Wednesday 27 November 2019

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं.

Image may contain: Himanshu Bagde, smiling, sitting, sky, ocean, outdoor, water and nature




आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे आणि त्याबदल्यात उदरनिर्वाहासाठी मनासारखा मोबदलाही मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?  मला नेहमीच वाटत आलंय… जगात सगळ्यात सुखद जॉब कुठला असेल तर तो भटकंतीचा .. कोणातरीसाठी कुठल्याही कारणाने, त्यांच्याच खर्चावर मुशाफिरी करावी, मनसोक्त हिंडावं, डोंगररांगा, समुद्र किनारे, हिरवाई, जंगल, प्राणी, किल्ले, लेण्या हुडकून काढाव्या. या भटकंतीतून निरनिराळ्या अनुभूती घ्याव्या, मनात साठवाव्या. मनसोक्त हिंडून झाले की घरी परतताना खिसाही भरला असावा. असे झाले तर ? स्वप्नील वाटतं ना सगळं. स्वप्न पाहायला हरकत नाही पण त्यानं पोट भरत नसते. स्वप्न बाजूला ठेवून वास्तवात जगता आलं पाहिजे. पण वास्तव म्हणजे काय शेवटी? तुमच्या इच्छा आकांक्षा मारून, स्वप्न बाजूला सारून प्रस्थापितांच्या मळलेल्या वाटेवरून मन मारून प्रवास करीत राहणे, मारून मुटकून स्वतःला एखाद्या साच्यात बसवणे आणि एक दिवस हे जग सोडून निघून जाणे .. एवढंच तर नव्हे ना?


असा विषय आला कि 'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life ' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) हमखास आठवतो. एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात.

हे अख्ख व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या अनेक भटक्यांबद्दल आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियेचे ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुख-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत. त्यातलाच एक हिमांशू बागडे.


तो तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी. एकेकाळी आर्मीत जाऊन देशसेवा करायचे स्वप्न पाहणारा.. वाचनाचे वेड असणारा, अध्यात्मात रुची असणारा, भर तारुण्यात फुगीर वाढीव पगाराच्या नोकऱ्या खुणावत असताना वर्षानुवर्षे प्रगतीच्या चढत्या पायऱ्यांचा आलेख नाकारून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले वेल सेटल कॉर्पोरेट करिअर सोडून वाट वाकडी करत गेली २० वर्ष निसर्गाचा ध्यास घेत जंगलं पालथी घालणारा हिमांशू फार कमी वयात देश विदेशात त्याच्या जंगलवेडासाठी आणि त्यासाठी केलेल्या कामामुळे नावारूपास आला.  वयाच्या अकराव्या वर्षीच मन-मेंदूने जंगलाच्या मोहात पडला. वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने सहज जंगलात जाणे व्हायचे. तिथला निसर्ग, वातावरण, प्राणी आदीची ओढ निर्माण व्हायला हळूहळू सुरुवात झाली असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा त्याने प्रत्यक्ष वाघ बघितला. हा अनुभव रोमांच उभा करणारा होता. त्या क्षणापासून वाघांवर त्याने निरातिशय प्रेम केले. वन्यजीव संवर्धन आणि व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाघांची काळजी घेणाऱ्या मोहिमेत हिमांशूने कळत नकळत मोठी भूमिका निभावली…तुमच्या जाणिवा जर सच्च्या आणि प्रामाणि‌क असतील तर तुम्हाला तुमच्याही नकळत मार्ग गवसत जातात ह्याचेच जिवंत उदाहरण हिमांशूच्या रूपात नावारूपास येत होतं,
जंगल अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या हिमांशुला नकळत जंगलावर प्रेम जडले. औद्योगिक विकास आणि अन्य विकासाच्या नावावर जंगलाची मोठ्या प्रमाणात होणारी वाताहत पाहून तो व्यथित होतो. यातूनच तो नि:स्वार्थीपणे ‘जंगल वाचवा’ मोहिमेत सहभागी झाला. हळूहळू या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला. जंगल वाचवा, पर्यायाने वाघ वाचविण्यासाठी तो आज दिवसरात्र धडपडतो आहे.

हिमांशुच्या याच कार्याने त्याला ‘जंगलतज्ज्ञ’ अशी नवी ओळख दिली. जंगलाशी संबंधित कुठलीही गोष्ट असेल, हिमांशुला त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. त्याचे मार्गदर्शनात जंगलाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून जंगलप्रेमी प्रयत्नरत असतात. येथूनच हिमांशुचा जंगल अभ्यासक, गाईड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असा नवा प्रवास सुरू झाला.



एकदा माया नावाची वाघीण तिच्या दोन शावकासोबत हिमांशुच्या पुढ्यात आली.  तिचं बेदरकार, तेजस्वी, स्वच्छंद वर्तन तिची दखल घेण्यास भाग पाडणारच होतं. तिला माणसांबद्दल संकोच नव्हता. इतर श्वापदांचे भय तिच्या वागण्यात जाणवत नव्हते. जंगलभर मुक्त संचार करणाऱ्या मायाच्या निर्भय वागण्यानं हिमांशु तिच्याकडे आकर्षित झाला. सतत मायाचेच विचार डोक्यात येऊ लागले. तिच्या अस्तित्वाभोवताल फिरु लागले. त्याने मायाचा माग घ्यायला सुरुवात केली. तिच्या हालचालीचा अभ्यास तो करु लागला.  म्हणतात ना, प्राण्याला ‘माया’ लावली की ते ही माणसाळतात. हिमांशुचे तिच्या अवतीभवती असणे आता ‘तिच्या’ही अंगवळणी पडले होते. तिलाही त्याची कदाचित सवय झाली होती.

वाघांचे वर्तन कसे असते, वाघांच्या हद्दी कशा ठरतात, त्याची आखणी कशी करतात, वाघ त्या कशा ठरवतात, त्यासाठी कशी भांडणे करतात याविषयीची अतिशय रंजन आणि  शास्त्रीय माहिती हिमांशुला आहेच. मात्र, याही पुढे जात माया कशी वागते. आपल्या बछड्यांच्या बचावासाठी काय-काय योजना आखते, त्यासाठी प्रयत्नपूर्वक काय कुटील कारस्थान खेळते, हे सगळं हिमांशुसाठीही नवीन होते. तो सांगतो ती तिच्या काळात जंगलाची सम्राज्ञी होती तरी त्याहून अधिक तिच्या बछड्यांची आई होती. पूर्वी अनेकदा साम्राज्य हासील करण्याच्या वाघांच्या लढाईत आपले शवक गमावलेली माया, त्यांच्याच राज्यात त्यांनाच गाफील ठेवून जगायला शिकली.  एकावेळी दोन नर वाघांपासून पिल्लांचा बचाव करायला म्हणून ती कुटीलपणे दोघांशीही संबंध ठेवून दोघांनाही हे तुमचेच पिल्लं आहे या भ्रमात ठेवून त्यांच्याच कडून पिल्लांचा बचाव करून घ्यायची.

‘माया’सोबतच्या भेटी जशा जशा वाढत गेल्या तशी ती हिमांशुला अधिकच उलगडत गेली. तिच्या स्वभावाचा अंदाज त्याला बांधता येऊ लागला. तिची पुढली चाल हिमांशुला ओळखता येऊ लागली. ती कोणत्या क्षणी कुठे असेल, कुठून प्रवास करेल, कुणाशी भांडेल, कुणाशी तह करेल ह्याचे आडाखे चपखल बसू लागले. एका क्षणी माया आणि हिमांशुचे नाते इतके प्रगाढ झाले कि, ‘टेलिपॅथी’ व्हायला लागली.



जंगलात भेटलेल्या हिमांशुला आता मायाच अनेक संकेत स्वतःहून देते. हिमांशुच्या हातात जेव्हा कॅमेरा असतो तेव्हा ती स्वत:हून पोज द्यायला सज्ज होते, असेच काहीसे वाटू लागले आहे. ह्या दोघांचे हे न समजणारे अनामिक नाते अनेक माध्यमसमूहांना खुणावत राहिले. ह्यातूनच 'लोनली प्लॅनेट'च्या निवडक लेखांच्या आवृत्तीत या दोघांवर सविस्तर लिहिले गेले. हिमांशुनेही 'माया इन्चान्ट्रेस' (माया एक जादूगारिणी) या नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये चरित्र मालिका लिहिली. त्याचे अनेक फोटोग्राफ्स आंतराष्ट्रीय पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आणि गाजलेही. त्याच्या कामातून, लिखाणातून च्याट्या छायाचित्रांतून त्याचे जीवनानुभव, संवेदनशील आणि तितकेच प्रगल्भ जीवनदर्शन घडते हे निश्चित.

जंगलांचा मागोवा घेत फक्त भारतच नव्हे तर विदेशातील अनेक जंगल पालथे घालून कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची अपेक्षा न करता तो अनेक वर्ष जंगलसेवा  निगुतीने करीत आहे.  दक्षिण भारत, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर-पूर्वेतले सगळे राज्य, मध्य भारतातील ताडोबा, मेळघाट, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगढ , सातपुडा, पन्ना, गोवा, कर्नाटका, तामिळनाडू, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि भूतान येथील जंगलांना त्याने भेट देऊन तिथल्या प्राण्यांचा, निसर्गाचा अभ्यास केला या प्रवासात अनेक जंगलप्रेमींच्याही भेटी घेतल्या आणि त्याचा हा मुलखावेगळा संसार अनेक पटींनी मोठा करीत नेला आहे.



हिमांशूच्या अतुलनीय कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१२ सालचा  ''Sanctuary Asia Wildlife Photographer', 'पुरस्कार, महाराष्ट्र राज्य बायोडाइव्हर्सिटी बोर्ड अवॉर्ड',  '२०१३ चा नॅशनल बायोडाइव्हर्सिटी फोटोग्राफर अवॉर्ड',  २०१९ साली UK ने आयोजित केलेला 'Winner of Lanka Challenge' अश्या अनेक पारितोषिकाचे तो मानकरी ठरला. त्याच्या श्रमसेवेच्या आस्थेपोटी मिळालेले अनेक सन्मान आणि सत्कार त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला अभिमान बाळगण्यास उद्बोधक असेच आहेत.

असे हे हिमांशु आणि जंगलाचे अतूट नाते म्हणजे मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गावर, वन्यजीवावर प्रेम करून त्याचे रक्षण करावे, हाच संदेश देणारे आहे. या गोड, अनामिक नात्यापासून आपणही प्रेरणा घेऊ या. नाही जंगल, किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एका प्राण्यावर तरी प्रेम करुया. झाडे लावून पक्षांना आमंत्रण देऊ या…त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी……!





मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर
(प्रतिबिंब-२०१९ च्या पर्यटन विशेष दिवाळी अंकात प्रकाशित )

2 comments:

  1. धन्यवाद रश्मी

    मी खूप जंगले- अरण्ये भटकलो पण माझ्या भटकंतीला इतक्या नेमक्या शब्दात मी सुध्दा मांडु शकलो नाही. पण रश्मी तुमच्या नावातच रश्मी आहे, उजळुन टाकण्याची क्षमता आहे. माझा प्रत्येक अरण्यानुभव तुम्ही आपल्या शब्दांनी प्रकाशमान केलाय. मुलाखत घेतल्यावरही ती शब्दबद्ध करणे आणि तो अनुभव जसाच्या तसा मांडणे यासाठी कौशल्य हवं असतं. समरसून जाणाऱ्या तुझ्या लेखणीला सलाम! माझ्या भटकंतीच असंही कुणी कौतुक करेल वाटलंच नाही कधी. तू माझी परत एकदा माझ्याशीच ओळख करून दिली अणि तुझ्या लेखातून मला माझं काम नव्याने करण्याची प्रेरणा अणि उत्साह दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !

    ReplyDelete
  2. खूपच उद्बोधक आणि प्रेरणादायी लेखन...
    मानव आणि प्राणी यांचं अशाप्रकारचं
    जगावेगळं नातंही असू शकतं याची खात्री पटली!

    ReplyDelete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...