Friday 18 March 2016

ग्लोरिफिकेशन - आत्महत्यांचे उदात्तीकरण




'त्महत्या' खरतर गंभीर विषय. कायद्याने म्हणाल तर गुन्हाच. कुठल्याही माणसाला जसा जन्म कुठे घ्यायचा हा अधिकार नसतो तसे प्रत्येक जन्मलेल्या माणसाला स्वतःला संपवण्याचे अधिकारही न्यायालयाने, शासनाने दिलेले नाहीत. जन्म घेतलाय तर जगावेच लागते मरण येत नाही तोपर्यंत. हे सगळे खरे असले तरी आत्महत्या होत नाही असे नाहीच. रोज अगदी रोज आत्महत्या होतात आणि शेकड्याने होतात. माणूस हा अगम्य प्राणी आहे. ज्या गोष्टींकडे जाण्यास त्याला आळा घालाल त्याच गोष्टींकडे तो जास्त आकर्षित होतो खेचला जातो. आकर्षणाच्या नियमात हे सटीक बसत असले तरी आत्महत्या हा डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही. सध्या देशात जे काही चाललंय ते फार खेदजनक आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दलितांची आत्महत्या हा देशातील सध्य:स्थितीत सर्वात गाजत असलेला विषय. परिस्थितीने गांजलेल्या कुणीही आत्महत्या करणे हे संवेदनशील मनाला त्रासदायकच आहे. असा कुठलाही मनुष्य नसेल ज्याला अश्या घटनांचे, या परिस्थितीचे वैषम्य वाटणार नाही. पण अशी परिस्थिती उद्भवली असेल तर तिला तेवढ्याच संवेदनशीलतेणे आपण हाताळतोय का हाच मुळात कळीचा मुद्दा आहे. आज देशात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे काही वैचारिक चर्चेच्या नावाने चाललंय ते पाहता प्रश्न उद्भवतो तो हा कि

''आपण आत्महत्यांचे उदात्तीकरण करतोय का??''

२००९ मध्ये पराग पाटील यांचा एक लेख वाचनात आला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूनंतर जी आत्महत्यांची लाट उसळली त्यावर त्यांनी लिहिले होते

''आत्महत्त्या या केवळ वैयक्तिक घटना नसून त्या सामाजिक फिनोमना आहेत, असं तत्ववेत्ते सांगत आले आहेत. जेव्हा एखादा करिझ्मॅटिक नेता जातो तेव्हा त्याच्या दु:खात स्वत:चं जीवन संपवणाऱ्या लोकांचं उदात्तीकरण म्हणजे समाज आजारी असल्याचं लक्षण आहे.''

हेच अगदी हेच निव्वळ आंध्र नाहीतर सगळ्याच आत्महत्यांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात लागू होत नाही का ??शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत मागल्या अनेक वर्षांपासून होत आहेत, त्या होऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असले आणि त्यासाठी शासनाने धोरणे राबवावी हि इच्छा असली तरी 'शेतकऱ्याने आत्महत्या का करावी हा प्रश्न शिल्लक राहतोच. चार माणसाचे पोट भरण्यासाठी त्याने काहीही करावे अगदी कष्ट उपसावे, हमाली करावी पण आत्महत्या करू नये. त्याच्या गेल्यानंतर त्याची बायको हाच फोर्मुला नाही का वापरत?  आपल्याच घरी अस्मानी संकटाने भिउन चार माणसाची जबाबदारी आपण उचलू शकत नाही आणि देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांची जबाबदारी शासनावर टाकून मोकळे कसकाय होतो ? आत्महत्या म्हणजे पळपुटेपणा.आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, संकट अडचणींना कसोटी समजून त्यांना तोंड द्यायचे सोडून घाबरून आत्महत्या करणाऱ्यांचे समर्थन कसकाय करू शकतो आपण?? हा झाला एक विषय.

''आंध्रातले शेतकरी आपला नेता मृत झाला म्हणून आत्महत्या करतात, तर महाराष्ट्रातले शेतकरी नेते जिवंत आहेत म्हणून आत्महत्या करतात'' हा त्यावेळी गाजलेला मराठी मुलखातला एक जहरी विनोद खिन्न हसूनही हा विनोद सोडून देता येत नाही. तो मनाच्या तळाशी डुचमळत राहतो.

रोहित विमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे राजकारण तर अतिशय दीनवाणे अन खेदजनक आहे. ऊच्च शिक्षण घेऊन, गुण अंगात बाणवून, मोठी कामं करूनही जिवंतपणी तर जिवंतपणी पण मेल्यावरही एखाद्याची ओळख फक्त 'दलीत' म्हणुन रहावी यासाठी त्याचीच लोकं जीव ओतून प्रयत्न करित असतील तर .. त्याच्या कर्तृत्वाहून जास्त तो दलित म्हणूनच शिल्लक राहणार हे त्याच्यासाठीही अभिमानाचे ठरले असते का प्रश्नच आहे.  आणि हे असेच होणे आम्हाला समाजमान्य असेल त्यात काहीही गैर दिसत नसेल तर एक काय चार राष्ट्रपूरुषही आम्हाला यातून कधीच बाहेर काढू शकणार नाही....आपलं कर्तूत्व आपल्या योग्यता ही आपली ओळख का असू नये..? एका दलिताला मारलं म्हणूनच शिक्षा व्हावी असा हट्ट का? एका कर्तूत्ववानाला संपवलं असा लढा नाही देता येणार का?? विचार करा एकदा आपण काय करतोय आणि आपल्याला नेमकं हवय काय ??

विषय नुसताच आत्महत्यांचा असता तर तो संवेदनशीलतेच्या सहाणेवर घासून पाहता आलाही असता .... पण प्रश्न इथे थांबत नाही, समस्येच मूळ शोधून त्यावर उत्तर शोधायला वेळ देत नाही तोपर्यंत घडतं काहीतरी वेगळंच. आत्महत्या कुणाचीही असो आत्महत्येनंतर एवढी प्रसिद्धी इतकी प्रशंसा आणि प्रतिष्ठा मिळणार असेल; संपूर्ण देशाच सांत्वन, सोबत शासनाच्या सोयी सवलती आणि देशपातळीवर उदोउदो होणार असेल तर हे मिळवायला उद्याची पिढी पुढे सरसावेल हि भीती नाही का वाटत??  आपण काय आदर्श ठेवतोय आपल्या पुढल्या पिढीसमोर. त्यांना आत्महत्येस प्रेरीतच करीत नाहीयोत का आपण ?? वर्षभरापूर्वी दिल्लीच्या 'आप' नेत्यांच्या धरणा कार्यक्रमात घडलेला लज्जास्पद प्रसंग आठवतो.  ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही धरण्यावर होतात त्यातल्याच एखाद्याने तुमच्या डोळ्यादेखत आत्महत्या करावी आणि तरीही भाषणगिरी सुरु ठेवून सत्तेवरील नेत्यांनी हातात ताकद असतांना त्याचा मृत्यू होईपर्यंत राजकारणात लीन राहणे किती हीन दर्जाचे होते. याहून वाईट होते ते त्याला वाचवायचे सोडून ते शूट करणे आणि ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली त्याचे लाइव शो टीव्ही वर दाखवले जाणे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येने देशाची हळहळ टिपून त्यात तिखट मीठ लावून प्रसारित करणे.

आत्महत्यावर होणारे राजकारण आणि राजकारणाचे विघटीकरण होत झालेले समाजकारण. आम्ही आमच्या संवेदना गमावतोय कि काय अशी भीती वाटायला लागलीय हल्ली. आणि हि भीती कायम करून त्याचेही राजकारण करणारे लोक आहेतच. टाळूवरचे लोणी खाणे ह्यालाच म्हणत असावे बहुदा ... नाही का ?



रश्मी / १७ मार्च 16

4 comments:

  1. खूप ज्वलंत प्रश्न आहे ....लेख उत्तम ....

    ReplyDelete
  2. खूप ज्वलंत प्रश्न आहे ....लेख उत्तम ....

    ReplyDelete
  3. खूप ज्वलंत प्रश्न आहे ....लेख उत्तम ....

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

      Delete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...