दारूचा विषय आला की बव्हंशी पुरुषांची त्यावर एकछत्री मक्तेदारी असते. महिलांचा त्याच्याशी संबंध आलाच तर तो संघर्षाचा, दुःखाचा. दारूने आयुष्य उध्वस्थ होतात, संसार पणाला लागतात हे कितीही ओरडून सांगितले तरी त्याचा परिणाम नेहमी शून्यच. निव्वळ प्रबोधनाने बदल घडत नाही त्यासाठी लढा द्यावा लागतो, संघर्ष करावा लागतो, वेळ पडलीच तर त्यागही करावे लागतात. आणि असा लढा देणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. नागपुर शहरालगतच्या हिंगण्यामध्ये निलडोह-डीगडोह परिसर आहे. तसे सुखासुखी जगणारी लोकं. भांडणतंटा नाही किंवा फार मोठ्या अडचणी नाहीत. एकदिवस मात्र अचानक मिळालेल्या एका बातमीने हादरला. गजानननगर मध्ये रहिवासी भागात जिथे सभ्य लोकांची वस्ती आहे, तिथेच शेजारी प्रार्थनास्थळ, शाळा आहे. अशा ठिकाणी दारूदुकान लागणार असल्याचे कळले आणि गावातील महिलांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला. सुखासुखी चाललेल्या आयुष्यात चटकन कुणीतरी मिठाचा खडा टाकावा, अशी स्थिती झाली. कुणालाच हे दुकान नको होते. पण पुढे होऊन लढणार कोण हा मोठाच प्रश्न होता. अशावेळी रचना कन्हेर पुढे सरसावल्या. रचना मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ...