गालगागा*4
मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते
काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते
ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या
लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते
भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले
मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते
सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना
वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते
नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही
वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते
या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे ते
चिडवते मी प्राक्तनाला अन् जरा हासून घेते
No comments:
Post a Comment