Sunday, 31 December 2023

माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता..


वेदमंत्रों की ध्वनि में हूँ।

उपनिषदों की वाणी में हूँ।।

गीता का विश्वरूप मेरा तन है।

पतंजलि का योग मेरा मन है।।

भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ।

षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।।


पुराणों की मोहक कथाओं में हूँ।

दुखी मानव की व्यथाओं में हूँ।।

राम के धनुष का अमोघ वाण हूँ।

कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।।


लिच्छवी का गणतंत्र हूँ।

राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।।


बुद्ध की करुणा हूँ।

महावीर की धारणा हूँ।।

नानक का संदेश हूँ।

सूफ़ियों का देश हूँ।।


गिरिजाघर की प्रार्थना हूँ।

पारसियों की अग्नि याचना हूँ।।


सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ।

मानव सभ्यता का प्रदोष हूँ।।

चरक का आयुर्वेद हूँ।

कालिदास का रस संवेद हूँ।।


भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ।

शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।।

पाणिनि का व्याकरण हूँ।

आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।।


शिवलिंग अनंत हूँ।

माँ दुर्गा दिगंत हूँ।।

शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ।

दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।।


उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ।

दक्षिण में जलधि का संचार हूँ।


अर्जुन का निष्काम कर्म हूँ।

चाणक्य का राष्ट्र धर्म हूँ।।

शास्त्र की पुकार हूँ।

शस्त्र की झंकार हूँ।

ज्ञान का आलोक हूँ।

विज्ञान का विलोक हूँ।


गंगा का पावन प्रवाह हूँ।

अनेक कल्पों का गवाह हूँ।।

लोक कल्याण की भावना से ओत प्रोत हूँ।

वसुधैव कुटुम्बकम् का प्राचीन स्रोत हूँ।।


माँ भारती के मन का मीत हूँ।

सत्यमेव जयते का गीत हूँ।।

( डॉ भूषण कुमार उपाध्याय, भा पो से, से. नि.)

Friday, 22 December 2023

सक्तीची ''पाळी''



आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, पडवीत, अंगणात, तिनेच सावरलेल्या तिच्या हक्काच्या स्वयंपाक घरात देखील नाही. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक देखील ग्रहण करायचे नाकारले जायचे. तिला एखाद्या कोपऱ्यात गुपचूप बसून राहावे लागायचे. ही ''सक्तीची विश्रांती'' होती.

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात उसतोडणीला जाणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काम करू दिले जात नाही म्हणून तेथील कामगार महिलांनी गर्भाशयच काढून टाकण्याचा 'सक्तीचा' मार्ग निवडला आता त्याला अनेक वर्ष होतायेत. अशा महिलांचा वाढता आकडा आता चिंताजनक झाला आहे, त्याचे प्रतिकूल परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले.. पण अजूनही त्यावर ठोस तोडगा काही निघालेला नाही. हे प्रकरण भयंकर आहे. पाळी आलेल्या बाईला काम द्यायचे नाही हे कोण ठरवतं, तर मुकादम. पाळी येणारच नसलेल्या महिलेला नवऱ्यासह कामावर ठेवायचे हे कोण ठरवतं - मुकादम. आणि काम हवे असेल तर गर्भाशय काढून टाका हा सल्ला सुद्धा देतो मुकादम, ऐकतो नवरा आणि भोगते स्त्री... सक्तीची रजा, सक्तीचे काम, सक्तीचा सल्ला, सक्तीचा भोग.

जपानी सरकारच्या अनेक कंपनीबरोबर, वर्षभर केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की त्या वर्षभरात केवळ 0.9% महिला कर्मचार्‍यांनी मासिक पाळीमुळे होणाऱ्या त्रासामुळे रजेसाठी अर्ज केला होता. इतर महिला स्वखुशीने कामावर हजर होत्या. त्या वर्षी सरसकट १००% महिलांना मासिक पाळीत सक्तीची रजा घ्यावयास सांगितले असते तर ०.९% महिलांशिवाय इतर महिलांवर तो सक्तीचा न्याय ठरला असता काय कि अन्याय ठरला असता ? किंवा त्यांना त्यांच्या कार्यापासून, कर्तव्य निभावण्यापासून वंचित ठेवले गेले असा त्याचा अर्थ काढता आला असता का ?

हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, नुकतंच राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच मासिक पाळी येणं हे काही अपंगत्व नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर मासिक पाळीच्या काळात त्रास होणाऱ्या महिलांना पगारी रजा मिळण्याच्या विषयावर घमासान सुरू आहे. असं असलं तरी महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. जगाच्या वेगवेगळ्या देशात यावर उहापोह देखील झाला, त्यावर मतभेद झाले. पण तोडगा मात्र आजतागायत कुठेही निघालेला नाही.


जागतिक इतिहास :
औपचारिक मासिक पाळीच्या रजेची कल्पना सुमारे एक शतकापूर्वी सोव्हिएत रशियामध्ये उद्भवली, जेव्हा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना 1920 आणि 30 च्या दशकात त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पगाराच्या श्रमातून मुक्त करून सक्तीच्या रजेवर पाठवायला सुरुवात झाली. त्यानंतर 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानमधील कामगार संघटनांमध्ये या कल्पनेने जोर धरला आणि अखेरीस 1947 मध्ये जपान देशाच्या कायद्यात हा अंतर्भूत झाला. जपानमधील या निर्णयामागील विचार काही प्रमाणात महिलांच्या प्रजननक्षमतेच्या सिद्धांतांवर आधारित आहे, युनियनने चेतावणी दिली आहे की दीर्घ तास आणि खराब स्वच्छताविषयक परिस्थिती त्यांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेस हानी पोहोचवू शकते, म्हणून या काळात त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. म्हणजे ह्यातही महिलांच्या आरोग्याविषयी, तिला होणाऱ्या त्रासासाठी किंवा तिच्या स्वतःच्या मर्जीसाठी नव्हे तर, ही सक्तीची रजा तिने पुढल्या पिढीला जन्म घालताना काही कसूर सुटू नये या स्वार्थी विचाराभोवती फिरणारा आहे.

काही देशात अशा योजना करण्यात आल्या की, मासिक पाळीच्या दिवसात महिलांना सुट्टी घेता येईल मात्र त्यांच्या कामाचे तास नंतरच्या काळात त्यांनी ज्यादा काम करून भरून काढायचे आहेत. तिथे मात्र एक वेगळी अडचण निर्माण झाली.. तेथील पुरुषांना आपल्यालाही महिन्याला चार सुट्ट्या जास्त मिळाव्या असे वाटू लागले आणि दुसऱ्या बाजूला मासिक पाळी जास्त वेदनादायी आहे की, पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणारे जास्तीचे तास त्रासदायक आहेत हा भेद करणं महिलांना कठीण झालं. अखेर या सगळ्याला महिलाच बळी पडताहेत या विचारला अधिक बळकटी येऊ लागली.

2016 साली चार इटालियन खासदारांनी दरमहा तीन दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेचा प्रस्ताव संसदेत मांडला होता, जो पुढे अयशस्वी झाला. तो अयशस्वी होण्यामागे महिलांचाच सहभाग जास्त होता कारण त्यांना काळजी वाटत होती की आधीच नोकऱ्यांवर पुरुषी वर्चस्व असतांना आणि नोकरी पेशात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, नियुक्ती होण्याआधीच महिला कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे प्रमाण या एका कारणाने वाढीस लागेल. ट्रेंटो विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डॅनिएला पियाझालुंगा तेव्हा म्हणाल्या, “माझ्यासह—बहुतेक लोकांना असे वाटले की यामुळे स्त्रियांना अधिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागेल.”

आणखी एक २०१४ साली केलेला सरकारी सर्वे असेही सांगतो कि ०.८ % महिलांना सोडले तर इतर महिला पाळीच्या काळातील त्रासाबद्दल सुट्टी घेऊ शकल्या नाही कारण त्यांना त्यांच्या वरिष्ठांना ते पटवून देणे फार कठीण वाटले किंवा वरिष्ठांमध्ये या बाबतची जागृतता आणि समजूतदारपणाची उणीव भासली.

मासिक पाळीच्या रजेचा जगभरातील नियोक्त्यांद्वारे स्वीकार केला जात असताना, यूएसमध्ये या कल्पनेला फारसा फायदा झाला नाही. हेल्थ केअर फॉर वुमन इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 600 अमेरिकन लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जवळजवळ निम्म्या प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की मासिक पाळीच्या रजेचा परिणाम होईल. काहींनी चिंता व्यक्त केली की ज्यांना मासिक पाळी येतच नाही अशा लोकांसाठी हे धोरण अन्यायकारक असेल किंवा अशा सुट्ट्यांचा हिशेब कोण आणि कसा ठेवणार ? या रजेचा गैरवापर केला जाणार नाही ह्याची शाश्वती कशी दिली जाऊ शकते.

भारतात, फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato ने २०२० या वर्षी कर्मचार्‍यांना वर्षातून 10 दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेची मुभा देण्यास सुरुवात केली आणि देशातील काही खाजगी कंपन्यांमध्ये सामील झाले ज्यांनी मासिक पाळीच्या संदर्भात भारताच्या दृढ निषिद्धांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की पॉलिसी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच झाल्यापासून, 2,000 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेतलेल्या 621 महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर केला आहे. तरी अजूनही भारतासारख्या देशात महिला कर्मचार्‍यांना असे वाटते की त्यांची अनुपस्थिती मासिक पाळीशी संबंधित आहे ही अत्यंत खाजगी गोष्ट सार्वजनिकपणे उघड करावी लागणे हे देखील अन्यायकारक ठरू शकेल. दुसरे, महिलांना सुट्टी हवीय का ? की त्यांना कामात व्यस्त राहणे आवडते. हा जिचा तिचा निर्णय असू शकतो. जसे आरोग्याची समस्या असतानाही कामावर यावेच लागेल हे अन्यायकारक आहे तसेच फक्त पाळी आहे म्हणून कामावर येऊच नये हे देखील तिच्यालेखी अत्यंत बळजबरीचे आणि अन्यायकारक असू शकेल.


असे कायदे लागू करण्याआधी खरी गरज आहे ती काही पूर्वतयारी करण्याची, महिला करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी मासिक पाळी साक्षरता आणि त्याला पूरक अशी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. कोणतीही धोरणे केवळ तेव्हाच प्रभावी होऊ शकतात जेव्हा कामाच्या ठिकाणी मासिक पाळी येत असलेल्यांसाठी विचारांचा समंजस मोठेपणा आणि त्यासाठी समर्थनाची स्पष्ट संस्कृती असेल. यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये मासिक पाळीच्या उत्पादनांचा पुरवठा करणे, स्वच्छता व आरोग्याविषयी आवश्यक संसाधनांची पूर्तता करणे आणि त्या त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या संघांना मासिक पाळी सारख्या विषयांवर कशी प्रतिक्रिया द्यायची आणि कसे समर्थन व सहयोग द्यावा याची समज आहे याची खात्री करणे अश्या गोष्टी समाविष्ट करता येतील.


खरतर महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे, वेगळे समजणे, दूर लोटणे.. त्याला नाव काहीही दिले तरी. असे होऊ नये की प्रगतीची कास धरताना आपला प्रवास उलट्या दिशेने होऊ लागेल. मला अनेकदा हा प्रश्न पडतो, महिलांबाबतचे अनेक नियम पुरुषांना का ठरवावे वाटतात किंवा ते ठरवताना किती स्त्रियांचा सहभाग, मत, निर्णय घेतले, मान्य केले जातात ? तिच्या बाबतीत तिला काय हवंय, काय करायचंय हे तिचे तिने ठरवायला, निर्णय घ्यायला आणि त्यावर अंमल करायला ती समर्थ आहे आणि सक्षमही. गरज आहे ती तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभे राहून तिला स्वातंत्र्य देण्याची.

भारतात हा कायदा निघालाच तर यातल्या किती मुद्द्यांवर विचार केला जाईल हे बघण्यासारखे असणार आहे..
तूर्तास सुट्टी द्यायची की द्यायची नाही या वर्चस्ववादी वादापेक्षा ''पाळीत तिला सुट्टी घ्यायची असेल तर अडवणूक नको आणि नको असेल तर बळजबरी नको असा कायदा निघत नाही तोवर वाट बघूया...


रश्मी पदवाड मदनकर
7720001132


(आजच्या तरुण भारत आकांक्षा पुरवणीत प्रकाशित कव्हर स्टोरी)



Tuesday, 19 December 2023

इन्स्युलिनच्या जन्माची कथा -





१९२२ च्या पूर्वी मधुमेहाने मरणाऱ्यांची संख्या टोकाला गेली होती. लहान मुलांना देखील मधुमेहाने ग्रासले होते. पहिल्यांदा इन्सुलिनचा शोध लागला तेव्हा अश्याच मरणासन्न मुलांवर हा प्रयोग करायचे ठरले. 1922 मध्ये, शास्त्रज्ञांचा एक गट टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मधुमेही मुलांना एका वेळी 50 किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठेवले जात होते. त्यापैकी बहुतेक कोमॅटोज (बेशुद्धावस्थेत) होते आणि डायबेटिक केटोआसिडोसिसमुळे मरणाच्या सीमारेषेवर पोचले होते.


मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवांचे निकामी होणे सुरु झाले की मृत्यूच ह्यांना सोडवेल अशी धारणा असे, त्यामुळे मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मधुमेहाच्या पहिल्या स्तराच्या रुग्णावर प्रयोग करण्यापेक्षा मरणासन्न मुलांवर उपचार करणे योग्य होते, कारण तशीही त्यांच्या परतण्याची आशा कमी होती त्यामुळे प्रयोग फसला तरी त्याने जास्त नुकसान होणार नव्हते. पण प्रयोग यशस्वी झाला तर ह्या लहान मुलांचे आयुष्य सत्कर्मी लागणार होते. त्यांनाही जीवनदान मिळणार होते. शास्त्रज्ञांनी झपाट्याने हालचाली सुरु केल्या आणि इन्सुलिनच्या नवीन शुद्ध अर्कासह मुलांना इंजेक्शन देण्यास पुढे सरसावले.

त्यांनी एकेक मुलाला शुद्ध अर्काच्या इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. ते जसजसे एकेक मुलाला इंजेक्शन देत पुढे जाऊ लागले तसतसे आधी इंजेक्शन दिलेली मुले शुद्धीवर येऊ लागली. मग एक एक करून सर्व मुले त्यांच्या डायबेटिक कोमातून जागी झाली. मृत्यू, दुःख, भीती आणि अंधकाराने भरलेली खोली अचानक आनंद आणि आशेने भरून गेली.
 
1920 च्या दशकाच्या सुरुवातीस, फ्रेडरिक बॅंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी टोरंटो विद्यापीठात जॉन मॅक्लिओडच्या अंतर्गत इन्सुलिनचा शोध लावला. जेम्स कॉलीप यांच्या मदतीने इन्सुलिनचे शुद्धीकरण करण्यात आले, ज्यामुळे ते मधुमेहावर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले. १९२२ मध्ये त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर जगभर मधुमेहावर उपचार करणे शक्य झाले. बॅंटिंग आणि मॅक्लिओड या दोघांनाही 1923 मध्ये त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बॅंटिंग यांना नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते आणि त्यांनी बक्षिसाची अर्धी रक्कम बेस्टसोबत शेअर करायचे ठरवले, जो त्यांचा सहाय्यक होता आणि त्यावेळी तो फक्त 24 वर्षांचा होता. बॅंटिंगने पेटंटवर आपले नाव देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते टोरंटो विद्यापीठाला $1 मध्ये विकले. लाखो जीव वाचवणाऱ्या शोधातून फायदा मिळवणे अनैतिक आहे असे त्याला वाटत होते..
 
"इन्सुलिन हे माणसांना जगवण्यासाठी आहे, त्यामुळे ते माझे नाहीच, ते जगाचे आहे" तो म्हणाला होता.
इन्सुलिनवर पेटंट नसल्यानेच जगभर त्याचा उपयोग करून रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. अशा माणसांना सलामच करायला हवा.
 
इन्स्युलिनच्या प्रयोगाला आणि मानवी सेवेत उतरले त्याला आता १०० वर्ष झालीत . ही कथा इंग्रजीतून वाचनात आली, वाटलं सर्वांशी शेअर करावी. म्हणून हा भावानुवाद प्रपंच.

मनाचा थांग लागेना

 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना  

मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना 


उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य  

फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना 


प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर 

प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना 


नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता  

अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेना


सख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा 

सुरांना ताल जोडावा, लयी बेताल चालेना

Tuesday, 3 October 2023

संस्कृती संरक्षणाची अफगाणी धडपड

गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर अचानक अफगाण महिलांचे अतिशय सुंदर सुंदर पोशाखात फोटो झळकू लागले. काही जुन्या काळचे गटागटाने काढलेले फोटो, काही सणावरांचे तर काही आत्ता वर्तमानातील महिलांचे. हे सगळे फोटो त्यांच्या आजवरच्या संस्कृतीची ओळख सांगणारे, पारंपरिक पोशाख परिधान केलेले आहेत. हे रंगीबेरंगी हसरे फोटो पाहून आनंद व्यक्त करावा वाटला पण या हसऱ्या फोटोंमागे कुठलीशी वेदना डोकावते आहे हे त्यावरील आठवडाभर trending होत गेलेल्या हॅशटॅगवरून लक्षात आले. हा hashtag होता #DontTouchMyCloths. 



अशा विचित्र अर्थाचा hashtag का? त्याच्या कारणांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा.. माझ्याचसारख्या, माझ्याच युगात ह्याचं धर्तीवर एकाच काळात जन्म घेऊनही वेगवेगळ्या प्रांताचा आणि संस्कृतीचा भाग असल्याने आम्हाला जगाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या विरोधाभासी आयुष्याचे अप्रूप वाटत गेले..आणि तेथील 'ति'च्यासाठी अनुकंपा दाटून आली. 

तीन वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत, तर त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या दैनंदिन हालचालींपर्यंत निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी तालिबानची सत्ता गेल्यानंतर महत्प्रयासाने जे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळवण्यासाठी तेथील महिलांनी जीवाचे रान केले, संघर्ष करत महिलांना शिक्षण नोकरी कायदे अधिकार मिळवून दिले. सगळं आलबेल चालू असताना तालिबानी सत्ता पुन्हा आरूढ झाली आणि मिळवलेलं आता सगळंच मातीत मिळून निरर्थक ठरतं की काय अशी भीती वाटू लागली आहे. तरी अजूनही हार न मानता स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महिलांचे जिवतोडून प्रयत्न सुरू आहेत..

 तालिबानी शासनाने महिलांच्या जगण्यावर अन्यायकारक प्रतिबंध लावणारे कायदे कायम करण्यासाठी तेथील नागरिकांचाच उपयोग करून घेत त्यांचे अनिर्बंध अन्यायी पंख पसरायला सुरुवात केली आहे. ह्याचे जिवंत उदाहरण सांगणारी घटना नुकतंच  घडली. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकणाऱ्या काळ्या आबाया घातलेल्या महिलांनी गेल्या आठवड्यात तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये मोठी रॅली काढली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचे असे मत होते की "आधुनिक, रंगीत कपडे आणि मेकअप परिधान केलेल्या अफगाण महिला देशातील मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. संपूर्ण शरीर झाकणारे अबाया, बुरखा आणि निकाब न घालणाऱ्या स्त्रिया परकीय संस्कृतीच्या अधीन गेल्या असून, शरिया कायद्याशी विसंगत असलेल्या आहेत. असे स्त्रियांचे हक्क आम्हाला नको आहेत. आम्हाला तालिबानी नियाब कबूल आहेत"

तालिबान शासित अफगाणिस्तानात स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी चिंतित, जागरूक, लढा देणाऱ्या महिलांसाठी ही रॅली म्हणजे एक धक्का होता. अफगाणिस्तानमधील अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाची प्राध्यापक डॉ. बहर जलाली या सर्वप्रथम ह्या मोहिमेविरोधात पुढे आल्या. इतर माध्यामांजवळ त्यांचे विचार व्यक्त करण्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. अफगाणिस्तानची अस्मिता आणि सार्वभौमत्वावर आघात होत असल्याने ही मोहीम सुरू केल्याचे बहार जलालीचे म्हणणे आहे. खरी अफगाण महिला अगदी पूर्वापार कशी होती.. त्यांची खरी संस्कृती काय होती हे सांगण्यास तिने सुरुवात केली. हिरव्या अफगाण पारंपरिक सुंदर पोशाखात तिचा फोटो शेअर करत तिने इतर अफगाण महिलांना 'अफगाणिस्तानचा खरा चेहरा' जगाला दाखवण्याचे आवाहन केले. अफगाण महिलांनी हातोहात ही मोहीम उचलून धरली. त्यांनी त्यांचे पारंपारिक कपडे, राहणीमान, पूर्वी उपभोगलेलं स्वातंत्र्य, त्याचा इतिहास आणि बरंच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर ठेवण्यास सुरुवात केली. हे करताना त्यांनी #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture सारखे हॅशटॅग वापरले, जे सध्या सर्वत्र trending आणि viral होत असून, जगभरातल्या स्त्रिया त्यांच्या समर्थनार्थ या सोशल मीडिया मोहिमेत जुळत चालल्या आहेत. 

बहर जलाली म्हणते, "मला जगाला सांगायचे आहे की, तालिबान समर्थक रॅली दरम्यान तुम्ही मीडियामध्ये जी पूर्ण झाकलेल्या स्त्रियांची छायाचित्रे पाहिली ती आमची संस्कृती नाही. ती आमची ओळख कधीच नव्हती. पारंपारिकपणे रंगीबेरंगी कलात्मक कपडे परिधान करणार्‍या अफगाण लोकांसाठी संपूर्ण शरीर झाकणे हीच खरेतर परदेशी संकल्पना आहे. जी आमच्यावर लादली जाऊ शकत नाही." 

यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या अनेक नामवंत, प्रतिथयश महिलांनी फोटोंसह मत व्यक्त केले. अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा पारंपारिक पोशाख आहे. इतकं वैविध्य असूनही, त्यात रंग, आरसे आणि भरतकामाचा भरपूर वापर आहे. रंगीबेरंगी व कलात्मक पद्धतीने तयार केलेले कपडे परिधान करणे हीच आमची सांस्कृतिक ओळख आहे जी आम्ही मिटू देणार नाही. असे त्यांचे मत आहे. 

व्हर्जिनियातील मानवाधिकार कार्यकर्त्या स्पोझमे मसीद यांनी पारंपरिक पेहराव्यातील विविध स्त्रियांचे फोटो टाकत ट्विटरवर लिहिले, "हा आमचा खरा अफगाण पोशाख आहे. अफगाण स्त्रिया असे रंगीबेरंगी आणि शोभिवंत कपडे घालतात. काळा बुरखा हा अफगाणिस्तानात कधीही पारंपारिक पोशाख नव्हता" पुढे त्या म्हणतात "आम्ही शतकानुशतके इस्लामिक देश आहोत आणि आमच्या आजींनी त्यांचे पारंपारिक कपडे सन्मानाने परिधान केले आहेत. त्यांनी ना निळी चादीरी घातली होती ना अरबांचा काळा बुरखा" त्यांच्या पुढल्या एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या "आमचे पारंपारिक कपडे पाच हजार वर्षांच्या आमच्या समृद्ध संस्कृतीचे आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अफगाणीला त्याचा सार्थ अभिमान आहे."

37 वर्षीय अफगाण संशोधक लिमा हलिमा अहमद सोशल मीडियावर लिहितात, "मी माझा फोटो पोस्ट केला कारण आम्ही अफगाण महिला आहोत. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आमचा विश्वास आहे की कोणताही अतिरेकी गट आमची ओळख ठरवू शकत नाही. आमची संस्कृती कधीच काळी नव्हती, ती सदैव रंगांनी भरलेली आहे. त्यात सौंदर्य आहे, त्यात कला आहे आणि तीच आमची ओळख आहे" 

अफगाणिस्तानच्या पुराणमतवादी लोकांचेही म्हणणे आहे की, त्यांनी महिलांना काळ्या रंगाचा निकाब घातलेला कधीच पाहिला नाही. 

गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या लीमा हलिमा अहमद काबूलमध्ये झालेल्या रॅलीचां संदर्भ देत सांगतात, "महिलांना त्यांचा पोशाख निवडण्याचे पूर्वीपासूनच स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचा ड्रेसकोड कधीच कोणी ठरवून दिला नाही. आम्ही अफगाण महिला आहोत आणि आम्ही आमच्या महिलांनी कधीही त्यांचे शरीर पूर्णपणे झाकलेले कपडे घातलेले पाहिले नाही. ज्या प्रकारचे काळे हातमोजे आणि बुरखे रॅलीत महिलांनी घातले होते, त्यावरून असे वाटत होते की, रॅलीसाठी ते खास शिवलेले असावे, ही रॅली तालिबानने मुद्दाम घडवून आणलेली होती."

या सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये सक्रिय असणारी  आणखी एक महिला म्हणजे मलाली बशीर, ही प्रागमधील पत्रकार आहे. अफगाण देशाचे सौंदर्य जगाला दाखवण्यासाठी ती सुंदर कपड्यांमधील अफगाण महिलांची चित्रे बनवते. ती म्हणते, "शहरात सोडा अगदी गावात देखील कोणीही काळा किंवा निळा बुरखा आजवर घातला नाही. पूर्वीपासून लोक फक्त पारंपारिक अफगाणी कपडे घालायचे. वृद्ध स्त्रिया डोक्यावर रंगीत चित्रांचा स्कार्फ घालत तर लहान मुली रंगीबेरंगी शाल ओढत. अलीकडे, अफगाण महिलांवर त्यांचा अस्सल सांस्कृतिक पोशाख बदलण्यासाठी दबाव वाढला आहे. लोकांना स्त्री दिसू नयेत म्हणून त्यांना पूर्ण झाकलेले कपडे घालण्यास सांगण्यात येत आहे. मी अनेक पुरातन स्त्रियांचे पेंटिंग्ज आजवर बनवले आहेत ज्यामध्ये अफगाण स्त्रिया त्यांचे पारंपारिक कपडे परिधान करतात. पेंटिंगमध्ये त्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय नृत्य 'अट्टन' सादर करतानाही दिसतात" 

या सर्व प्रकरणात तालिबान मात्र अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत. तालिबानचे म्हणणे आहे की महिलांना शरिया कायदा आणि स्थानिक परंपरांनुसारच अभ्यास आणि काम करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र यासोबतच ड्रेस कोडचे कठोर नियमही लागू होतील, जे त्यांना पाळणे बंधनकारक असेल. 

या अन्यायकारक कायद्यांचे समर्थन तेथील अफगाण पुढारी देखील करतात, पर्यायाने स्वसंरक्षणार्थ काही अफगाण महिलांनी आतापासूनच काळजी घेत चादरी, आबाया, नीकाब घालण्यास सुरुवात केली आहे. या निळ्या रंगाच्या ड्रेसने महिलांचे डोके ते पाय अगदी डोळे देखील झाकलेले असतात. कधी नव्हे ते काबूल आणि इतर शहरांमध्ये महिला या चादरी मोठ्या प्रमाणात परिधान करताना दिसू लागल्या आहेत. ह्याचीच चिंता आता परिवर्तनशील, उदारमतवादी, स्त्रीवादी अफगाण महिलांना सतावू लागली आहे, म्हणूनच विविध माध्यमांचा उपयोग करत त्या त्यांचे मत जगासमोर मांडत आहेत. जगभरातून त्यांच्या मानवी अधिकारासाठी आणि स्वातंत्र्यासाठी समर्थन यावे एवढीच त्यांची अपेक्षा असावी. स्त्री म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आपण त्यांची सोबत द्यायला काय हरकत आहे ? 

- रश्मी पदवाड मदनकर


(Published on 30 September 2023 in Tarun Bharat 'Akanksha' Suppliment)

Thursday, 24 August 2023

डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री 

स्पर्शातुन उठते काहूर पोचण्यास गात्री गात्री 


श्वासात कोरल्या गेल्या व्याकूळ मनाच्या गाठी 

आठवता गहिवर येतो त्या धुंद क्षणांच्या भेटी 


ही ओढ अनामिक दाटे मोहरून येते काया 

देहात असा दरवळतो तू मोहक अत्तर फाया 


का नाव तुझे घेताना ओथंबुन श्रावण येतो 

सावळा मेघ भिरभिरतो देहावरती कोसळतो 


हे सौख्य असे नात्याचे की नुसते आभासाचे 

मी भान हरपुनी आहे की बघते स्वप्न सुखाचे 


पोचल्या कश्या ना हाका का साद न पडली कानी 

मी व्याकुळ आहे इकडे का तुझ्या न आले ध्यानी 


©रश्मी पदवाड मदनकर

विधाता वृत्त

Saturday, 29 July 2023

जरा हासून घेते..

 गालगागा*4


मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते

काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते


ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या

लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते


भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले

मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते


सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना

वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते


नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही

वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते


या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे‌ ते

चिडवते मी प्राक्तनाला  अन् जरा हासून घेते

पिसे लागले ..

 

फुलाच्या तनाशी धुके दाटले  

कशी पाकळी ही दिसे साजरी 

पिसे लागले सावळ्याचे तिला 

जडाली अशी प्रीत भुंग्यावरी 


सुगंधी असा स्पर्श देहावरी 

नव्याने पुन्हा वेचते, लाजते

अश्या स्निग्ध वेळी नसे भानही 

तिचे अंग धुंदीत नादावते 


कहरतो जरा श्र्वास गंंधाळतो

तमोधुंद काया तशी थरथरे

चढे कैफ सारा नशा लाघवी 

तिच्या तप्त देही भरे कापरे


सरी पावसाच्या उरी झेलते

झिरपते मनाशी जरा ओलही

तसा डळमळे देठही साजरा 

फुलाला पडे लाजरे स्वप्नही 


बिलगतो जसा चुंबतो देह तो

तिची पाकळी दरवळे मोहवे

नव्या यौवनाची नशा आगळी

निसटत्या क्षणा ओंजळी साठवे


तिला साहवेना पिडा वैभवी

निरंतर छळे वेड ते लावते 

पुन्हा भेटण्याला किती आसुसे

तिचा रंग कोमेजुनी सांगते


©रश्मी पदवाड मदनकर

Friday, 21 July 2023

नैतिकतेची कँडी'क्रश'

 महेंद्रसिंग धोनीचा 'कॅण्डी क्रश' खेळतानाचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आणि तासाभरात कॅण्डी क्रशचे ऍप्लिकेशन 30 लाख लोकांनी डाउनलोड केल्याची बातमी पसरली. बघता बघता बातमीचीही बातमी झाली आणि सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म धोनीच्या फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांनी ओसंडून वाहू लागले. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. काहींच्या मते धोनी विमान सफरीच्या फावल्या वेळेत कँडी क्रश खेळताना कॅमेरात कैद होणं हा निव्वळ योगायोग होता आणि त्याची ही नैसर्गिक आवड लोकांना आवडली; तर काहींच्या मते ही हेतुपुरस्सर केलेली कँडी क्रश ॲपची जाहिरात होती आणि त्यासाठी सगळं वातावरण प्लॅन केलं गेलं होतं. विषय धोनीचं कँडी क्रश खेळणं हे सहज होतं की हेतुपुरस्सर हा नाहीच आहे, विषय खरंतर त्या पलीकडचा आणि जरा गंभीर असा आहे. धोनी त्याच्या फावल्या वेळात खेळतो म्हणून तासाभरात ३० लाख लोकांनी एखादा गेम डाऊनलोड करून घेणं हा आकडाच जरा अचंबित करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या वागण्याचा, आवडीनिवडीचा संपूर्ण समाजावर केवढा मोठा प्रभाव असतो ह्याचे हे जिवंत उदाहरण. ह्याची जाणीव आणि त्याबाबतची आवश्यक संवेदनशीलता किती सेलिब्रिटींना असते हा  खरा प्रश्न, या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. 




 भारत हा बहुतांश भाबड्या लोकांचा देश आहे. भारतातला प्रत्येक माणूस अगदी आबालवृद्ध कुठल्यातरी सेलिब्रिटीचा चाहता असतो. ते खेळाडू असतील, चित्रपट अभिनेते असतील किंवा राजकीय नेते; आपल्या आवडत्या सेलिब्रिटींवर जीवही ओवाळून टाकायला इथली माणसं तयार असतात. मला आठवतं २००९ साली आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांच्या आत्महत्यांची मोठी लाट उसळली होती. ह्या आत्महत्या थांबवायला विशेष प्रयत्न करावे लागले होते. ह्या सेलिब्रिटींचा सामान्यांच्या आयुष्यावर असा फार गहिरा प्रभाव असतो. अगदी त्यांच्या हेअरस्टाईलपासून ते त्यांच्या लाईफस्टाईलपर्यंत लोकं त्यांना फॉलो करत असतात. एकेकाळी 'साधना' या चित्रपट अभिनेत्रीची हेअरस्टाईल खूप गाजली होती, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ट्रेंडिंग होती. कपाळ रुंद असल्याने ते लपवायला समोर काढलेल्या केसांच्या बटा देशभरातल्या मुलींच्या आकर्षणाचा विषय झाला होता. त्याकाळात प्रत्येक मुलीला साधनासारखं दिसायचं असायचं आणि म्हणून कपाळावर केसांच्या बटा पसरून तिच्यासारखं दिसण्याचा त्या प्रयत्न करायच्या. अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, संजय दत्त आणि सलमान खान यांच्याही हेअरस्टाईल तत्कालीन तरुणांनी मोठ्या प्रमाणात कॉपी केली होती. मुमताजच्या साडी नेसण्याची पद्धत, आशा परेखच्या ड्रेसचा पॅटर्न, श्रीदेवीने चांदणी चित्रपटात नेसलेल्या कोऱ्या रंगीत साड्या, माधुरी दीक्षितने 'दिल तो पागल है' मध्ये घातलेले पारदर्शक सलवार हे देशात अनेक वर्ष त्यांच्या त्यांच्या नावाने ओळखले, खपले, विकले जात राहिले. जबरदस्त चाहते असणाऱ्या अश्या सेलिब्रिटींच्या या प्रसिद्धीचा कुठल्या कुठल्या पद्धतीने उपयोग करून घेता येईल ह्यासाठी पूर्वीपासूनच जाहिरात कंपनी देखील प्रयत्नरत असतात. पूर्वी या सगळ्याचा फक्त सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी उपयोग केला जायचा, ह्यात सरकारी जाहिरातींचाही समावेश होता आणि कलाकार स्वतःही अनेकदा नैतिक जबाबदारी म्हणून, सामाजिक देणं फेडायचं म्हणून समाजहिताच्या जाहिराती करत असत. एक काळ होता देशातून पोलिओ ह्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवली जात होती. त्यासाठी ५ वर्षाखालील प्रत्येक मुलांना पोलिओची लस पाजणे अनिर्वार्य होते. अश्यात देशातील  सगळ्यात लोकप्रिय आणि प्रत्येकाला आपलासा, विश्वासार्ह वाटणारा सिनेअभिनेता अमिताभ बच्चनने ही सरकारी जाहिरात स्वीकारली आणि त्यांच्या माध्यमातून अगदी घराघरात पोचून, लोकांचा विश्वास संपादन करत, लस घेण्याचे महत्त्व पटवून, लोकांना आरोग्य विभागापर्यंत खेचत आणून, प्रत्येक लहान मुलांनी लस घेतलीय हे खातरजमा करत, भारतातून पोलिओ हा आजार हुसकावून लावण्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदवला. एकेकाळी अध्यात्मिक, देवभोळ्या असणाऱ्या भारत देशात नॉनव्हेज खाणे फार साधारण मानले जात नसे. नॉनव्हेज खाण्याचे विशेष दिवसच ठरलेले होते. तेव्हा प्रोटीनचे उत्तम स्रोत असलेले अंडे लोकांनी खावेत यासाठी चक्क सरकारला खेळाडू सेलिब्रिटींना घेऊन "संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे" अशी जाहिरात करावी लागली होती. ही जाहिरात तेव्हा दारासिंग ह्यांनी आणि पुढे कपिल देवने केली होती.

आजचा काळ हा सामाजिक माध्यमांचा (सोशल मीडिया) काळ आहे असे आपण सहज बोलून जातो. समाज माध्यमांमुळे, इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे असेही म्हंटले जाते. इथे टिकून राहण्यासाठी, दिसण्यासाठी 'कट थ्रोट' स्पर्धाच जणू चालू असते. मध्ये एक जाहिरात आली होती त्यात अनुष्का शर्मा म्हणाली की - "Whatever you do, whatever you say, if you are trending you are here to stay." म्हणजे काहीही करा, काहीही बोला, जर तुम्ही प्रसिद्धी माध्यमात सर्वात वर किंवा प्रकाश झोतात राहाल तरच तुम्ही इथे राज्य कराल. समाज माध्यमांचा इतका पगडा का बसला हा खरेतर समाजाच्या स्वास्थ्याचा विषय होऊ शकेल. सोशल मीडिया किंवा व्हर्च्युअल जग हे सुद्धा शेवटी खऱ्याखुऱ्या समाजाचाच आरसा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. सामाजिक माध्यमे हे देखील सध्याचे जाहिरात करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. पण इथे टिकून राहण्यासाठी असण्यापेक्षा दिसण्यावर अधिक भर दिला जातो. उत्पादन कितीही चांगले असले तरी ते विकण्यासाठी आकर्षक पॅकेज तयार केले जाते. आतल्या मालाच्या दर्जापेक्षा जास्त त्याच्या बाहेरील स्वरूपावर लक्ष दिले जाते, खर्च केला जातो. ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी ऑफर्सचा देखील वापर केला जातो, आणि मोठ्या प्रसारासाठी सेलिब्रिटींचा वापर मग ओघाने आलाच. मात्र या सगळ्या स्पर्धेत टिकाव धरायला, प्रसिद्धी मिळवायला-टिकवायला उर फोडून धावताना समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारीदेखील आहे ह्याचा विसर सेलिब्रिटींना पडतो आहे की काय असे प्रश्न देखील राहून राहून उठत राहतात. जेव्हा ह्या प्रसिद्ध व्यक्ती अयोग्य, घातक किंवा चुकीच्या उत्पादनांची जाहिरात बिनदिक्कत करताना दिसतात. तेव्हा त्याचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात समाजमनावर पडत असेल यात आता काही शंकाही उरलेली नाही. पण मग ते असे का करतात? त्यांना समाजाची काळजी का नसेल, हा प्रश्न सलत राहतो. 

 समाजाप्रती नैतिकतेची जाणीव न ठेवता, स्वार्थापोटी आंधळे होवून कृती करणे, मोह उत्पन्न होवून चोरी करणे, खोटे बोलणे, एखाद्याला शारिरीक मानसिक हानी होईल अश्या गोष्टी करायला लावणे ह्या नैतिक अधःपतनाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. नैतिक गोष्ट ही कल्याणवादी, उपयोगितावादी, सर्वभुतहितवादी असते. ही कृती करणारा आणि ती ज्याच्यासाठी केली आहे अशा दोघानाही  त्याचा सारखाच फायदा होत असतो. पण आजच्या युगात जरा वेळ थांबून शांतपणे ह्या सगळ्याचा विचार करायला आणि नैतिक बाबींची जबाबदारी घेऊन, महत्त्व समजून कृती करायला वेळ कुणाकडे आहे ? अगदी लोकप्रिय असणाऱ्या आणि मोठ्या संख्येने लोकं ज्यांची नकल करतात अश्या सेलिब्रिटींकडेही नाही. सगळ्या ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग असतात पण कोठेच चारित्र्य घडणीचे वर्ग मात्र दिसत नाहीत, त्याचेच हे परिणाम. 

महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूच्या अगदी साधारणशा एका कृतीतून तासाभरात लाखो लोकं प्रभावित होत असतील तर, ज्या समाजामुळे आपण प्रकाश झोतात आलो, ज्यांच्यामुळे पत, प्रतिष्ठा, पैसे, प्रसिद्धी उपभोगता आली त्या समाजाला काहीतरी चांगले देण्याची जबाबदारी आपण निभावली पाहिजे. पैसे-प्रतिष्ठा कमावतांनाच समांतर अनेक सकारात्मक बाबतीत ह्या प्रसिद्धीचा, व्यक्तिमत्त्वाचा, प्रभावाचा वापर करता येईल का हे बघायला काय हरकत आहे. उदाहरणार्थ त्यांनी वृक्षारोपण करतानाच एखादा व्हिडीओ टाकला, चांगली पुस्तकं वाचताना स्टेटस शेअर केले, गरजुंची मदत करताना वरचेवर रिल तयार केले, तरुणांमध्ये चांगले विचार रुजविण्याचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले तर काही प्रमाणात तरी सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकेल यात शंका नाही, पण तसे होताना दिसत नाही..

दुसऱ्या बाजूने, समजा धोनी कँडी क्रश ऐवजी पुस्तक वाचताना दिसला असता तर या ३० लाखांपैकी किती लोकांनी जाऊन पुस्तकं विकत घेतली असती ? किती जणांनी तितक्याच उत्साहात वृक्षारोपण केले असते ?  सेलिब्रिटींच्या पुढ्यात उभा आजचा जबाबदार समाज म्हणून मी काय स्वीकारावे काय स्वीकारू नये..कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यावे, काय अंगिकारावे, माझ्या निवडीची माझी स्वतःची जबाबदारी आहे हे समजून उमजून मी माझे वागणे बदलतो का? हा आजच्या पिढीसाठी या निमित्ताने पडलेला आणखी एक ठळक प्रश्न आहे. आणि आता प्रत्येकाने ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 

©रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 14 June 2023

रात्र झाल्यावर... !

 

🌿🌿
उन्हाचा दाह शांतवते, जराशी रात्र झाल्यावर
जिवाची काहिली होते, सुखाची रात्र झाल्यावर
सुन्या रानात पेटवले, उगवत्या आठवांचे तृण
तनाला भार सोसेना, मनाची रात्र झाल्यावर

शहारा आजही येतो, तुझे का, नाव आल्यावर
क्षणाचा गंधही छळतो उराशी, रात्र झाल्यावर

मुक्याने का सहावे रे, तुझ्या कढ वेदनेचे मी
बळे मग कंठही फुटतो, मलाही रात्र झाल्यावर

जगाची का करू चिंता, असे काळीज जखमी हे
घराला आग लावी ते, दिसाची रात्र झाल्यावर
🌿🌿

✍️रश्मी पदवाड मदनकर

Friday, 2 June 2023

न्यायाधीशांची अनोखी शिक्षा


अमेरिकेत एक पंधरा वर्षाचा मुलगा होता, एका दुकानातून चोरी करताना पकडला गेला. त्याला पकडल्यावर त्याने रक्षकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुकानातील एक कपाटही तुटले.

न्यायाधीशांनी गुन्हा ऐकला आणि मुलाला विचारले, "तू खरोखरच ब्रेड आणि चीजचे पॅकेट चोरले आहेस का?"

मुलाने खाली पाहिले आणि उत्तर दिले - होय.

न्यायाधीश :- का?

मुलगा :- मला गरज होती.

न्यायाधीश :- विकत घेतले असते.

मुलगा :- पैसे नव्हते.

न्यायाधीश :- घरच्यांकडून घ्यायला हवे होते.

मुलगा :- घरात फक्त आई आहे. आजारी आणि बेरोजगार, तिच्यासाठीच ब्रेड आणि चीज चोरले होते.

न्यायाधीश :- तू काही काम करत नाहीस?

मुलगा :- कारवॉश मध्ये करायचो. मी माझ्या आईची काळजी घेण्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली होती, म्हणून मला काढून टाकण्यात आले.

न्यायाधीश :-  कोणाकडे मदत मागितली का?

मुलगा :- सकाळपासून घर सोडले होते, जवळपास पन्नास लोकांकडे गेलो, शेवटी हे पाऊल उचलले.

युक्तिवाद संपला, न्यायाधीश निर्णय सुनावू लागतात, चोरी आणि विशेषत: भाकरीची चोरी हा अत्यंत लज्जास्पद गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला आपण सगळेच जबाबदार आहोत.

"कोर्टातील प्रत्येकजण... माझ्यासह प्रत्येकजण गुन्हेगार आहे, म्हणून इथल्या प्रत्येकाला दहा डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. दहा डॉलर्स दिल्याशिवाय कोणीही इथून बाहेर पडू शकत नाही."

असे म्हणत न्यायाधीशांनी खिशातून दहा डॉलर्स काढले आणि मग पेन उचलला आणि लिहू लागले :- याशिवाय, भुकेल्या मुलाशी मानवतेने वागणूक न दिल्याबद्दल आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याबद्दल मी स्टोअरला $1,000 दंड करतो. चोवीस तासांत दंडाची रक्कम जमा न केल्यास दुकान सील करण्याचा आदेश न्यायालय देईल.

दंडाची संपूर्ण रक्कम या मुलाला देऊन न्यायालयाने त्या मुलाची माफी मागितली.

निकाल ऐकल्यानंतर कोर्टात उपस्थित लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, त्या मुलालाही हुंदका आवरला नाही. तो मुलगा आपले अश्रू लपवत बाहेर गेलेल्या न्यायाधीशाकडे वारंवार पाहत होता.

आपला समाज, व्यवस्था आणि न्यायालये अशा निर्णयासाठी तयार आहेत का?

चाणक्य म्हणाले होते की, "जर भुकेलेला माणूस भाकरी चोरताना पकडला गेला तर त्या देशातील जनतेला लाज वाटली पाहिजे."


(कुठेतरी वाचलेली, आवडलेली कथा:- लेखकाचे नाव माहिती नाही.) 







Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...