टाळीला थाळीची आस - भाग 2
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ? जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात, हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये ...