Wednesday, 9 March 2016

स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल !!


सृजनशीलता आणि सर्जनशीलता या दोन भिन्न पारिभाषिक संज्ञा आहेत.सृजन म्हणजे उत्पत्ती आणि सर्जन म्हणजे निर्मिती. प्रतिभेने सर्जनशीलता अंगात भिनवता येऊ शकेनही कदाचित पण सृजनशील असणे किंवा होणे कठीणच. म्हणूनच पु. भा. भावे म्हणतात ...

''दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे''

जन्मदात्री असणाऱ्या मातेचे म्हणजेच स्त्रीचे म्हणूनच सृजनशील म्हणून सर्वात मानाचे स्थान आहे. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. आई नवा जीव जन्माला घालते. सृष्टी पर्यावरणात नवजागृती करते अन पृथ्वी उत्पन्न करते. म्हणून निसर्गाने निर्मिलेल्या या तिन्हीचे सृजनाशी हे असे शाश्वत नाते आहे. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वात्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी या सर्वांपलीकडे ती स्वतःही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे विसरून कसे चालेल??

'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा. स्त्रीचं विश्वच वेगळं असतं किंवा ''women itself a different world '' असे म्हणाले तरी वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून ते आजतागायत तिच्या जगण्याशी संबंधित तिढा सुटायचे नाव घेत नाही. कुठे स्त्री उच्च शिक्षण घेऊन दर्जेदार नौकरी करतांनाही तिचे स्त्री असणे हा तिच्या गुणवत्तेपेक्षा मोठा विषय ठरतो तर कुठे अजूनही ती अठराव्या शतकातले अठरा विश्वे वैचारिक दारिद्र्याच्या लक्ष्मण रेषेत अडकून पडली आहे. तिने कितीही मोठी झेप घेतली किंवा कितीही मोठ्ठी उडी घेतली तरी परतीची उडी काटेरी कुंपणाच्या आतच येउन पडावी हे दुर्दैव आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पुढे जात स्त्रीत्वाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आधुनिक विश्वात आपण नेमक्या कुठे आहोत व कुठे जाण्याची गरज आहे ती आजही या प्रश्नांची उत्तर शोधत भरकटतेच आहे.

आजही प्रत्येक क्षेत्रात स्त्री असण्यापलिकडल्या कर्तृत्वाच्या खुणा तिनं उमटवल्या असल्या, तरी ती एक स्त्री आहे हिच तिची ओळख प्रीसाइज्लि शिल्लक राहते, आज विश्वभरात व्यवसायाचं दार ठोठावणारी स्त्री पूर्वी म्हणजे अगदी एक पिढी आधीपर्यंत तर अस्तित्वाचीच लढाई लढत होती. बाह्य जगाने आपला स्वीकार करावा, आपला योग्य मान ठेवावा आपल्या बुद्धिमत्तेची, कलागुणांची आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यावी यासाठी धडपडत असायची. तिची लढाई तिलाच लढावी लागायची. मला माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, विचार आहे स्वातंत्र्य आहे, ह्याची जाण शिक्षणातून येत गेली आणि अस्मितेचा शोध लागला. स्त्री मधलं स्त्रीत्व जागं झालं पण समाजातल्या जाणीवा जागृत होणे बाकी होते, समाजात वावरतांना येणाऱ्या मर्यादा कायम होत्या. स्त्री बदलू शकते पण विकृती आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसोबत काम करणे सोप्पे नव्हते. त्याहून कठीण होते ते परंपरेच्या सो कॉल्ड चौकटी मोडून तर्काधिष्ठित विचारांवर ठामपणे उभे राहणे. हा संघर्षाचा काळ होता. शिक्षणाने स्त्रीला मानसिकदृष्ट्या सक्षम केले परंतु तरी ती पुरुषी वर्चस्वाला थेट आव्हान देण्याइतकी समर्थ झाली नव्हती. मधल्या काळात स्त्रीने सगळ्यांना सुखी करण्याच्या नादात सुपर वुमन बनण्याच्या प्रयत्नात स्वतःची फरफट करून घेतली. परिणामी अनेक मुलाचं संगोपन, ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या, नातलग, पतीची प्रगती यांना प्राधान्य देतांना स्वतःच्या आवडी निवडी कलागुण आणि प्रगतीच्या संधींकडे निग्रहाने पाठ फिरवीत राहिली. किंबहुना स्वतःकडे दुय्यम स्थान घेत राहिली. स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करत राहिली. पण आजची स्त्री बदलली . आजच्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढून स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला काय हवय हे शोधण्याचे तिने ठरवले आणि त्यासाठी प्रयत्नही करू लागली. म्हणूनच आज तिच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी ती स्वतः आहे . प्राधान्य आहे ते तिच्या ती असण्याला आत्मसन्मानाला आणि तिच्या मनातील शाश्वत संस्कार मूल्यांना त्याची जपणूक करतांना संसार मुलबाळ नातेसंबंध ह्यांना बरोबर घेऊनच तिला पुढे जायचे आहे. आणि हे सगळ करत असतांना तिच्या सर्वांगीण प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक दूर सारण्याचा ती प्रयत्न करते आहे. अर्थात हे स्थित्यंतर सहज घडलेले नाही. सोंदर्य आणि सौष्ठव यांचे मापदंड असलेल्या स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे हे नक्की.

''स्त्रीजन्मा स्त्रीजन्मा तुझी ही कहाणी... बाईचा जन्म नको घालू शिरीहरी, रातन् दिस पुरुषाची ताबेदारी. ''

कुठल्याश्या लोकगीताच्या या ओळी ऐकलेल्या आठवतात. आयुष्याच्या दाहक अनुभवातून उद्भवलेल्या या ओळी असाव्या यात शंका नाही . निव्वळ स्त्रीभ्रूण हत्या किंवा हुंडाबळी हेच ज्वलंत विषय म्हणून आम्ही हाताळतो. पण समाजात पावलोपावली तिला मिळणारी वागणूक, तिच्याकडे पाहण्याचा इतर वर्गांचा दृष्टीकोन, तिच्याकामाच्या ठिकाणी तिच्या कामाशिवाय तिच्याकडून केली जाणारी अपेक्षा आणि त्यासाठी होत असलेले प्रयत्न, स्थळी काळी नको वाटणारे स्पर्श-भाषा,अनेकदा नातलगांचा असहकार, बुरसटलेल्या नजरा आणि बरच काही. स्त्रीने तक्रार करू नये. केली तरी तिचे तिने तसेच जगायचे आहे. कालची स्त्री तसेच जगली, आजची जगतेय उद्याच्या स्त्रीनेही तेच करायचे आहे. किंबहुना तिला तसेच करावे लागणार दुसरा पर्याय नाही. स्वतःच्या हक्कासाठी लढणारी स्त्री अतिशाहणी ठरते. पण स्त्रियांवर वर्चस्व दाखवणारा पुरुष मात्र मर्दमाणूस म्हणून गणला जातो. हे सगळे सहन करूनही तिच्याच चारित्र्यावर घेतली गेलेली शंका अश्या एकनाअनेक समस्या. आणि ती मात्र रोजच्या आयुष्यातल्या अनेक आघाडींवर लढतांना स्वतःला सिद्ध करण्यास धडपडते आहे... नसलेल्या आठ हाताने चारही दिशेने येणाऱ्या या संकटांवरही वार करत पुरून उरते आहे. ती हे करते आहे यासाठी तिला कौतुक नको, सहानुभूती तर अजिब्बातच नको तिला हवंय ते तिच्या हक्काचं जीण... तिच्या गुणवत्तेची तिच्या कार्याची खरी पावती. स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून या समाजाने बघावे वागवावे हि एवढी साधी अपेक्षा असणे रास्त नाहीये का ??


(महिला दिन विशेष :- मासिकासाठी लेहिलेला लेख)

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...