Wednesday, 23 December 2020

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे 

कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं

माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात 

आणि कवितेतच माणसं शोधलीस 


माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा .. 


इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं

कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास .. 

माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस .. 


अरे कविता अश्रू पुसत नाही

तिच्याजवळ खांदा नसतो रडायला 

ती कुशीत घेऊन जोजवत नाही 

मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही 


कवितेला आई होता येत नाही 

तिला बहिणीची माया देता येत नाही 

प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही 

तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही ..


तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास 

ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास 

तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते 

आत आत हेलावून क्षणभर सुखावते 

सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते.. 


तिच्याकडून घेता येत नाही रे काही 

तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी

तिला सतत देत रहावं लागत असतं..


सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या नादात 

सतत प्रेम देऊन माया लावणाऱ्या माणसांना तू गमावतो आहेस 

हे लक्षात येत नाही का तुझ्या .. ?


अहो, कवी महोदय, उशीर होण्याआत जागे व्हा ..जागे व्हा !


रश्मी ...   


  

  


Monday, 7 December 2020

 आला आला रे डोंबारी

त्याच्या हाती काठी दोरी

पोरीसंगे तो दाखवतो

फुटक्या जगण्याची लाचारी


दोर टांगतो आकाशाला  

तालावर पोरं नाचवतो

टिचकीभर या पोटासाठी

जीव दावणीला आंथरतो


एकाएका पैशासाठी

हात पसरतो दारोदारी 

चिंध्यांचा संसार मांडतो

उघड्यावरती भर बाजारी


किती यातना सोसत जातो

भोग कशाचे मोजत जातो

सोस कशाचा नसे बापुडा

बिनबोभाटा भोगत जातो


रश्मी पदवाड 

२३.११.२०

Tuesday, 29 September 2020

'स्वभान' जपणारी ग्रामीण स्त्री !

 १८ व्या शतकाच्या शेवटी घडून आलेल्या औद्योगिक क्रांती, शहरी विकास आणि पुनर्जागृतीमुळे समाजात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यानंतरच्या काळात पश्चिमी देशांशी तुलना करत विकसनशील देशामध्ये जे परिवर्तन घडू लागले त्यालाच आधुनिकरण असे म्हंटले जाऊ लागले. हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध, निर्मिती आणि वापर जसजसे वाढू लागले तसतसे जग अधिक जवळ येऊ लागले. सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे जगणे अधिक सुलभ सोप्पे होऊ लागले. भारतासारख्या विकसनशील देशात ह्याचे जास्त महत्व होते कारण एकतर पारतंत्र्याचा काळ भोगल्यानंतर शेकडो वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणून शून्यातून सुरुवात करून वैयक्तिक प्रगती आणि देशाचा निदान मूलभूत विकास या दोन्ही गोष्टी कमावणं काही खायचं काम नव्हतं. एका बाजूने हे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीला भुलून तरुण पिढी भौतिक सुखाकडे आकर्षिले जाण्याकडे कल वाढत होता. भारतीय समाजाच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीतच मुळात फरक असल्याने ह्याचे परीणाम वेगवेगळ्या स्तरावर होऊ लागले. एकंदरीत सर्व बाजूने गतीने बदल होत चालले होते. शैक्षणिक टक्केवारी वाढल्याने आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक सुखसोयी आणि राहणीमानातले बदल दृष्टीस पडेल इतक्या स्पष्ट आणि सहज रीतीने झाले, परंतु मानसिकतेत मात्र आज ७० वर्षांनंतरही हवे तसे बदल घडलेले नाही. पुरुषसत्ताक रूढीवादी परंपरेने ग्रसित अनेेक घटनांतून आजही स्त्रीजीवनाचे आभाळ फाटकेच असल्याची जाणीव होत रहाते. मधल्या काळातील स्त्रियांनी वेगवेगळ्या मार्गाने बदलासाठी जोरकस प्रयत्न केले जरूर पण त्यामुळे या फाटक्या आभाळाला फक्त ठिगळच जोडता येऊ शकली.. संयुक्त राष्ट्रात १८४८ मध्ये 'सेनेका फल्स' संमेलन झाले ज्यात महिलांच्या अधिकारांसाठी पहिल्यांदाच आंदोलन झाले होते. भारतीय स्त्रीवादाची सुरुवात मात्र त्यामानाने सुदैवी होती एकतर ती स्त्रीवादापेक्षा स्त्रीमुक्तीची लढाई होती आणि त्यासाठी महिलां पुरुषांचा सहभाग होता, अनेक बुरसटलेल्या प्रथा परंपरेच्या जोखडातून इथल्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मानसिकता बदलण्याचा संघर्ष तिचा अजून संपलेला नाही. संपूर्ण जगातील कहाण्या ऐकल्या तर स्त्री जीवनाची कथा फार काही वेगळी नाही. सगळ्याच देशात कुठल्यातरी कारणाने स्त्रीहक्कासाठी लढा सुरु आहे. भारतात मात्र हा लढा स्वातंत्र्यासाठी  नंतर मूलभूत गरजांपासून जगण्याच्या हक्कापर्यंत आधी  द्यावा लागतो ही मोठी शोकांतिका आहे हे मान्य करावेच लागेल. 


भ्रूणहत्या, हुंडाबळी, कुटुंबातील अत्याचार, परित्यक्तांच्या समस्या हे प्रश्न शहर आणि ग्रामीण भागात सारखेच जटिल आहेत. पण त्याही पुढे जाऊन ग्रामीण स्त्रीचे काही मूलभूत आणि जीवनावश्यक प्रश्न आहेत. ग्रामीण स्त्रीच्या गरजा निव्वळ अधिकार मागण्यापुरत्या मर्यादित नाहीये तर त्यांचा संघर्ष पुरुषी दमनव्यवस्थेला तोंड देत जगून तगून दाखवण्याबरोबरच घरगाडा चालवण्यासाठी शारीरिक मानसिक स्तरावर सतत लढत राहणे, शिक्षणासाठी आग्रह, दारूबंदी, घरगुती छळ, अन्यायाचा सामना अश्या अनेक मागण्यांच्या दारी तिला जाऊन उभे राहावे लागले आहे.  आधुनिकतेने जो बदल घडवून आणला त्यात स्त्रियांच्या दमनाचे आणखी नवे मार्ग तयार झाले पण त्याचबरोबर शिक्षणानं स्त्रियांना दमनव्यवस्थांबरोबर झगडा करण्याचे बळही मिळाले हेही मान्य करावे लागते. ग्रामीण स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचा विचार केल्यास ती अजूनही दयनीय आहे परंतु जनतांत्रिक माहोल, शिक्षण आणि सर्वच क्षेत्रातली त्यांची वाढती भागीदारी यामुळे परिस्थितीत परिवर्तनाची निदान सुरुवात झाली आहे ह्याचे समाधान वाटते. मागल्या काही वर्षात तर ग्रामीण स्त्रियांनी स्वभान जागृतीचे अभूतपूर्व उदाहरण कायम केले आहे. ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. देशभरात महाराष्ट्रापासून ते मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब कुठल्याही राज्यात दारूबंदी सारख्या आंदोलनात ग्रामीण महिलांचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवला गेला. यात विशेष म्हणजे दारूबंदीच्या आंदोलनापर्यंतच मर्यादित न राहता दारू पिणाऱ्या पुरुषांचा सामाजिक बहिष्कार करण्यापासून ते दारू अड्ड्यावर पोचून दारू भट्टी उडवून लावेपर्यंत इतकेच नव्हे तर अगदी घरातल्या माणसाला दारू पिण्यापासून थांबवण्यासाठी भर रस्त्यात चोप देईपर्यंत मजल तिने गाठली. याशिवाय अनेक राज्यात, वेगवेगळ्या समाजातील स्त्रियांनी आपल्याच समाजातील अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध संघर्षाचा बिगुल देखील फुंकला आणि त्यात तिला हळूहळू का होईना यश मिळू लागले ही समाधानाची बाब आहे.  भारतीय मुस्लिम समाजाचा परंपरागत चेहेरा देखील आता बदलताना दिसतो आहे.  या समाजातील महिलाही त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात झालेल्या एका राष्ट्रस्तरीय बैठकीत. ही बैठक भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बैठक होती. मुस्लिम महिलांचे असे पडद्याबाहेर येऊन उघड उघड संघटन प्रस्थापित करण्याची ही पहिलीच वेळ होती. देशभरातील सुमारे ३० मुस्लिम महिला प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होत्या. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली. त्यांच्या या हक्कांसाठीच्या आंदोलनाच्या ज्वाळा ग्रामीण महिलांपर्यंत झपाट्याने पसरल्या आणि त्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.  

नोकरीच्या निमित्ताने माध्यम समूहात काम करतांना स्त्रीहक्कासाठी त्यांच्या उत्थानासाठी काम करण्याचा मुंबई पासून ते विदर्भभर फिरण्याचा, ग्रामीण भागातील स्त्री लढ्यांना जवळून पाहण्याचा माझा सुखद योग घडून आला होता, आणि या कार्यकीर्दीत घडलेल्या काही आंदोलनांचे त्यातून निर्माण झालेल्या अनेकानेक यशोगाथा अभ्यासण्यासाठी विदेशातून आलेल्या काही शोधकार्यकर्त्यांनी त्यांच्या कॅमेरात ह्याचे फुटेज टिपून नेलेत. त्यांना ते त्यांच्या देशातील स्त्रियांना दाखवून त्यांच्यात आत्मभानाचे स्फुल्लिंग पेटवायचे होते हे पाहून आमच्या ग्रामीण भागातील महिलांच्या ताकदीची प्रकर्षाने जाणीवही झाली.  

यातली काही उदाहरणे वानगीदाखल पाहूया - 
१. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण. नक्सलग्रस्त भागापासून थोड्याच अंतरावर वसलेले विकसनशील छोटेखानी शहरवजा गाव. दोन वर्षांपूर्वी २० महिला एकत्र आल्या आणि तालुक्यातील आसपासच्या एकदोन नाही तर तब्बल २५ गावात परिवर्तन घडवून आणले. जमिनीच्या कागदपत्रांवर महिलांचे नाव देखील असावे आणि त्यांच्या सही शिवाय जमिनीचा व्यवहार होणार नाही हा मुख्य मुद्दा घेऊन या महिलांनी काम सुरु केले. ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते घराच्या दारावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाटीवरही घरातल्या स्त्रीचे नाव असावे त्या घराशी सलग्न अशी तिची ओळख असावी हा त्यामागचा मुख्य हेतू होता. ग्रामसेवकापासून ते कलेक्टर आणि पुढे पंतप्रधान कार्यालयापर्यंत धाव घेऊन या महिलांनी अखेर कार्य सिद्धीस नेले. आज साकोली तालुक्यासह जिल्ह्यातील बव्हंशी गावातील प्रत्येक दारावर घरातील कर्त्या पुरुषांबरोबरच त्या घरातील स्त्रीचे नाव देखील चढले आहे. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते जमीन क्रय-विक्रयाच्या कागदपत्रांवर तिच्या सहीशिवाय व्यवहार केले जात नाही. आता ७/१२ वर स्त्रीचे नावही आवश्यक पात्रतेपैकी एक आहे.





२. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातली दाभाडी गावातील १० महिलांचे दारूबंदीसाठीचे आंदोलन अत्यंत त्रासाचे आणि संघर्षाचे झाले. प्रस्थापितांसोबतचा हा लढा अनेक अत्याचार सहन करण्यासोबत सुरु राहिला. दारू भट्टीच्याभट्टी रात्रभरातुन उध्वस्थ करायच्या, दारू विक्रेते, प्रशासन, राजकारणी आणि घरातील पुरुष या सगळ्यांचा विरोध, त्यासोबत झालेला अत्याचार साहत ह्या महिलांनी एक दिवस चमत्कार घडवला दाभाडीला पुर्णपणे दारूमुक्त केले, त्यासोबत त्या तिथेच थांबल्या नाहीत तर आसपासच्या गावांमध्ये लढा कायम ठेवत तालुक्यातील तब्बल १० गावांमध्ये दारूबंदी घडवून आणली. 




३. हागणदारी मुक्तीचे वारे वाहू लागले तेव्हा घराघरात शौचालय असावे ही स्वप्न ग्रामीण महिला पाहू लागली होती. हा आरोग्यासोबतच आत्मसन्मानाचा प्रश्न होऊन बसला होता. त्यात वाशीम जिल्ह्यातल्या सायखेड गावातल्या मंगळसूत्र विकून आग्रहाने घरात शौचालय बांधून घेतलेल्या संगीता आव्हाळेचा किस्सा गाजला होता. याच धर्तीवर  वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा गावातील महिलांनी आंदोलन सुरु केले. आपल्याच कुटुंबातील गावातील विरोधकांशी लढा लढत अखेर घरात शौचालय बांधून घेत  त्यांनी संपूर्ण गाव हागणदारी मुक्त केले. पुढे लढा कायम  ठेवत तालुक्यातील अनेक गावे त्यांनी हागणदारी मुक्त केलेत. 


४. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीच्या संघर्षात हजारो ग्रामीण स्त्रियांनी उतर्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला होता. यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांची समस्या सोडवण्यासही वणी तालुक्यातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि आसपासच्या ग्रामीण महिलांनी एकत्र येऊन यशस्वीपणे राज्यभर तांदूळ विक्रीचा व्यवसाय दणक्यात  करून दाखवला. याच महिलांनी महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक बोर्डाशी लढा देत तालुक्यातील लोड शेंडींगची समस्या कायमची संपुष्टात आणली. याशिवाय विदर्भभरातील ग्रामीण क्षेत्रातल्या महिलांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' सारख्या प्रकल्पात 'थर्ड पार्टी ऑथारिटी' म्हणून कार्य केले. 




गेली काही वर्ष ग्रामीण स्त्रियांचा सामाजिक क्षेत्रातला तसेच राजकारणातला सहभाग वाढल्याने त्यांच्याशी संबंधित समस्यांचे निवारण होण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पाणी योजना, जमिनीवरील हक्क, चांगले रस्ते, शौचालय, आरोग्याचे प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचार, दारूबंदी, कायद्यात अनुकूल बदल वगैरे प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दिशेने स्त्रियांनी पावले उचलली. विधवांना अनुदान, अपंग आधार योजना, वयस्कांना सेवानिवृत्तिवेतन, व्यवसायाला अनुदान वगैरे शासकीय योजना स्त्रियांपर्यंत पोचल्या. याच काळात अनेक बचत गटांची मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागात सुरुवात झाल्याने ग्रामीण स्त्रियांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत चालली आहे. छोट्या छोट्या रकमा साठवून लग्नासाठी, शिक्षणासाठी कर्ज मिळण्याची सोय झाल्याने तसेच आरक्षण, नोकरी, व्यवसाय याकारणाने सहभाग वाढल्याने तिचा आत्मविश्वास आणि आत्मबळही वाढले आहे. 

असे सगळे छान छान दिसत असले तरी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्या पूर्णपणे सुटल्या आहेत असे नाही, तरी पूर्वीसारखी परिस्थिती तितकीशी भयावह देखील राहिलेली नाही,  ग्रामीण  महिलांच्या तंबूत निदान बदलास सुरुवात झाली आहे हे महत्वाचे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तुलनेत शेतकरी स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. त्यामागच्या अनेक कारणांत परिस्थितीशी चिवटपणे झुंजण्याचे स्त्रीचे सामर्थ्य आहे पण म्हणून जीवनाशी एकटीने करावे लागणारे दोनदोन हात ही एक समस्याच तर आहे.. अजूनही लढा कायम आहे ... मराठवाड्यातल्या ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या महिलांचे गर्भ काढून टाकणे असो, पाण्यासाठी रखरखत्या उन्हात पायपीट करणारी मराठवाड्यातील महीला असो किंवा यवतमाळच्या झरीजामणीतल्या कुमारी मातांचा वाढत जाणारा आकडा.. लढा अजून कायम आहे. संघर्ष करत राहावे लागणार आहे. यशाचे शेवटचे शिखर चढेपर्यंत या ग्रामीण महिलांना प्रत्येक स्त्रीचा नव्हे संवेदनशील पुरुषांचाही पाठिंबा मिळायला हवा.. त्यांचा लढा त्यांनीच लढायचा असला तरी निदान एवढा नैतिक आधार प्रत्येकाला देता येतोच .. नाही ?    

- रश्मी पदवाड मदनकर 

(लेख २०२० च्या दैनिक सकाळ नागपूरच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे )







विस्मृतीचा श्राप ...

 अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे 

आणि एक एक पाऊल पुढे चालतांना 

घुप्प अंधार गवसत राहावा ... 

आकाश, जमीन, प्रकाश 

आणि सजीवांचे भास-आभास 

सगळंच दूर-दूर पुसट होत, 

ठिपका होत नाहीसे होण्यापर्यंत येऊन पोचावे .. 


नाव, गाव ओळख मिटू लागावी, 

भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये 

माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या कथा 

कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा 

घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या.. आणि 

यासर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या प्रथा 

विघटित होऊन उडून जाव्या  ..

 

 रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी

वैचारिक भूमिका, बौद्धिक- मानसिक आंदोलनं

गहिवरलेली स्पंदन विरावीत ..

इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी  

अनोळखी होत जावे सारे .. 


अंधाराच्या पटलावर दूर चमकताना दिसेल काहीतरी

धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..

काळा कभिन्न परिसर, फसव्या दिशा 

अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती 

अनासक्त प्रवास ... आणि 

अनवट भिवतीच्या अंधार वाटा .. 


कुठे घेऊन जातील... ?

बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..

अफाट असतो पण अथांगही नसतो .. 

आपण चालत राहावे ... 

प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत

आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं 

आणि सजीवांचे भास-आभास परत मिळेपर्यंत 

पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत 

चालत राहावे .. अनिमिष .. 


बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..  

मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्या आत 

भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्या आत 

मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला विस्मृतीचा श्राप ... 


 रश्मी 

Tuesday, 22 September 2020

 जन्माच्याच वेळी सटवाई लिहिते तिच्या माथी - 'बाई'

मग ती होते लेक, बहीण, बायको.. आई

गात राहते आयुष्यभर पीडेतून उठलेली जीवनगर्द अंगाई ..

गुणगुणते तटतटत्या वेदनेतून भावसमेवर आलेल्या अंतर्लयी ..


ती छेडत राहते प्राणाच्या वीणेवर अम्लान सुखाची तान 

पानगळीतही शोधत बसते मनाचे लसलसते हिरवे रान 

उजवते चैतन्याची कूस अन शिवून घेते उसवलेले काळीजभान 

 चिंब ओल्या सांजपावसातही फुलवते जाणिवांचे विवर्त विराण 


ती घेते नात्यांना खोल काळजात रुजवून 

प्रत्येक कणाला भावओल देऊन देते मायेने भिजवून 

रात्र रात्र पाहते स्वप्न - ठेवते सगळे जागवून

आकांक्षांच्या उडत्या पाखरांना ठेवते पदरात निजवून 


ती आणते रखरखत्या उन्हातून शीतल गारवा चोरून 

वाटत फिरते प्रेम-जिव्हाळा ओंजळ भरभरून

फाटक्या तुटक्या मोडक्या विटक्या गोष्टी ठेवते झाकून

बोलते हसते रमते खेळते ..मुखवटा घेते ओढून. 


रश्मी..

Wednesday, 2 September 2020

आयुष्यभर धावून धावून दमलेला असतो जीव .. त्यात तुम्ही नोकरी करणारे, घरचं बाहेरचं सगळंच सांभाळणारे असाल तर दमून, कावून, रापून गेलेला असतो जीव.. घरातल्या, गणगोतांच्या, संबंधातल्या, नात्यातल्या, माहितीतल्या, मैत्रीतल्या, भोवतालच्या सगळ्यांच्या फर्माईशी, इच्छा, अपेक्षा.. त्यांच्या त्यांच्या आपल्याबाबतीतच्या आकांक्षा पूर्ण करत राहणे, सगळ्यांची मर्जी सांभाळत जगणे .. अपरिहार्य असतं आॅफिस, तीथली कामं, कामाचा ताण, आॅफिस पाॅलिटीक्स, विवीध प्रकारची वृत्तीची माणसं सगळ्यांना फेस करणं, शिकणं शिकवणं, समजणं- समजावणं-समजून घेणं.. सतत गोतावळ्यात राहणं, सतत सगळं आणि सगळ्यांना ऍडजस्ट-मॅनेज करत राहणं .. पर्यायच नसतो तब्येतीच्या कुरकुरी तर कोपऱ्यातच ढकलायच्या .. या सगळ्यात मन दुखू द्यायचं नसतं .. दुखलं तरी दाखवायचं नसतं.. हसत राहायचं, सतत आनंदी दिसायचं .. या सगळ्यांवर उपाय म्हणून 'सुकून के पल' शोधत चार मित्र-मैत्रिणी शोधायच्या, एकत्र आणायच्या .. पण बरेचदा (नेहेमी नाही) इथंही फार वेगळं काही घडत नाही. माणसं कधी स्वार्थी असतात किंवा फार फार जजमेंटल निघतात.. कुठूनतरी कसेतरी पाठीत वार तरी होतात .. किंवा तुमच्या सहेतुक असण्यावरच प्रश्न चिन्ह उभे होऊन असला नसला सगळा डाव मोडून टाकतात. सगळं जोडून ठेवायचे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे मैत्रीपूर्ण प्रेमपूर्ण वातावरणातील मूठभर आपल्या माणसांच्या सहवासाचे स्वप्नही भंगतेच कधीतरी .. पुन्हा नवा डाव.. पुन्हा पुन्हा तेच ..कंटाळतो जीव असे एक घर, एक दार - एखादी खिडकी, छोटेसे भगदाड तरी असावे वाटते .. आपल्या हक्काचे .. जिथून आत शिरताना आपण आहोत तसे स्वीकारले जावे, जिथे पूर्ण स्वातंत्र्याने वाटेल तसे वागता यावे - बोलता यावे. त्या दारानं-खिडकीनं-भगदाडानं आपल्याला जज करू नये, आपल्या वागण्या-बोलण्यावर प्रश्न उभे करू नये. तराजूत तोलून मापून धरू नये. आपल्या अश्या जश्या कश्या असण्यामागची कारणे समजून न घेता आपल्याला कसली कसली 'लेबलं' लावू नये. आपल्याला शिकवू नये आपल्याला बदलवू नये ...कुठल्या कुठल्या कथा-कादंबरीशी आपल्याला जोडून नसते दुषणं लावू नये. आयुष्याच्या संघर्षमय प्रवासात जे जे काही बरे-वाईट धगधगत असेल आतात खोल ते ते शमवता आले तर शमवावे किंवा शांतवावे जमल्यास; नाहीच तर निदान हवा देऊ नये. धरावा हातात हात आधाराचा .. नाहीच तर धक्का देऊ नये. दिसणं नाही असणं महत्वाचं आहे .. असण्याची जाणीवही पुरे आहे. या जाणिवा भक्कम करत राहणारे एखादे दार, एखादी खिडकी एखादे भगदाड भेटलेच कुठे तर ते जपावे ... नसेल तर आभासांच्या, मृगजळाच्या मागे धावून त्याच त्या पसाऱ्यात तसाच तसा पसारा वाढवत बसण्यात काय अर्थ आहे ?? असो .. आपल्यालाही कोणासाठी ते घर, दार .. नाहीच तर खिडकी किंवा भगदाड तरी होता यायला हवं .. निदान स्वतःसाठी तरी.. ©रश्मी पदवाड मदनकर

Saturday, 1 August 2020

तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे
तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे

कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो
अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो

तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा
तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा

तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते
मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते

सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते
विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते

तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते
आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते


रश्मी पदवाड मदनकर
३०जुलै २०

'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !

Ship of Theseus [2012] : A Collective Voyage - High On Films

'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच. भारतातल्या रसिकांची आवड आणि क्लास समजून घेऊन हा चित्रपट भारतात रिलीजच करायचा नाही असा निर्णय सिनेमाच्या निर्मिती टीमने घेतला होता... मग एकदिवस टोरांटो फेस्टिवलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर होतो.. तो प्रचंड गाजतो. त्यावर वेड्यासारख्या चर्चा घडायला लागतात. याच फेस्टिवलमध्ये अमीर खान आणि किरण खान उपस्थित असतात, ते भारावून जातात आणि अश्या हटके क्लासी सिनेमाचा रसिक मोठ्या प्रमाणात नसला तरी मूठभर रसिकांनी तरी त्याला का मुकावे म्हणून स्वखर्चावर तो भारतात घेऊन येतात आणि मोजक्याच फिल्म थिएटरला रिलीज करतात. तो मूठभर लोकांचा क्लास ती सिनेमा पाहतात आणि एक चांगली कलाकृती पदरी पडल्याचे समाधान मानून घेतात... माझ्यासारखे रसिक एका छोट्या शहरात राहत असल्याने त्यातही थिएटरमध्ये बिग बजेट फिल्म आणि अश्या क्लासी फिल्मच्या लॉबी संघर्षात फसतात आणि अनेक महिने वाट पाहूनही शेवटी मुकलेच जातात.... नंतर जवळजवळ ६-७ वर्षांनी तो ऑनलाईन धुंडाळून पाहता येतो त्यात समाधान मानतो.... तर असो. या सगळ्यात कौतुक करावे ते या सिनेमाचा निर्देशक आनंद गांधी आणि खान दाम्पत्याचं.


जवळजवळ माझ्याच वयाचा असणारा एखादा अत्यंत प्रतिभाशाली सिने निर्देशक जगावेगळ्या कलाकृती निर्मितीसाठी धडपडतो आणि तसे करूनही दाखवतो तेव्हा त्याचे कौतुक वाटणे साहजिक आहे. आपल्यासारखेच अनेक तर्काधिष्ठित विचार डोक्यात घेऊन फिरणारे बरेच आहेत पण कुठलीही तडजोड न करता कलेच्या माध्यमातूनच का होईना पण ती वाटते तशी, दिसते-जाणवते तशी कोरून बनवून जमिनीवर उतरवून प्रेक्षक रसिकांसमोर मांडणे आणि नंतर त्याच्यावर मिळणाऱ्या बऱ्या-वाईट प्रतिक्रिया, समीक्षा झेलत राहणे ..फार न मिळालेल्या रिस्पोन्सनेही खचून हलून न जाता ठरवलेल्या मार्गाने ठामपणे चालत राहणे आनंद सारख्या कलावंताची खासियत असते. ‘मला जर जादूगार, तत्त्ववेत्ता, लेखक, अभिनेता असं सगळं एकत्रितरीत्या बनायचं असेल तर माझ्यासाठी सिनेमा हे एकमेव माध्यम आहे' असे तो म्हणतो. ‘माझ्या माझ्याकडूनच असलेल्या अपेक्षा मी कला आणि चित्रपटातूनच वाढवतो. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून मला जगण्याबद्दल नवं काहीतरी गवसलं पाहिजे. अशाच गोष्टींमध्ये मी रमतो,’ असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा कोण जाणे का आपल्यासारखाच भासतो.


माणूस बदलत जातो .. आयुष्याच्या अनुभवाने, बऱ्या-वाईट माणसांच्या संगतीने. तो जसा आहे तसाच्या तसा कधीच उरत नाही. आयुष्यात येणारा वाईट काळ म्हणजे आयुष्याचा वसंत जशी पानगळ होते बहर ओसरतो तसा एक दिवस हिरव्याकंच पालवीने नव्या मोहोराने जगणे फुलून बहरुनही येते .. तर असे ऋतू येत जात राहतात आणि माणूस हळूहळू नखशिखांत बदलत जातो. असे म्हणतात मानवाच्या शरीरातल्या एकूण एक कोशिका ७ वर्षांमध्ये पूर्णपणे बदलतात.. मग या बदलानंतरचा माणूस तोच पूर्वीचा असतो की बदललेला असतो ? हे जाणून घेण्याची जिज्ञासा या चित्रपटाच्या निर्मितीच्या मुळाशी आहे.
तर 'बदल' ही मनुष्याच्या हयातीपर्यंत कायम असणारी एकमेव बाब आहे. बदल घडणार हे ठामपणे सांगता येत असले तरी बदल घडण्यामागची कारणे आणि ते कसे घडतील हे कुणालाही सांगता येत नाही. 'शिप ऑफ थिसीस' चित्रपटाच्या तिन्ही कथेचा गाभाही हाच आहे.


पहिली कथा आलिया (आयदा-अल-काशेफ) हिची आहे. नेत्रहीन आलिया तिच्या सेन्सेसचा वापर करून उत्कृष्ट फोटोग्राफी करत असते. दिसत नसूनही तिच्या अत्यंत वेगळ्या धाटणीची कलात्मक फोटोग्राफी तिला सहज साधता येते..पण एक दिवस ऑपरेशन करून दिसू लागल्याने अत्यानंदाने घरी परत आलेल्या आलियाला लक्षात येते कि दृष्टी मिळवली असली तरीही तिने तिचे ते सगळे विशेष सेन्सेस मात्र गमावले आहे आणि खूप प्रयत्नानंतरही आता तिला फोटोग्राफी जमत नाहीये.


दूसरी कथा मैत्रेय(नीरज कबि) नावाच्या एक श्वेतांबर साधु/भिक्षुची आहे. ते जीव-जंतूंच्या अधिकारासाठी विज्ञानाच्या परीक्षणाच्या नावावर त्यांच्यावर
होणाऱ्या अत्याचारासाठी कोर्टपर्यंत लढा देत असतात. त्यांना पोटाचा गंभीर आजार झालाय परंतु ते औषध घ्यायला तयार नाही कारण प्रत्येक औषधीमागे जीव-जंतूंवर अत्याचार झाल्याची खंत मनात आहे. पोटाचा आजार लिव्हर सिरॉयसिस पर्यंत पोचतो आणि तो कॅन्सर पर्यंत पोचण्याचे चान्सेस वाढतात. तरीही तत्वांवर कायम राहून ते जीव त्यागण्याचा निर्णय घेतात आणि आमरण उपोषण सुरु करतात.... वेदनेच्या अत्युच्च बिंदूवर एकदिवस धैर्य खचत आणि ते ऑपरेशन करायला तयार होतात. त्यांचे लिव्हर बदलले जातात. जीवजंतूंच्या हत्येने तयार होणाऱ्या उपचारांचा उपयोग केलेला भिक्षु आता भिक्षु उरला नसतो आणि जीव-जंतूंच्या अन्यायावर लढण्याचा अधिकारही गमावून बसला असतो.


तीसरी कथा नवीन (सोहुम शाह) नावाच्या एका स्टॉकब्रोकरची आहे. कथेची सुरुवातच हॉस्पिटलमध्ये नवीनच्या किडनी प्रत्यारोपण नंतर होते. एका फ्रिडम फायटर, सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या आजीचा हा नातू. आजीला मुळात ही खंत आहे कि एवढ्या समाजसेवी घराण्यात जन्मूनही नवीन निव्वळ पैशांच्या मागे धावत राहणारा अत्यंत शुल्लक आयुष्य जगणारा माणूस आहे. किडनी ट्रान्सप्लान्टस आणि आणखी एका कारणासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला नवीन एका घटनेला साक्षी ठरतो ... ज्या दिवशी नवीनला किडनी बसवण्यात आली असते त्याच दिवशी एका गरीब मजदुरांची किडनी त्याच हॉस्पिटलला चोरी गेली असते... त्या गरिबाला त्याबदल्यात पैसे नको असतो तर किडनीच परत हवी असते.. आणि सुरु होतो प्रवास त्याच्या किडनी शोधाचा. त्याची किडनी लावण्यात आलेल्या त्या माणसाला शोधायला नवीन स्टॉकहोम, स्वीडनपर्यंत जाऊन पोचतो. या कथेत दोन बदल घडतात .. पैशांमागे धावणाऱ्या सोहम्ला आता मनुष्याचा जीवनाची किंमत कळली असते तो बदलला असतो आणि तो गरीब मजदूर जो पैसे नको किडनीच हवी असे म्हणतो तो विदेशी माणसाने दिलेल्या मोठ्या रकमेला पाहून लालसा निर्माण होऊन पैशांसाठी राजी झालेला असतो. हे दोन्ही कायाकल्प एक विरोधाभासी संभ्रमच तर असतो.


अखेर इतकेच की बॉलिवूडच्या प्रस्थापित स्टीरियोटाइप छबी मोडणारा 'शिप ऑफ थिसीस' सिनेमा अपवादात्मक सिनेमा ठरतो. विचारांच्या खोल तळाशी असणारा एखादा बिंदुएवढाही विचार समाजातील माणसांच्या जगण्याशीच अखेर संबंधित असतो. या जगण्याचाच एक भाग कलेच्या रूपात त्यांच्यासमोर ठेवून त्यांनाच अचंभित करण्याची आनंद गांधी यांची शैली वाखाण्याजोगीच म्हणावी लागेल.


©रश्मी पदवाड मदनकर



No photo description available.



Monday, 20 July 2020

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..






संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असूनही आपल्याला दिसू शकली नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकलो नाही याचं वाईट वाटून घ्यावं हा मोठा प्रश्न आहे ..


मागल्या आठवड्यात ऑफिसमधून घरी परतताना ५ आणि ३ वर्षांचे दोन चिमुकले दिसले चपलेविना हातात हात घेऊन रस्त्याने चालताना. पायात चपला का नाही विचारले तर म्हणाले नाही आहेत चपला. कुठे राहता तर खालच्या बस्तीत म्हणाले .. खालच्या बस्तीत म्हणजे ही मुले पारधी समाजाचा जो जत्था राहतायत ओंकार नगरच्या खुल्या मैदानावर त्यांची मुले. दुसऱ्या दिवशी चपला घेऊन पोचले बस्तीवर तर रस्त्यापासून उतारावर असणाऱ्या प्लास्टिक झाकलेल्या त्यांच्या झोपड्या पावसाच्या पाऊलभर पाण्यात तुडुंब डुंबलेल्या दिसल्या. रस्त्यापासून झोपड्यांपर्यंतचा पूर्ण रस्ता चिखल चिखल झालेला. मी दूर वर रस्त्यावरच उभी राहून पाहत राहिले .. जिथे त्यांच्या झोपडीत जमिनीवर बसता येण्याचीही शक्यता नव्हती. प्रफुल्लित वातावरण झाले म्हणून खुश होत आपण आपल्या घरी चार भिंतीत चहा भजी खात असतो तेव्हा.. जेव्हा आकाशातून धो धो पाऊस बरसत असतो, डोकं लपवायला असणाऱ्या तुटक्या झोपडीत जमिनीवरही पाऊलभर पाणी साठले असते, जेव्हा ह्यांना साधे जमिनीवर बसता झोपताही येत नसते, रात्र रात्र डोक्यावर फाटके छत आणि पाणी भरल्या जमिनीवर उभे राहून काढावी लागते , येण्याजाण्याच्या रस्त्यावर पाय रुततील इतका चिखल भरला असताना आपण आणलेले २-४ जोड चपला यांच्या काय कामाच्या असतील हा विचार मनात येऊन मी स्तंभित होऊन तिथेच उभे राहिले बराच वेळ.. यांच्यासाठी काय करता येणार होते? तुटपुंज्या मदती गाडीच्या डिक्कीत घेऊन फिरणारे आपण आपली झोळी किती तोकडी असते, किती बांधले गेलेलो असतो आपण .. अश्यावेळी ह्याची जाणीव होते आणि मग आपणच आपल्यासमोर फार खुजे दिसू लागतो... फार खुजे.

Image may contain: outdoor and nature

-रश्मी ...
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न - 

(तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले)
कसे दुःख सारे झडू लागले 

तुझी आस जेथे मनी दाटली  
तिथे भास सारे दडू लागले 

उगी अडखळू लागली पावले  
कळेना असे का घडू लागले 

अश्या सांज समयी सुने वाटते 
तुझे दूर जाणे नडू लागले 

कुणाला पुसू काय हे दाटले 
कशाला असे भडभडू लागले

Thursday, 9 July 2020

माझा वेल्हाळ पाऊस

माझा वेल्हाळ पाऊस
असा येतो बरसतो 
जणू अंगांगात साऱ्या  
नवे चैतन्य पेरतो 

माझा वेल्हाळ पाऊस 
घर अंगण भिजवी
खोल मातीत शिरून 
नवे अंकुर फुलवी 

माझा वेल्हाळ पाऊस 
त्याची बातच वेगळी 
त्याच्या फक्त स्पर्शामुळे
फुलारते चाफेकळी

माझा वेल्हाळ पाऊस 
नदी होऊन वाहतो 
तिच्या अंगाखांद्यावर 
खुणा पेरून धावतो

माझा वेल्हाळ पाऊस 
पाझरतो आत आत 
जणू रुजवून काही 
पुन्हा उगवे कणात..

माझा वेल्हाळ पाऊस 
करे धरतीशी माया 
रस रूप गंध सारे 
आला उधळून द्याया..

माझा वेल्हाळ पाऊस 
उतरतो खोल खोल  
गात्रागात्रातून वाहे 
त्याच्या अस्तित्वाची ओल.


Monday, 6 July 2020

सुखाशी भांडतो आम्ही



सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ??


या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज ….


'सुखाशी भांडतो आम्ही'


लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं ….


लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही' एक अप्रतिम आणि उत्कृष्ट नाटक ….


सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ.गिरीश ओक) द्विधा मनःस्थितीतला, स्वतःला काय हवं ते विसरून प्रतिष्ठा, ऐश्वर्य हेच सुख समजून त्यांचाच शोध घेत मिळेल तो रस्ता पत्करत धावणारा आणि त्याची अति महात्वाकांक्षी पत्नी मिता (रेखा बडे) हिच्या सुखाच्या लग्जरिअस कल्पना …. या जुगलबंदीतून प्रेक्षक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत राहतो ….


शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरीब माणसाच्या प्रामाणिक नौकरीतून मिळणाऱ्या पगारातही होणारे भ्रष्टाचार, अन्याय … मन म्हणेल तसे वागायची मुभा नाही, मन् मारून जगायचे लोकांच्या खोट्या प्रतिष्ठा या सर्वात हा प्रामाणिक आणि पापभिरू 'सदा' गुंतत जातो त्याच्या मनाचा कोंडमारा होतो आणि 'मन' हेच त्याचे सर्वात मोठे वैरी होऊन बसते … त्यातून त्याला वेगवेगळे भास होऊ लागतात आणि मग त्याच्या हाताने त्याच्या बायकोची अन मुलाची हत्या घडून येते स्वतः आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना पकडला जातो आणि ७ वर्षांची शिक्षा भोगून परत येउन मान्सोपचाराकडे उपचारार्थ दाखल होतो …


सदाचे मन सदाशी बोलत असतं … आणि आपण आपल्याच मनाचं का ऐकत नाही हा प्रश्न सदाला छळून असतो … म्हणजे मनाचच ऐकायला पाहिजे पण व्यावहारिक जगात जगतांना आपण आपल्या मनाचं ऐकत नाही किंवा त्याला दूर लोटूनच जगलं पाहिजे तरच इथे मनुष्य जगू शकतो किंवा टिकू शकतो हे सदाला कळतंय पण सदाच मन ऐकत नाहीये आणि म्हणून सदा स्वतःच्याच मनाचा वैरी झालाय….


कारण मनामुळे तो इतर लोकांसारखे व्यावहारिक जगणे जगू शकत नाही त्याला भावना सतावतात, त्याला दुख होतं,आनंद होतो पण व्यावहारिक जगात जगाला वाटेल तस जगाव लागतं, त्याला इतरांसारखे मनाला समजावता येत नाही स्वतःच्या अखत्यारीत बांधून ठेवता येत नाही ….या सगळ्या नुसत्या कल्पना बघतांना सुद्धा आपल्याकरवी राहून राहून लेखकाला नकळत दाद दिली जाते ...


शहाण्यानसारखे जगणारे डॉ श्री त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मानसिक रोगी किंवा वेडा ठरलेला सदा यांच्यातले संवाद दिलखेचकच नाही तर हृदय ढवळून टाकणारे आणि सगळी वैचारिक गात्रे जागृत करणारी आहेत …


श्री आणि सदाच्या मधला ड्रिंक घेताना आणि आईची आठवण एक विनोदी सीन पण बुद्धिशाली लिखाणाचा अन सुंदर अभिनयाची परिसीमा गाठणारा नमुना आहे ….


आजच्या काळातल्या विभक्त कुटुंबाच उदाहरण दाखवलेले श्री चे कुटुंब त्यांची स्वप्न त्यांच्या महत्वाकांक्षा एका उंचीपर्यंत पोचताच मुलाने दूर विदेशात जाउन सेटल होण्याचा घेतलेला निर्णय आणि याबरोबरच सुखाच्या बेगडी कल्पना गळून पडलेली मुसमुसनारी आई आणि ........आणि आपणही आपले गाव सोडतांना आपल्या तरुणपणी असेच वागलो होतो हे आठवून हिरमुसलेला बाबा…. त्या आधी खुळ्या सदाने त्याच्या पद्धतीने सांगितलेले सुखाचे तत्वज्ञान …… काही भाग मनाला भिडणारे आणि नाटकाला उंचीवर घेऊन जाणारे आहेत …


खरा वेडा कोण आणि खरा शहाणा कोण … या प्रश्नांच्या मध्ये कोंडी झालेला प्रेक्षक या नाटकातून त्याच्या आयुष्यातले लहान लहान सुख सुद्धा किती महत्वाचे आहेत आणि ते आपण सुखामागे धावतांना, पडतांना आणि परत उठून पळतांना तसेच ताटकळत सोडून देत असतो हा हिशोब स्वतःच्याही नकळत हे नाटक बघतांना लावत असतो ….ते पूर्णपणे हिरावून जाण्या आधी बदल करता येतील का याचा शोध घेत बसतो … खरतर हीच या नाटकाची मिळवती बाजू आहे ….


या व्यतिरिक्त गुरु ठाकूर ह्यांचे वजनदार शब्द सुरेश वाडकर ह्यांच्या अप्रतिम सुराने नाटकात सुरुवातीपासूनच पोषक अशी वातावरण निर्मिती होते …. तसेच पौर्णिमा हिरे यांनी कमळाबाईंच्या भूमिकेत धमाल केली आहे… विनोद निर्माण करत गंभीर झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न या पात्राने केला आहे .…विजया महाजन यांनी प्रधान मेडम तर अभय फडके याने श्री चा मुलगा म्हणून अक्षय ची भूमिका यथार्थ पार पाडली आहे ….


एकंदरीत …. एखादी सुंदर, बुद्धीला खाद्य देणारी आणि वैचारिक भूक शमवणारी तरीही पूर्ण मनोरंजक पैसा वसूल कलाकृती पहायची असेल तर 'सुखांशी भांडतो आम्ही' एकदा बघायलाच हवा ….














रश्मी पदवाड मदनकर


6/07/2013

Thursday, 2 July 2020

घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत
एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा
अचानक फाटला, कोसळला .. आणि
 उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं
जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत
पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही
अश्रूंच्या महापुरात तुडुंब ..

संसार उघडे पडले..हातातले हात सुटले
शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..  
पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले
तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच
अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन
फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,
 कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी
एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या
भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड !

माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत
उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे.

काळ सोकावत जाईल
वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील,
खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील.
पण
जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे
पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर
महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर
चिरकाल ..

रश्मी -
ऑक्टो. २०

Image may contain: text

Friday, 26 June 2020

काळीजहाक ..



भवतालच्या परिघातून घुमत येते एखादी काळीजहाक
आणि ..दिगंतात दुमदुमू लागते दर्दस्त अंतर्लय
अंतर्यामातील वीणेच्या तारेवर रणकंदते एखादी झंकार
आणि वाजू लागते अम्लान वेदनेची स्निग्ध तार
प्राणाच्या समेवर राग चंद्रकंस छेडला जातो..
आणि संथागारातील मर्मतळातून ..
आकांतून बाहेर पडतात अव्यक्त आत्मप्रलय

नको असतात हाका, हाका त्रास देतात
काळजावर कोरलेल्या अनेक डोळ्यांच्या खळातून
आक्रंदत पाझरू लागतात ऋतुगर्द आठवणींचे जीवनलय..
जसे पाषाणाचे हृदय भेदत जखमांच्या भेगांतून बाहेर येऊ पाहतात
काळ्याभोर ढेकळांचे कवच फोडणारे गर्दकोवळे कोंब ...






रश्मी -
२६/०६/२०

Wednesday, 24 June 2020

नरो वा कुंजरो वा !



माणूस हा फार चक्रम प्राणी आहे.. प्रत्येक मानवी प्रवृत्ती गुणदोषांनी भरलेली असते हे तो मान्य करतो. आपल्या माणसांना गुण-दोषांसह स्वीकारावे हेही पटवून देतो,  स्वतःला मात्र कधीच जोखायला जात नाही,  किंवा स्वतःच्या बाबतीत माणूस अत्यंत सहिष्णू वगैरे असतो आणि इतरांकडूनही त्याची तशीच वागण्याची अपेक्षा असते. ..मात्र वास्तवात इतरांकडे पाहताना स्वतःचा दृष्टिकोन मात्र अत्यंत एकसुरी राखतो. दुसऱ्यांकडे पाहतांना तो प्रचंड जजमेंटल वगैरे होतो. पुढला एकतर अगदीच देव हवा असतो किंवा टोकाचा दानव. आपण कितीही प्रगल्भ झालो तरी आपण हे मान्य करायला तयारच नसतो की, माणूस चांगला का वाईट हे आपण कधीच ठरवू शकत नाही. माणूस ज्या वेळी जसा वागतो ते त्या त्यावेळी घडणाऱ्या परिस्थितीमुळे ..आणि परिस्थितीमुळे माणूस जसा वागतो तो तसा असतोच असे नाही ...ते वागणे तात्पुरते असते तेवढ्या परिस्थितीपुरते. आपण नेहमी फक्त माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.

आल्फ्रेड हिचकॉकच्या एका चित्रपटात एक दृश्य होतं ज्यात एक मवाली एका पादचाऱ्याच्या खिशातल्या तुटपुंज्या पैशांसाठी त्याचा निर्घृण खून करतो, त्याच्या अंगावरल्या, खिशातल्या वस्तू ओरबाडून घेऊन शांत चालू लागतो......पुढे गेल्यावर त्याला एक आंधळी म्हातारी कशी बशी रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात दिसते..तर धावत जाऊन तो तिला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. हे सगळं अवघ्या पाच मिनिटात घडतं आणि हे सगळं पाहणारा लांबवर उभा असलेला सिनेमातला माणूस किंवा आपण प्रेक्षकही बुचकळ्यात पडतो की यातला नेमका खरा माणूस कोणता?? खून करणारा की म्हातारीला मदत करणारा??

रॉबिनहूड नावाचं एक मिथ आहे... श्रीमंतांकडून संपत्ती लुटून ती गरीबांमध्ये वितरण करणारा एक लोकप्रिय लोकनायक म्हणजे रॉबिनहूड. या संकल्पनेवर जगभरातील सगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले गेले. असे ऐकिवात आहे कि एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन असणाऱ्या हाजी मस्तानीची रॉबिनहूड सारखी प्रतिमा होती. श्रीमंत, व्यावसायिक, बॉलिवूड कलावंतांमध्ये त्याची दहशत होती. अनेक असंवैधानिक अन्यायी कामे तो करीत होता म्हणून एका वर्गासाठी गुन्हेगार आणि क्रूर होता.. मात्र त्या शहरातील गरिबांसाठी मात्र तो एक देवच होता..दोन्ही बाजू नीट अभ्यासला कि हा व्यक्ती नेमका होता कोण ? ह्यास व्हिलन म्हणावे का हिरो हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो. प्रत्येक माणसांत चांगल्या आणि वाईट गोष्टी वास करून असतात. कोणत्या वेळी कोणती गोष्ट बाहेर पडेल आणि दर्शन देईल हे सांगणे मुश्कील आहे. इतरांचे राहो बाजूला ... ज्याचे त्याला देखील हे नक्की सांगता येणार नाही... त्यामुळेच फक्त एखाद्या कृतिवरून व्यक्ति जोखणे चुकीचे ठरते.. पण मानवी स्वभाव असा आहे की आपण वाईट गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतो आणि एखाद्या व्यक्तिची एखादी वाईट कृति त्याच्या आधीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी धुळीस मिळवते आणि आपण त्या व्यक्तिला वाईट किंवा चुकीचे संबोधू लागतो ..

खरतर परिस्थितीला दोष देऊन केलेल्या किंवा करीत असलेल्या चुकीच्या क्रियेचे समर्थन नाहीये हे. परिस्थिती म्हणजे दारू नव्हे जिच्या आहारी जाऊन माणूस विपरीत कृती करतो. दोन्ही ठिकाणी हे क्षम्य नाही. कृती माणूस करतो आणि दोष परिस्थितीला? संधी माणूस घालवतो आणि दोष नशीबाला? खरतर हे असे व्हायला नको .. वारंवार घटना घडत असतील तर ती प्रवृत्तीच आहे असे म्हणता येईल, परिस्थितीला बळी पडणारा पण माणूस आणि परिस्थिती निर्माण करणारा पण माणूसच, एक उदाहरण आठवत, महाभारताच्या युद्धात ज्या वेळी 'अश्वत्थामा' नावाचा हत्ती मारला जातो आणि द्रोणांची युधिष्ठिराला विचारणा होते की, 'अश्वत्थामा मृत्युमुखी पडलाय  हे खरे आहे का?' तेंव्हा नेहमी सत्य बोलणारा म्हणून प्रचिती असणारा धर्मराज युधिष्टिर 'हो' असेच म्हणतो, नंतर तो 'नरो वा कुंजरो वा' असे पुटपुटतो अशी कथा आहे... वास्तविक ज्यांच्या सोबत कृष्ण-सखा, सारथी आणि मार्गदर्शक होता त्यांचा विजय अटळ होता ... तरीही परिस्थितीला वश होऊन खोटे बोलण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तरी ही अशी बुद्धी व्हावी हे कशाचे लक्षण आहे? ..... ... हे परिस्थितीला शरण जाणेच नव्हे का? खरतर असेही होता काम नये.

Kurukshetra War - Day 16 - Indus.heartstrings

एकाच्या परिस्थितीला दुसरा माणूस कारण ठरतो आणि हे कारण ठरण्यामागे सुद्धा कुठलीतरी परिस्थिती कारणीभूत  ठरलेली असते, प्रत्येकवेळी परिस्थितीला दोष देत बसणे बरे नसले तरी कधीतरी हातून घडून गेलेल्या भल्या-बुऱ्या गोष्टी समजून घेता येतातच.. माफही करता येतात. पण यामागे त्या व्यक्तीला झालेल्या चुकीची जाणीव असणे आणि त्यातून हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मात्र असायला हवी असते. कारण परिस्थिती ही अनेक कारणांची परिणती असते. ती अचानक वरुन पडत नाही किंवा अचानक निर्माण होत नाही. माणूस आपल्या कर्माने त्यात ओढला जातो, बाहेर यायची किल्ली मात्र त्याच्याकडेच असते... ती त्याने प्रयत्नपूर्वक वापरायला मात्र हवी असते.

- रश्मी पदवाड मदनकर

Friday, 5 June 2020

जेव्हा माझ्या खिडकीशी
चंद्र सलगी करेल
तुझ्या गोड आठवांनी
आसमंतही भरेल

रात्र उशाशी येऊन
तुझे गुपीत सांगेल
चित्त बेभान होईल
मनामध्ये काहुरेल

असे आतुरेल मन
कड डोळ्यांची भिजेल
चाचपडेन मी शेज
भ्रम भोपळा फुटेल

तुझी वाट मी पाहते
मन माझं अलवार
ध्यास तुला भेटण्याचा
जीव होई हळुवार

चल लावू ये मोगरा
आपुल्या या अंगणात
गंधाळल्या सोबतीचा
गंध वाहू दे घरात

टाळीला थाळीची आस - भाग ४ (अंतिम)

लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1




आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी पण फक्त नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येतं. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असतांना.. आपलीच झोळी फाटली असतांना देखील ती उरलेली लख्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. म्हणूनच राणीची कमाल वाटते, कामाचा अकाल पडलेल्या कोरोनाच्या काळात स्वतःचे पोट भरत नसताना, उपजीविकेचे माध्यम लॉकडाऊन होऊन बंद पडलेले असतांना दावणीला बांधून ठेवलेली तुटपुंजी सेविंग देखील काढून ती गरीबांमध्ये अन्नदान करत सुटते ....

Image may contain: 2 people, people standing


लॉक डाऊन सुरुवातीचा हा काळ होता, अचानक संकट ओढवल्याने अनेक माणसे हवालदिल झालीत. कुणाची नोकरी गेली, अनेकांचा छोटा मोठा व्यवसाय होता तो बंद पडला, रोजंदारीवर जाणाऱ्यांची मजुरी मिळणे बंद झाले, दोन वेळ खाण्याचेही वांदे व्हायला लागले. हा काळ किती लांबणार आहे हे कुणालाच माहिती नव्हते .. म्हणून खरतर अनेकजण गाठीशी बांधून ठेवलेला खडकू खडकू जपत होते. पण राणी किंग ने असा विचार न करता आता या क्षणी उपाशी असणाऱ्यांचे पॉट भरणे गरजेचे आहे हे पहिले आणि पदरात बांधून ठेवलेला बचतीचा पैसा त्यात लावला. आता तो पैसा संपलाय आणि नव्या कमाईसाठी घराबाहेर पडायचे मार्ग बंद आहेत. अश्यात त्यांनाच आता शासनाकडे मदत मागायची वेळ येऊन ठाकली आहे.

जशी परिस्थिती इतर मजुरीवर कमावत्या हातांची तशीच परिस्थिती या तृतीयपंथीयांची देखील .. कारण ही देखील हातावर कमावून खाणारीच माणसेच आहेत. मी सहज विचारले मग काय करताहात सध्या कशी चालतेय उपजीविका ? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना राणी भावुक होत सांगू लागल्या ''ताई आम्हाला कोणी नोकरीपाणी देत नाही, महत्प्रयासाने एखाद्याला मिळालीच तर लोकं टोमणे मारून, चिडवून, शारीरिक छेडछाड करत खूप छळवणूक करतात अखेर तिथून बाहेरच पडावे लागते, आम्ही टाकलेले व्यवसाय स्वतःला साळसूद समजणारी लोकं खपवून घेत नाहीत.. आमचे आशीर्वाद मिळावे म्हणून धडपडणाऱ्या कित्तेक दुतोंडी लोकांना आमच्या हातचे खाणेपिणे देखील चालत नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या घरी होणारी शुभकार्ये देखील बंद आहेत त्यामुळे उपजीविकेची सगळी दारेच बंद पडली आहेत'' त्यांचे उत्तर ऐकतांना सहज मी बोलून गेले 'होय ट्रेन बसेस मधून फिरून मिळणारे थोडेथोडके पैसे देखील बंद असतील ना गाड्याच बंद असल्याने'' त्यावर राणीचे स्पष्ट खंबीर उत्तर होते ते आपल्या सगळ्यांनीच ऐकणे गरजेचे आहे. ती म्हणाली '' ट्रेन बसेस किंवा दुकानांमध्ये अनेकदा घुसून, अंगाला हात लावून धमकीवजा वाईट शब्द वापरत, बळजबरीने पैसा मागणारा वर्ग आमचा नाही, त्यातले अनेक जण या मार्गाने मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापायी साडीचोळी नेसून हे काम करीत असतात. आमचं दुःख एवढाच आहे कि ह्यांच्या अश्या वागण्याने आम्ही बदनाम होतो आणि समाजात आमच्याबद्दल अविश्वास निर्माण होतो'' तिच्या उत्तराने मी अवाक होते कारण अशी बळजबरी करणारे अनेक तृतीयपंथी मी मुंबईच्या लोकलमध्ये, ट्रेनने प्रवास करतांना बघायचे आणि माझ्याही मनात ह्यांच्याबद्दल ही समज होतीच.

राणीसारख्या इतर अनेक समजूतदार किन्नरांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनांमुळे आताशा ह्यांच्या अनेक मागण्या हळूहळू पूर्ण होऊ लागल्या आहेत, मतदान करण्यासारखे-निवडणूक लढवता येण्यासारखे अनेक हक्क देखील प्रदान करण्यात येऊ लागले आहेत. पण तरीही ही फक्त सुरुवातच आहे आणि अजून खूप मोठा पल्डा त्यांना गाठायचा आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या उपजीविकेसाठी, किंवा तात्पुरती तरी मदत मिळावी या मागणीकरिता राणी किंगचा एक बाईट रेकॉर्ड करून ही बातमी शासनापर्यंत पोचावी आणि तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या या शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर पडलो.... पण खरतर अजूनही बाहेर पडलेलोच नाही. राणी किंगला भेटणे ही एक पर्वणी ठरली. अनेक गैरसमज दूर झाले अनेक समज कायम झाले, किती माहिती मिळाली, घटना कळल्या किस्से ऐकले हे सगळं प्रगल्भ करणारे अनुभव होते शिवाय ह्यांच्यातलया माणुसकीचा झरा वाहता ठेवणाऱ्या.. संस्कारित संवेदनशील माणसांची ओळख झाली ही जमेची बाजू.

त्यांचीही माणसे शिकून सवरून नोकरी करत सन्मानाने जगावी ही राणीची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी .. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या तिच्या रिंगटोनचे शब्द खऱ्या आयुष्यात खरे उतरावे, आणि ती करीत असलेल्या
सगळ्या चांगल्या कामांना भरभरून यश मिळावे या शुभेंच्छा या सीरिजच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायाच्या माध्यमातून त्यांना पोचवुया ...


रश्मी पदवाड मदनकर









Monday, 1 June 2020

टाळीला थाळीची आस - भाग ३

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1

४ जून २०१९ ची घटना, या घटनेने संपूर्ण नागपूरचा किन्नर समाज हादरला होता. किन्नर समाजात नावारूपाला येणाऱ्या .. शहरात बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या आणि भविष्यात समाजाची पुढारी म्हणून आशा असणाऱ्या चमचम गजभियेचा भरदुपारी प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. तृतीय पंथियांचा त्यावेळचा सेनापती म्हणजे गुरु मानला जाणारा उत्तम बाबा तपन याने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील आणि किन्नरांची अपेक्षित उदयोन्मुख सेनापती तृतीयपंथी चमचम गजभियेची कळमनातील कामना नगरात तिच्या घरात घुसून हत्या केली होती. खरतर तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्वासाठीचा आपापसातला संघर्ष हा काही नवीन विषय नाही. सर्वाधिकार असणारी गादी मिळवून नेतृत्व करण्याची इच्छा इथे अनेक जण बाळगून असतात.. त्यातून चालणारी गटबाजी, कुरघोड्या, राजकारण हे नेहमीचेच. आपल्यावर कोणी हावी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त किन्नर आपल्या गोटात राखून शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व गाजवण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित आणि इच्छुक पुढारी करीत राहतात. त्यातून परस्परांवर हल्ले, हाणामाऱ्या, एकमेकांना धमक्या देणे इत्यादी राजरोसपणे घडत राहतं. पोलिसांनाही सतत या प्रकरणांचा शहानिशा करावा लागतो. तत्कालीन सेनापती उत्तम बाबाच्या डोक्यातही वर्चस्वाची हवा होती .. इतर किन्नरांबरोबर दुष्टपणे वागण्याच्या, अत्याचाराच्या अनेक कथा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ लागल्या होत्या. त्यातून गट पडायला लागली होती, माणसे वाटली जात  होतीत, उत्तमबाबाची ताकद कमी होऊ लागली होतीच पण पैशांचे गल्ल्यात येण्याचे प्रमाणही आता कमी झाले होते.. उत्तमबाबा विरोधात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या चमचमच्या गोटात जाणाऱ्या किन्नरांची संख्या वाढत होती, आणि हुकूमशाही नाकारायला, कष्टाचे पैसे त्याच्या गल्ल्यात द्यायला चमचमने ठामपणे नाकारायला सुरुवात केली होती ...

तृतीयपंथीवर पहिल्यांदाच सार्वजनिक ...

कोण होती चमचम - 
पूर्वाश्रमीचा प्रवीण प्रकाश गजभिये उर्फ 'किन्नर चमचम गजभिये' ही अतिशय देखणी आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. किन्नर करीत असलेल्या सगळ्या प्रकारच्या कामात तिला सर्वात जास्त मागणी असायची, लोकप्रियताही बऱ्यापैकी वाढत होती.. तिला मुहबोली किंमत देखील मिळायची .. मात्र प्रयत्नांनी कष्टांनी काम मिळवून त्यातून कमावलेला सगळा पैसा उत्तमबाबाच्या हवाली करावा लागायचा. हे हळूहळू चमचमच्या जीवावर यायला लागले आणि तिने त्याला टाळायला सुरुवात केली.. चमचमच्या वाढत्या लोकप्रियतेला भाळलेले आणि उत्तमबाबाला कंटाळलेले इतर अनेक तृतीयपंथी देखील मग मार्ग बदलू लागले... ह्याचा वचपा काढत एक दिवस उत्तमबाबाने त्याच्या इतर साथीदारांसह काटा काढून टाकण्याच्या दृष्टीनेच चमचमवर हल्ला चढवला..तिच्याच राहत्या घरी घुसून या टोळीने तिच्या डोक्यावर चेहेऱ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केलेत, तीला गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिली, आणि त्यातूनच दोन दिवसाने कामठी मार्गावरील एका प्रायव्हेट हॉस्पिटलला तिचा मृत्यू झाला. 

nagpur-third-gender-uttambaba-kinner-chamcham-fight-for-head945
 
ही घटना तृतीय पंथीयांसाठी हादरवणारी होती, प्रचंड तणाव निर्माण झाला.. उत्तमबाबांच्या अत्याचाराची सीमा पार झाली होती त्याला शिक्षा होण्यासाठी आता तृतीयपंथींना पुढे येणे गरजेचे होऊन बसले होते. कारण तसेही ह्यांना हक्काचे जगणे असू देत नाहीतर न्याय मिळणे इतके सहज साध्य कुठे आहे, त्यासाठी पुन्हा संघर्ष आलाच. चमचमला न्याय मिळवून द्यायला पुन्हा राणी किंग पुढे आल्यात.. उत्तमबाबांच्या त्वरित अटकेसाठी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी असो किंवा नंतर त्याला कडक शिक्षा व्हावी म्हणून अनेक स्तरावरची आंदोलनं .. पुढे कोर्टातली धावपळ अशी चमचमच्या न्यायाची लढाई राणी लढत राहिली...आजही हे चालू आहे. या संघर्षातून आणि लढाईतून तृतीयपंथीयांनी संघटना असावी हा विचार उदयास आला आणि 'किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्था' निर्माण करण्यात आली. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा कारभार आज राणी किंग सांभाळत आहेत. या माध्यमातून  किन्नरांसाठी अनेक चांगली कामे करण्याचा मानस असल्याचे राणी किंग वारंवार बोलून दाखवतात ....
शेवटच्या भागात बघूया कोरोना वायरस लॉकडाऊन काळात तृतीय पंथीयांच्या जीविकेवर झालेला परिणाम आणि याही काळात राणी किंग निभावत असलेली माणुसकी ...

रश्मी पदवाड मदनकर 

Tuesday, 26 May 2020

टाळीला थाळीची आस - भाग 2

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा -



सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ?

जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये हे फार दुःखद आहे.

ह्याच उपेक्षित तृतीय पंथीय समाजाच्या उत्थानासाठी किन्नर राणी ढवळे मागल्या अनेक वर्षांपासून लढतायेत. स्वतःच्या चांगुलपणावर आणि संस्कारावर ठाम विश्वास असणाऱ्या राणी म्हणतात 'ताली बाजाकर और एक रुपये का सीक्का देकर हम कबतक जिते रहेंगे, अपने लिये नहीं तो कमसे कम हमारी आनेवाले पिढी के लिये हमें मान सन्मान वाला जिंदगी छोडकर जाना चाहिये' तुकाराम महाराज म्हणतात ना 'जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' कोणताही दुटप्पीपणा ढोंग न करता बोलनं आणि वागणं यात सुसंगती ठेवणार्या व्यक्ती बद्दल आदर बाळगावा म्हणूनच राणीचे काम बघितल्यानंतर आपसूक तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. तृतीय पंथीयांनी चांगले शिक्षण घ्यावे, शिकलेल्या सक्षम असलेल्या तृतीय पंथीयांना सरकारने रोजगार द्यावा, समाजात मान निर्माण होईल अशी त्यांनी वागणूक ठेवावी .. फक्त आपल्याच कम्युनिटीच्या नव्हे तर समाजातील प्रत्येक माणसांच्या गरजेला कामी यावे, अन्यायासाठी लढा द्यावा तेवढेच संकटात गरजेच्या वेळी एकमेकांसाठी धावून जावे ही राणीची मानसिकता आहे.

ती आजवर कोणत्याही संस्थेच्या भरवशावर न राहता स्वबळावर या कम्युनिटीसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आली. त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगार मिळवण्यासाठी, अनेक बाबतीत त्यांना समानतेचा अधिकार मिळण्यासाठी, त्यांना अपमानाचा सामना करावा लागू नये म्हणून शहरात स्वतंत्र शौचालय बांधून द्या यासाठी किंवा चुकीची कामे करावी लागू नये म्हणून व्यवसाय प्रशिक्षण किंवा निर्मिती करण्यासाठी शासनाने मदत द्यावी यासाठी राणी तिच्या साथीदारांसह पुढाऱ्यांपासून शासनदरबारापर्यंत पायपीट करत, निवेदन देत, आंदोलन करत फिरत असते.




राणीचे काम इतक्यावर संपत नाहीं. समाजातील कोणत्याही घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती ठामपणे उभी राहते तिच्या नेटवर्कच्या माध्यमातून मदत पोचवते. कुठल्याश्या विधवेला सासरहून मिळवून दिलेला हक्क, कोणत्या सुनेची सासरच्या जाचातून केलेली सुटका, एखाद्या म्हातारीला मुलगा-सुनेच्या अत्याचारापासून वाचवून प्रदान केलेली सुरक्षा, कुणाला मरणाच्या दारातून परत आणले किंवा कुना गरजवंताला पैशांची केलेली मदत अश्या एक ना अनेक कहाण्या तिच्या पदरात बांधलेल्या सापडत राहतात.

पुढल्या भागात पाहूया एका किन्नरच्या हत्येसाठी आपल्याच समाजातील त्या दृष्ट माणसांच्या विरोधात उभे राहण्याचे राणीचे धारिष्ट्य ..





©रश्मी पदवाड मदनकर




Monday, 25 May 2020

टाळीला थाळीची आस - 1



#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा -


हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे''



आपण फोन केल्यावर ही सुरेख रिंगटोन कानावर पडते. ती ऐकतानाच त्यांच्याबद्दलचा पूर्वाग्रह आपोआप गळाल्यासारखा वाटू लागतो स्क्रीनवर 'राणी किंग' नाव झळकत असते.. राणी किन्नर (राणी ढवळे) फोन उचलतात. 'हा बोलो दीदी' अश्या अत्यंत नम्र आवाजात आपली विचारणा होते . बातमीसाठी भेटायचंय सांगीतल्यावर दोघींच्याही सहमतीने सोयीने भेटीची वेळ आणि ठिकाण ठरते.. खरतर नाही म्हंटले तरी जरा दबकतच आपण वेळेत जाऊन पोचतो, दिलेल्या पत्त्यावर पण जरा बाहेरच रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहतो, थोडी वाट पाहावी लागते .. तेवढ्याच वेळात मनात बरेच विचार येऊन जातात. तृतीय पंथीयांना असे पाहिले बोललो असलो तरी स्वतः त्यांच्या राहत्या जागी जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायची ही आपली पहिलीच तर वेळ असते.

१५-२० मिनिटांचा वेळ जातो आणि राणी किंग त्यांच्या इतर ४ साथीदारांसह गाडीतून उतरतात. आपण अचंभित बघत राहतो .. अतिशय साधा वेष साधी लिंबू रंगाची सुती साडी एखाद्या घरंदाज बाईसारखा खांद्यावरून पदर घेतलेला. उतरताच चेहेऱ्यावर स्मित आणि एक हात छातीवर ठेवून जरा शरीर वाकवून आम्हाला केलेले वंदन. आणि हातानेच 'या' म्हणत त्या पुढे चालू लागतात. आपण बेमालूमपणे त्यांच्या पाठी चालू लागतो. आपल्या कल्पनेतली कुठलीही खून त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही. कुठलाही भडक मेकअप नाही, शरीराला उगाचच दिलेले लटके-झटके नाही, चालण्यात लचक नाही कि चेहेऱ्यावर अगाऊ भाव नाहीत..एखाद्या मानी स्त्री प्रमाणे काखेत पर्स लटकावून खांद्यावरचा पदर नीट सांभाळत साधेपणाने त्यांचे चालणे दिसत राहते .. आपल्या कल्पनेतले अनेक मनोरे अजून ढासळणार असतात.. पूर्वग्रह पुसला जाणार असतो.

एका तीन मजली क्वार्टर सदृश इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर आपण येऊन पोचतो.. ही तुमच्या आमच्या सारखीच मध्यम वर्गीय सभ्य लोकांची सोसायटी असल्याचे लक्षात येते. इमारतीत आणखीही बरेच कुटुंब यांच्यासह गुण्यागोविंदाने राहत असल्याचे कळते. आपण आत येताच आपल्या हातावर सॅनिटायझर दिले जाते.. सगळ्यांनी मास्क देखील लावले असतात. त्यांच्या घरात त्यांचा वावर अगदी आपल्यासारखा सहज साधा.. नीटनेटकं लावलेलं घर, घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिव्या फुलांनी सजवलेलं देवघर.. दाराला तोरण पडदे.. आणि माणूस म्हणून आवडणाऱ्या सॉफ्ट टॉईज सारख्या अनेक गोष्टी... आपल्याला विषयाला हात घालायचा असतो, राणी रोशनीला थंड भरलेले ग्लास आणायला सांगते 'दीदी आप धूप में घुमकर आई हो पहिले थंडा पी लो, बाते तो क्या होती रहेंगी' रोशनी गोड स्मित करत थंड आणायला आत जाते आणि मला उगाचच दारात आलेल्याला पाणीही न विचारणारा सभ्य समाज डोळ्यापुढे येऊन आठवत राहतो ...

हातात दिलेल्या कोल्ड ड्रिंकचा घोट पीत मी थेट प्रश्नाला हात घालते ''आपको यहा के लोग तक्लीफ नही देते ?? '' राणी हलके स्मित करत शांत स्वरात उत्तर देते ''नही देते दीदी, आपुन अच्छे तो अपने लिये सारा जमाना अच्छा है. अपने से किसी को तक्लीफ नही तो अपने को लोग काहे को तक्लीफ देंगे' .. आपण तिच्याकडे बघत राहतो.. समाजाने टाकून दिलेले किंवा सतत हिनवले गेलेले हे लोक, अजूनही किती आशावाद ठेवून जगत असतात.
क्रमशः

कोण आहेत राणी किंग वाचा पुढील भागात ..

©रश्मी पदवाड मदनकर


Image may contain: 2 people, people standing and indoor

Wednesday, 13 May 2020

मन बेबंद .. !



घर .. आंगण .. बाजार .. कार्यालये .. शहर लॉकडाऊन .. ...

शेजारी .. सहकारी .. गणगोत .. मित्र मंडळी ..होम क्वारंटाईन

सगळं सामसूम .. कडेकोट बंदोबस्तात

आता कोणी कोणाला भेटत नाही. भेटल्यावर हसण्यातून-डोळ्यातून दाटून आलेला आनंद आता दिसत नाही. विश्वासाचा स्पर्श म्हणून कोणी हातात हात घेत नाहीत. आधाराची थाप आणि कौतुकाची शाबासकीही देत नाहीत. डोक्यावर आशीर्वादाचा हात कोणी ठेवत नाही आणि मित्र मैत्रिणी भेटल्यावर कोणी आवेगपूर्ण मिठीही मारत नाहीत.

परवा आठवला तो पावसानं सगळा संसार उधळून लावल्यावर कवी कुसुमाग्रजांना भेटायला आलेला तोच तो कोणी.., दारात दूर उभा राहिला एक शब्दही न बोलता
कसे म्हणावे '‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला'' एकटेपणा आता सगळ्यांच्याच पदरी पडलेला नाही का.
'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' इतकेही शब्द फुटेनात.. पाठीवर हात मागायचा तरी कसा ? सोशल डीस्टंसिग पाळायला हवे.

''पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे''


इंदिरा बाईंना कोणी सांगावं की येऊ द्यात निदान तेवढं तरी.. तेवढ्याने काही लागण होणार नाही. पण जगण्याला जरा निमित्त मिळत राहील. अहो सगळंच बंद केलं तर जगायचं तरी कसं?
इतकेही मिळणार नसेल तर सुरेश भटांच्या गजलेतील एका शेराप्रमाणे गत होईल
''नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते''


नुसतेच भासमय जगणे ??
या भासांवर निभावून नेणे कधीपर्यंत ? किती वाट पाहावी किती सहावे विरह .. सुधीर मोघेंना ही अवस्था बरोबर कळली होती बहुदा ..
'मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥'


अश्या एकांतात इंदिरा संतांना देखील आठवणी दाटून येतात .. गहिवरते मन. क्षणक्षण पुढ्यात येऊन उभा राहतो आणि जीवाची तगमग तगमग होत राहते. स्वतःशीच पुटपुटत त्या विचारतात सख्याला
"ऐक जरा ना"
कौलारांतुन थेंब ठिबकला
ओठावरती
"ऐक जरा ना... एक आठवण.
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
उघडी खिडकी,
कसे म्हणाला..
मीच ऐकले शब्द तयाचे...
'या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय."


 कसली हृद्य आठवण.. पण वास्तव सुटतंय का हातातून ? आठवणीतच जगायला भाग पाडतंय. आठवणींचा कल्लोळ मनात धुमाकूळ घालतोय, पण उपाय काय स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याशिवाय पर्याय तरी काय .. इंदिरा संत हतबल होतात. जीवाचा कोंडमारा सहन होत नाही आणि मग त्या भरभर कागदावर ओळी उतरवतात
"अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे."


केवढा हा जीवाचा आकांत केवढी कासावीशी. अश्या जगण्याचा तिढा कधी सुटायचा.. किती वाट पाहायची? आजूबाजूला एवढे मळभ दाटून आले असतांना, मनाला कसे आणि काय समजवायचे. इंदिरा संतांच्या मानसारखीच शांताबाईंची अवस्था झाली असावी का ? त्यांनी इतक्या आर्त भावना कश्या बरं उतरवल्या होत्या.
''घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणि मजला घेरित आले''


तसे शांताबाई या निराशेतून बाहेर यायला सांगतात तेव्हा त्यांचे शब्द खूप धीरही देतात. कणखरपणे उभे राहायला हवे, तसेच जसे हजार आपदा येऊन आदळल्या तरी निसर्ग निराशेच्या गर्तेत जात नाही. कोलमडून पडल्यावरही नवी पालवी फुटते नवा बहर येतो. त्या म्हणतात मनाचा हिरवा बहर ओसरल्यासारखा वाटत असेल तर जरा खिडकीतून डोकवावे बाहेर, या निराशेतही आशेचे अनेक फुलोरे फुलून आले असतात तिथे -

"तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे."


हे मन फार हटखोर असतं नाही ? काही केल्या ऐकत नाही ..
मनाला नाही का लॉकडाऊन करता येत ? न हलता-डुलता, कुठेच न जाता, कुणाचीच आठवण न काढता, दूर दूर जाऊन कुणालाच न भेटता गप्प बसायचं 'डिस्टंसिंग राखायचं' असं नाही का सांगता येत ... सांगता आलं असतं .. मनाला क्वारंटाईन करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ... नाही ?

©रश्मी पदवाड मदनकर

Friday, 8 May 2020

झूम जब तक धड़कनों में जान है ...



याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !!


कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत.

माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप' वाटत असेल तर मग सगळं सुरळीत चालू असतांनाच हे सगळे असले चोसले आपण का पाळत बसतो. एकदा 'द बर्निंग ट्रेन' हा सिनेमा पाहतांना मला हा प्रश्न पडला होता तेव्हा वय थोडं लहानच होतं पण आज कोरोनाच्या धर्तीवर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि सिनेमा पुन्हा पुन्हा आठवू लागला आहे.


साहिर लुधियानवीने लिहिलेली रफी अन आशादी ने गायलेली या सिनेमातली कव्वालीच आयुष्याचे केवढे सार सांगून जाते..


पल दो पल का साथ हमारा
पल दो पल के याराने हैं
इस मंज़िल पर मिलने वाले
उस मंज़िल पर खो जाने हैं


आयुष्याची शाश्वती आहे तोवरच जगून घ्यायला हवे, उद्याचा काय भरवसा आज ज्यांचे हात हातात आहेत उद्या नसतील कदाचित, आज जे डोळ्यांना दिसतायेत उद्या दिसणार नाहीत. आपण तरी उरणार आहोत का ? जिथे कशाचीच शाश्वती नाही तिथे कसला संकोच आणि कसली शंका .. सगळं पुसून कोऱ्या पाटीप्रमाणे स्वच्छ करावं आणि उरलेल्या दिवसांचा मनाप्रमाणे उत्सव करावा.


कव्वालीत म्हटलंय ना ..
हर ख़ुशी कुछ देर की मेहमान है
पूरा कर ले दिल में जो अरमान है
ज़िन्दगी इक तेज़-रौ तूफ़ान है
इसका जो पीछा करे नादान है
झूम जब तक धड़कनों में जान है




१९८० साली रवी चोपडा यांच्या निर्देशनात ५ वर्षाच्या दीर्घ कालावधीत तयार झालेला 'द बर्निंग ट्रेन' सिनेमा आला होता. विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जितेन्द्र आणि नीतू कपूर सारख्या दिग्गज कलाकारांनी काम करूनही त्याकाळात फ्लॉप झालेला परंतु कालांतराने क्लासिक सिनेमाचा दर्जा प्राप्त झालेला हा अफलातून चित्रपट. विविध स्थानकांवरून वेगवेगळ्या गंतव्याला निघालेली जात, धर्म, परंपरा, पेश्यानं आणि स्वभावानंही विवीधता असणारी अनेकजण अगदी अबालवृद्ध एका ट्रेनने प्रवास करत असतात.. प्रवासभर कायकाय घडत राहतं. आपापसात प्यार-मोहब्बत पासून ते मारधाडपर्यंत.. नव्या होणारया मैत्रीपासून ते पुर्विचे असणारे वैर आणि त्याचा सुड वगैरे घेण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यापर्यंत...अगदी करमणुकीत नाच गाणीही चालू असतात. सगळे आपापल्या तालात जगण्यात तल्लीन वगैरे. पण हे सर्व सगळं आलबेल असतं तोवर... अचानक परिस्थिती पालटते चालत्या ट्रेनला आग लागते आणि सारं चित्रच पालटतं. धगधगत्या ट्रेनमधले ब्रेक फेल होतात. मरण डोळ्यापुढे दिसू लागतं.. जगण्याचे आता काहीच क्षण उरल्याची जाणीव प्रखर होते. सगळे मुखवटे सगळे बेगडी अवसान गाळून पडू लागतात. होते नव्हते क्लेश विसरून प्रेमाची माणसं जवळ येतात.. सहप्रवासी माझं-तुझं विसरून एकमेकांना मदत करू लागतात. वैरी हातात हात घेऊन संकटातून मार्ग काढायला रणांगणात उतरतात, महिला खांद्याला खांदा लावून मदतीला सरसावतात, ज्यांना ज्यांना हे शक्य होत नाही ती देवाला प्रार्थना करून हातभार लावतात.


तेरी मर्ज़ी से ऐ मालिक हम
इस दुनिया में आए हैं
तेरी रहमत से हम सबने
ये जिस्म और जान पाए हैं
तू अपनी नज़र हम पर रखना
किस हाल में हैं ये ख़बर रखना
तेरी है ज़मीं, तेरा आसमां
तू बड़ा मेहरबां, तू बक्शिश कर ..


जगण्या-मरण्याच्या प्रचंड कोलाहलातून, मोठ्या संघर्षातून महत्प्रयासाने विजय मिळविला जातो आणि काही प्रवासी गमावून उर्वरित मात्र सुखरूप गंतव्याला पोचतात. हा मरणाकडे घेऊन जाणारा प्रवास खूप काही शिकवून गेलेला असतो. ट्रेनमध्ये चढतांना असलेला प्रवासी त्याच ट्रेनमधून उतरतांना पूर्वीचा तो राहिलेलाच नसतो ... नखशिखांत बदललेला असतो.


काहीतरी शिकायला समजून घ्यायला बरेचदा स्वतःचे अनुभवच का घ्यावे. पुढ्ल्याला लागलेली ठेच पाहून खरतर मागल्याने शहाणे व्हायला हवे पण असे होत नाही. त्याला ठेच कशी लागली म्हणून पाहायला धजावतो आणि स्वतःचा पाय ठेचकाळून घेतो. आज या घडीला तरी हे व्हायला नको कारण शिकत बसायला आयुष्य पडलंय हे म्हणण्याइतकासुद्धा वेळ खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का कुणास ठाऊक. म्हणून वाटतं जो पर्यंत आपल्या घरात, परिवारात, आपल्या आजू-बाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंतच माणसाचे जात-धर्म, आपला-तुपला, सख्खा-परका, हा गरीब तो श्रीमंत असे जास्तीचे चोसले असतात, पण खरी वेळ अंगावर आली की यातले काहीही कामात येत नाही कामात येते ती फक्त माणसातली माणुसकी... आपल्यातली माणुसकीच तेवढी शिल्लक राखायला हवी .. जपायला हवी.


 रश्मी पदवाड मदनकर






Saturday, 2 May 2020

क्वारंटाईन ..



शेवटी भांडून निघालो तेव्हा 
अडकून पडणार आहोत आपण 
एकमेकांपासून दूर .. आपापल्या घरात 
क्वारंटाईन होऊन ..
कुठे माहिती होते तुला मला 
 
नकोच तू मला म्हणतांना 
तोंडच बघायचे नाही ठरवतांना 
जीव तटतटून आठवण येईल 
पण नाहीच बघायला मिळणार एकमेकांना .. 
कुठे माहिती होते तुला मला 

हातातले हात सोडले तेव्हा 
रागानेच विलागलो तेव्हा 
एकमेकांच्या स्पर्शालाही पारखे होऊ 
आठवणींशी झटत राहू .. 
हा अंदाजही कुठे बांधता आला तुला मला 

स्वप्नातले इमले होते इवले इवले 
एकमेकांच्या सोबतीने पाहिलेले 
तुझ्या डोळ्यात माझे माझ्या डोळ्यात तुझे 
अवकाश होते झुकलेले .. 
सोबतीचे अवकाशच असे दुरावेल  
 कुठे माहिती होते तुला मला 

एकमेकांपर्यंत पोचायचे सगळे रस्ते बंद आहेत आता 
एकमेकांजवळ घेऊन जाणाऱ्या पायांना टाळे  ..
निरोपाचे रस्ते सुद्धा अदृश्य झाले तर ? ... आणि 
शेवटचा श्वास घ्यावाच लागला तर 
सांग कसे कळेल तुला मला ? 

लॉकडाऊन संपेल तेव्हा 
धावत येऊ भेटायाला 
पश्चातापाचे अश्रू थोपवून 
मिठीत शिरून सॉरी म्हणायला 
आपल्यातला एक दिसलाच नाही 
कुठे विरला कळलेच नाही 
पाहता पाहता दुनिया बदलेल 
अखंड पोकळी निर्माण होईल 
जगण्या जगवण्याचे प्रश्न 
शून्य होऊन संपून जातील 

जगता जगता मरता मरता 
का मी उरलो कळणार नाही 
तगणे इतके कठीण होईल   
उरल्या सुरल्या त्या एकाला 
भकास जगणे जमणार नाही 

सांग माहिती होते तुला मला ?

शेवटी भांडून निघालो तेव्हा 
अडकून पडणार आहोत आपण 
कुठे माहिती होते तुला मला 
 
- रश्मी 

#लॉकडाऊन_मधल्या _कविता 







 
कुणीतरी हाक घालतं
 मनाच्या बांधावरच हात घालतं
बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात
आणि भीती दाटून येते

कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित
मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून
टाळे लावून घेतलेले असतात
आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात
अंतर आखले अंतर राखले असतात ..

मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत
पण अंतरं मन मोडतही नाहीत
मनांचा मनाशी संवाद घडत राहायला
हरकत नाही एकवेळ ..
पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना
मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..
 
  

Monday, 27 April 2020

हिरवे भान -



(वृत्त - महाराष्ट्र वृत्त)

बकुळीखाली निजून आहे
उन्हकेशरी हिरवे भान
मुग्धफुलांची पखरण होता
थरथर झाले सारे रान

पहाटसमयी किलबिल झाली
वनी पसरले गीत अजाण
दवांत न्हाले उन्ह कोवळे
बहकत गेले सारे रान

फांद्यांवरती हिंदोळ्यावर
फुले डोलली पानोपान
अंगांगावर रंग उधळले
बहरून आले सारे रान

श्वासाश्वासा मधे पेरला
गंधगारवा पाऊस छान
माती भिजली अत्तर झाली
मृद्गंधीले सारे रान

थोडी सळसळ थोडी हळहळ
नदीकाठच्या वाटेवरती
पानगळीच्या ऋतुत कातर
अधीर झाले सारे रान ...

©रश्मी

मै तुम्हे फिर मिलूंगी..







खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो.


जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राहतेस अमृता प्रीतम .. शेजारी येऊन बसतेस आणि तुझ्या शब्दातलं वाण माझ्या पदरी घालत माझ्या उसवलेल्या मनाचा पोत शिवत बसतेस कधी कवितेने कधी कथेने. तू म्हणाली होतीस आठवतं..
घनघोर अंधेरा छाये जब
कोई राह नज़र ना आये जब
कोई तुमको फिर बहकाये जब
इस बात पे थोड़ी देर तलक
तुम आँखें अपनी बंद करना
और अन्तर्मन की सुन लेना
मुमकिन है हम-तुम झूठ कहें
पर अन्तर्मन सच बोलेगा...


कसं गं कळतं तुला? अजाणता अनुरूपता दोघींच्या जगण्यातल्या बाबी रिलेट का होतात. तू कधीकाळी जगलेले भोगलेले अनुभव माझ्या अनुभूतींना ओळखीचे का वाटतात. वेगवेगळ्या काळात समांतर आयुष्याच्या दोऱ्या पकडून त्याच चढ-उत्तरातून, त्याच खाच-खळग्यातून केला असतो आपण एकसारखाच प्रवास. शब्दांनी सावरलं असतं तेव्हा तुला आणि तेच शब्द आता देत असतात आधार मला. पण तुझ्यासारखं त्या शब्दांना जोजवून आपलंसं करून आतात भिनवणं अजून बाकी असतं..इथेही आयुष्याचा खोल अर्थ समजावत तूच तर येतेस मदतीला ..
ज़िंदगी खेलती है
पर हमउम्रों से...
कविता खेलती है
बराबर के शब्दों से, ख़यालों से
पर अर्थ खेल नहीं बनते
ज़िंदगी बन जाते हैं...
होय या अर्थांचाच तर शोध असतो आयुष्यभर जो संपतच नाही. तुला हि माझी तगमग बरोबर उमगली असते तुझ्याशी असणाऱ्या अंतरिक भावबंधाच्या रेषा फेर धरतात भोवताली आणि तुझे शब्द जगण्याची उभारी देत राहतात. मी समाजाने घातलेल्या कुंपणा अल्याड सतत भान राखत स्वतःच सामान्यत्व मान्य करून स्वीकारून जगू पाहणारी .. आणि तू समाजाचे ओझे झुगारून स्वच्छंद, सामान्य असण्याची सगळी कुंपणं ओलांडून स्वतःच्या अस्तित्वा पल्याड विशेषत्व जागवून स्व-अटींवर जगणारी .. तरी का कोण जाणे तुझ्यात माझ्यात एक समान धागा आहे ज्यानं आपल्यात एक नातं निर्माण केलं आहे..तू सतत पुढ्यात येऊन सांगत राहतेस मला; या अश्या मनासारखे कलंदरी जगण्यासाठी करावे लागणारे त्याग सोप्पे नसतात. कधीतरी माझा कान धरून म्हणतेसही ''बाई गं! दुनियाभऱ्याचं ओझं खांद्यावर लादत, इतरांसाठी झोकून, स्वतःच अस्तित्व विसरणं म्हणजेच बाईपण असतं हि व्याख्या विसर एकदा .. तू ओझ्याखाली राहतेस'' मी नुसतंच हसते ..आणि विचारते.. मग तूच सांग तू कुठे राहतेस ?? तू म्हणतेस ..
आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है
गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है
हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..
गर आपने मुझे कभी तलाश करना है….
तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ –
यह एक शाप है – एक वर है
और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे
समझना – वह मेरा घर है !!!


मनावर भुरळ घालणाऱ्या तुझ्या शब्दांच्या गावातून प्रवास करतांना मनातून-शरीरातून उसळत्या भावनांच्या लाटा मी अनेकदा अनुभवल्या आहेत. तू आताशा तुझ्या चाहत्यांच्या नसानसात अशी काही भिनली आहेस जणू तू म्हणजे आत्मा आणि आम्ही सारे त्या आत्म्याला फुटलेले लाखो संवेदनांचे धुमारे. तुझ्या शब्दातून मिळणाऱ्या आनंदांच्या ओढीने लिहिण्या-वाचण्यातलं सुख किती निर्मळ आणि चिरंतन असतं कसं सांगू तुला ? स्वत:च अंगावर ओरबाडून घेतलेल्या रोजच्या जगण्यातल्या अनेकविध जखमांवर कधीतरी या सुखाचा मलम लावावा अन जगणं सहज सुलभ करत जावं. यासाठीच तर हा सारा प्रपंच.. तू दिलेल्या शब्दांची साथ म्हणजे हदयी असलेल्या वीनेची तार झंकारल्या सारखीच आहे, त्याचे सुर आत अनेक दिवस गुंजत राहतील अमृता ....
तू मात्र भेटायला येत राहा कारण तू वचन दिले आहेस
 ''मै तुम्हे फिर मिलूंगी ...''


©रश्मी पदवाड मदनकर

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...