पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे. पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा.
आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय.
पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराला, लेक माहेराला, शिष्य गुरूला, मित्र एकमेकांना अगदी कुणीही कुणाला ... ''मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं'' असा खेळ खेळायचो आम्ही आमच्या लहानपणी त्या खेळातूनही आलेलं पत्र हरवलं म्हणून किती शोधायची धडपड चालायची. अश्या या पत्रांचं अनन्यसाधारण महत्व ओळखून पुढे ही पत्र साठवली जाऊन प्रकाशित होऊ लागली. संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी, स्वामी विवेकानंदांची तर कितीतरी पत्रं, महात्मा गांधींनी ॲनी बेझंटला, आचार्य विनोबा भावेंना लिहिलेली पत्रं,मग हल्लीच्या कवी अनिल आणि कुसुमावतींची पत्रं आणि अमृता प्रीतम आणि इमरोजची पत्रं ही पत्रं साहित्यप्रेमींच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. पुष्टी रेगेंच्या सावित्रीने तर साहित्य रसिकांना भुरळच पाडली होती.
पत्र व्यक्तीच्या आयुष्याचा आरसाच तर असतो जणू.
प्रेमचंद म्हणतात ''पत्र-साहित्य का महत्त्व इसलिए है कि उसमें ‘बने-ठने, सजे-सजाये’ मनुष्य का चित्र नहीं, वरन् एक चलते-फिरते मनुष्य का स्नैप शॉट मिल जाता है, लेखक के वैयक्तिक सम्बंध, उसके मानसिक और बाह्य संघर्ष तथा उसकी रुचि और उस पर पड़नेवाले प्रभावों का पता चल जाता है. जिन पत्रों के विषय और शैली दोनों ही महत्त्वपूर्ण हों, वे साहित्य की स्थायी सम्पत्ति बन जाते हैं और इस सम्पत्ति पर पाठक भी गर्व करते हैं!
याच भावभावनांचा संचय करायला पत्र वाङ्मयाची सुरुवात झाली असावी. साहित्यात आज पत्र वाङ्मयाचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी प्रकाशित होणाऱ्या पत्रिकांसाठी जी पत्रं यायची त्या पत्रांनाही साहित्यिक स्पर्शअसायचा व ती साठवली जायची, जसजसे साहित्यिकांमध्ये आत्मभान यायला लागले ते दिवंगत झालेल्या साहित्यिकांच्या पत्रांचे संकलन करून प्रकाशित करू लागले. हिंदी साहित्यात या परंपरेची प्रथम सुरुवात पं. बनारसीदास चतुर्वेदी यांनी केली त्यांनी पत्रलेखनाचा जणू ध्यासच घेतलाआणिकही लेखकांसमवेत पत्रलेखन मंडळाची स्थापना केली. उर्दूतही अनेक पत्रसंग्रह आहेतच. सर्वप्रथम उर्दूतले संकलन रजब अली बेग ‘सरूर’ यांचं प्रकाशित झालं पण मिर्ज़ा गालिब यांचे खतूत प्रकाशित झाल्यानंतर तर अनेक पत्रसंग्रह येत राहिले. कराचीवरून प्रकशित होणारे 'नकुश'१९५७ नोव्हेंबरच्या अंकात १०४० पानात १५५ प्रसिद्ध व्यक्तींचे ३००० पेक्षा जास्त दुर्मिळ पत्र प्रकाशित झाले होते.
प्रसिद्ध अमेरिकी संत एमर्सन यांच्या पत्राचं संकलन तर जवळ जवळ 32 हज़ार पानांचं आणि पाच खंडांमध्ये व्याप्त आहे. स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला लिहिलेली तत्व चिंतनपूर्ण पत्रे असूदेत, स्वामी स्वरूपानंदचे ‘पत्र-प्रबोध’ पुस्तक किंवा ‘प्रेमचंद की चिट्ठी-पत्री... डॉ. वा.श. अग्रवाल म्हणतात - ‘मेरी समझ में किसी व्यक्ति की भारी-भरकम साहित्यिक कृति आंधी के समान है, पर उसके साहित्यिक पत्र उन झोंकों के समान हैं, जो धीरे से आते-जाते रहते हैं और वायु की थोड़ी मात्रा साथ लाने पर भी सांस बनकर जीवन देते हैं.’
मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत, हे व्यवहार त्या पत्रांमार्फत करीत हि पत्रे हा इतिहासाचा आरसाच तर आहेत. त्या कालचे जगणे-वागणे त्यावेळचा कारभार-राजकारण या पत्रांतून सुस्पष्ट होतो.अस्सल पुराव्याखेरीज इतिहासाच्या नोंदी खऱ्या कश्या मानल्या जाणार. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. हा मराठी इतिहासातील पत्रव्यवहार तर बुद्धिभेद करून राजकारण करण्याचे उदाहरण कायम करणारे ठरतात.
अश्या या पत्रवाङ्मयाचा इतिहास आता संपुष्टात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. हल्ली कुणी कुणाला पत्रेच पाठवत नसल्याने हा वाङ्मयीन प्रकारचं भविष्यात बंद होणार असे स्पष्ट जाणवू लागले आहे. आणि निव्वळ हे बंद झाल्याने साहित्याचा तोटा होणार नसून इतिहास समजून घेण्याची पाळंमुळं देखील हलणार आहेत हे निश्चित.
रश्मी पदवाड मदनकर -
२४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित
No comments:
Post a Comment