तिने खरतर शाळेत असायला हवे होते.. खेळण्याबागडण्याच्या वयात जणू घराला आग लागली आहे आणि आपण सर्वांनी जागे होऊन ती विझवायला आता याक्षणी प्रयत्न करायला हवे असे तळमळीने सांगत फिरते आहे. कोण आहे ती?
ऑगस्ट २०१८ पासून “स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट” नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले, ते ग्रेटाच्या 'हाऊ डेअर यु ?' असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या यूएनमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून ''फ्राइडेज फार फ्यूचर'' ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती जी जगातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते की बेजबाबदार राजकारणी आणि उद्योगांमुळे ही धरती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायला हवे ते होत नाहीये. हे जग ही धरती जलवायू प्रदूषणापासून वाचवण्याची लढाई काही विशिष्ट लोकांचीच नाही तर या एका कारणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. नवीन पिढीला आम्ही काय देऊ शकतो, तर.. पूर्वजांकडून मिळाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी जगण्यायोग्य, जलवायू प्रदूषणमुक्त पृथ्वी सोडू याची हमी आम्ही त्यांना द्यायला हवी असे तिचे म्हणणे आहे..फक्त १६ वर्षाच्या अल्पायुत जलवायू परिवर्तनाबाबत काळजी बाळगत त्या विरोधात उभे होऊन जगभर खळबळ माजवून देणाऱ्या स्वीडनच्या या इटुकल्या क्रन्तिकारीचे नाव आहे ग्रेटा थॅनबर्ग. यावर्षी ग्रेटा यांना प्रतिष्ठित अॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिची आंदोलनाची तीव्रता बघून प्रेरित होऊन हे लोण जगभर पसरत चालले आहे. तिला ‘युनो’ मध्येच नव्हे, तर अनेक ठिकाणी बोलायला बोलावलं जात आहे.
नेमके काय झाले होते ...
ऑगस्ट 2018 मध्ये एकदा ग्रेटाने कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे होणारी तापमानवाढ या संदर्भातला एक व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला आणि तिच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. लवकरच यावर काहीतरी करण्यात आले नाही तर ह्याचा अत्यंत विपरीत परिणाम या धर्तीवर होईल व ती जगण्यायोग्य राहणार नाही, स्वीडन सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करावे यासाठी प्रयत्न करावे असे तिला वाटू लागले. त्याच काळात स्वीडनमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार होत्या तेव्हा ग्रेटाने शाळेत जाणे बंद केले. त्याऐवजी, संसदेच्या बाहेर बसून जीवघेण्या हवामान बदलाच्या विरोधात एल्गार पुकारला. सुरुवातीला ती एकटी होती पण तिने धैर्य न गमावता आपला निषेध सुरू ठेवला, हळूहळू तिचा आवाज लोकांपर्यंत पोचू लागला. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बेल्जियममधील मुले या क्रांतीमध्ये सामील झाली, यूकेमध्ये शाळेतली मुले रस्त्यावर उतरली. या सगळ्यांच्या हातात फळी होती ज्यात असे लिहिले होते की 'आपण आपले काम प्रामाणिकपणे कराल तेव्हाच आम्ही आमचे गृहकार्य पूर्ण करू'. तेव्हापासून दर शुक्रवारी शाळेसमोर निदर्शने करीत हवामान बदलाच्या विरोधात हजारो विद्यार्थी आपापल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत जगातील 100 हून अधिक देशांतील एक हजाराहून अधिक धरणे ग्रेटाच्या समर्थनार्थ झाले आहेत. या चळवळीमुळे युरोपच्या निसर्गासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात आहे. युरोपमधील बर्याच देशांनी त्यांच्या हवामान बदलाच्या धोरणात चळवळीच्या दबावाखाली मोठ्या सुधारणा करायला सुरुवात केली आहे.
स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम यांनी १७३९ मध्ये लिहिले होते कि ''लोकप्रतिनिधिक सरकारांची सुरूवात करण्यात आली कारण माणूस आपल्या संकुचित विचारांमुळे स्वार्थापलीकडे पाहू शकत नाही, तो त्याच्या वर्तमानकालीन लाभांमध्ये आणि लोभांमध्ये गुरफटून असतो, तो भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवू शकत नाही'' त्यांचे मानाने होते कि सरकारी संस्था, संसदीय परंपरा आणि लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थाला आळा घालतील आणि समाजाला दूरदृष्टी देण्यासाठी काम करतील. पण आजच्या जगभरातील राजकीय वातावरणावर नजर टाकली तर परिस्थिती अगदी विपरित असल्याचे लक्षात येते. कोणताही पुढारी भविष्यातील पिढीच्या भवितव्याबद्दल विचार करतांना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्यात देशांचे स्वतःचे हितसंबंध बाधा बनताना दिसतात. डेव्हिड ह्यूमला लोकशाहीकडून असलेली आशा स्पष्टपणे भंग झालेली दिसते आहे. अश्या परिस्थितीत काहीतरी जादू घडेल अशी वाट न बघता प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवात कोणीतरी करायला हवी आहेच पण प्रत्येकाला अचंभित आणि आकर्षित करणारी गोष्ट हि आहे कि हे आंदोलन कुठल्या नावाजलेल्या बुद्धिवाद्यांनी नव्हे तर एका ‘अस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी असणाऱ्या किशोरवयीन बालिकेने छेडले आहे. हा स्वमग्नतेसारखा आजार आहे, अस्पर्जर सिंड्रोमने ग्रसित माणसे एखाद्या विशिष्ट विषयांबद्दल खूपच चिंतित होतात. ते त्या विषयांना अत्यंत गांभीर्याने घेतात आणि त्याच त्याच गोष्टींसाठी आग्रह लावून धरतात..असे लोक सहसा सामाजिक संवाद कमी करतात. पण ह्याच कारणामुळे ग्रेटा ला तिचे विचार सतत लावून धरणे ते लक्ष विचलित न होऊ देता लोकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. संपूर्ण जगातलेच पुढारी परिवर्तन घडवून आणण्यात फेल ठरले आहेत असे तिला वाटते, ती यूएसमध्ये अडीच लाख लोकांच्या गर्दीसमोर उभी राहून पुढाऱ्यांना उद्देशून एक प्रश्न विचारते '' जर तुमचे घर ढासळायला लागले तर तीन आपत्कालीन बैठकी आणि हवामान आणि पर्यावरणाच्या विघटना संदर्भात चमू बोलावून आपत्कालीन शिखर परिषद घेत तुम्ही बसणार आहात का ?" तापमानवाढीमुळे संपूर्ण जगच संकटाच्या सावटाखाली आले आहे, याचे परिणाम आपण भोगत असतांना यावर तात्काळ उपाययोजना व्हायला हवेत असे तिला वाटते. ती तिच्या एका भाषणात जनतेला संबोधून म्हणते '' तुम्ही तुमच्या मुलांवर अत्यंत प्रेम असल्याचा आव आणता, पण त्यांचे भविष्य आता त्यांच्या डोळ्यादेखत संकटात घालता आहात'' आपले आपल्या माणसांवर प्रेम असेल तर जलवायू परिवर्तनासंबंधी योग्य उपाययोजना आपणच शोधून काढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या देशांनी पॅरिस ठरावानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे, हे ती जगाला ठासून सांगते आहे.
ग्रेटासारख्या किशोरीला पर्यावरणाचे जे महत्व समजले आहे त्यासाठी जगभरातील किशोर, तरुणवर्ग तिच्या सोबतीला उभे राहत आहेत. आपणही निदान आपल्या हिस्स्याचे कर्तव्य पार पाडत पर्यावरणाला घटक ठरतील अश्या गोष्टी नाकारून पर्यावरणासाठी पूरक गोष्टींचा स्वीकार करायला हवा...निदान इतके योगदान शुभेच्छांसह तिच्या चळवळीला आपण देऊच शकतो... नाही?
- रश्मी पदवाड मदनकर
Sundar Lekh , Abhinandan
ReplyDelete