण्याचीच दाट शक्यता असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. इसिसचे प्रस्त कायम व्हावे म्हणून या अतिरेक्यांनी दंडुके वापरून निर्दोषांचा हकनाक बळी घेऊन उच्छाद मांडला..त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून वागवले गेले. वासना शमवत, बलात्कार सहन करत, त्यातून मुलांना जन्म देऊन त्यांनाही जन्मापासूनच आतंकवादी बनताना पाहताहेत. हजारो महिला नरकयातनेत जगताहेत . त्यांच्यावर एकेक दिवसात अनेकानेक पुरुष कित्तेकदा पाशवी बलात्कार करतात, त्यांच्या शरीराचे लचके तोडले जातात, मारहाण सहन करावी लागते. बलात्कार केलेल्या पुरुषांची ओळख कधीही पटू नये म्हणून मग त्यांना जीवे मारलेही जाते. हे राक्षस अशी कृत्ये करूनच थांबत नाही तर यझिदी समुदायातील महिला-बालके यांना पकडून त्यांचे धर्मपरिवर्तनही करते, त्याला नकार दिल्यास त्यांना ठार मारले जाते. त्याचबरोबर गुरं-ढोर विकावे तसे किंमत ठरवून महिलांना बाजारात विकलेही जाते. या महिलांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.



 ‘इसिस’च्या हैवानी कृत्यांचा नागडा तांडव  सीरिया, इराक, लिबिया आदी देशांमधील निष्पाप नागरिक सतत सहन करीत आले आहे. अनेकींच्या अनेकानेक कहाण्या आहेत. अनेकींच्या अगणित जखमा-वेदना आहेत.  इतकेच काय तर एका असहाय्य मातेस अनेक दिवस उपाशी ठेवून नंतर अक्षरश: तिचेच बाळ शिजवून खाऊ घालण्याचे निर्घृण कृत्य देखील करण्यात हि नराधम जमात चुकली नाहीत. महिलेला तिचा गुन्हा न सांगताच दगडाने ठेचून मारायची शिक्षा देणं. दुरून डोक्यात असंख्य गोळ्या घालून डोक्याची अनेक शकलं पाडणं पशूंनाही लाजवेल इतके क्रौर्य. २०१६ साली दहशतवाद्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या 19 याझिदी तरुणींना या जागतिक दहशतवादी संघटनेने भर चौकात जिवंत जाळले. सेक्‍स स्लेव्हज म्हणून पकडण्यात आलेल्या या तरुणींना इराकमधील मोसूल शहरात लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त करून मोठ्या जनसमुदायापुढे जिवंत जाळण्यात आले होते. अक्षरश: दगडालाही पाझर फुटेल, अशी क्रौर्याची परिसीमा गाठली गेली.  अफगाणिस्तान फिरून त्या ठिकाणच्या वस्तुस्थितीची प्रत्यक्ष माहिती करून घेण्याकरिता ख्रिस्तिना लँब ही लेखिका अफगाणिस्तानात आली होती. तिच्या स्यूईंग सर्कल्स ऑफ हेरात (Sewing Circles of Herat, 2004, Hurper Collins) या पुस्तकात कंदहारच्या फुटबॉलच्या मैदानाची माहिती देतांना ती सांगते, कंदहारवर तालिबान्यांचा अंमल असताना तेथे उघडयावर फाशी देण्याचे, शरीयाच्या कायद्याप्रमाणे हातपाय तोडण्याचे, महिलांना दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार होत असत. त्या दुर्दैवी लोकांचे रक्त त्या भागात सांडून मातीचा रंग सुद्धा बदलला होता. तालिबान्यांना हुसकावून लावल्यानंतर ते मैदान खेळण्यासाठी वापरण्याआधी धुण्यात आले, तेव्हा तेथे असलेल्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, तेथे टाकण्यात आलेले पाणी रक्ताने लाल होऊन तीन आठवडयांपर्यंत गल्ली-बोळीतून वाहत होते. क्रूरतेची परिसीमा गाठताना त्याला विकृत रूप देऊन हजारोच्या संख्येने ते पाहणे आणि करमणूक करून घेणारी हि कुठली वृत्ती हि कुठली जमात हि कोणती मानसिकता असावी? या विकृत मनोवृत्तीने आज संपूर्ण अरब जगताला घेरले आहे. त्याचे अगदी पराकोटीच्या निर्घृणतेचे उदाहरण म्हणजे आपली आई इसिसला विरोध करते यासाठी एका युवकाने अनेक बघ्यांसमोर स्वत:च्याच आईचा गळा चिरला..त्या मुळासकट लोकांच्याही संवेदना इतक्या बोथट व्हाव्या?. बाईवर बळजबरी करणे, बलात्कार, पाशवी अत्याचार करून तिला गर्भार करणे आणि त्यानंतरही तिला वेदना-यातना देत राहणे हा या क्रूरकर्मा नराधमांच्या पुरुषत्वाचा निकष असतो...पण हि मर्दुमकी नव्हे हे भय आहे आणि हा साराच भयभीतांचा तांडा आहे ... पुरुषांचा. भयभीतांच्या तांड्यांकडून दुर्बल राहिलेल्यांवर अत्याचार चालूच रहातील. का तर त्यांचे कल्पनारम्य पौरुषत्व आणि दांभिक बिनबुडाच्या धार्मिक अस्मिता अबाधित रहावे म्हणून.. हे कोणत्या मानवतेच्या, विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेत बसते?

हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू दे … भारत, अफगान, अमेरिका, पाकिस्तान देश कोणताही असू दे …. दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्धे होऊ दे , धर्मयुद्ध होऊ दे सर्वात आधी बळी पडते ती 'स्त्री' जात. पण म्हणूनच, आज कुर्दिश महिलांनी आजवरचा इतिहासच पालटायचे ठरवले, या दुर्बलतेवर मात करत भोगवट्याचा त्याग करत, सहनशीलतेची कात टाकून लढायचे ठरवले...या महिलांनी एकत्र येऊन महिलांची फौज उभारली. कुर्दिश लढवैय्या शिपायांकडून या महिला प्रशिक्षण घेऊन विविध प्रकारच्या गटातून युनिट प्रस्थापित करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने युद्धास सज्ज झाल्या आहेत. सीरियाच्या सिंजार शहरात असाच मृत्यूचा तांडव खेळला गेला त्यानंतर तेथील महिलांना लैंगिक गुलामगिरीत ढकलून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले याच शहरात आज सिंजार वुमन युनिट (YJS) तेथील उर्वरित महिलांनी तयार केले.  कुर्दिश सीरियन डेमोक्रेटिक फौजची वुमेन्स प्रोटेक्शन यूनिट, कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन यूनिट्स (YPG) हे आणखी काही असेच योद्धा महिलांचे सशस्त्र युनिट. यातल्या कमांडर महिलेचे म्हणणे आहे “मौसूलच्या बाजारात विकली गेलेली आणि जिवंत जाळलेल्या आमच्या याझिदी भगिनींसाठी आम्ही लढणार आहोत. अजूनही इसिसच्या तावडीत दुःख भोगणाऱ्या महिला आमची वाट बघत आहेत. त्यांना सोडवून यातना भोगणाऱ्या महिलांचा सूड उगवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'' यांच्या प्रयत्नांना यशही मिळू लागले आहे.  या क्रूरकर्मा जिहादी दहशतवाद्यांना या महिलांच्या हाताने मरणाची खरतर भीती निर्माण झाली आहे. महिलेच्या हाताने मृत्यू म्हणजे जन्नतचे दरवाजे बंद होऊन जहन्नुम भोगावा लागणार असा त्यांचा  समज आहे. या रणरागिणी कुर्दीस्थानच्या वेगवेगळ्या भागातून एकत्रित आल्या आहेत.यातल्या अनेकांचे कुटुंब देखील आहे. अगदी तरुण वयाच्या या महिलांमध्ये प्रचंड ध्येयशक्ती आहे. याचे उदाहरणही नुकताच २० जानेवारी रोजी पाहायला मिळालं 20 वर्षीय अवेस्ता खाबुर या तरुणीने तुर्की सैनिकांच्या आत्मघाती टॅंक उध्वस्त करून बऱ्याच सैनिकांनाही मृत्युलोकीं पाठवले. यात अवेस्ताला मात्र जीव गमवावा लागला.

जिवंत राहण्याची लाचार धडपड आणि तगमगत जगण्याचा प्रवास  … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी रडून, कधी ओरडून तर कधी व्यासपीठावर उभे राहून ताठ मानेने …तरीही हुंदका गिळत, मुसमुसत कधी युद्धाला सरसावून मारून मरून विचारतेय ती...प्रस्थापितांच्या उघड आणि छुप्या संकेतांमधून स्त्रियांचे खाजगी जीवन घरात आणि घराबाहेर नियंत्रित करणे कधी थांबेल, तिच्यावर  होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कोण पुढे सरसावेल..कोण मदत करेल..  महत्वाचे म्हणजे स्त्रियांमध्ये प्रतिकाराचे अंगार आणि आत्मभानाची स्फुल्लिंगे कोण चेतावेल? कुठे संपेल फक्त ती स्त्री आहे म्हणून जगभर होणारे अन्याय-अत्याचार, अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिला तिच्या गरजेचं, अधिकाराचं, जन्माच्या हक्काचं जिनं ?… या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. .. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच... 

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इसिसने सीरियातून पाऊलं मागे घेतलीत अश्या बाता काही महिन्यांपूर्वी ऐकायला येऊ लागल्या खऱ्या परंतु अद्याप पूर्ण मुक्ती हे स्वप्नच आहे. संपूर्ण देश उध्वस्त झाल्यावरही आजही निर्दोषांचे हकनाक बळी जातच आहेत. सामान्य नागरिकांच्या कत्तली सुरु आहेत. पूर्वी दहशतवाद्यांचे अत्याचार आणि आता छुप्या दहशतवाद्यांना मारण्याच्या निमित्ताने शहरांवर रासायनिक शस्त्रांचा वापर आता देशाचे कायदेशीर हुकूमशाह खुद्द करीत आहेत. इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, शहर जळताहेत, लोक होरपोळुन निघतायेत. तरी युद्ध सुरूच आहे. या देशाच्या दुर्दैवाचे दशावतार आज जगभरच्या संवेदनशील माणसांना पाहणेही त्रासदायक ठरू लागले आहेत. या दुर्दैवी देशाचे कमनशिबी फासे पालटतील आणि येथील नष्टचर्य.. लोकांचे दुर्धर जगणे रुळावर येईल अशी अशा आणि प्रार्थना... विकृत मानसिकतेचा विखार एक दिवस जगभरातून संपुष्टात येईल.. महिलांचे, लहान मुलांचे जगणे सुखकर होईल तो दिवस सर्व जगासाठी सुदिन ठरेल या अपेक्षेसह ...  

(c)रश्मी पदवाड मदनकर 
(मे-२०१८ च्या 'मित्रांगण' या त्रैमासिकात प्रसिद्ध)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...