Tuesday, 24 March 2026

संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय


आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत.

आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. त्यामुळे उपजीविकेचे स्थिर मार्ग नसल्याने अनेकांना भीक मागणे किंवा मंगलकार्यांमध्ये नाच-गाणे करण्यावर अवलंबून राहावे लागते. तरीही गेल्या काही वर्षांत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. विविध संस्था आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शिक्षण, रोजगार आणि समाजातील स्वीकाराबाबत जागरूकता वाढत आहे आणि काही तृतीयपंथी विविध क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतात.

नागपूरमध्येही या समुदायातील अनेक जण स्वकष्टाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग घडवत आहेत. समाजाने जर पूर्वग्रहांच्या चौकटी मोडून त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले आणि सन्मानाने जगण्याची संधी दिली, तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष निश्चितच कमी होऊ शकतो. तृतीयपंथी समाज वेगळा नाही; तोही आपल्या समाजाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना समजून घेणे, स्वीकारणे आणि सन्मान देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या माणुसकीची खरी कसोटी आहे. यानिमित्ताने नागपुरातील काही तृतीयपंथींची ओळख करून घेऊया..

विद्या कांबळे या नागपूरमधील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या अनेक वर्षांपासून आपल्या समुदायाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, कायदेशीर मदत आणि रोजगाराच्या संधींबाबत त्या जनजागृती करतात. विशेष म्हणजे, त्या लोकअदालतमध्ये पॅनल सदस्य म्हणून सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ठरल्या. तृतीयपंथीयांना ओळखपत्रे, शासकीय योजना आणि आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात या समुदायाविषयी स्वीकाराची भावना हळूहळू वाढताना दिसते.

ट्रान्सजेंडर आंचल वर्मा यांनी संघर्षातून आपलं आयुष्य घडवलं. किन्नर समाजाला ज्या कठीण वाटा पार कराव्या लागतात, त्या सगळ्या अनुभवूनही त्या कधी खचल्या नाहीत. नाच-गाण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज समुपदेशन आणि LGBTQAI समुदायासाठी सामाजिक कार्यापर्यंत पोहोचला असून त्या देशभर जनजागृतीसाठी प्रवास करतात. सौंदर्यस्पर्धेत “मिस महाराष्ट्र” ठरलेल्या आंचल सामाजिक कार्यासाठी मॉडेलिंगही करतात. विशेष म्हणजे अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीला वाचवून तिचा सांभाळ केला आणि एका वृद्ध देवदासी महिलेलाही आधार दिला. त्यांच्या या प्रेरणादायी आयुष्यावर “कायांतर” हे पुस्तक प्रकाशित झाले, जे आज राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.

शिवानी सूरकर या विदर्भातील तृतीयपंथी समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. समाजातील उपेक्षा आणि भेदभावाचे चटके सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. B.Com, MBA, LLB अशी उच्च शिक्षणे पूर्ण करत २०२० साली बार कौन्सिलकडून वकिलीची सनद मिळवून त्या विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकिल ठरल्या. त्या तृतीयपंथीयांना कायदेशीर मार्गदर्शन, ओळखपत्रे मिळविण्यास मदत आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आधार देत आहेत. त्यांच्या कार्यातून शिक्षण आणि स्वावलंबनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

ट्रान्सजेंडर मोहिनी या किन्नर समाजातील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नृत्यांगना आहेत. मंगलकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील नृत्य-गायनाच्या परंपरेला त्यांनी केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता त्यात कलात्मकतेची भर घालून वेगळी ओळख मिळवली. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून नृत्य सादर करत त्या किन्नर समुदायाच्या प्रतिभेकडे समाजाचे लक्ष वेधतात. कलेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांविषयीचे गैरसमज दूर करून समाजात स्वीकार आणि सन्मान वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

कल्याणीगुरु या नागपूरमधील तृतीयपंथी समाजातील ओळखल्या जाणाऱ्या किन्नर गुरु आहेत. सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी वेगळी वाट निवडत नागपुरात “चाय वीला” या नावाने चहाचे दुकान सुरू केले, ज्याची ख्याती आज सर्वदूर पसरली आहे. पारंपरिक मंगती किंवा मंगलकार्यांपुरतेच आयुष्य मर्यादित नसते, तर व्यवसायाच्या माध्यमातूनही स्वाभिमानाने जगता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक तृतीयपंथीयांसाठी स्वावलंबनाची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

तृतीयपंथीयांना नोकरीच्या संधी कमी मिळतात, या वास्तवावर खंत व्यक्त करत बसण्याऐवजी ट्रान्सजेंडर संजना हिने वेगळी वाट निवडली. तिने स्टॉक मार्केट ट्रेडिंगचे पद्धतशीर प्रशिक्षण घेत सातत्याने सराव करत या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. आज ती शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सन्मानाने उदरनिर्वाह करते. विशेष म्हणजे, ती आपल्या समुदायातील इतर इच्छुकांना देखील ट्रेडिंगचे प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवत आहे.

याशिवाय नागपूरमध्ये काही तृतीयपंथी HIV-जागरूकता, आरोग्य मोहिमा आणि सामाजिक जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत काम करतात. आरोग्य शिबिरे, समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. काहींनी छोट्या व्यवसायांद्वारे स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.. जसे की ब्युटी पार्लर, मेकअप सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन. काही तृतीयपंथीनी लॉकडाऊन किंवा आपत्तीच्या काळात गरजू लोकांना अन्नवाटप, कपडे आणि आवश्यक वस्तू देण्याचे मानवतावादी काम केले. त्यामुळे समाजात त्यांच्या भूमिकेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. अनेकांनी सिद्ध केले "माणुसकीच्या वाटेने चालण्यासाठी माणसांनी घालून दिलेल्या चौकटीत जन्मणे आवश्यक नसते. मानवता लिंगावर अवलंबून नसते; ती मनाच्या विशालतेतून आणि संवेदनशीलतेतून उमलते. माणुसकी जपण्यासाठी जे धाडसी, नि:स्वार्थ आणि करुणेने भरलेले हृदय लागते, ते त्यांच्या जवळही ताकदीने धडधडत असते.'' पण आजही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येते ? वंचना आणि उपेक्षा!

अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....

“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,

हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”


या ओळीत ज्या वेदना दिसतात, त्या आजही तृतीयपंथीच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात.

या सर्व उदाहरणांकडे पाहिले की एक गोष्ट ठळकपणे जाणवते; तृतीयपंथी समाजाला संधी, आधार आणि स्वीकार मिळाला, तर तेही इतरांप्रमाणे स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे आयुष्य जगू शकतात. उपेक्षा आणि भेदभावाच्या अंधाऱ्या वाटा पार करत त्यांनी जिद्दीने स्वतःसाठी नवे मार्ग तयार केले आहेत. थोडा विश्वास, थोडी साथ आणि समानतेची दृष्टी मिळाली, तर ते केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाहीत, तर समाजालाही संवेदनशीलतेचा नवा धडा देतात. कारण शेवटी प्रश्न वेगळेपणाचा नाही, तर स्वीकाराचा आहे आणि तृतीयपंथी समाज हा आपल्या समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे.



रश्मी पदवाड मदनकर

rashmi.aum15@gmail.com

7720001132

No comments:

Post a Comment

Featured post

संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय

आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यां...