Saturday, 17 May 2025

हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -


याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात.

चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय संकल्पनेचं एक ठोस आणि उल्लेखनीय उदाहरण मानलं जाऊ शकतं विशेषतः त्याच्या गुन्हेगारी इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही अनेक स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित झाल्या, प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आणि काहींनी तर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये, शोभराजने नेपाळमधील नीहिता बिस्वास हिच्याशी विवाह केला. ती त्याच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान होती, आणि शोभराज तुरुंगात असतानाच दोघे भेटले. त्याचे सगळे गुन्हे माहिती असताना नीहिताने त्याच्यावर प्रेम असल्याचं खुलेपणाने जाहीर केलं आणि त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले.

रिचर्ड रामिरेझ हा अमेरिकेतील अत्यंत क्रूर आणि भयावह सिरीयल किलर होता, ज्याला "नाईट स्टॉकर" म्हणून ओळखले जाते. 1984 ते 1985 दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये त्याने बलात्कार, हत्या, चोरी आणि अत्याचार यांसारखे अनेक गुन्हे केले. त्याच्या विकृत आणि सैतानी प्रवृत्तीमुळे संपूर्ण अमेरिका हादरली होती. तरीसुद्धा, रामिरेझ तुरुंगात गेल्यानंतर हजारो महिलांनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं, त्याला प्रेमपत्रं पाठवली, आणि त्याच्या सैतानी व्यक्तिमत्त्वाला "आकर्षक" म्हटलं. 1996 मध्ये, डोरीन लिओय नावाच्या एका पत्रकार महिलेने त्याच्याशी तुरुंगात विवाह केला. ही घटना हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय विकृतीचं अत्यंत स्पष्ट उदाहरण आहे ... जिथे स्त्रिया गंभीर गुन्हेगारांच्या क्रौर्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात.

भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकरी आणि अर्धिया (कमिशन एजंट) यांच्यातील संबंध स्टॉकहोम सिंड्रोमच्या उदाहरणासारखे आहेत. अर्धिया शेतकऱ्यांना पिकांची खरेदी आणि अनौपचारिक कर्ज देतात, ज्यामुळे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत विक्री करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला जातो, कारण अर्धिया यांच्या माध्यमातून त्यांना तात्पुरती सुरक्षितता आणि आधार मिळतो. या संबंधांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात शोषण होऊनही अर्धिया यांच्याबद्दल प्रेमाचे नाते आणि विश्वास दिसून येतो, जे स्टॉकहोम सिंड्रोमचे मोठे लक्षण आहे.

सोशल मीडियावरील हायब्रिस्टोफिलिया समुदाय:
आजच्या युगात सोशल मीडियाचा मानवी वर्तनावर खोलवर परिणाम होत आहे. ही केवळ माहितीच्या देवाण-घेवाणीची जागा राहिलेली नसून, व्यक्ती आपल्या ओळखी, मतमतांतरे आणि भावना खुलेपणाने मांडताना दिसतात. या डिजिटल विश्वात एक आगळावेगळा आणि वादग्रस्त समुदाय पुढे येताना दिसतो आहे, तो म्हणजे "हायब्रिस्टोफिलिया समुदाय". या समुदायातील व्यक्ती गंभीर गुन्हेगारांप्रती प्रेम, आकर्षण वा सहानुभूती व्यक्त करतात. ही भावना केवळ वैयक्तिक मानसिक विचलन नसून, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली सामूहिक ओळखीचं आणि उपसंस्कृतीचं रूप घेत आहे.

हायब्रिस्टोफिलिया म्हणजे काय?
हायब्रिस्टोफिलिया ही एक विशिष्ट मानसशास्त्रीय अवस्था आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला बलात्कार, खून, दहशतवादी कृत्ये, नक्सलवाद किंवा अन्य गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती किंवा भावनिक काहीवेळा लैंगिक आकर्षण देखील निर्माण होते. हे आकर्षण अनेकदा इतके तीव्र असते की काही महिला (बहुतेक वेळा) तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशीदेखील विवाह करण्याचा निर्णय घेतात. उदाहरणार्थ, चार्ल्स शोभराज, अबू सालेम, टेड बंडी, रिचर्ड रामिरेझ आणि जेफ्री डाहमर हे अत्यंत गंभीर गुन्हेगार असूनही, त्यांच्या भोवती एक मोठा प्रेम, आकर्षण आणि भक्तिभाव व्यक्त करणारा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या गोष्टी मर्यादित वैयक्तिक होत्या तोवर ठीक होतं; पण सोशल मीडियावर अशा गुन्हेगारांची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स, त्यांना निरपराध दाखवण्याची लगबग, त्यासाठी होणारी अस्वस्थता तडफड आणि त्या तडफडीचे विक्षिप्त पद्धतीने केलेले सादरीकरण हायब्रिस्टोफिलियाच्या समाजमाध्यमांवरील रुग्णांच्या दृश्य रूपाची साक्ष देतात.

सोशल मिडिया ही केवळ संवादाची जागा नाही, ती आता एक ओळख साकारण्याची जागा आहे असे समजले जाते. TikTok, Instagram, Tumblr, Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक अनेकदा गुन्हेगारांविषयी आकर्षण व्यक्त करताना स्वतःची एक खास 'डार्क फॅन' ओळख निर्माण करतात. हे आकर्षण अनेक वेळा गुन्हेगाराच्या "वैयक्तिक बाजू" ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ, "तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे", "त्याची बालपणाची वेदना कुणी समजून घेतली नाही म्हणून बिचारा असा झाला", वगैरे.
अशा लोकांच्या नैतिकतेचा गोंधळ उडालेला असतो. या अशा मानसिक डिस्टर्ब् समुदायांमध्ये एक प्रकारची 'नैतिक तडजोड' (moral negotiation) दिसून येते. हे लोक वारंवार सांगतात की ते गुन्ह्यांना पाठिंबा देत नाहीत, पण गुन्हेगार म्हणून व्यक्तीमध्ये त्यांना काही "खास" दिसतं किंवा हा मानवी दयामायेचा मुद्दा आहे पण हीच मानवीयता किंवा दयामाया त्यांना त्या अन्यायाला बळी पडलेल्यांबद्दल किंवा अत्याचारग्रस्त माणसांबद्दल वाटत नसते. तेव्हा यांचा मानवतेचा बुरखा उघडा पडतो. काही वेळा हे आकर्षण केवळ व्यक्तिमत्त्व, रूप, किंवा प्रसिद्धीशी संबंधित देखील असते. असे असते तेव्हा ते अधिक मानसिक आजाराशी संबंधित असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय अनेक वेळा सोशल मिडियावर गुन्हेगारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबाचे फोटो, कोर्ट फूटेज, किंवा जुन्या मुलाखती वापरून त्यांचं 'एस्थेटिक रूपांतर' करतात. गडद संगीत, ब्लर फिल्टर्स, रोमँटिक कोट्स यांद्वारे गुन्हेगाराची प्रतिमा एखाद्या प्रेमळ, दयाळू, कुटुंबवत्सल व्यक्तींसारखी सादर केली जाते. यामुळे गुन्हेगारांची भीतीदायक प्रतिमा लुप्त होते आणि त्या जागी एक "आकर्षक विरोधाभास" उभा राहतो.

या समुदायांबाबत समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात काहींना हे मनोरंजक वाटते, तर काहींना हे 'अतिशय चिंताजनक' वाटते. गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होणं हे ''गुन्हेगारीचे सामान्यीकरण'' होणे असू शकते, जे समाजासाठी घातक आहे. विशेषतः जेव्हा पीडितांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या ऐवजी गुन्हेगारांचे महिमामंडन केले जाते तेव्हा ते अधिकच गंभीर स्वरूपाचे असते.

हायब्रिस्टोफिलिया समुदाय हे सोशल मिडियाच्या काळात निर्माण झालेलं एक गुंतागुंतीचं, नैतिकदृष्ट्या गंडलेलं, आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या साशंक असलेलं क्षेत्र आहे. या समुदायातील लोक फक्त गुन्हेगारांवर प्रेम करत नाहीत, ते सोशल मिडियाद्वारे त्या गुन्हेगाराशी स्वतःची ओळख वाढवणे, त्याच्या विचारसरणीशी सुसंगत वागणे आणि भरकटलेल्या भावनिक गरजा एनकेन पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी असे वागत असतात. ही गोष्ट फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे, तर समाजशास्त्र, डिजिटल माध्यमांचे विश्लेषण, आणि नैतिकता या सर्व अंगांनी अभ्यासण्यासारखी आहे. जरासे स्वतःच्या आत वाकून पाहण्याची तेवढी गरज आहे.

✍🏻 रश्मी पदवाड मदनकर

(१७ मे २०२५ रोजी तरुण भारत आकांक्षा पुरवणीत कव्हर स्टोरी प्रकाशित)





No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...