Monday, 8 August 2016

नैराश्यातून आशेकडे (मनाचिये गुंती)


आयुष्यात अनेक घटना घडतात, काही प्रसंग अत्यंत कडवट अनुभव देणारे असतात. ते कुठेतरी मनाच्या तळाशी साठून राहतात. विसरता विसरले जात नाहीत. कधीतरी मध्येच एखाद्या धक्क्याने ते सगळं स्मृती पटलावर येतात असे वारंवार घडत राहते अन आयुष्य त्या घटनेच्याच अवती भवती घुटमळत राहते. हि नैराश्याची स्थिती फार गंभीर असते. यातनामयी भूतकाळात गुरफटला गेलेला माणूस वर्तमान आयुष्यही मातीमोल करतो आणि साऱ्या जगण्याचीच राखरांगोळी होत जाते. कुठलीही दुःखद घटना पचवणे-विसरणे सोपे नसते. काही काळ ती मनात ठाण मांडून बसते हे जरी खरे असले तरी जीवन जगतांना येणारे नवनवीन आव्हान झेलताना, नवीन अनुभव घेतांना ते क्षण त्या आठवणी पुसट होत असतात किंबहुना व्हायलाच हव्या असतात. असे जेव्हा घडत नाही, त्याच त्याच आठवणी उगाळून तेच ते दुःख तो रवंथ करीत राहतो तेव्हा माणूस नैराश्येने ग्रासला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण असे होत नाही, त्याच्या वागण्याचा वैताग येऊन त्रासलेली लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याशी बोलायचे टाळतात किंवा चिडचिड करतात. त्याचे उलट परिणाम होतात. नैराश्यग्रस्त माणूस अधिकाधिक गुरफटत जातो. मन मोकळं न करता आल्याने आतल्या आत घुसमट होते आणि समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते.

हा सारा संबंध असतो तो मनाशी. बुद्धीने कितीही युक्तिवाद केला तरी काही गोष्टी मानायला मन तयार नसते आणि म्हणून अश्या माणसांना कितीही समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न व्यर्थ ठरतो. आपली तर्कनिष्ठता आपले वाक्प्रभुत्व सपशेल फसतं. गरज असते ती अश्या नैराश्याने ग्रस्त माणसांना धीराने आधार देण्याची. मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे उपचार सुरु करावे पण त्या बरोबरच त्यांची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यांना अतिशय सकारात्मक रीतीने त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची. त्यांच्या मनातील नकारात्मकता काढून घडलेल्या घटनेला विसरायलाच हवे असाही आग्रह न धरता ती स्वीकारून परिस्थितीचा सामना करत पुढले आव्हानं पेलून आगेकूच करायला त्यांना पुन्हा बोट धरून मार्गक्रमण करायला लावणाऱ्या सच्च्या मित्राची भूमिका आपल्याला बजावत येते का याचा प्रयत्न करायला हवा. नैराश्याने ग्रासले असतांना अशी साथ आणि योग्य उपचार रुग्णाला लवकर बरे होण्यास खूप बळ देतात.

(दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित )

Wednesday, 3 August 2016

तेजशलाका अरुंधती

कविसाव्या शतकात शांतता व शाश्वत समुदायाच्या उभारणीसाठी कराव्या लागणा-या खडतर प्रयत्नांमध्ये जागतिक पातळीवर महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तश्या जगभरातील विदुषीका पुढेही येत आहे.  हिलरी क्लिंटन यांनी या युगाचे वर्णन ‘सहभागाचे युग’ असे केले आहे. आपण जात, धर्म व लिंगभेद विसरून समाजामधील एक बहुमूल्य घटक बनण्याकडे व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे त्या म्हणतात. आज हे त्यामानाने सहज वाटत असले तरी साठाव्या दशकात राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून त्यासाठी काम करणं तितकसं सोप्प नव्हतं. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान भारतातील महिलांना जगभरात कुठेही पुरुषांपेक्षा कमी मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा  प्रवास आजही अचंभित करतो. परराष्ट्र धोरणाच्या कार्यात भारतातून महिलांचा सहभाग अगदीच नगण्य असला तरी, 1963 साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यानंतर पुढले चार दशकं आपल्या बहुमूल्य कार्याचा ठसा या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर उमटविणाऱ्या,  'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध करारावर' (सीटीबीटी) भारताची बाजू मांडण्यात महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अरुंधती घोष यांचे नाव आज अग्रस्थानी घेतले जाते. जगतिक मंचावर अण्वस्त्र प्रसारासारख्या ज्वलंत विषयावर आपल्या देशाची भूमिका शांत, संयत पण ठामपणे मांडणारी अस्सल देशी भारतीय प्रतिमा म्हणजे अरुंधती घोष.

संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून भूमिका वठवणाऱ्या अरुंधती घोष यांचे नुकतंच निधन झाले.  नेहरू घराण्याच्या सरकारच्या काळातील प्रसिद्ध परदेश खात्यातील त्या एक अधिकारी होत्या. घोष यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असला, तरी त्यांची जडणघडण मुंबईत झाली. कोलकात्यातील लेडी ब्रेबोर्न महाविद्यालय आणि विश्‍व-भारती विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर 1963 मध्ये त्या भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. भारताच्या मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक युरोपीय देशांमध्ये काम केले. यामध्ये ऑस्ट्रिया, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि नेदरलॅंड आदी देशांचा समावेश आहे. जिनिव्हातील अमेरिकेच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या अधिकारी होत्या. त्या प्रथम चर्चेत आल्या ते जिनिव्हा येथे आण्विक चाचणीबंदी करारासंबंधी परिषदेत मांडलेल्या त्यांच्या भूमिकेमुळे. स्वसंरक्षणासाठी इतर देशांप्रमाणेच भारतालाही अण्वस्त्रसज्ज होण्याचा अधिकार आहे. संपूर्ण नि:शस्त्रीकरणासाठी भारत कोणाच्याही दबावाखाली शस्त्रे टाकणार नाही; तर त्याबाबत एकमत होऊन सर्व देशांनी शस्त्रत्याग केल्यावर आम्हीही स्वखुशीने आपली शस्त्रे संपवू, ही भारताची भूमिका त्यांनी अत्यंत ठामपणे महासत्तांच्या पुढ्यात मांडली होती. . दक्षिण आशियात लहान सहन शस्त्रांवर नियंत्रण आणण्यासाठी त्या आग्रही होत्या. त्यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय घोष यांची आसाममधील ‘अल्फा’च्या दहशतवाद्यांनी १९९७ साली अपहरण करून हत्या केली होती. त्यामुळे त्यांनी भोगलेल्या या दुःखाची झळ पसरू नये असे त्यांना वाटे.  बांग्लादेशातही त्यांनी अज्ञातवासातील बांगलादेशी असे कोलकात्यात बंगाली नेते ताजुद्दीन अहमद सरकारचे मुख्य संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या या कामाचा गौरव २०१२ साली देशाच्या ४१व्या स्वातंत्र्यदिनी बांगलादेशने केला.

  सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या नि:शस्त्रीकरणविषयक सल्लागार मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले. रराष्ट्र खात्याच्या नि:शस्त्रीकरणविषयक कृती गटाच्या सदस्य अश्या अनेक जबाबदाऱ्या त्या निभावत राहिल्या. 

(बुधवार दि. ३/०८/२०१६ सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)

Tuesday, 26 July 2016

वोह ना आयेंगे पलटकर ... अलविदा मुबारक

 काही माणसांच्या आयुष्याची नीट पडलेली घडी विस्कटते अन पुढे सगळी प्रमेयच चुकत जातात. गुणांची मूर्तिमंत प्रतीके असणारी हि माणसे ट्रॅजेडी मध्ये अशीकाही गुरफटली जातात की  गुणांहून अधिक त्यांच्या दुःखाचं पारडं कधी भारी होऊन पडतं कळतही नाही. 'कभी तनहाईयों में यु हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे, और बिजली कोध जायेगी ''
हे गीत गायिले तेव्हा या गायिकेला अंदाजही नसावा कधीतरी या दोन ओळींचे बोल तद्वतच आयुष्यात खरे उतरणार आहेत. आयुष्याच्या उतारवयात त्या अश्याच गुमनामींच्या 'अंधारा'त झाकोळल्या गेल्या अन आयुष्याच्या अंतापर्यंत कितीतरी दुःखाच्या 'बिजली' झेलत राहिल्या. त्यांच्या गाण्यांनी त्याकाळात मंत्रमुग्ध होणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना मात्र ह्याचा थांगपत्ताही लागला नाही. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आपल्या आवडत्या गायिकेचे झालेले हाल ऐकून सारेच संगीत प्रेमी हळहळले.

मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानच्या सुजनगढ झुंझुनू इथला. लहानपणापासूनच चित्रपटांचं वेड होतं त्यांना. त्यातल्या त्यात सुरैय्यावर विशेष प्रेम होतं. सुरैय्याला बघणे, दिवसरात्र तिचे गाणे गुणगुणणे त्यांना फार आवडायचं. त्यांनी कधीही शिक्षण घेतले नाही त्यांना लिहिता वाचताही यायचे नाही पण संगीत शिकणे हा एकमेव ध्यास लागला. पुढे रियाजुद्दीन खान सारख्या फणकार गुरूंकडून त्यांनी गायकीचे प्रशिक्षण घेतले. मुबारकजींचे काका त्यांच्या प्रतिभेने अचंभित झाले त्यांच्याच आग्रहावरून त्यांना घरून परवानगी अन रेडिओमध्ये गाण्याची संधी मिळाली आणि मुबारक बेगम चित्रपटसृष्टीत पोचल्या. 1949 मध्ये 'आईए' चित्रपटासाठी संगीतकार नाशाद ह्यांनी गाण्याची संधी दिली  'मोहें आने लगी अंगडाई' हे पाहिले गीत रेकॉर्ड झाले.  त्यानंतर एका पार्श्वगायिकेचा यशाच्या शिखराचा प्रवास सुरु झाला. 1949 ते 1972 या काळात  काही सुरेल गाण्यांची मेजवानी मुबारकजींनी रसिकांना दिली.  त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली अन तो काळ असा गाजला की सुमधुर आवाजाच्या धनी मुबारक ह्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . लतादिदी, कैफी आजमी, एस. डी. बर्मन, खय्याम. मो.रफी अश्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. हिंदीसोबतच मारवाडी, गुजराथी गाणीही त्या गायिल्या, त्यांच्या कंठातून उतरलेली काही गाणी जसे मधुमती चित्रपटातले 'हम हाले दिलं सुनायेंगे सुनीये की न सुनीये, हम हाले दिलं सुनायेंगे' हमराहीचे 'मुझको अपने गले लगालो ऐ मेरे हमराही' अशी अनेक सुरमयी गाणी पुढेही अनेक वर्ष संगीत प्रेमी गुणगुणत राहतील हे निश्चित.

''अगर इस जहाँ का मालिक कही मिल सके तो पूछे; मिली कौनसी खता पर हमें इस कदर सजाये'' त्यांनी गायिलेल्या या गाण्याचे शब्द खरे ठरले,  आयुष्याच्या शेवटी मुबारकजींचे आयुष्य फार हालापेष्टांमध्ये गेले. जावेद अख्तर आणि सुनील दत्त यांच्या मदतीने जोगेश्वरी इथे राहायला घर मिळाले होते पण राज्य सरकार कडून मिळणाऱ्या मासिक 700 रुपयांवर तरुण मुलीचे आजारपण अन इतर खर्च त्यांना चालवावा लागे. काही चाहत्यांनाही वेळोवेळी 'शुक्राना' पोहोचवून मदत केली होती, मधले अनेक वर्ष मात्र त्या विस्मरणात गेल्या होत्या. पण आयुष्याच्या शेवटाला आजारपणामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या. मनेका गांधींनी सरकारकडे मदतीचे आव्हान केले तर राज्यमंत्री विनोद तावडेंनीही त्यांना प्रत्यक्ष भेटून मदत दिली होती. आज मुबारक बेगम आपल्यात नसल्या तरी त्यांनी रसिकांना जगण्यासाठी दिलेल्या गीत संजिवणीमुळे त्या शतकांपर्यंत अजरामर ठरणार आहेत. 

(दि. २७/०७/२०१६ ला 'सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


  

Friday, 22 July 2016

संवेदनेच्या सहाणेवर ... (स्वाथी मर्डर केस - चेन्नई )



सकाळी ६.३० ची वेळ, चेन्नईचे नूनगंबक्कम रेल्वे स्थानक... खूप गर्दी झालेली नव्हती अजून पण सामसूमही कुठे होते, निदान शंभरेक माणसे होतीच लोकलची वाट बघत. पुढल्या काहीच मिनिटात एक घटना घडते एका तरुणीवर कुणीतरी चाकूने हल्ला करतो. सर्वांच्या डोळ्यादेखत चाकूने गोंदत जातो. एक निष्पाप जीव सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानकावर रक्ताच्या थारोळ्यात पडली असते, बेसुध. 'मला वाचवा' अशी आरोळीही तिला ठोकता आली नसते. मारेकरी पळून जातो आणि काय आश्चर्य सारीच पांगापांग होते. उपस्थित लोकं थंड डोक्याने आपापली गाडी पकडून गंतव्याला निघून जातात. पुढे अडीच तास ती तिथेच मदतीविना तात्कळत जीव सोडते. 'ती' आई-वडिलांच्या जगण्याचा प्राण, गुरुजनांच्या अपेक्षा, कष्टानं उच्चशिक्षण घेतलेली, कुणाचा तरी आधार ठरणारी , कुणाचे तरी भविष्य साकारणारी, डोळ्यात अखंड स्वप्न घेऊन महत्त्वाकांक्षेने वावरणारी. पडलीय जमिनीवर, संपतेय ... तडफडत जीव सोडतेय. आपण मात्र chill आहोत. हे सगळं डोळ्याने पाहूनही आपल्याला cool होऊन पुन्हा वेळ मारून नेता येते आहे. कौतुक करावं का ?? की कु~~ल म्हणता म्हणता आपण खरंच इतक्या थंड रक्ताचे झालोय की अश्या कुठल्याही घटनेने मन हेलावतच नाही.

इन्फोसिसमध्ये काम करणारी आयआयटीयन स्वाथीची ही हृदय पिळवटून टाकणारी घटना. हल्लीच चेन्नईच्या सर्व चॅनलची ब्रेकिंग ठरलेली बातमी. बातमी कळली तेव्हा तुमच्या माझ्यासकट सगळेच हळहळले. अनेकांनी आंदोलनही केले. मेणबत्ती घेऊन कित्येकांनी रॅली काढली. न्यूज चॅनलवर चर्चा सत्र झडले. वाद-विवाद झाले. आरोप-प्रत्यारोप झाले आकांड तांडवही संपले. पण हे सर्व घटना घडून गेल्यानंतर घटनाबाह्य लोकांनी केले होते. प्रश्न असा उद्भवतो की त्यावेळी त्या तिथल्या उपस्थितांचे काय झाले?? ती का नाही सरसावली मदतीला? त्यावेळी ते तिथे नसते तर तीही पुढे या आंदोलनात सामील झाली असती का? किंवा आज आंदोलन करतायेत ती लोक प्रत्यक्ष तिथे असती तर धावली असती का मदतीला ??

याच वर्षी मार्च महिन्यात एकतर्फी प्रेमातून १४ वर्षीय व्हॉलीबॉल खेळाडूची कोलकात्याच्या बारासात भागात मैदानावरच तिच्या तथाकथित प्रेमीने हत्या केली. आरोपीने सर्वांदेखत चाकूने घाव करून असेच तिला भर मैदानात रक्ताच्या थारोळ्यात मरत सोडून दिले. एका उगवत्या खेळाडूचे आयुष्य संपले. एप्रिल महिन्यात मुंबई प्रभादेवीला एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, जून महिन्यात तेलंगणमधील अदिलाबाद जिल्ह्यामध्ये 17 वर्षांच्या एका मुलीचा भरदिवसा तिच्या घरासमोरच गळा चिरला...भंडारा, गोंदिया, ठाणे, उल्हास नगर किती किती आणि कुठे कुठे ?? केवळ नकार पचवता आला नाही म्हणून जीवावर उठणाऱ्या या सडकछाप मजनूंच्या दिलजले प्रेमाचं आणखी किती मुलींनी शिकार व्हायचं?

प्रेम किती अलवार अलगद, येणाऱ्या अनुभूती साठवण्याची अन निव्वळ त्या आठवणींवर आयुष्य कंठण्याची सुरेल सुंदर भावना असते. ज्यावर प्रेम केलंय त्या व्यक्तीच्या मर्जीचे तिच्या भावनांचे भान राखून तिला जिंकण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालविण्याची सुखद प्रक्रिया असते. खरतर प्रेम मनात जन्म घेते त्या क्षणापासून माणसाने हळवे व्हायला हवे त्याच्यात संवेदना जागृत व्हायला हव्या. प्रेम ही भावनाच माणसाला हलवणारी, फुलवणारी, प्रेरणा देणारी, त्याच्या मनात जगण्याविषयीची कोवळीक निर्माण करणारी असते. प्रेमात माणूस क्रूर, राक्षसी कसा होतो, विद्रुप सैतानी खेळ तो खेळूच कसा शकतो हा प्रत्येक संवेदनशील मनाला छळणारा प्रश्न आहे.

खरतर प्रेम ही देण्या-घेण्याची चीजवस्तू नाहीचेय. मालकी हक्क गाजवण्याची किंवा मला हवय ते मिळायलाच हवं असा आग्रह धरणे, मला मिळणार नसेल तर इतर कुणालाही मिळू देणार नाही असे विचार, मग तो माणूस असो किंवा वस्तू माझी नसेल तर मी मोडून टाकेन, संपवून टाकेन, मारून टाकेन, कुचकरून टाकेन, विद्रुप करेन असे विचार अन त्यातून निर्माण होणारी कृती म्हणजे निव्वळ दूषित विचार, विकृत मनोवृत्तीच लक्षण आहे. संस्कारातलं न्यून आहे. ही प्रेमभावना नाहीच ही अहंभावना आहे. कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आपण नकळत मान्य केलेलं असत तेव्हाच ते प्रेम स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचाही अधिकार दुसऱ्या व्यक्तीला असतो हे साहजिकच आहे. हे पचवता येणार नसेल तर तो माणूस नाहीच तो केवळ सैतान. हे सारे थांबवायचे असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी सहजीवनाचे, समान हक्काचे संस्कार पुढल्या पिढीत रुजवणे गरजेचे आहे. पुढल्या पिढीमध्ये पोषक मैत्रीचे अन निस्वार्थ प्रेमाचे बीज पेरणे गरजेचे आहे पण त्याहून गरजेचे आहे त्यांच्यात स्त्री-पुरुष नात्यातला मान राखून निर्माण होणाऱ्या संवेदनांचा स्वीकार करण. या सगळ्यासाठी आवश्यक आहे माणसात माणूसपणाच्या जनुकांची ओळख पटवून देण्याची. ती पुढल्या पिढीत रुजवायची असेल तर ती तुमच्या आमच्यात आता असायला हवीय ना ?? मृत्यूच्या दारात तडफडणाऱ्या आपल्याच सारख्या एखाद्या जीवाला आपण ताटकळत तसेच टाकून निघून जात असू तर आपणच गमावत चाललेल्या संवेदना पुढल्या पिढीत पेरायच्या कश्या ??
विचार करायला हवा ... नाही ??



 (दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीत बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत दि. २०/०७/२०१६ रोजी प्रकाशित झालेला लेख )
http://epaper3.esakal.com/20Jul2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm 

Thursday, 30 June 2016

शिंग फुंकिले रणी

हिला आंदोलन म्हंटले कि डोळ्यासमोर चितारते ती संघर्ष करणारी, विरोध करीत धरणे देणारी, निदर्शने, उपोषण करणारी महिला. खरेतर रोजच्या जीवनातही  प्रत्येकीचा वेगळा लढा सुरु असतो. आयुष्यभर तगमग करत जगण्याचा संघर्ष सुरूच असतो: पण त्यासाठी ती आंदोलने करीत नाही. धरणे देत नाही किंवा निदर्शनेही करीत नाही, म्हणून बरेचदा तिचा आक्रोश चौकटीपार पोचत नाही. 'जीवना हि तुझी मिजास किती' असे म्हणत सहन करत ती जगत राहते. अशी हि जगातील निम्म्या लोकसंख्येची शोकांतिका. पण आता जग बदलाची नांदी होऊ घातली आहे. एकीकडे भ्रूणहत्या, हुंडाबळी, बलात्कारासारख्या समस्या ..महिलांच्या जगण्याच्या अधिकारावरही प्रश्न निर्माण करणाऱ्या, वर्चस्व गाजवणाऱ्या... नरविविक्षित समाजातील अनेक विकृतींना तोंड देतांना तिला सोसाव्या लागलेल्या वेदना, करावा लागणार संघर्ष आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत लढतांना होणारी घालमेल. अश्या अनेक नकारात्मक बाबी ... त्यासाठी निर्माण केलेले नकारात्मक वातावरण... तर दुसरीकडे महिलांच्या तंबूत आता सकारात्मक निर्णयक्षमतेचे, सर्वक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन मिळालेल्या यशाचे, शिक्षणाने आलेल्या ज्ञानातून प्रगल्भ वैचारिक अभिव्यक्तीचे वारे वाहू लागले आहेत. तिला तिच्या अधिकारांची जाणीव होऊन ते मिळवण्यासाठी जरा डगमगतच पण स्वेच्छेने ती लढते आहे. स्वतःसाठी कणखरपणे उभी राहते आहे. समाजात त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. हि जमेचीच तर बाजू आहे.

मागल्या वर्षीपासून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा प्रस्थापित रूढींवरचा एल्गार गाजतोय. शनिशिंगणापूर, शबरीमाला, हाजीअली दर्गाह अश्या अनेक धार्मिकस्थळी महिलांना विनाअट प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन छेडले आणि सगळीकडे वाद-विवादाचे पडसाद उमटले. हा विवाद सुरु असतानाच राजस्थानच्या दोन मुस्लिम महिलांनी त्या प्रदेशातील पहिल्या 'महिला काझी' असल्याचा दावा केला आणि उलेमांमध्ये विरोधाचा धुराळा पेटवून दिला. जहाँ आरा आणि अफरोज नावाच्या या दोन महिला मुंबईहून दोन वर्षांचे 'काझी' संबंधीचे प्रशिक्षण घेऊन आल्यात आणि आता त्यांना निकाह, तलाक, मेहेर यांसारख्या परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी अधिकार हवे आहेत.

भारतीय मुस्लिम समाजाचा परंपरागत चेहेरा आता बदलताना दिसतो आहे.  या समाजातील महिलाही त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात झालेल्या एका राष्ट्रस्तरीय बैठकीत. हि बैठक भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बैठक होती. मुस्लिम महिलांचे असे पडद्याबाहेर येऊन उघड उघड संघटन प्रस्थापित करण्याची हि पहिलीच वेळ होती. देशभरातील सुमारे ३० मुस्लिम महिला प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होत्या. विविध राज्यांमधून या बैठकीला पाठिंबा मिळाला आणि आजमितीस त्याची सदस्य संख्या वेगाने वाढते आहे. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली.
यानंतर या संघटनेने घडवून आणलेले काही बदल दखलपात्र ठरले.

> मुस्लिम महिला आंदोलनानंतर राजस्थानमधील ५ हजार मदरसे सांभाळण्याची जबाबदारी पहिल्यांदाच मदर्स बोर्डच्या चेअरपर्सन मेहरुन्निसा टांकयांना देण्यात आली.
> वक्फ बोर्डात पहिल्यांदाच एमएलए नसीम नावाच्या मुस्लिम महिलेला सामील करण्यात आले. मुस्लिम कायदेविषयक संशोधन करतांना कमिटीत निदान दोन महिला सदस्य असणे अनिर्वार्य असल्याचा नियम पहिल्यांदाच पारित झाला.
>  भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सदस्यांनी एकमताने महिलांच्या अधिकारासाठी मसुदा तयार केलाय, त्याला कायदेशीर दर्जा देण्यासाठी मुस्लिम महिलांची मोहीम अजूनही चालू आहे.
> याच संघटनेने हल्लीच देशभर मोहीम राबवली. तीन तलाक कायद्याविरुद्ध ४,७१० मुस्लिम महिलांची मत नोंदणी केली. या मोहिमेद्वारे 'मुस्लिम पर्सनल लॉ' मध्ये सुधारणा करण्यासाठी संघटना प्रयत्नरत आहे. याचे पडसाद संपूर्ण देशात पसरून त्यांच्या हक्कांबद्दल आता खुल्या व्यासपीठांवर चर्चा होऊ लागली आहे.


भारतीय मुस्लिम स्त्रीचा लढा असूदेत किंवा देशभरातील कुठल्याही धर्म-पंथातील महिलेचा : एक लक्षात घेणे आवश्यक आहे कि, हा लढा पुरुषांविरुद्धचा नाही, प्रथा-परंपरांविरुद्धही नाही. तिचा लढा बुरखा आणि तलाक यांच्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा जपण्याचा देखील आहे. आज संघटित झालेल्या महिला एकजुटीने कार्य करीत प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होतांना दिसताहेत. आत्मविश्वासाने याच समाजात स्वाभिमानाच्या पाऊलखुणा उमटवत अनेक यशोगाथा साकारताहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक टप्प्यांवर स्त्रियांच्या प्रश्नांचा पुनर्विचार होऊन त्यावर सारासार चर्चा घडून समाजमनही बदलू लागले आहे, हीच पुढल्या पिढीसाठी सुखाची नांदी आहे. प्रत्येक जीवितांना सामान अधिकार असणाऱ्या आदर्श समाजाची स्वप्ने पाहणाऱ्या नागरिकांसाठी हि समाधानाची बाब आहे.




(नागपूरच्या दैनिक सकाळ मध्ये दर बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत प्रकाशित झालेला लेख)

Wednesday, 29 June 2016

मेरे घर आना जिंदगी ...




तो उपाशीच निघून गेलाय म्हणून दिवसभर तिचं मन लागलं नाही. आपण फार दुखावलं त्याला विचार करून तिच्या मेंदूचा भुगा झाला होता.

तिची संध्याकाळही तशीच धुरकट होत गेली. अक्ख्खा दिवस ओघळता गेला बाहेर आकाशी मेघ दाटलेले अन इकडे मनात मळभ, डोळ्यात ओल साठली राहिली दिवसभर. अश्रूंचा पाऊस कोसळत राहिला. कालरात्री त्याचं अन तिचं असं भांडण झालं. तो सकाळी न बोलताच निघून गेला. निघून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली. त्यानं एकदाही पाठी वळून पाहिलं नाही. 'रात्रभर माझी अवस्था काय झाली असेल ह्याच्याशी ह्याला कसलेही देणेघेणे नाही' तिला हुंदका आवरला नाही अन मग सगळंच ओसंडून वाहू लागलं. 'माझ्या भावनांची किंमतच नाही याच्या लेखी' तिला पुन्हा भळभळून आले.

काल प्रसंगच तसा घडला होता ..

त्याला आवडते म्हणून कित्तेक दिवसांनी तिने हातभर मेहेंदी लावली होती. स्वतःच्या हातांकडे अन त्या गडद रंगलेल्या मेहेंदीने खुललेल्या सौंदर्यास बघून तिलाच कसलं अप्रूप वाटत होतं. सकाळी ती कुठली कुठली कारणे शोधून त्याच्या पुढे पुढे करत राहिली पण तो त्याच्या टॅबमध्ये तोंड खुपसून बसलेला. कामात प्रचंड मश्गुल झालेला.
मग तिने शक्कल लढवली. .. तिला मोगरा आठवला ...

मोगरा त्याला कित्ती आवडायचा... लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातले ते मोहमयी गंधाळलेले दिवस आठवले. तिच्या लांब केसांत माळलेला मोगरा पाहून तो वेडावून जायचा. कित्तेक वेळ तिच्या जवळ जवळ करत असायचा, तिच्या केसात मान घालून मोगऱ्याच्या गंधान धुंद व्हायचा .... तिला आठवलं, चेहेऱ्यावर खट्याळ स्मित आलं. धावत अंगणात जाऊन ओंजळभर मोगऱ्याची फुले ती घेऊन आली. छनछन करत आत येऊन त्याच्या पुढ्यात उभी झाली अन मेहेंदीने रंगलेली मोगऱ्याची ओंजळ त्याच्या पुढ्यात धरली. त्याने वर न बघताच त्यातली दोन फुले वेचली, नाकाशी नेली हुंगली अन पुढ्यात ठेवलेल्या टी-पॉयवर ठेवून दिली. ती
फारच हिरमुसली, उदास झाली. मेहेंदी भरल्या हाताकडे कटाक्ष टाकला आणि वळून जायला लागली तेवढ्यात त्याने आवाज दिला.
'मने'

'आह्ह ! त्यानं बघितलंय'

तिच्या गालात हसू खुललं.‌. ती वळली ...

तो म्हणाला

"अगं ऐक ना, आपली आता यावेळची ही २५ लाखांची बिजनेस डील पूर्ण झाली ना की आपण मोठी गाडी घेऊया मस्त प्रशस्त आपल्या स्टेटसला शोभेल अशी...त्याचेच फोटो बघतोय .. कसली साली सुंदर कार आहे बघ .."

तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं... त्याच्या २५ लाखाच्या स्वप्नात तिचे २५ रुपयांचे सत्य विरून गेले होते. मनभर पसरलेला आनंद करपून निघाला होता आणि त्याला जाणीवही नव्हती. तिने टी-पॉयवर ठेवलेल्या फुलांना हाताने चुरगाळून फेकून दिले अन ती रडतच निघून गेली. अर्ध्यारात्री कधीतरी त्याने तिच्या अंगावर हात ठेवला अन तिचा बांधच फुटला.

"मला विकलं तर कित्ती पैसे मिळतील रे... तेवढ्या पैशात तुझ्या स्टेटसला शोभेल अशी कार येईल का?"

तिने ओघळत्या आसवासह प्रश्न केला अन तोही चिडलाच ..

"आता आता कुठे यश मिळायला लागलंय खुपतंय का ग तुला?? बघवत नाहीये का??"

तिला बोलले ते शब्द अन मग सारेच विस्कटले. संपूर्ण रात्र गडद अधिक गडद होत गेली.

******************************

ती तशी स्वप्नाळू. आयुष्याच्या लहान लहान गोष्टींमध्ये सुख शोधणारी. प्रेम हाच जगण्याचा आत्मा समजणारी. 'तो' म्हणजेच तिचं सारं विश्व. त्याच्यासोबत हातात हात घेऊन आली तेव्हा संसाराचे किती किती स्वप्न पाहिले होते तिने. राजाराणीचा संसार. त्यानं कमावून आणलेल्या चार आन्यातही संसार थाटू एक भाकरी मिळाली तरी वाटून खाऊ पण दोघात अंतर येता कामा नये. प्रेमात गळती होता नये. नंतरही कित्तेक अडचणी आल्या, संकट ठाण मांडून बसले पण तिचे सगळे वागणे सगळ्या क्रिया प्रतिक्रिया त्याच्यासाठीच असायच्या. त्याच्याच अवती-भवति तिचं आयुष्य फिरायचं. त्याचं मात्र वेगळं होतं. तिला मिळवायला जितकी धडपड त्याने केली होती ती मिळताच ती संपली. टार्गेट पूर्ण झाले होते. त्यानंतर त्याचा प्रवास सुरु झाला तो पैसा, प्रेस्टिज आणि प्रोग्रेस मागे धावण्याचा. पुढली सगळी धडपड मोठा माणूस होण्याची. त्याच्या मोठमोठ्या स्वप्नात तिची छोटी छोटी स्वप्न झाकोळली गेली. पण तरीही ती खुश होती, संसार सांभाळत जपत जगत होती. थोडा पैसा मिळाला कि संपेल आपली हि जगण्याची तगमग ती स्वतःला समजवायची. पण थोडा पैसा आला कि सुरु व्हायचा प्रवास दुसरे टार्गेट पूर्ण करण्याचा. त्याचा प्रवास श्रीमंतीकडे आणखी पुढे आणखी पुढे न संपणारा ....आणि तिचा प्रवास मात्र संपला होता ती थिजली होती जागीच त्याची वाट पाहण्यात. सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलेला नवरा येऊनही परत यायचाच नाही तो मनाने तिथेच असायचा कामाच्या भाउगर्दीत, पैशांच्या हिंदोळ्यावर झुले घेत. त्याच्याच आसपास वावरणारं तिचं अस्तित्व तर कित्तेकवेळा त्याला जाणवायचंही नाही. खरतर त्याच्या लेखी या सगळ्याचं महत्वही नव्हतच. तिच्या लेखी सुख पैशान मिळणार नव्हतच. ते तिथेच पडलं होतं घरात त्यांच्या शयनकक्षेच्या कोपऱ्यात खितपत.... दुर्लक्षित.

दाराची बेल वाजली तिची विचारांची तंद्री भंगली, अंधारलं होतं सगळीकडे.... 'बापरे, अक्खा दिवस असाच निघून गेलाय ...विचारात' तिने लगबगीने डोळे पुसले. दिवे लावले अन ती दार उघडायला धावली.. दाराजवळ जाउन उंच श्वास घेतला स्वतःला सावरलं अन दार उघडले .... पुढ्यात तो उभा होता तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघत, लाल झालेले डोळे त्याचीही अवस्था दिवसभर तिच्यासारखीच असल्याचे सांगत होते. तो सुखरूप होता न कळत तिच्या मनात समाधानाची कळ पसरली ... थोडं संकोचतच ती वळली अन आत आली. त्याच्यासाठी काहीतरी खायला करावं म्हणून स्वयंपाक घरात गेली. दोन पाच मिनिटे गेली असतील त्याचा स्पर्श जाणवला तिला. तिच्या लांब सडक केसांत तो मोगऱ्याचा गजरा माळत होता. तिचे डोळे भरून आले. त्याने तिला डायनिंगच्या खुर्चीवर बसवले. तिचे मेहेंदीने रंगलेले दोन्ही हात हातात घेतले. ते डोळ्याला लावले अन स्वतःचा चेहेरा त्या हातांनी झाकून घेत उर भरून श्वासात तो गंध भरून घेतला. ती हे सगळं अवाक होऊन बघत होती .... त्याने शेजारच्या खुर्चीतली पळसाची फुले उचलली अन तिच्या ओंजळीत ठेवली. पळसाची फुले बघताच तिचे सगळे अवसान गळून पडले. ती हमसून हमसून रडू लागली ......... हि पळसाची फुले तिच्या आवडीची. लग्नाआधी ती दोघं भेटायची त्या स्थळी असलेल्या एका झाडाला येणारी ..शहरापासून २५ किमी दूर असलेले. तो तिथे जाउन आलाय आपल्या विरहात तोही तितकाच व्याकूळ होता हे लक्षात आले तिच्या अन रडतच तिने मिठी मारली त्याला .... पळसाच्या केसरी रंगात गैरसमजाचे सगळे रंग उडून गेले होते. अन मोगऱ्यासारखी दोघांचीही मनं शुभ्र गंधमय होऊन फुलून आली होती ....

आणि तिच्या मनात अमृता प्रीतमच्या ओळी रुंजी घालू लागल्या

जिंदगी के उन अर्थो के नाम _ जो पेडों के पत्तों की तरह चुपचाप उगते हैं और झड जाते है!!!!
दूर कुठेतरी रेडिओ वाजत होता ....

मेरे घर आना ... आना जिंदगी .... जिंदगी

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण





'मन' तसे पाहिले तर छोटासा दोनाक्षरी शब्द. पण आयुष्याच्या आठवणी, कित्तेक घटना, कुठकुठली स्वप्नं, आणि कित्तेक गुपितं ते आपल्या इतकुश्या कुपीत दडवून ठेवत असतं. मन दिसत नाही पण असतं. मनाला स्पर्श करता येत नाही पण पाहिलेल्या अनुभवलेल्या कित्तेक गोष्टी मनाला स्पर्शून जातात. भावनेच्या आहारी जाऊन आपण चुकतो अनेकदा पण मनाला धारेवर धरता येत नाही. मन मात्र कधीही अन कुठेही आपल्याला चिमटीत धरू शकतो. म्हणूनच म्हणतात ना 'मन मनास उमजत नाही, काही केल्या समजत नाही' पण मनात आहे ते मिळवणं किंवा मनासारखे घडतांना बघणं किती आनंददायक असतं. म्हणजे मन हसतं, मन रुसत, मन खट्याळही असतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाला उद्देशून मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी मनाला अचपळ, नाठाळ, अनावर अशा किती प्रकारांनी संबोधले. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 'मन हे राम जाले'  म्हणजेच संत अन महापुरुषांनाही मनाचे माहात्म्य मान्यच होते. मानसोपचार आपल्याकडे फार महत्त्वाचे मानलेले आहेत. मानसपूजा खरी पूजा मानली जाते. मनासारखं वागावं, स्वच्छंदी मनानं जगावं हा आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन आहे. मन जिंकणे, मनीमानसी नसणे, अचपळ मन असे अनेक वाक्प्रचार रोजच्या बोलण्याचा भाग आहे.

असे हे मन नसतेच तर जगणे किती यंत्रयावत झाले असते ना. त्याला दुःख नसते, सुख नसते, आवडी निवडी नसत्या तर काय केले असते आपण? चंचलता हा मनाचा स्वभाव आहे़. वाऱ्या पेक्षाही वेगवान आणि पाऱ्यापेक्षाही धरायला कठीण असलेलं मन,  पण जगण्याचा खरा आत्मा आहे. तेव्हा त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. मनाचं स्वास्थ्य प्रत्येकाने जपलंच पाहिजे मनःस्वास्थ्य बिघडणं कुठल्याही इतर रोगांहून वाईट असतं. प्रत्येकाच्या मनःस्वास्थ्याशीच समाजस्वास्थ्य जुळलेले असते. समाजातील प्रत्येकाची सुदृढ मनःस्थिती ही सर्वोच्च महत्त्वाची आहे. त्यासाठी सकारात्मकता बाळगावी. आनंदी राहावे. आवडेल ते करावे. छंद जोपासावे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि हे करीत असतांना मार्गक्रमण करतांना त्या प्रवासाचाही आनंद घ्यावा.

रश्मी / २९/०६/२०१६


('दैनिक सकाळ' च्या 'मी' पुरवणीत प्रकाशित झालेला लेख )









Monday, 6 June 2016

पाव शतकाचा 'आक्रोश'




माणूस आपला आहे कि परका, मित्र आहे कि वैरी हा विषयच नसतो बरेचदा. तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेतला असेल तर तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी तुमची असते. तुमच्या पुढ्यात उभा असणारा पुरुष  तुमच्या कितीही विश्वासातला वाटत असला तरी त्याच्यातला नर कधी जागा होईल आणि तुम्ही मादी आहात म्हणून तो तुमच्यातल्या स्त्रीचा चुराडा करत माणुसकीला काळिमा फासेल याचा नेम नाही. नवं वर्षाच्या उत्सवात पुरुषांच्या घोळक्यात आब्रू वाचवत पळत सुटणाऱ्या मुली काय किंवा मोनिका घुरडे, आयआयटीएन स्वाथी किंवा पुण्यात इन्फोसिसच्या रसीलाची हत्या काय अशी अनेक उदाहरणे आपण रोज रोज बघत असतो. हल्लीच दिल्लीत झालेली घटना सगळ्यांच्याच स्मृतीपटलावर ताजी आहे. ओळखीच्या मुलाने घरी सोडून देण्याच्या निमित्ताने मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन स्वतःसकट इतर ४ मित्रांच्या हवाली केले. पहाटेच्या सुमारास तिने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली आणि घडली घटना पोलिसांना सांगितली. माध्यमांनी ती देशभर प्रसारित केली. अनेकदा जवळचा मित्रच 'ती' च्या परवानगी शिवाय तिच्यावर त्याच्या इच्छा थोपवतो, ती नाही म्हणत असतांनाही त्या पूर्ण करून घेतो. 'नाही म्हणजे नाहीच असतं, नाही शब्दाचा अर्थ नाही असाच होतो' याच अर्थाचा अमिताभ बच्चनचा 'पिंक' सिनेमा देखील 70MM वर आला आणि प्रचंड गाजला. पण आजही स्त्रीची मर्जी, तिची इच्छा तिची परवानगी हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय मानला जातच नाही. तिला सुदैवच गृहीत धरल्या जाते आहे. पण आज हा विषय जेव्हा महत्वाचा वाटून त्यावर चित्रपट बनताहेत किंवा चर्चा झडताहेत याची सुरुवात मात्र केटी नावाच्या युवतीने २५ वर्षांपूर्वीच केली होती. त्यासाठी तिला दीर्घकाळ लढा द्यावा लागला ...तिच्याच संघर्षाची हि कथा.

३ जून १९९१ हा दिवस विशेष दिवस म्हणून कायद्यात कोरला गेला त्याला कारण ठरली केटी कोएस्तनर नावाची १८ वर्षीय तरुणी. त्यावेळी केटी या नवंमहाविद्यालयीन विद्यार्थिनीचा फोटो 'टाईम्स' मासिकाच्या कवर पेजवर प्रसिद्ध झाला होता, हे पहिल्यांदाच घडले आणि संपूर्ण अमेरिकेत चर्चेला पेव फुटले. केटीवर बलात्कार झाला होता, तिला न्याय हवा होता इतकेच नाही तर त्यासाठी तिने स्वतःच एल्गार पुकारला होता. तिच्या समर्थकांच्या आणि त्याहून अधिक विरोधकांच्या फौजा तयार झाल्या. प्रचंड उहापोह, कोलाहल ... आणि पहिल्यांदाच 'डेट रेप' संकल्पना अस्तित्वात आली.

केटी प्रथमच कॉलेजला जायला लागली होती. पहिल्या काही दिवसातच तिची भेट आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एका तरुणाशी झाली, हळूहळू ओळख मैत्रीत बदलली. एका रात्री कॉलेज पिकनिकच्या दरम्यान रात्री जेवणानंतर वेळ घालवण्यासाठी केटी अन तो तरुण रूममध्ये एकटे गाणी ऐकून डान्स करीत असतांना त्याने तिच्यावर बळजबरी केली. केटीने विरोध करूनही तो केटीला समजावण्याचा अन शांत करण्याचा, मनावण्याचा प्रयत्न करीत राहिला, आणि शेवटी तिचा नकार न जुमानता केटीचा बलात्कार झाला. या घटनेला आज २५ वर्ष झाली.  या प्रसंगाची आठवण करतांना हळवी होत केटी म्हणते ''लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी मी जे सुंदर स्वप्न मनःपटलावर जपून ठेवले होते त्याचा त्या हॉटेलच्या खोलीतल्या जमिनीवरच्या गुलाबी कार्पेटवर चुराडा झाला होता. माझ्या शरीरासकट माझ्या भावनांचा, आत्म्याचाही बलात्कार झाला होता'

केटी लगेच दुसऱ्या दिवशी हेल्थ सेंटरला गेली पण तिच्यावर घडलेला प्रसंग ऐकूनही तिला निव्वळ झोपेच्या गोळ्या देऊन परत पाठवले गेले. तिथल्या अधिकाऱ्यांना-डॉक्टरांना तिने पुनर्विचाराचा सल्ला दिला पण सर्व व्यर्थ. तिच्या वडिलांनीही तिलाच दोष दिला ''तू एकट्या मुलासह त्या खोलीत गेली नसतीस तर तुझ्याबरोबर असं वाईट कृत्य कधीच झालं नसतं'' वडिलांचे हे शब्द तिच्या मनावर अधिक घाव करून गेले....आपल्याला हा लढा एकटीने लढावं लागणार आहे याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. मात्र तिने हार मानली नाही, न्यायालयातही तिच्यावरच ताशेरे ओढले गेले, लाजिरवाणे आरोप झाले. ''बळजबरी होत असतांना त्याला पूर्ण ताकदिनीशी विरोध करून बलात्काऱ्यास थांबवायला हवे होते असे बिनबुडाचे सल्ले तिला भर कोर्टात देण्यात आले. तिच्या मागणीवर क्रिया करून तिच्या बलात्काऱ्यास कॉलेजच्या त्या सत्रासाठी बेदखल करण्याआधी तिच्या महाविद्यालयाने तिला तिच्या आरोपीशी सौहार्दाने घेऊन जुळवून घेण्याचा हास्यास्पद सल्ला देखील दिला. केटीसाठी हे सगळंच खूप मनःस्ताप देणारे होते. तिच्यावर झालेल्या अन्यायापेक्षाही बलात्काऱ्याबद्दल सगळ्यांना माया दाटून येते आहे आणि उलट तिलाच चुकीचे ठरवले जाते आहे हे तिच्या त्यावेळच्या कोवळ्या वयातल्या आकलनशक्तीच्या आणि सहनशक्तीच्याही पलीकडचे होते.

शेवटचा उपाय म्हणून अंततः केटीने लोकल वृत्तपत्रांना पत्र लिहिली आणि महाविद्यालयीन कॅम्पस मधून आंदोलनं सुरु केली. तिची बातमी हळूहळू राज्यस्तरीय मुद्दा ठरू लागली, माध्यमातून बुद्धिवंतांच्या चर्चा झडू लागल्या. पण त्यातल्या बऱ्याच या केटीच्याच विरोधातल्या होत्या. तरुण वर्गातही तिचेच विरोधक जास्त होते विरोधाची सीमा म्हणजे जवळ जवळ २००० विद्यार्थ्यांनी केटी विरुद्ध याचिका दायर केली. त्या सर्वांनी केटी खोटं बोलत असल्याचे याचिकेत म्हंटले होते. पुढे तिचा लढा अधिक तीव्रतेने चालत राहिला. पुढे तिचे म्हणणे, तिचा संघर्ष लोकांना हळूहळू कळू लागला. केटीने पुन्हा एकदा अमेरिकन लोकांचा विश्वास संपादन केला होता.

 या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. केटीच्या या पहिल्या-वहिल्या ''डेट रेप'' केस नंतर अश्या घटनेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आज केटी बलात्काराने पिडीत महिलांसाठी समुपदेशनाचे कार्य करीत आहे आणि जनजागृती करत गरजूंसाठी मोफत वकिलीही करते आहे. ती म्हणते ' महिलेच्या परवानगीशिवाय तिच्या इच्छेविरुद्ध केलेले शरीरसंबंध बलात्कारच आहेत. तिच्या मर्जीचा, तिच्या भावनेचा मान राखलाच जायला हवा.'' केटीने जे काही भोगलंय ते पुढे कधीही इतर कुठल्या स्त्रीला भोगावे लागू नये म्हणून केटीचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत.

   

रश्मी पदवाड मदनकर / 06 jun 2016 

(१५ जून २०१६ ला  'सकाळ' च्या ''मी'' पुरवणीत प्रकाशित )

Saturday, 21 May 2016

पाटीवरचा हक्क ..!



महिलांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाले कि भरून बोलता येतं. पण तेच त्यांच्या अधिकारांचा प्रश्न उद्भवला कि तो प्रश्नच म्हणून शिल्लक राहतो. प्रश्न वारसाहक्काचा असुदेत किंवा वडिलांच्या संपत्तीची हिस्से वाटणी, तिच्या वाट्याला येते पुन्हा तेच ती 'स्त्री' असण्याचा शिक्का अगदी साऱ्यांच्या सही सकट. जन्म घातलेल्या मुलाला तिच्या नावाची कुठलीच ओळख नसते. वडलांच्या घरात तिचे काहीच शिल्लक उरत नाहीच पण मग जन्मभरासाठी ज्याच्याकडे ती आली असते त्याच्याकडेही तिची स्वतःची अशी विशेष ओळख नसते... हा सर्वत्र वादाचा मुद्दा असताना, विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातील तानिष्कांनी मात्र निव्वळ वाद घालत न बसता. जिल्ह्यापुरता का होईना परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना भरघोस यश देखील मिळाले. तानिष्कांनी स्त्री म्हणून स्त्रियांना स्त्रियांच्या अधिकारांची जाणीव करून दिली त्यासाठी जनजागृती केली. प्रत्यक्ष कार्य घडवून आणले आणि त्यांचे नवे स्थान नवा मान त्यांना मिळवून दिला.


विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण. नक्सलग्रस्त भागापासून थोड्याच अंतरावर वसलेले विकसनशील छोटेखानी शहरवजा गाव. दोन वर्षांपूर्वी २० महिला सकाळ मध्यम समूहाच्या ''तनिष्का'' व्यासपीठात सहभागी झाल्या आणि बघता बघता मुख्य अडचणींना वाचा फुटू लागली. विकासाच्या दिशेने वारे वाहत असताना ह्याच कामात तानिष्कांचा सिंहाचा वाटा ठरला. इंद्रायणी कापगते या गटनेत्या पुढे सरसावल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनात गटाद्वारे अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. इंद्रायणीताई तश्या लढवैय्या, महिलांच्या अडचणींसाठी सतत कार्यशील राहणाऱ्या. महिलांच्या हक्कासाठी काम करायचे ठरले आणि गटाला सोबत घेऊन त्यांनी रणशिंग फुंकले.

जमिनीच्या कागदपत्रांवर महिलांचे नाव देखील असावे आणि त्यांच्या सहीशिवाय जमिनीचा व्यवहार होणार नाही हा मुख्य मुद्दा घेऊन गटाने काम सुरु केले. ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते घराच्या दारावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाटीवरही घरातल्या स्त्रीचे नाव असावे त्या घराशी सलग्न अशी तिची ओळख असावी हा त्यामागचा मुख्य हेतू होता. ग्रामसेवकापासून ते कलेक्टर आणि पुढे पंतप्रधान कार्यालयापर्यंत धाव घेऊन तानिष्कांनी कार्य सिद्धीस नेले.


आज साकोली तालुक्यासह जिल्ह्यातील बव्हंशी गावातील प्रत्येक दारावर घरातील कर्त्या पुरुषांबरोबरच त्या घरातील स्त्रीचे नाव देखील चढले आहे. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते जमीन क्रय-विक्रयाच्या कागदपत्रांवर तिच्या सहीशिवाय व्यवहार केले जात नाही. आता ७/१२ वर स्त्रीचे नावही आवश्यक पात्रतेपैकी एक आहे.

साकोलीतील तनिष्कांच्या या अभूतपूर्व यशाची परिणीती म्हणून '२०१५ तनिष्का महोत्सवात' मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कामाची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी बघता आज साकोली तालुक्यात ४ गट जवळजवळ ४० तनिष्का एकजुटीने कार्यरत आहेत. आणि अनेक चांगल्या उपक्रमांच्या यशाच्या भागीदार होण्यास प्रयत्नरत आहेत. .........................................................................................

-: कोट :-

जमीन व्यवहार पत्रांवर महिलांचे नाव असावे हा संपत्तीचा मुद्दा नव्हता, व्यसनात अडकलेल्या घरच्या पुरुषांच्या हातून व्यसनासाठी जमिनीची नासधूस होऊ नये किंवा ती होतांना निदान तिला त्याची माहिती असावी अशी साधीच अपेक्षा यामागे आहे. आज महिलांना तो मानच मिळाला नाही तर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव देखील त्या निमित्त्याने झाली.

इंद्रायणी कापगते
गटनेत्या, साकोली तनिष्का व्यासपीठ



(सकाळ दैनिकात प्रकाशित बातमी )

Sunday, 24 April 2016

लाडका सोनचाफा ..

एकेक क्षण महत्वाचा असतो पण एखादा क्षण किती खास असतो ना ?


आज ऑफिस मध्ये मोठ्या बहिणीसारख्या असलेल्या एका जवळच्या मैत्रिणीने तिच्यासाठी नवऱ्याने मुंबईहून खास आणलेल्या फुलांतून माझ्यासाठी निवडून जपून आणलेला 'सोनचाफा' हातात दिला आणि काय सांगू काय वाटलं....

सोनचाफा .. अतिशय आवडतं फुल . म्हणतात हे स्वर्गीय फुल आहे. देवांच लाडकं… 
सोनचाफ्याशी काही आठवणी निगडीत आहेत. मुंबईच्या...
मला आठवतं, तशी सोनचाफ्याशी माझी ओळख फारशी नव्हतीच. त्याचं कारणही तसं होतं. नागपुरात हा फारसा दिसतंच नाही. चाफ्याचे सगळे प्रकार आढळतात पण सोनचाफा क़्वचितच दिसतो....तर मुंबईत सोनचाफ्याची ओळख तेव्हाच्या तिथल्या ऑफिसातल्या एका मैत्रिणीने दादरच्या स्वामींच्या देवळात दर्शनाला जातांना करून दिली आणि मी वेडावून प्रेमातच पडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा दिसला तो ओंजळीत भरून घेऊन तासंतास त्या सुगंधानं तल्लीन होऊन तादात्म पावत राहिले. सोनचाफा स्वामींच्या पायाशी वाहिल्यावरही हाताला त्याचा मंद सुगंध घट्ट धरून असायचा. त्या हातांना लाभलेला तो सात्विक स्पर्श अन जीव प्रसन्न करणारा सुगंध इतका हवाहवा वाटायचा कि त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा विकत घेतला तो देणाऱ्या मावशीला कागदात किंवा पानात बांधून न देता हाताच्या ओंजळीतच मागितला. तो ओंजळीत घेऊन हळुवार हाताळायचा उरभरून सुगंध घेतांना चाफ्याला इजा होऊ नये हेही जपायचं, त्याचा सोनेरी ईश्वरी रंग उतरतांना, तो कोमेजतांना बघवणार नाही अन कचऱ्यातही टाकवणार नाही हे माहिती असल्यानेच नंतर तो स्वामींच्या पायाशी समर्पित करायचा. मी सोनचाफा अन स्वामी हे अगनिताचे गणित जुळत गेले. पुढे कित्तेक वर्ष सोनचाफ्याशी हे असं भावनिक नातं अधिक घट्ट होत गेलं.

मुंबई सोडली आणि चाफ्याशी भेट अशक्यप्रायच झाली. तरीही मी शोधत असायचे, मधल्या काळात एका पानावरील लेखासंबंधी माहिती हवी म्हणून लीलाताई चितळेंना भेटायला गेले. त्यांच्या अंगणात असलेले कुठलेसे अनोळखी अतिशय सुंदर फुलांचे प्रचंड मोठे झाड पाहिले. अंगणात फुलांची पखरण आणि वातावरणात भारलेला मंद सुगंध. पुन्हा सोनचाफ्याची आठवण ताजी करून गेला. त्या झाडाबद्दल विचारले आणि लीलाताईही भूतकाळात रमत उत्साहात सांगू लागल्या, गोड योगायोग म्हणजे या झाडाच्या जन्माच्या कहाणीत सोनचाफ्याशी संबंध होताच हे विशेष. लीलाताईंनी हे झाड मुंबईहून 'सोनचाफा' समजूनच आणले होते. सोनचाफा समजूनच जपले-जगवले. झाड मोठे झाल्यावर पहिले फुल आले तेव्हा कळाले हा सोनचाफा नाही. फुलाच्या आत पराग असतात तिथे छोटी महादेवाची पिंड असावी तसा आकार अन वरून शेषनाग असतो तश्या पाकळ्या असणारे हे अतिशय सुंदर दिसणारे पांढरे गुलाबी फुल होते. मी माहिती काढली तेव्हा कळाले ते कैलासपती उर्फ कॅननबॉल होते. सोनचाफ्याहून सुंदर सुगंधी. पण ..... पण सोनचाफा नव्हताच.




















तर असे अनेक वर्षात न भेटलेला सोनचाफा माझा किती लाड्का आहे हे जाणल्यावर आपल्या एखाद्या मैत्रिणीने ते लक्षात ठेवून विशेष मिळालेल्या भेटीतून न विसरता निवडून जपून आपल्यासाठी आणावा .. अन ते बघून आपल्या आनंदात आनंद मानावा हे असे क्षण अन हि अशी माणसं नशिबानेच भेटतात.. नाही??

 स्वाती ताई यासाठी मी आभार मानणार नाही. हे गोड सुगंधी ऋण असू दे माझ्यावर कायम.

का क्षणाला हजारो पानं फुटण्यापेक्षा
एकेका पानानं हजारो क्षण जगावेत
पण प्रत्येक क्षण निखळ असावा.....फक्त त्याचा तोच
मग त्याच्याशी नातं सहज जुळतं...
क्षणाचं...जगण्याचं....क्षणाच्या जगण्याचं.....जगण्याच्या क्षणाचं.....
मग सुंदर असणं होत जातं.



रश्मी
२२ एप्रिल १६

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...