अशा विचित्र अर्थाचा hashtag का? त्याच्या कारणांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा.. माझ्याचसारख्या, माझ्याच युगात ह्याचं धर्तीवर एकाच काळात जन्म घेऊनही वेगवेगळ्या प्रांताचा आणि संस्कृतीचा भाग असल्याने आम्हाला जगाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या विरोधाभासी आयुष्याचे अप्रूप वाटत गेले..आणि तेथील 'ति'च्यासाठी अनुकंपा दाटून आली.
तीन वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत, तर त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या दैनंदिन हालचालींपर्यंत निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी तालिबानची सत्ता गेल्यानंतर महत्प्रयासाने जे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळवण्यासाठी तेथील महिलांनी जीवाचे रान केले, संघर्ष करत महिलांना शिक्षण नोकरी कायदे अधिकार मिळवून दिले. सगळं आलबेल चालू असताना तालिबानी सत्ता पुन्हा आरूढ झाली आणि मिळवलेलं आता सगळंच मातीत मिळून निरर्थक ठरतं की काय अशी भीती वाटू लागली आहे. तरी अजूनही हार न मानता स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महिलांचे जिवतोडून प्रयत्न सुरू आहेत..
तालिबानी शासनाने महिलांच्या जगण्यावर अन्यायकारक प्रतिबंध लावणारे कायदे कायम करण्यासाठी तेथील नागरिकांचाच उपयोग करून घेत त्यांचे अनिर्बंध अन्यायी पंख पसरायला सुरुवात केली आहे. ह्याचे जिवंत उदाहरण सांगणारी घटना नुकतंच घडली. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकणाऱ्या काळ्या आबाया घातलेल्या महिलांनी गेल्या आठवड्यात तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये मोठी रॅली काढली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचे असे मत होते की "आधुनिक, रंगीत कपडे आणि मेकअप परिधान केलेल्या अफगाण महिला देशातील मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. संपूर्ण शरीर झाकणारे अबाया, बुरखा आणि निकाब न घालणाऱ्या स्त्रिया परकीय संस्कृतीच्या अधीन गेल्या असून, शरिया कायद्याशी विसंगत असलेल्या आहेत. असे स्त्रियांचे हक्क आम्हाला नको आहेत. आम्हाला तालिबानी नियाब कबूल आहेत"
तालिबान शासित अफगाणिस्तानात स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी चिंतित, जागरूक, लढा देणाऱ्या महिलांसाठी ही रॅली म्हणजे एक धक्का होता. अफगाणिस्तानमधील अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाची प्राध्यापक डॉ. बहर जलाली या सर्वप्रथम ह्या मोहिमेविरोधात पुढे आल्या. इतर माध्यामांजवळ त्यांचे विचार व्यक्त करण्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. अफगाणिस्तानची अस्मिता आणि सार्वभौमत्वावर आघात होत असल्याने ही मोहीम सुरू केल्याचे बहार जलालीचे म्हणणे आहे. खरी अफगाण महिला अगदी पूर्वापार कशी होती.. त्यांची खरी संस्कृती काय होती हे सांगण्यास तिने सुरुवात केली. हिरव्या अफगाण पारंपरिक सुंदर पोशाखात तिचा फोटो शेअर करत तिने इतर अफगाण महिलांना 'अफगाणिस्तानचा खरा चेहरा' जगाला दाखवण्याचे आवाहन केले. अफगाण महिलांनी हातोहात ही मोहीम उचलून धरली. त्यांनी त्यांचे पारंपारिक कपडे, राहणीमान, पूर्वी उपभोगलेलं स्वातंत्र्य, त्याचा इतिहास आणि बरंच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर ठेवण्यास सुरुवात केली. हे करताना त्यांनी #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture सारखे हॅशटॅग वापरले, जे सध्या सर्वत्र trending आणि viral होत असून, जगभरातल्या स्त्रिया त्यांच्या समर्थनार्थ या सोशल मीडिया मोहिमेत जुळत चालल्या आहेत.
बहर जलाली म्हणते, "मला जगाला सांगायचे आहे की, तालिबान समर्थक रॅली दरम्यान तुम्ही मीडियामध्ये जी पूर्ण झाकलेल्या स्त्रियांची छायाचित्रे पाहिली ती आमची संस्कृती नाही. ती आमची ओळख कधीच नव्हती. पारंपारिकपणे रंगीबेरंगी कलात्मक कपडे परिधान करणार्या अफगाण लोकांसाठी संपूर्ण शरीर झाकणे हीच खरेतर परदेशी संकल्पना आहे. जी आमच्यावर लादली जाऊ शकत नाही."
यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या अनेक नामवंत, प्रतिथयश महिलांनी फोटोंसह मत व्यक्त केले. अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा पारंपारिक पोशाख आहे. इतकं वैविध्य असूनही, त्यात रंग, आरसे आणि भरतकामाचा भरपूर वापर आहे. रंगीबेरंगी व कलात्मक पद्धतीने तयार केलेले कपडे परिधान करणे हीच आमची सांस्कृतिक ओळख आहे जी आम्ही मिटू देणार नाही. असे त्यांचे मत आहे.
व्हर्जिनियातील मानवाधिकार कार्यकर्त्या स्पोझमे मसीद यांनी पारंपरिक पेहराव्यातील विविध स्त्रियांचे फोटो टाकत ट्विटरवर लिहिले, "हा आमचा खरा अफगाण पोशाख आहे. अफगाण स्त्रिया असे रंगीबेरंगी आणि शोभिवंत कपडे घालतात. काळा बुरखा हा अफगाणिस्तानात कधीही पारंपारिक पोशाख नव्हता" पुढे त्या म्हणतात "आम्ही शतकानुशतके इस्लामिक देश आहोत आणि आमच्या आजींनी त्यांचे पारंपारिक कपडे सन्मानाने परिधान केले आहेत. त्यांनी ना निळी चादीरी घातली होती ना अरबांचा काळा बुरखा" त्यांच्या पुढल्या एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या "आमचे पारंपारिक कपडे पाच हजार वर्षांच्या आमच्या समृद्ध संस्कृतीचे आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अफगाणीला त्याचा सार्थ अभिमान आहे."
37 वर्षीय अफगाण संशोधक लिमा हलिमा अहमद सोशल मीडियावर लिहितात, "मी माझा फोटो पोस्ट केला कारण आम्ही अफगाण महिला आहोत. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आमचा विश्वास आहे की कोणताही अतिरेकी गट आमची ओळख ठरवू शकत नाही. आमची संस्कृती कधीच काळी नव्हती, ती सदैव रंगांनी भरलेली आहे. त्यात सौंदर्य आहे, त्यात कला आहे आणि तीच आमची ओळख आहे"
अफगाणिस्तानच्या पुराणमतवादी लोकांचेही म्हणणे आहे की, त्यांनी महिलांना काळ्या रंगाचा निकाब घातलेला कधीच पाहिला नाही.
गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या लीमा हलिमा अहमद काबूलमध्ये झालेल्या रॅलीचां संदर्भ देत सांगतात, "महिलांना त्यांचा पोशाख निवडण्याचे पूर्वीपासूनच स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचा ड्रेसकोड कधीच कोणी ठरवून दिला नाही. आम्ही अफगाण महिला आहोत आणि आम्ही आमच्या महिलांनी कधीही त्यांचे शरीर पूर्णपणे झाकलेले कपडे घातलेले पाहिले नाही. ज्या प्रकारचे काळे हातमोजे आणि बुरखे रॅलीत महिलांनी घातले होते, त्यावरून असे वाटत होते की, रॅलीसाठी ते खास शिवलेले असावे, ही रॅली तालिबानने मुद्दाम घडवून आणलेली होती."
या सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये सक्रिय असणारी आणखी एक महिला म्हणजे मलाली बशीर, ही प्रागमधील पत्रकार आहे. अफगाण देशाचे सौंदर्य जगाला दाखवण्यासाठी ती सुंदर कपड्यांमधील अफगाण महिलांची चित्रे बनवते. ती म्हणते, "शहरात सोडा अगदी गावात देखील कोणीही काळा किंवा निळा बुरखा आजवर घातला नाही. पूर्वीपासून लोक फक्त पारंपारिक अफगाणी कपडे घालायचे. वृद्ध स्त्रिया डोक्यावर रंगीत चित्रांचा स्कार्फ घालत तर लहान मुली रंगीबेरंगी शाल ओढत. अलीकडे, अफगाण महिलांवर त्यांचा अस्सल सांस्कृतिक पोशाख बदलण्यासाठी दबाव वाढला आहे. लोकांना स्त्री दिसू नयेत म्हणून त्यांना पूर्ण झाकलेले कपडे घालण्यास सांगण्यात येत आहे. मी अनेक पुरातन स्त्रियांचे पेंटिंग्ज आजवर बनवले आहेत ज्यामध्ये अफगाण स्त्रिया त्यांचे पारंपारिक कपडे परिधान करतात. पेंटिंगमध्ये त्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय नृत्य 'अट्टन' सादर करतानाही दिसतात"
या सर्व प्रकरणात तालिबान मात्र अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत. तालिबानचे म्हणणे आहे की महिलांना शरिया कायदा आणि स्थानिक परंपरांनुसारच अभ्यास आणि काम करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र यासोबतच ड्रेस कोडचे कठोर नियमही लागू होतील, जे त्यांना पाळणे बंधनकारक असेल.
या अन्यायकारक कायद्यांचे समर्थन तेथील अफगाण पुढारी देखील करतात, पर्यायाने स्वसंरक्षणार्थ काही अफगाण महिलांनी आतापासूनच काळजी घेत चादरी, आबाया, नीकाब घालण्यास सुरुवात केली आहे. या निळ्या रंगाच्या ड्रेसने महिलांचे डोके ते पाय अगदी डोळे देखील झाकलेले असतात. कधी नव्हे ते काबूल आणि इतर शहरांमध्ये महिला या चादरी मोठ्या प्रमाणात परिधान करताना दिसू लागल्या आहेत. ह्याचीच चिंता आता परिवर्तनशील, उदारमतवादी, स्त्रीवादी अफगाण महिलांना सतावू लागली आहे, म्हणूनच विविध माध्यमांचा उपयोग करत त्या त्यांचे मत जगासमोर मांडत आहेत. जगभरातून त्यांच्या मानवी अधिकारासाठी आणि स्वातंत्र्यासाठी समर्थन यावे एवढीच त्यांची अपेक्षा असावी. स्त्री म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आपण त्यांची सोबत द्यायला काय हरकत आहे ?
- रश्मी पदवाड मदनकर
(Published on 30 September 2023 in Tarun Bharat 'Akanksha' Suppliment)
No comments:
Post a Comment