Monday 6 June 2016

पाव शतकाचा 'आक्रोश'




माणूस आपला आहे कि परका, मित्र आहे कि वैरी हा विषयच नसतो बरेचदा. तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेतला असेल तर तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी तुमची असते. तुमच्या पुढ्यात उभा असणारा पुरुष  तुमच्या कितीही विश्वासातला वाटत असला तरी त्याच्यातला नर कधी जागा होईल आणि तुम्ही मादी आहात म्हणून तो तुमच्यातल्या स्त्रीचा चुराडा करत माणुसकीला काळिमा फासेल याचा नेम नाही. नवं वर्षाच्या उत्सवात पुरुषांच्या घोळक्यात आब्रू वाचवत पळत सुटणाऱ्या मुली काय किंवा मोनिका घुरडे, आयआयटीएन स्वाथी किंवा पुण्यात इन्फोसिसच्या रसीलाची हत्या काय अशी अनेक उदाहरणे आपण रोज रोज बघत असतो. हल्लीच दिल्लीत झालेली घटना सगळ्यांच्याच स्मृतीपटलावर ताजी आहे. ओळखीच्या मुलाने घरी सोडून देण्याच्या निमित्ताने मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन स्वतःसकट इतर ४ मित्रांच्या हवाली केले. पहाटेच्या सुमारास तिने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली आणि घडली घटना पोलिसांना सांगितली. माध्यमांनी ती देशभर प्रसारित केली. अनेकदा जवळचा मित्रच 'ती' च्या परवानगी शिवाय तिच्यावर त्याच्या इच्छा थोपवतो, ती नाही म्हणत असतांनाही त्या पूर्ण करून घेतो. 'नाही म्हणजे नाहीच असतं, नाही शब्दाचा अर्थ नाही असाच होतो' याच अर्थाचा अमिताभ बच्चनचा 'पिंक' सिनेमा देखील 70MM वर आला आणि प्रचंड गाजला. पण आजही स्त्रीची मर्जी, तिची इच्छा तिची परवानगी हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय मानला जातच नाही. तिला सुदैवच गृहीत धरल्या जाते आहे. पण आज हा विषय जेव्हा महत्वाचा वाटून त्यावर चित्रपट बनताहेत किंवा चर्चा झडताहेत याची सुरुवात मात्र केटी नावाच्या युवतीने २५ वर्षांपूर्वीच केली होती. त्यासाठी तिला दीर्घकाळ लढा द्यावा लागला ...तिच्याच संघर्षाची हि कथा.

३ जून १९९१ हा दिवस विशेष दिवस म्हणून कायद्यात कोरला गेला त्याला कारण ठरली केटी कोएस्तनर नावाची १८ वर्षीय तरुणी. त्यावेळी केटी या नवंमहाविद्यालयीन विद्यार्थिनीचा फोटो 'टाईम्स' मासिकाच्या कवर पेजवर प्रसिद्ध झाला होता, हे पहिल्यांदाच घडले आणि संपूर्ण अमेरिकेत चर्चेला पेव फुटले. केटीवर बलात्कार झाला होता, तिला न्याय हवा होता इतकेच नाही तर त्यासाठी तिने स्वतःच एल्गार पुकारला होता. तिच्या समर्थकांच्या आणि त्याहून अधिक विरोधकांच्या फौजा तयार झाल्या. प्रचंड उहापोह, कोलाहल ... आणि पहिल्यांदाच 'डेट रेप' संकल्पना अस्तित्वात आली.

केटी प्रथमच कॉलेजला जायला लागली होती. पहिल्या काही दिवसातच तिची भेट आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एका तरुणाशी झाली, हळूहळू ओळख मैत्रीत बदलली. एका रात्री कॉलेज पिकनिकच्या दरम्यान रात्री जेवणानंतर वेळ घालवण्यासाठी केटी अन तो तरुण रूममध्ये एकटे गाणी ऐकून डान्स करीत असतांना त्याने तिच्यावर बळजबरी केली. केटीने विरोध करूनही तो केटीला समजावण्याचा अन शांत करण्याचा, मनावण्याचा प्रयत्न करीत राहिला, आणि शेवटी तिचा नकार न जुमानता केटीचा बलात्कार झाला. या घटनेला आज २५ वर्ष झाली.  या प्रसंगाची आठवण करतांना हळवी होत केटी म्हणते ''लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी मी जे सुंदर स्वप्न मनःपटलावर जपून ठेवले होते त्याचा त्या हॉटेलच्या खोलीतल्या जमिनीवरच्या गुलाबी कार्पेटवर चुराडा झाला होता. माझ्या शरीरासकट माझ्या भावनांचा, आत्म्याचाही बलात्कार झाला होता'

केटी लगेच दुसऱ्या दिवशी हेल्थ सेंटरला गेली पण तिच्यावर घडलेला प्रसंग ऐकूनही तिला निव्वळ झोपेच्या गोळ्या देऊन परत पाठवले गेले. तिथल्या अधिकाऱ्यांना-डॉक्टरांना तिने पुनर्विचाराचा सल्ला दिला पण सर्व व्यर्थ. तिच्या वडिलांनीही तिलाच दोष दिला ''तू एकट्या मुलासह त्या खोलीत गेली नसतीस तर तुझ्याबरोबर असं वाईट कृत्य कधीच झालं नसतं'' वडिलांचे हे शब्द तिच्या मनावर अधिक घाव करून गेले....आपल्याला हा लढा एकटीने लढावं लागणार आहे याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. मात्र तिने हार मानली नाही, न्यायालयातही तिच्यावरच ताशेरे ओढले गेले, लाजिरवाणे आरोप झाले. ''बळजबरी होत असतांना त्याला पूर्ण ताकदिनीशी विरोध करून बलात्काऱ्यास थांबवायला हवे होते असे बिनबुडाचे सल्ले तिला भर कोर्टात देण्यात आले. तिच्या मागणीवर क्रिया करून तिच्या बलात्काऱ्यास कॉलेजच्या त्या सत्रासाठी बेदखल करण्याआधी तिच्या महाविद्यालयाने तिला तिच्या आरोपीशी सौहार्दाने घेऊन जुळवून घेण्याचा हास्यास्पद सल्ला देखील दिला. केटीसाठी हे सगळंच खूप मनःस्ताप देणारे होते. तिच्यावर झालेल्या अन्यायापेक्षाही बलात्काऱ्याबद्दल सगळ्यांना माया दाटून येते आहे आणि उलट तिलाच चुकीचे ठरवले जाते आहे हे तिच्या त्यावेळच्या कोवळ्या वयातल्या आकलनशक्तीच्या आणि सहनशक्तीच्याही पलीकडचे होते.

शेवटचा उपाय म्हणून अंततः केटीने लोकल वृत्तपत्रांना पत्र लिहिली आणि महाविद्यालयीन कॅम्पस मधून आंदोलनं सुरु केली. तिची बातमी हळूहळू राज्यस्तरीय मुद्दा ठरू लागली, माध्यमातून बुद्धिवंतांच्या चर्चा झडू लागल्या. पण त्यातल्या बऱ्याच या केटीच्याच विरोधातल्या होत्या. तरुण वर्गातही तिचेच विरोधक जास्त होते विरोधाची सीमा म्हणजे जवळ जवळ २००० विद्यार्थ्यांनी केटी विरुद्ध याचिका दायर केली. त्या सर्वांनी केटी खोटं बोलत असल्याचे याचिकेत म्हंटले होते. पुढे तिचा लढा अधिक तीव्रतेने चालत राहिला. पुढे तिचे म्हणणे, तिचा संघर्ष लोकांना हळूहळू कळू लागला. केटीने पुन्हा एकदा अमेरिकन लोकांचा विश्वास संपादन केला होता.

 या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. केटीच्या या पहिल्या-वहिल्या ''डेट रेप'' केस नंतर अश्या घटनेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आज केटी बलात्काराने पिडीत महिलांसाठी समुपदेशनाचे कार्य करीत आहे आणि जनजागृती करत गरजूंसाठी मोफत वकिलीही करते आहे. ती म्हणते ' महिलेच्या परवानगीशिवाय तिच्या इच्छेविरुद्ध केलेले शरीरसंबंध बलात्कारच आहेत. तिच्या मर्जीचा, तिच्या भावनेचा मान राखलाच जायला हवा.'' केटीने जे काही भोगलंय ते पुढे कधीही इतर कुठल्या स्त्रीला भोगावे लागू नये म्हणून केटीचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत.

   

रश्मी पदवाड मदनकर / 06 jun 2016 

(१५ जून २०१६ ला  'सकाळ' च्या ''मी'' पुरवणीत प्रकाशित )

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...