इन्फोसिसमध्ये
काम करणारी आयआयटीयन स्वाथीची
ही हृदय पिळवटून टाकणारी घटना.
हल्लीच चेन्नईच्या
सर्व चॅनलची ब्रेकिंग ठरलेली
बातमी. बातमी कळली
तेव्हा तुमच्या माझ्यासकट
सगळेच हळहळले. अनेकांनी
आंदोलनही केले. मेणबत्ती
घेऊन कित्येकांनी रॅली काढली.
न्यूज चॅनलवर चर्चा
सत्र झडले. वाद-विवाद
झाले. आरोप-प्रत्यारोप
झाले आकांड तांडवही संपले.
पण हे सर्व घटना घडून
गेल्यानंतर घटनाबाह्य लोकांनी
केले होते. प्रश्न
असा उद्भवतो की त्यावेळी त्या
तिथल्या उपस्थितांचे काय
झाले?? ती का नाही
सरसावली मदतीला? त्यावेळी
ते तिथे नसते तर तीही पुढे या
आंदोलनात सामील झाली असती
का? किंवा आज आंदोलन
करतायेत ती लोक प्रत्यक्ष
तिथे असती तर धावली असती का
मदतीला ??
याच वर्षी
मार्च महिन्यात एकतर्फी
प्रेमातून १४ वर्षीय व्हॉलीबॉल
खेळाडूची कोलकात्याच्या
बारासात भागात मैदानावरच
तिच्या तथाकथित प्रेमीने
हत्या केली. आरोपीने
सर्वांदेखत चाकूने घाव करून
असेच तिला भर मैदानात रक्ताच्या
थारोळ्यात मरत सोडून दिले.
एका उगवत्या खेळाडूचे
आयुष्य संपले. एप्रिल
महिन्यात मुंबई प्रभादेवीला
एकतर्फी प्रेमातून मुलीची
हत्या, जून महिन्यात
तेलंगणमधील अदिलाबाद जिल्ह्यामध्ये
17 वर्षांच्या एका
मुलीचा भरदिवसा तिच्या घरासमोरच
गळा चिरला...भंडारा,
गोंदिया, ठाणे,
उल्हास नगर किती किती
आणि कुठे कुठे ?? केवळ
नकार पचवता आला नाही म्हणून
जीवावर उठणाऱ्या या सडकछाप
मजनूंच्या दिलजले प्रेमाचं
आणखी किती मुलींनी शिकार
व्हायचं?
प्रेम
किती अलवार अलगद, येणाऱ्या
अनुभूती साठवण्याची अन निव्वळ
त्या आठवणींवर आयुष्य कंठण्याची
सुरेल सुंदर भावना असते.
ज्यावर प्रेम केलंय
त्या व्यक्तीच्या मर्जीचे
तिच्या भावनांचे भान राखून
तिला जिंकण्याच्या प्रयत्नात
आयुष्य घालविण्याची सुखद
प्रक्रिया असते. खरतर
प्रेम मनात जन्म घेते त्या
क्षणापासून माणसाने हळवे
व्हायला हवे त्याच्यात संवेदना
जागृत व्हायला हव्या. प्रेम
ही भावनाच माणसाला हलवणारी,
फुलवणारी, प्रेरणा
देणारी, त्याच्या
मनात जगण्याविषयीची कोवळीक
निर्माण करणारी असते. प्रेमात
माणूस क्रूर, राक्षसी
कसा होतो, विद्रुप
सैतानी खेळ तो खेळूच कसा शकतो
हा प्रत्येक संवेदनशील मनाला
छळणारा प्रश्न आहे.
खरतर प्रेम
ही देण्या-घेण्याची
चीजवस्तू नाहीचेय. मालकी
हक्क गाजवण्याची किंवा मला
हवय ते मिळायलाच हवं असा आग्रह
धरणे, मला मिळणार
नसेल तर इतर कुणालाही मिळू
देणार नाही असे विचार, मग
तो माणूस असो किंवा वस्तू माझी
नसेल तर मी मोडून टाकेन,
संपवून टाकेन, मारून
टाकेन, कुचकरून
टाकेन, विद्रुप
करेन असे विचार अन त्यातून
निर्माण होणारी कृती म्हणजे
निव्वळ दूषित विचार, विकृत
मनोवृत्तीच लक्षण आहे.
संस्कारातलं न्यून
आहे. ही प्रेमभावना
नाहीच ही अहंभावना आहे.
कोणत्याही व्यक्तीवर
प्रेम करण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य
आपण नकळत मान्य केलेलं असत
तेव्हाच ते प्रेम स्वीकारण्याचा
अथवा नाकारण्याचाही अधिकार
दुसऱ्या व्यक्तीला असतो हे
साहजिकच आहे. हे
पचवता येणार नसेल तर तो माणूस
नाहीच तो केवळ सैतान. हे
सारे थांबवायचे असेल तर तुम्ही
आम्ही सर्वांनी सहजीवनाचे,
समान हक्काचे संस्कार
पुढल्या पिढीत रुजवणे गरजेचे
आहे. पुढल्या पिढीमध्ये
पोषक मैत्रीचे अन निस्वार्थ
प्रेमाचे बीज पेरणे गरजेचे
आहे पण त्याहून गरजेचे आहे
त्यांच्यात स्त्री-पुरुष
नात्यातला मान राखून निर्माण
होणाऱ्या संवेदनांचा स्वीकार
करण. या सगळ्यासाठी
आवश्यक आहे माणसात माणूसपणाच्या
जनुकांची ओळख पटवून देण्याची.
ती पुढल्या पिढीत
रुजवायची असेल तर ती तुमच्या
आमच्यात आता असायला हवीय ना
?? मृत्यूच्या दारात
तडफडणाऱ्या आपल्याच सारख्या
एखाद्या जीवाला आपण ताटकळत
तसेच टाकून निघून जात असू तर
आपणच गमावत चाललेल्या संवेदना
पुढल्या पिढीत पेरायच्या
कश्या ??
विचार
करायला हवा ... नाही
??
(दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीत बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत दि. २०/०७/२०१६ रोजी प्रकाशित झालेला लेख )
http://epaper3.esakal.com/20Jul2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm
(दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीत बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत दि. २०/०७/२०१६ रोजी प्रकाशित झालेला लेख )
http://epaper3.esakal.com/20Jul2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm
खूप मर्मस्पर्शी लिहिलंय, लिहीत राहा
ReplyDeleteThank u so much :)
ReplyDelete