काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचानक, अकस्मात; आणि मग सगळंच अडकून राहतं अधांतरी. शब्द अर्धवट राहतात, संवाद मध्येच तुटतात, नाती अचानक संपतात, काही प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत आणि काही माणसं कारण न सांगता निघून जातात. परिस्थिती उद्भवते.. निवळून जाते, पण अपूर्ण राहिलेल्या गोष्टी काळाच्या पलीकडेही आपला पाठलाग करत राहतात.

आपण पुढे चालत राहतो, जगत राहतो, हसतही राहतो… पण आत कुठेतरी एक अधांतरी जागा कायम उघडी राहते.अंतिम स्पष्टता किती आवश्यक असते याचा अंदाज सहज लावता येत नाही. त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ आसपास रेंगाळत राहतात.
क्लोजर मिळालेल्या गोष्टी मात्र शांतपणे पुढे निघून जातात. एखादं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं. त्यांची वेदना, त्यांचं अस्तित्व संपत नाही कदाचित… पण त्यांचं ओझं राहत नाही. त्या विस्मृतीत जात नाहीत, पण त्या स्मृतींना छळतही नाहीत.
पण क्लोजर न मिळालेल्या, कधीच पूर्ण न झालेल्या गोष्टी वेगळ्याच असतात. त्या मनात, विचारांत, आठवणींत भटकत राहतात. तुकड्यांत. विखुरलेल्या. कधी एखाद्या गाण्यातून समोर येतात, कधी एखाद्या रस्त्यावर अचानक भेटतात, तर कधी कुठल्यातरी माणसाच्या एखाद्या वाक्यातून पुन्हा जिवंत होतात.
पृथ्वी गोल आहे म्हणतात… माणसं, क्षण, प्रश्न, नाती आणि अपूर्ण गोष्टीही कदाचित तशाच असाव्यात. वर्तुळात फिरत कधीतरी त्या पुन्हा आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. आणि तेव्हा त्यांना टाळता येत नाही. मग तोंड द्यावंच लागतं. उर्वरित हिशेब मांडावे लागतात. अनुत्तरीत उत्तरं शोधावी लागतात. कधी कुणाला माफ करावं लागतं, धरून ठेवलेलं सोडून द्यावं लागतं किंवा नाकारलेलं स्वीकारावं लागतं. पूर्णविराम आवश्यक असतो. कारण अर्धवट राहिलेल्या गोष्टी सहज शांत बसत नाहीत. त्यांना पूर्णत्व हवं असतं. त्या सतत प्रयत्न करत राहतात आपल्या आत, आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा परत येत राहतात.. जोपर्यंत त्यांना त्यांचा शेवट मिळत नाही.
क्लोजर म्हणजे विसरणं नाही. क्लोजर म्हणजे स्वीकार. जे झालं ते मान्य करून त्या गोष्टींना मनातून मुक्त करणं. म्हणून कदाचित गोष्टी अर्धवट सोडू नयेत. जे बोलायचं आहे ते बोलून टाकावं. जे संपलं आहे त्याला प्रामाणिक शेवट द्यावा, आणि जे दुखलं आहे ते स्वतःपाशी तरी मान्य करावं. कारण अर्धवट गोष्टी शेवटपर्यंत अर्धवट राहत नाहीत… त्या कधीतरी, कुठल्यातरी वळणावर पुन्हा समोर येतातच, स्वतःला पूर्ण करून घेण्यासाठी.

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय