Monday, 6 January 2020

जीवन गाणे गातच राहावे ..


पुन्हा एक वर्ष सरलं, नवं वर्ष-नवे संवत्सर सुरु झाले. नव्या वर्षाचा जल्लोष वगैरे साजरा होईल नवनवोन्मेषाने भारलेली रात्र उजळून जाईल, नव्या वर्षाच्या पहाटेचा सूर्य अधिक तजेला अधिक उत्साही दिसू लागेल. दिवस पालटेल जुने कॅलेंडर भिंतीवरून उतरेल नवे चढवले जाईल आणि मग पुन्हा 'चल रे माझ्या मागल्या ..' तसं नव्या-जुन्या वर्षानं बदलत काहीच नाही तीच तशीच सकाळ उगवते आणि कामाच्या रहाटगाड्यात कधी रात्र होते कळतही नाही. दिवसामागून दिवस सरतात रात्री मागून रात्र, महिने पालटतात मग वर्षामागून वर्ष येत जातात जात राहतात.


नव्या वर्षाच्या पहिल्याच दिनी भिंतीवर चढवलेले नवे कॅलेंडर तयार असते अगदी नव्या कोऱ्या पाटीसारखे नव्या रेघोट्या ओढून घ्यायला. पुढे वर्षभर ते तारखा लक्षात आणून देणार असतं .. आठवणी अंगावर कोरून घेणार असतं, हिशेबांचे आकडे, कुणाकुणाचे जन्मदिन-लग्नदिन, दूध-पेपर न कामवाल्यांच्या उपस्थिती अनुपस्थितीच्या नोंदी, महत्वाच्या कामासाठीचे रिमाइंडर किती किती आणि काय काय.... काल उतरवलेल्या जुन्या कॅलेंडरवरच्या खाणाखुणा मात्र राहतात तश्याच, चोळामोळा होतात, रद्दीत फेकल्याही जातात .. अंह ! पण नेहमीच नव्हे कधी कधी शिल्लक राहतात..तिथेच कॅलेंडरवर किंवा आतात-मनात, सलत राहतात, सोलत राहतात किंवा आनंदाच्या आठवणींचा कोलाज होऊन मनात तरंगत राहतात सदैव.


कसं असतं ना ?? निघून गेलेल्या वेळेतल्या आयुष्यानं नोंद घेतलेल्या काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, मागे सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि स्वतःसाठी करावयाच्या राहून गेलेल्या काही गोष्टी .. जुन्या वर्षासोबत हे सगळंच मुठीतून रेती घसरावी तसे निसटून गेले असतात.. हे लक्षात येते तेव्हा पश्चाताप होतो पण या साऱ्या विचारात आता रात्र सरली असते आणि नव्या वर्षाची नवी सकाळ पुन्हा हर्षोल्लास जागवते. आणखी एक संपूर्ण वर्ष म्हणजे ३६० दिवस पदरी पडणार असतात..


आयुष्याच्या या नव्या क्षणाला- या घडीला आपण पार केलेल्या कालपर्यंतच्या प्रवासाच्या बदलणाऱ्या वळणावर जरा थांबून जरा मागे वळून बघावं... स्वतःसाठी. सगळ्या चांगल्या गोष्टींचा लेखाजोखा एकदा पुढ्यात मांडून बसावं. चांगलं जगण्यासाठी म्हणून कुठेही न केलेली तडजोड, ती करावी लागू नये म्हणून केलेला संघर्ष, भल्यासाठी केलेले प्रयत्न, बुऱ्यासाठी दिलेला लढा, जगण्यासाठी वर्षभर उपसलेले कष्ट आणि त्यातून मिळवलेले यश या साऱ्यांसाठी स्वतःवर खुश होण्याचा हा क्षण उगवलेला आहे. आज स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतलीच तर त्यात काहीच गैर नाही. या पुढे वर्षभर आनंद वाट्याला येईल ते क्षण अन क्षण वेचत जायचे आहे, या प्रवासात सुगंधी फुलांचे ताफे, उत्तुंग पहाड, रम्य हिरवळ आणि सौंदर्य न्याहाळायचे आहे. नव्या सुखद अनुभवांचा नवा सिद्धांत मांडत नवे समीकरण कायम करायचे आहे. समांतर येणाऱ्या वाटेवर अनुभूतींचा खजाना आहेच, अडचणींचा, समस्यांचा नवा अनुभव घेत हातात हात घेऊन पुढे निघू …. या कडेवरून जगण्याच्या आत डोकावतांना काय गवसतं हे बघण्यात सुख असणार आहे हे नक्की…


येणारे नूतन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबीयास सुख समाधानाचे व समृद्धीचे जावो..















Tuesday, 10 December 2019

आसमान छुती लडकीया !!




पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे सर्विलांस एयरक्राफ्ट उडवणार आहे.


ह्यांच्याबद्दल जाणून घेणं प्रेरक आहे -

भावना कांत : भावना नोव्हेंबर २०१७ मध्ये फायटर स्क्वाड्रॉनमध्ये सामील झाली आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये मिग -21 बायसनवर प्रथमच तिने एकटीने उड्डाण केले होते. हे तेच विमान आहे ज्याने विंग कमांडर वर्तमान अभिनंदन ह्याने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाला मारून पाडले होते. भावना कांत सध्या राजस्थानमध्ये असणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवर तैनात आहेत. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपुर ब्लॉकमधील बाऊर गावची रहिवासी असणाऱ्या भावनानी एमएस कॉलेज बंगळुरू येथून बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले. भावना सामान्य कुटुंबातली असली तरी तिने आकाशापर्यंत उडण्याचे स्वप्न लहानपणापासूनच हृदयाशी बाळगले होते; स्वतःच्या स्वप्नासोबत देशाला गर्व वाटावा असे कार्य तिच्या हातून घडून आले आहे.

सब लेफ्टनंट शिवांगी : सिक्कीम-मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली शिवांगी बिहारच्या मुझफ्फरपूरची रहिवाशी आहे. एखाद्या शिक्षिकेची नोकरी किंवा गृहिणी होईल एवढीच तिच्याकडून अपेक्षा केली गेली होती मात्र, विद्यापीठाच्या प्रवेश योजनेचा एक भाग म्हणून बनविलेले नौदल सादरीकरण करतांना तिच्या उडण्याच्या सुप्त इच्छेला बळ मिळाले. त्यानंतर तिने जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये २०१८ साली एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. मुजफ्फरपूरमधल्या भारतीय नौदल अकादमीमध्ये सहा महिन्यांच्या नौदल ओरिएंटेशन कोर्सनंतर तिने एअरफोर्स अकॅडमी (एएफए) येथे पिलाटस बेसिक ट्रेनरवर उड्डाण करण्याच्या प्रॅक्टिससाठी आणखी सहा महिने प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यांपासून कोची स्थित भारतीय नौदल एअर स्क्वॉड्रॉन 550 ज्याला ‘फ्लाइंग फिश’ म्हणून ओळखली जाते तेथे भारतातील नौदल उड्डाणांचे अल्मा मॅटर, डोर्निअर सागरी विमान चालविणे शिकली. कोर्सचा एक भाग म्हणून तिने आतापर्यंत सुमारे 100 फ्लाइंग तास लॉग इन केले आहेत, त्यामध्ये 60 पेक्षा जास्त डॉर्नियर तिने उडवले आहेत.नौदलात सामील होण्यापूर्वी फक्त गोव्याचा समुद्र पर्यटक म्हणून पाहिलेली शिवांगी आता हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित ड्रोनिअर 228 सागरी विमान उड्डाण करणार आहे. हे विमान अल्प-अंतराच्या सागरी मिशनवर पाठविले जाते. त्यात रडारवर अ‍ॅडव्हान्स पाळत ठेवणे , इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि नेटवर्किंग सारख्या बर्‍याच उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांच्या मदतीने हे विमान भारतीय समुद्री भागावर नजर ठेवेल.



शिवांगीचे हे असाधारण यश पाहून तिला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली होती “विमान उड्डाण करण्यासाठी आपल्याकडे सुपर प्रतिभावान असण्याची गरज नाही, परंतु आपल्याला खरोखर कठोर परिश्रम करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे,” पुढे ती म्हणाली, “उडणे तुमच्या नैसर्गिक वृत्तीच्या विरूद्ध आहे. म्हणूनच फोकस आणि स्किल सेटचे महत्त्व जास्त आहे”


भावना आणि शिवांगी सारख्या महिलांमुळे इतर महिलांसाठी अनवट वाटा मोकळ्या होतायत, त्यांचं पहिलं पाऊल उमटलं आता या पाऊलखुणा अनेकींना नवनवे मार्ग दाखवतील. महिला ताकतवर आणि हीमतीही असतातच, त्यांच्या पंखांना हवा फक्त द्यायची असते. ते काम या दोघींनी उदाहरणासह करून दाखवलं आहे. आता याही क्षेत्रात महिलांना परचम लहरवता येईल आणि देशासाठी काहीतरी केल्याचं समाधानही मिळवता येईल.. या दोन्ही भारतभूच्या लेकींचे मनभरून कौतुक आणि शुभेच्छा.

- रश्मी पदवाड मदनकर


Saturday, 7 December 2019

मामाचं पत्र हरवलं ..





पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण  कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे.  पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा.
आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय.

पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराला, लेक माहेराला, शिष्य गुरूला, मित्र एकमेकांना अगदी कुणीही कुणाला ... ''मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं'' असा खेळ खेळायचो आम्ही आमच्या लहानपणी त्या खेळातूनही आलेलं पत्र हरवलं म्हणून किती शोधायची धडपड चालायची.  अश्या या पत्रांचं अनन्यसाधारण महत्व ओळखून पुढे ही पत्र साठवली जाऊन प्रकाशित होऊ लागली. संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी, स्वामी विवेकानंदांची तर कितीतरी पत्रं, महात्मा गांधींनी ॲनी बेझंटला, आचार्य विनोबा भावेंना लिहिलेली पत्रं,मग हल्लीच्या कवी अनिल आणि कुसुमावतींची पत्रं आणि अमृता प्रीतम आणि इमरोजची पत्रं ही पत्रं साहित्यप्रेमींच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. पुष्टी रेगेंच्या सावित्रीने तर साहित्य रसिकांना भुरळच पाडली होती.

पत्र व्यक्तीच्या आयुष्याचा आरसाच तर असतो जणू.
प्रेमचंद म्हणतात ''पत्र-साहित्य का महत्त्व इसलिए है कि उसमें ‘बने-ठने, सजे-सजाये’ मनुष्य का चित्र नहीं, वरन् एक चलते-फिरते मनुष्य का स्नैप शॉट मिल जाता है, लेखक के वैयक्तिक सम्बंध, उसके मानसिक और बाह्य संघर्ष तथा उसकी रुचि और उस पर पड़नेवाले प्रभावों का पता चल जाता है. जिन पत्रों के विषय और शैली दोनों ही महत्त्वपूर्ण हों, वे साहित्य की स्थायी सम्पत्ति बन जाते हैं और इस सम्पत्ति पर पाठक भी गर्व करते हैं!

याच भावभावनांचा संचय करायला पत्र वाङ्मयाची सुरुवात झाली असावी. साहित्यात आज पत्र वाङ्मयाचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी प्रकाशित होणाऱ्या पत्रिकांसाठी जी पत्रं यायची त्या पत्रांनाही साहित्यिक स्पर्शअसायचा व ती साठवली जायची, जसजसे साहित्यिकांमध्ये आत्मभान यायला लागले ते दिवंगत झालेल्या साहित्यिकांच्या पत्रांचे संकलन करून प्रकाशित करू लागले. हिंदी साहित्यात या परंपरेची प्रथम सुरुवात  पं. बनारसीदास चतुर्वेदी यांनी केली त्यांनी पत्रलेखनाचा जणू ध्यासच घेतलाआणिकही लेखकांसमवेत पत्रलेखन मंडळाची स्थापना केली. उर्दूतही अनेक पत्रसंग्रह आहेतच. सर्वप्रथम उर्दूतले संकलन रजब अली बेग ‘सरूर’ यांचं प्रकाशित झालं पण मिर्ज़ा गालिब यांचे खतूत प्रकाशित झाल्यानंतर तर अनेक पत्रसंग्रह येत राहिले. कराचीवरून प्रकशित होणारे 'नकुश'१९५७ नोव्हेंबरच्या अंकात १०४० पानात १५५ प्रसिद्ध व्यक्तींचे ३००० पेक्षा जास्त दुर्मिळ पत्र प्रकाशित झाले होते.

प्रसिद्ध अमेरिकी संत एमर्सन यांच्या पत्राचं संकलन तर जवळ जवळ 32 हज़ार पानांचं आणि पाच खंडांमध्ये व्याप्त आहे. स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला लिहिलेली तत्व चिंतनपूर्ण पत्रे असूदेत, स्वामी स्वरूपानंदचे ‘पत्र-प्रबोध’ पुस्तक किंवा ‘प्रेमचंद की चिट्ठी-पत्री... डॉ. वा.श. अग्रवाल म्हणतात - ‘मेरी समझ में किसी व्यक्ति की भारी-भरकम साहित्यिक कृति आंधी के समान है, पर उसके साहित्यिक पत्र उन झोंकों के समान हैं, जो धीरे से आते-जाते रहते हैं और वायु की थोड़ी मात्रा साथ लाने पर भी सांस बनकर जीवन देते हैं.’

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत, हे व्यवहार त्या पत्रांमार्फत करीत हि पत्रे हा इतिहासाचा आरसाच तर आहेत. त्या कालचे जगणे-वागणे त्यावेळचा कारभार-राजकारण या पत्रांतून सुस्पष्ट होतो.अस्सल पुराव्याखेरीज इतिहासाच्या नोंदी खऱ्या कश्या मानल्या जाणार. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही.  शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. हा मराठी इतिहासातील पत्रव्यवहार तर बुद्धिभेद करून राजकारण करण्याचे उदाहरण कायम करणारे ठरतात. 

अश्या या पत्रवाङ्मयाचा इतिहास आता संपुष्टात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. हल्ली कुणी कुणाला पत्रेच पाठवत नसल्याने हा वाङ्मयीन प्रकारचं भविष्यात बंद होणार असे स्पष्ट जाणवू लागले आहे. आणि निव्वळ हे बंद झाल्याने साहित्याचा तोटा होणार नसून इतिहास समजून घेण्याची पाळंमुळं देखील हलणार आहेत हे निश्चित.


रश्मी पदवाड मदनकर -
२४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित


Tuesday, 3 December 2019

लँड ऑफ होप - अंजा रिग्रेन



बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, दलाई लामा इत्यादी प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहेऱ्यांना मागे टाकून डेन्मार्कस्थित सामाजिक कार्यकर्ता अंजा रिंग्रिन लोवेन जगातील प्रेरणादायक लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या 'उम' नावाच्या जर्मन भाषेच्या लोकप्रिय मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून गेला होता. अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवून शेकडो नायजेरिअन मुलांना जीवनदान देणाऱ्या त्यांच्यासाठी त्यांच्याच देशात राहून जीव ओतून कार्य करीत असलेल्या अंजाची या दिशेने जाण्याची जीवनकहाणी तिच्या सुरुवातीच्या काळापासून मी पाहत आले आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या प्रेरणा स्थानांमध्ये अंजाचे नाव माझ्या यादीत अग्रगण्य आहे.

हो आता मोठा झालाय... इतर कुठल्याही सामान्य मुलांएवढाच तंदुरुस्त आणि आनंदी दिसतो. कोण आहे हा होप ? ही एका अश्या दुर्दैवी लहान मुलाची कहाणी आहे ज्याला अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या बेगडी समाजाने मरणासन्न अवस्थेत रस्त्यावरून टाकून दिले होते. दारिद्र्यामुळे जगण्यासाठीचा करावा लागणार संघर्ष, अशिक्षितपणा आणि त्यामुळे समाजातील घसरलेली मूल्य या गोष्टी माणसाला काय काय करायला भाग पाडू शकतात हे पाहिले कि आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना त्रास होणे साहजिक आहे.. पण बरेचदा आपण हळहळण्याशिवाय काहीच करू शकत नाही. नायजेरियात जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली दोषी मुलांवर होणारा हिंसाचार आणि अत्याचार ही सामान्य बाब आहे. अश्याच आरोपांनी ओढवलेल्या संकटात त्या चिमुकल्या जीवाला अत्यंत द्वेषपूर्ण वागणूक, छळ आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या .. हे कधी तर अगदी ३ वर्षे वयाचा असतांना. पण अश्या हजारो मुलांमध्ये होप सुदैवी होता ज्याला एका ममतामयी हळव्या महिलेच्या बिनशर्त प्रेमामुळे जीवनदान मिळाले. बचावानंतर लगेचच अंजाने स्वत:चा त्या चिमुकल्या जीवाला पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ सामायिक केला ज्यामुळे मुलाच्या जादूटोण्यांच्या दुःखद समस्येबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि होपच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी पैसे एकत्रित व्हावे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि होपची कथा लाखो लोकांच्या मनाला भिडली.










30 जानेवारी, 2016 चा तो दिवस होता मूळची डेन्मार्कची असणारी अंजा रिंगग्रेन लोव्हन सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने नायजेरियाच्या गल्लीबोळातून फिरून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होती. अचानक कुपोषणाने ग्रस्त अतिशय कृश शरीराचा ३ वर्षाचा चिमुकला मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर फिरत असलेला तिच्या नजरेस पडले. अफगाणिस्तानसारख्या बर्‍याच देशांमध्ये सामान्यपणे प्रचलित असलेल्या ‘जादूटोणा’ सारख्या अंधश्रद्धेवरून तास आरोप लावलेल्या मुलांना स्वतःचेच कुटुंब चक्क मरण्यासाठी म्हणून रस्त्यावर सोडून देतात. त्यावेळी मुलांचा द्वेष द्वेष केला जातो. त्यांना खायला प्यायला सुद्धा दिले जात नाही, त्यांच्या अंगावर कपडे नसतात.. त्यांच्या रस्त्यावरच मारून पडण्याची वाट पहिली जाते. होपचे हेच झाले होते .. तो दिसला तेव्हा चालण्यास अगदीच अक्षम तो आठ महिन्यांपासून रस्त्यावरच राहत होता आणि लोकांकडून फेकल्या जात असलेल्या अन्नावर जिवंत वाचला होता. अश्या परिस्थितीतल्या त्या चिमुकल्याला पाहून अंजाचे मन द्रवले तिने त्याला त्या क्षणी खायला प्यायला दिले आणि उचलून सोबत घेऊन आली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचे नाव अंजाने 'होप' असे ठेवले. आज होप ७ वर्षांचा आहे आणि इतर मुलांएवढाच तंदुरुस्त आणि सक्षम आयुष्य जगतो आहे. होपच्या प्रकृतीविषयी बोलताना अंजा म्हणाली होती की 'मी फक्त 20 महिन्यांपूर्वी आई बनले होते. मुलांच्या गरजा आणि आईची माया काय असते हे मला माहित होते, एका छोट्याश्या जीवाचे हाल मला बघवले नाहीत आणि मी त्याला दत्तक घेण्याचे ठरवले'.

होपबद्दल जिव्हाळा वाटणाऱ्या लोकांसाठी होपची सध्याची स्थिती वर्तवणारा फोटो जाहीर करतांना अंजाने 'तो क्षण' पुन्हा क्रिएट करणारा फोटो काढून बिफोर-आफ्टर परिस्थिती दाखवणारे फोटो टाकले आणि पुन्हा एकदा नेटिझन्स नॉस्टेल्जिक होत होप-अंजा च्या प्रेमात पडले आहेत. 






अंजा आणि तिचा नवरा डेव्हिड इमॅन्युएल अश्या दुर्दैवी मुलांसाठी 'आफ्रिकन चिल्ड्रन्स एड एज्युकेशन डेव्हलपमेंट फाउंडेशन' (एसीएईडीएफ) नावाचे अनाथालय दक्षिण-पूर्व नायजेरियात चालवतात, नायजेरियातच राहतात. 'लँड ऑफ होप' या नावाने अंजा एक सोशल मीडिया कॅम्पेन देखील चालवते आहे. या माध्यमातून अनेक नायजेरियन मुलांचे प्राण वाचवून त्यांना चांगले जीवन तिने दिले आहे. या मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि अश्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ती सध्या नायजेरियन सरकारशी लढा देते आहे. अश्या ममतामयीला मानाचा मुजरा.





- रश्मी पदवाड मदनकर



Wednesday, 27 November 2019

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं.

Image may contain: Himanshu Bagde, smiling, sitting, sky, ocean, outdoor, water and nature




आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे आणि त्याबदल्यात उदरनिर्वाहासाठी मनासारखा मोबदलाही मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?  मला नेहमीच वाटत आलंय… जगात सगळ्यात सुखद जॉब कुठला असेल तर तो भटकंतीचा .. कोणातरीसाठी कुठल्याही कारणाने, त्यांच्याच खर्चावर मुशाफिरी करावी, मनसोक्त हिंडावं, डोंगररांगा, समुद्र किनारे, हिरवाई, जंगल, प्राणी, किल्ले, लेण्या हुडकून काढाव्या. या भटकंतीतून निरनिराळ्या अनुभूती घ्याव्या, मनात साठवाव्या. मनसोक्त हिंडून झाले की घरी परतताना खिसाही भरला असावा. असे झाले तर ? स्वप्नील वाटतं ना सगळं. स्वप्न पाहायला हरकत नाही पण त्यानं पोट भरत नसते. स्वप्न बाजूला ठेवून वास्तवात जगता आलं पाहिजे. पण वास्तव म्हणजे काय शेवटी? तुमच्या इच्छा आकांक्षा मारून, स्वप्न बाजूला सारून प्रस्थापितांच्या मळलेल्या वाटेवरून मन मारून प्रवास करीत राहणे, मारून मुटकून स्वतःला एखाद्या साच्यात बसवणे आणि एक दिवस हे जग सोडून निघून जाणे .. एवढंच तर नव्हे ना?


असा विषय आला कि 'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life ' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) हमखास आठवतो. एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात.

हे अख्ख व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या अनेक भटक्यांबद्दल आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियेचे ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुख-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत. त्यातलाच एक हिमांशू बागडे.


तो तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी. एकेकाळी आर्मीत जाऊन देशसेवा करायचे स्वप्न पाहणारा.. वाचनाचे वेड असणारा, अध्यात्मात रुची असणारा, भर तारुण्यात फुगीर वाढीव पगाराच्या नोकऱ्या खुणावत असताना वर्षानुवर्षे प्रगतीच्या चढत्या पायऱ्यांचा आलेख नाकारून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले वेल सेटल कॉर्पोरेट करिअर सोडून वाट वाकडी करत गेली २० वर्ष निसर्गाचा ध्यास घेत जंगलं पालथी घालणारा हिमांशू फार कमी वयात देश विदेशात त्याच्या जंगलवेडासाठी आणि त्यासाठी केलेल्या कामामुळे नावारूपास आला.  वयाच्या अकराव्या वर्षीच मन-मेंदूने जंगलाच्या मोहात पडला. वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने सहज जंगलात जाणे व्हायचे. तिथला निसर्ग, वातावरण, प्राणी आदीची ओढ निर्माण व्हायला हळूहळू सुरुवात झाली असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा त्याने प्रत्यक्ष वाघ बघितला. हा अनुभव रोमांच उभा करणारा होता. त्या क्षणापासून वाघांवर त्याने निरातिशय प्रेम केले. वन्यजीव संवर्धन आणि व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाघांची काळजी घेणाऱ्या मोहिमेत हिमांशूने कळत नकळत मोठी भूमिका निभावली…तुमच्या जाणिवा जर सच्च्या आणि प्रामाणि‌क असतील तर तुम्हाला तुमच्याही नकळत मार्ग गवसत जातात ह्याचेच जिवंत उदाहरण हिमांशूच्या रूपात नावारूपास येत होतं,
जंगल अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या हिमांशुला नकळत जंगलावर प्रेम जडले. औद्योगिक विकास आणि अन्य विकासाच्या नावावर जंगलाची मोठ्या प्रमाणात होणारी वाताहत पाहून तो व्यथित होतो. यातूनच तो नि:स्वार्थीपणे ‘जंगल वाचवा’ मोहिमेत सहभागी झाला. हळूहळू या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला. जंगल वाचवा, पर्यायाने वाघ वाचविण्यासाठी तो आज दिवसरात्र धडपडतो आहे.

हिमांशुच्या याच कार्याने त्याला ‘जंगलतज्ज्ञ’ अशी नवी ओळख दिली. जंगलाशी संबंधित कुठलीही गोष्ट असेल, हिमांशुला त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. त्याचे मार्गदर्शनात जंगलाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून जंगलप्रेमी प्रयत्नरत असतात. येथूनच हिमांशुचा जंगल अभ्यासक, गाईड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असा नवा प्रवास सुरू झाला.



एकदा माया नावाची वाघीण तिच्या दोन शावकासोबत हिमांशुच्या पुढ्यात आली.  तिचं बेदरकार, तेजस्वी, स्वच्छंद वर्तन तिची दखल घेण्यास भाग पाडणारच होतं. तिला माणसांबद्दल संकोच नव्हता. इतर श्वापदांचे भय तिच्या वागण्यात जाणवत नव्हते. जंगलभर मुक्त संचार करणाऱ्या मायाच्या निर्भय वागण्यानं हिमांशु तिच्याकडे आकर्षित झाला. सतत मायाचेच विचार डोक्यात येऊ लागले. तिच्या अस्तित्वाभोवताल फिरु लागले. त्याने मायाचा माग घ्यायला सुरुवात केली. तिच्या हालचालीचा अभ्यास तो करु लागला.  म्हणतात ना, प्राण्याला ‘माया’ लावली की ते ही माणसाळतात. हिमांशुचे तिच्या अवतीभवती असणे आता ‘तिच्या’ही अंगवळणी पडले होते. तिलाही त्याची कदाचित सवय झाली होती.

वाघांचे वर्तन कसे असते, वाघांच्या हद्दी कशा ठरतात, त्याची आखणी कशी करतात, वाघ त्या कशा ठरवतात, त्यासाठी कशी भांडणे करतात याविषयीची अतिशय रंजन आणि  शास्त्रीय माहिती हिमांशुला आहेच. मात्र, याही पुढे जात माया कशी वागते. आपल्या बछड्यांच्या बचावासाठी काय-काय योजना आखते, त्यासाठी प्रयत्नपूर्वक काय कुटील कारस्थान खेळते, हे सगळं हिमांशुसाठीही नवीन होते. तो सांगतो ती तिच्या काळात जंगलाची सम्राज्ञी होती तरी त्याहून अधिक तिच्या बछड्यांची आई होती. पूर्वी अनेकदा साम्राज्य हासील करण्याच्या वाघांच्या लढाईत आपले शवक गमावलेली माया, त्यांच्याच राज्यात त्यांनाच गाफील ठेवून जगायला शिकली.  एकावेळी दोन नर वाघांपासून पिल्लांचा बचाव करायला म्हणून ती कुटीलपणे दोघांशीही संबंध ठेवून दोघांनाही हे तुमचेच पिल्लं आहे या भ्रमात ठेवून त्यांच्याच कडून पिल्लांचा बचाव करून घ्यायची.

‘माया’सोबतच्या भेटी जशा जशा वाढत गेल्या तशी ती हिमांशुला अधिकच उलगडत गेली. तिच्या स्वभावाचा अंदाज त्याला बांधता येऊ लागला. तिची पुढली चाल हिमांशुला ओळखता येऊ लागली. ती कोणत्या क्षणी कुठे असेल, कुठून प्रवास करेल, कुणाशी भांडेल, कुणाशी तह करेल ह्याचे आडाखे चपखल बसू लागले. एका क्षणी माया आणि हिमांशुचे नाते इतके प्रगाढ झाले कि, ‘टेलिपॅथी’ व्हायला लागली.



जंगलात भेटलेल्या हिमांशुला आता मायाच अनेक संकेत स्वतःहून देते. हिमांशुच्या हातात जेव्हा कॅमेरा असतो तेव्हा ती स्वत:हून पोज द्यायला सज्ज होते, असेच काहीसे वाटू लागले आहे. ह्या दोघांचे हे न समजणारे अनामिक नाते अनेक माध्यमसमूहांना खुणावत राहिले. ह्यातूनच 'लोनली प्लॅनेट'च्या निवडक लेखांच्या आवृत्तीत या दोघांवर सविस्तर लिहिले गेले. हिमांशुनेही 'माया इन्चान्ट्रेस' (माया एक जादूगारिणी) या नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये चरित्र मालिका लिहिली. त्याचे अनेक फोटोग्राफ्स आंतराष्ट्रीय पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आणि गाजलेही. त्याच्या कामातून, लिखाणातून च्याट्या छायाचित्रांतून त्याचे जीवनानुभव, संवेदनशील आणि तितकेच प्रगल्भ जीवनदर्शन घडते हे निश्चित.

जंगलांचा मागोवा घेत फक्त भारतच नव्हे तर विदेशातील अनेक जंगल पालथे घालून कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची अपेक्षा न करता तो अनेक वर्ष जंगलसेवा  निगुतीने करीत आहे.  दक्षिण भारत, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर-पूर्वेतले सगळे राज्य, मध्य भारतातील ताडोबा, मेळघाट, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगढ , सातपुडा, पन्ना, गोवा, कर्नाटका, तामिळनाडू, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि भूतान येथील जंगलांना त्याने भेट देऊन तिथल्या प्राण्यांचा, निसर्गाचा अभ्यास केला या प्रवासात अनेक जंगलप्रेमींच्याही भेटी घेतल्या आणि त्याचा हा मुलखावेगळा संसार अनेक पटींनी मोठा करीत नेला आहे.



हिमांशूच्या अतुलनीय कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१२ सालचा  ''Sanctuary Asia Wildlife Photographer', 'पुरस्कार, महाराष्ट्र राज्य बायोडाइव्हर्सिटी बोर्ड अवॉर्ड',  '२०१३ चा नॅशनल बायोडाइव्हर्सिटी फोटोग्राफर अवॉर्ड',  २०१९ साली UK ने आयोजित केलेला 'Winner of Lanka Challenge' अश्या अनेक पारितोषिकाचे तो मानकरी ठरला. त्याच्या श्रमसेवेच्या आस्थेपोटी मिळालेले अनेक सन्मान आणि सत्कार त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला अभिमान बाळगण्यास उद्बोधक असेच आहेत.

असे हे हिमांशु आणि जंगलाचे अतूट नाते म्हणजे मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गावर, वन्यजीवावर प्रेम करून त्याचे रक्षण करावे, हाच संदेश देणारे आहे. या गोड, अनामिक नात्यापासून आपणही प्रेरणा घेऊ या. नाही जंगल, किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एका प्राण्यावर तरी प्रेम करुया. झाडे लावून पक्षांना आमंत्रण देऊ या…त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी……!





मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर
(प्रतिबिंब-२०१९ च्या पर्यटन विशेष दिवाळी अंकात प्रकाशित )

Monday, 18 November 2019

लेखकांच्या गोष्टी



#लेखकांच्या_गोष्टी


''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.''


परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं.. शिवाय दोनेक वर्षाआधी पाहिलेला 'गॉन गर्ल' चित्रपटही आठवला. तसा हा सिनेमा गूढ कॅटेगरीतला डेविड फिंचर ह्याने २०१४ साली निर्देशित केलेला ह्याच शीर्षकाच्या कादंबरीवर बनवलेला स्मार्ट सिनेमा आहे. चित्रपटातली नायिका एमी (रोसमंड पाइक) ही तिच्या लहानपणी तिच्या आई-वडिलांनी लिहिलेल्या, प्रचंड गाजलेल्या, लोकप्रिय कादंबरीची खरीखुरी नायिका आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या तिच्याशी भावना जुळल्या आहेत. ती स्वतःही लेखिका आहे आणि त्याच अनुषंगाने तिला रोजनिशी लिहायची सवयही आहे. एमीचा नवरा निक डन (बेन अफ्लेक) त्याच्या जुळ्या बहिणीसोबत मिळून एक बार चालवतो. सगळं काही सुरळीत चालू असतांना लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला निक घरी पोचतो तेव्हा त्याला लक्षात येतं एमी गायब आहे .. सर्वत्र तूट-फूट, रक्ताचे शिंतोडे, पसारा घरातल्या एकंदरीत परिस्थितीवरून एमीसोबत काहीतरी भयंकर घडले असल्याचे लक्षात येते. इथून सुरु होतो रोमांच. इन्वेस्टीगेशन टीम, माध्यम समूहांची गर्दी, एमीचे चाहते ह्यांच्या भन्नावून सोडणाऱ्या प्रश्नांनी आणि तपासणीत पुढे येणाऱ्या विरोधातल्या पुराव्यांनी एमीचा खून झाला असल्याची आणि तिचाच नवरा निक त्याला कारणीभूत असल्याची खात्री पटत जाते. एमीच्या रोजनिशीवरून चित्रपट उलगडत जातो. काही क्ल्यू मिळतात आणि निक अधिकाधिक गाळात फसत जातो.


एमीच्या रोजनिशीवरून लक्षात येतं कि, एमीच्या लोकप्रियतेला भाळून निकने तिच्याशी लग्न केले असते परंतु त्यांच्यातले संबंध मात्र फार दिवस चांगले राहत नाही. निकचा बाहेरख्यालीपणा, दुर्लक्ष करणे शिवाय इतर महिलांशी संबंध एमीच्या दुःखाचं कारण असतं. तिच्या रोजनिशीतून निक कमालीचा विलन वाटायला लागतो. एमीच्या खुनाच्या आरोपात निकला शिक्षा होते .. गूढ मात्र काहीतरी वेगळंच असतं. ही लेखिकेशी प्रेम केल्याची किंवा तिला दगा देण्याची शिक्षा भोगल्याचीच योजनाबद्ध कहाणी असते. हे प्रेक्षकांना अगदी शेवटच्या एकमेव सीनवरून लक्षात येतं.


२०-२५ वर्षाआधी कधीतरी टीव्हीवर वेगवेगळ्या कथांचे एपिसोड असलेली सिरीयल पहिली होती. 'मिट्टी के रंग' मधेच असावी बहुदा नेमके आठवत नाही पण ती देखील अशीच काहीशी. एक लेखक असतो प्रचंड लोकप्रिय वगैरे. पण त्याच्या लोकप्रियतेमागे, त्याच्या पुस्तकांचा खप प्रचंड वाढण्यामागे त्याच्या लिखाणापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाच कारणीभूत असतात. अत्यंत साधी वेशभूषा, मितभाषी असणारा हा लेखक बायकोच्या अत्याचारांनी पिडलेला असतो. तिच्या अत्यंत वाईट वागणुकीचा तो बळी असतो. त्याच्या लिखाणाची किंमत ती ठरवते, त्यानं कुठल्या कार्यक्रमांना किती मानधन घ्यायचं हे ती सांगते .. मानधन न मिळणाऱ्या कार्यक्रमांना ती लेखकाला जाऊच देत नाही. एवढंच नाही तर दारावर आलेल्या आयोजकांना चक्क हाकलून लावते हे पडद्यावर दिसत राहते. लेखक महाशय कार्यक्रमांमध्ये डोळ्यातून आसवे गाळून या चर्चांना पुष्टी जोडत राहतो. जनतेत हळहळ पसरते, चर्चांना उधाण येतो, त्याच्या बायकोबद्दल समाजात प्रचंड घृणा पसरते.. लेखकाची प्रतिष्ठा मात्र वाढतच जाते. कार्यक्रमाला लेखक हवा पण बायकोकडून नकार येऊ नये म्हणून मानधन वाढवून दिले जातात, कार्यक्रमांना गर्दी वाढत राहते.. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा काहीतरी क्ल्यू मिळेल म्हणून वाचकांत जिज्ञासा शिगेला पोचते त्यांच्या पुस्तकांचा खप गगनाला जाऊन भिडत राहतो.


हे सगळं पाहून आपणही हळहळतो, बायकोचा राग राग येऊ लागतो, आपल्या संवेदना आपली सहानुभूती पूर्ती लेखकाच्या बाजूने झुकलीच असते आणि शेवटचा सिन येतो... गूढ उकलत..पचनी पडणार नाही असं सत्य समोर येतं, हा सगळा लेखकानेच रचलेला सापळा असतो..बायको स्वतःही त्यात पिडलेली प्यादीच असते.


लेखकांवर लिहिणारे लेखकही किती क्रिएटिव्ह असतात .. लेखक हा स्वप्नील विश्वात रमणारा.. सत्यही कल्पनेत रंगवून पाहणारा आणि शब्दांच्या जादूने वाचकांना असणाऱ्या - नसणाऱ्या दुनियेचीही सफर घडवून आणणारा. त्याचीही उलटी-सुलटी रूपे असू शकतात सत्यात किंवा एखाद्या लेखकाच्या कल्पनेतही हे बघणे गमतीशीरच आहे... नाही ?


- रश्मी पदवाड मदनकर







रश्मी पदवाड मदनकर -

Saturday, 16 November 2019




तसे रोजचेच तर असते जगणे 

अंधारातही उजाडले अंगण बघणे 
मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा ..

तेव्हा एक करावं  ..

रोज थोडं थोडं चांदणं 
मनातून काढून गोळा करावं 
कुपीत घालून जपून ठेवावं .. 

रात्र उलटेल .. दिवस पालटतील
कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन ..
आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर 

कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून, 
पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या 
उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या ..

मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या 
कारण 

मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा !

- रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 30 October 2019


 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर  
आरसा हवा हवा वाटत असला, तरी 
प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा 
डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा 
फिरवून घेतो आपण चेहेरा ..

अगदी आहे तशीच दिसणारी माणसे 
हवी हवी वाटतात..पण  
इतरांच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात 
त्यांचे हवे असणे नको असणे .. 

रश्मी पदवाड मदनकर.


Sunday, 20 October 2019

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

गाडली असतीस माझी नाळ ... आई ..

तर ..

तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती
आयुष्याचा सुर्य उगवण्याआत
पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची
परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा
संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा
सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून
परतवून लावता आल्या असत्या मलाही
रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून
ओतून देता आला असता ... आणि

आणि

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

नव्या जगण्याचा नवा उजेड
पांघरून घेतला असता मी  ... आई .. !

पांघरून घेतला असता मी आई !!






- रश्मी पदवाड मदनकर


Saturday, 19 October 2019

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !



एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.

‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,
पण वाती भिजलेल्या नसतील,
धुपारतीची वेळ होईल लवकर अन्
माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’

असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर

"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"

उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत


- रश्मी पदवाड मदनकर

Monday, 7 October 2019

'फ्रायडे फॉर फ्युचर' - ग्रेटाची ग्रेट चळवळ


तिने खरतर शाळेत असायला हवे होते.. खेळण्याबागडण्याच्या वयात जणू घराला आग लागली आहे आणि आपण सर्वांनी जागे होऊन ती विझवायला आता याक्षणी प्रयत्न करायला हवे असे तळमळीने सांगत फिरते आहे. कोण आहे ती?





गस्ट २०१८ पासून “स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट” नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले, ते ग्रेटाच्या 'हाऊ डेअर यु ?' असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या यूएनमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून ''फ्राइडेज फार फ्यूचर'' ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती जी जगातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते की बेजबाबदार राजकारणी आणि उद्योगांमुळे ही धरती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायला हवे ते होत नाहीये. हे जग ही धरती जलवायू प्रदूषणापासून वाचवण्याची लढाई काही विशिष्ट लोकांचीच नाही तर या एका कारणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. नवीन पिढीला आम्ही काय देऊ शकतो, तर.. पूर्वजांकडून मिळाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी जगण्यायोग्य, जलवायू प्रदूषणमुक्त पृथ्वी सोडू याची हमी आम्ही त्यांना द्यायला हवी असे तिचे म्हणणे आहे..फक्त १६ वर्षाच्या अल्पायुत जलवायू परिवर्तनाबाबत काळजी बाळगत त्या विरोधात उभे होऊन जगभर खळबळ माजवून देणाऱ्या स्वीडनच्या या इटुकल्या क्रन्तिकारीचे नाव आहे ग्रेटा थॅनबर्ग. यावर्षी ग्रेटा यांना प्रतिष्ठित अ‍ॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिची आंदोलनाची तीव्रता बघून प्रेरित होऊन हे लोण जगभर पसरत चालले आहे. तिला ‘युनो’ मध्येच नव्हे, तर अनेक ठिकाणी बोलायला बोलावलं जात आहे.

नेमके काय झाले होते ...

ऑगस्ट 2018 मध्ये एकदा ग्रेटाने कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे होणारी तापमानवाढ या संदर्भातला एक व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला आणि तिच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. लवकरच यावर काहीतरी करण्यात आले नाही तर ह्याचा अत्यंत विपरीत परिणाम या धर्तीवर होईल व ती जगण्यायोग्य राहणार नाही, स्वीडन सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करावे यासाठी प्रयत्न करावे असे तिला वाटू लागले. त्याच काळात स्वीडनमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार होत्या तेव्हा ग्रेटाने शाळेत जाणे बंद केले. त्याऐवजी, संसदेच्या बाहेर बसून जीवघेण्या हवामान बदलाच्या विरोधात एल्गार पुकारला. सुरुवातीला ती एकटी होती पण तिने धैर्य न गमावता आपला निषेध सुरू ठेवला, हळूहळू तिचा आवाज लोकांपर्यंत पोचू लागला. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बेल्जियममधील मुले या क्रांतीमध्ये सामील झाली, यूकेमध्ये शाळेतली मुले रस्त्यावर उतरली. या सगळ्यांच्या हातात फळी होती ज्यात असे लिहिले होते की 'आपण आपले काम प्रामाणिकपणे कराल तेव्हाच आम्ही आमचे गृहकार्य पूर्ण करू'. तेव्हापासून दर शुक्रवारी शाळेसमोर निदर्शने करीत हवामान बदलाच्या विरोधात हजारो विद्यार्थी आपापल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत जगातील 100 हून अधिक देशांतील एक हजाराहून अधिक धरणे ग्रेटाच्या समर्थनार्थ झाले आहेत. या चळवळीमुळे युरोपच्या निसर्गासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात आहे. युरोपमधील बर्‍याच देशांनी त्यांच्या हवामान बदलाच्या धोरणात चळवळीच्या दबावाखाली मोठ्या सुधारणा करायला सुरुवात केली आहे.




स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम यांनी १७३९ मध्ये लिहिले होते कि ''लोकप्रतिनिधिक सरकारांची सुरूवात करण्यात आली कारण माणूस आपल्या संकुचित विचारांमुळे स्वार्थापलीकडे पाहू शकत नाही, तो त्याच्या वर्तमानकालीन लाभांमध्ये आणि लोभांमध्ये गुरफटून असतो, तो भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवू शकत नाही'' त्यांचे मानाने होते कि सरकारी संस्था, संसदीय परंपरा आणि लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थाला आळा घालतील आणि समाजाला दूरदृष्टी देण्यासाठी काम करतील. पण आजच्या जगभरातील राजकीय वातावरणावर नजर टाकली तर परिस्थिती अगदी विपरित असल्याचे लक्षात येते. कोणताही पुढारी भविष्यातील पिढीच्या भवितव्याबद्दल विचार करतांना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्यात देशांचे स्वतःचे हितसंबंध बाधा बनताना दिसतात. डेव्हिड ह्यूमला लोकशाहीकडून असलेली आशा स्पष्टपणे भंग झालेली दिसते आहे. अश्या परिस्थितीत काहीतरी जादू घडेल अशी वाट न बघता प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवात कोणीतरी करायला हवी आहेच पण प्रत्येकाला अचंभित आणि आकर्षित करणारी गोष्ट हि आहे कि हे आंदोलन कुठल्या नावाजलेल्या बुद्धिवाद्यांनी नव्हे तर एका ‘अस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी असणाऱ्या किशोरवयीन बालिकेने छेडले आहे. हा स्वमग्नतेसारखा आजार आहे, अस्पर्जर सिंड्रोमने ग्रसित माणसे एखाद्या विशिष्ट विषयांबद्दल खूपच चिंतित होतात. ते त्या विषयांना अत्यंत गांभीर्याने घेतात आणि त्याच त्याच गोष्टींसाठी आग्रह लावून धरतात..असे लोक सहसा सामाजिक संवाद कमी करतात. पण ह्याच कारणामुळे ग्रेटा ला तिचे विचार सतत लावून धरणे ते लक्ष विचलित न होऊ देता लोकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. संपूर्ण जगातलेच पुढारी परिवर्तन घडवून आणण्यात फेल ठरले आहेत असे तिला वाटते, ती यूएसमध्ये अडीच लाख लोकांच्या गर्दीसमोर उभी राहून पुढाऱ्यांना उद्देशून एक प्रश्न विचारते '' जर तुमचे घर ढासळायला लागले तर तीन आपत्कालीन बैठकी आणि हवामान आणि पर्यावरणाच्या विघटना संदर्भात चमू बोलावून आपत्कालीन शिखर परिषद घेत तुम्ही बसणार आहात का ?" तापमानवाढीमुळे संपूर्ण जगच संकटाच्या सावटाखाली आले आहे, याचे परिणाम आपण भोगत असतांना यावर तात्काळ उपाययोजना व्हायला हवेत असे तिला वाटते. ती तिच्या एका भाषणात जनतेला संबोधून म्हणते '' तुम्ही तुमच्या मुलांवर अत्यंत प्रेम असल्याचा आव आणता, पण त्यांचे भविष्य आता त्यांच्या डोळ्यादेखत संकटात घालता आहात'' आपले आपल्या माणसांवर प्रेम असेल तर जलवायू परिवर्तनासंबंधी योग्य उपाययोजना आपणच शोधून काढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या देशांनी पॅरिस ठरावानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे, हे ती जगाला ठासून सांगते आहे.




ग्रेटासारख्या किशोरीला पर्यावरणाचे जे महत्व समजले आहे त्यासाठी जगभरातील किशोर, तरुणवर्ग तिच्या सोबतीला उभे राहत आहेत. आपणही निदान आपल्या हिस्स्याचे कर्तव्य पार पाडत पर्यावरणाला घटक ठरतील अश्या गोष्टी नाकारून पर्यावरणासाठी पूरक गोष्टींचा स्वीकार करायला हवा...निदान इतके योगदान शुभेच्छांसह तिच्या चळवळीला आपण देऊच शकतो... नाही?



- रश्मी पदवाड मदनकर

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...