'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद्र आहे. “सारस्वतांचे माहेर” ही ओळख नागपूरने केवळ नावापुरती मिळवलेली नाही, तर अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या कार्यातून ती सतत सिद्ध होत आली आहे. या भूमीने घडवलेले लेखक, कवी, विचारवंत यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून भारतीय साहित्याची पत जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्यही केले आहे.
नागपूरची सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. शिक्षणसंस्था, वाचनसंस्कृती, नाट्यसंस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रम यांच्या माध्यमातून येथे साहित्याची चळवळ नेहमीच जिवंत राहिली आहे. या वातावरणात घडलेल्या लेखकांनी केवळ शब्दांची मांडणी केली नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष, आशा आणि बदल यांचे जिवंत चित्रण आपल्या लेखणीतून साकारले.
विशेषतः, या सारस्वत भूमीने दिलेल्या स्त्री लेखकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. पारंपरिक चौकटी मोडत, सामाजिक कुप्रथांना आव्हान देत आणि स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण करत या लेखिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या लेखनात स्त्रीच्या भावना, तिचा संघर्ष, तिची ओळख आणि तिचे स्वातंत्र्य यांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसून येते. या लेखिकांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजमन घडवण्याचे कामही केले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, शिक्षणाचे महत्त्व आणि मानवी मूल्ये यांसारख्या विषयांवर ठामपणे भूमिका मांडल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेकांना विचार करण्याची दिशा मिळाली, तर अनेकांना प्रेरणा मिळाली. नागपूरच्या या साहित्य परंपरेतून घडलेल्या लेखिकांची नावे आज मराठी साहित्यात सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात आणि पुढील पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरतात. त्यांच्या लेखनातून केवळ साहित्याचीच नव्हे, तर समाजाचीही प्रगती घडून आली आहे. अगदी १३ व्या शतकातील मराठी साहित्यातील आद्य कवयित्री मानल्या जाणाऱ्या महादाईसा ऊर्फ महदंबा यांचा संबंध विदर्भातील महानुभाव पंथाशी होता. त्यांनी 'धवळ्यांची' रचना केली, जी नागपूर-विदर्भ परिसरातील साहित्यिक वारशाचा भाग आहे. १९ व्या शतकातल्या ताराबाई शिंदेंपासून ते आजच्या डिजिटल युगातही नागपूरची ही साहित्य परंपरा कायम आहे. नव्या पिढीतील लेखक-लेखिका नव्या विषयांवर, नव्या शैलीत लेखन करत आहेत. मात्र, त्यांच्या पाठीशी उभी असलेली ही समृद्ध परंपरा आजही त्यांना दिशा देत आहे.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर एक कटू वास्तव समोर येते... बृहन्महाराष्ट्राच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय, विशेषतः नागपूरच्या लेखिकांची आजही अपेक्षित ती दखल घेताना, त्यांना सुयोग्य मान-सन्मान मिळताना दिसत नाही. राज्यातील प्रभावी साहित्यिक वर्तुळात नावांची यादी काढताना विदर्भातील लेखिकांना अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. ही केवळ भावना नाही, तर विविध संमेलनांमधील प्रतिनिधित्व, पुरस्कारांचे वितरण, चर्चांमध्ये मिळणारी जागा आणि मुख्य प्रवाहातील समीक्षेतली उपस्थिती यांचा अभ्यास केला, तर ही तफावत स्पष्टपणे जाणवते. या परिस्थितीची कारणे शोधताना केवळ “बाहेरचे दुर्लक्ष” पुरेसे स्पष्टीकरण ठरत नाही. त्यासाठी आपल्या घरात, आपल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात डोकावणे आवश्यक ठरते....
विदर्भ साहित्य संघसारख्या संस्थांनी निःसंशयपणे विदर्भात साहित्याची परंपरा जिवंत ठेवली. पण प्रश्न असा आहे की, या संस्थांच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रिया कितपत आहेत? नेतृत्वपदांवर, धोरणात्मक समित्यांमध्ये, निवड प्रक्रियेत स्त्री लेखकांची उपस्थिती मर्यादित असेल, तर व्यापक पातळीवर त्यांचे प्रतिनिधित्व कमी राहणे स्वाभाविक ठरते. अलीकडील संस्थात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक नेतृत्व, गटबाजी, प्रतिनिधित्व यावर चर्चा झाली; पण त्यात लेखिकांचा ठोस, संघटित आवाज कितपत होता? वैयक्तिक पातळीवर सक्षम लेखिका असल्या तरी त्या एकत्रित शक्ती म्हणून उभ्या राहत नाहीत, ही एक मोठी उणीव आहे. विदर्भाचा साहित्यिक इतिहास समृद्ध असला तरी त्याची मांडणी आणि परंपरा मोठ्या प्रमाणावर पुरुषकेंद्री राहिली आहे. त्यामुळे स्त्रियांचे योगदान नेहमीच दुय्यम ठरले किंवा अदखलपात्र राहिले आणि त्यामुळे जिथे घरातच आवश्यक ते महत्त्व मिळाले नाही, तिथे बाहेरची अपेक्षा काय करावी, अशी स्थिती. एकीकडे स्त्रियांच्या लेखनातून सामाजिक भान, स्त्री-अस्मिता, विषमता, बदलाची आस यांचे प्रभावी चित्रण दिसते; तर दुसरीकडे साहित्यिक सत्ताकारणात, निर्णयप्रक्रियेत, नेतृत्वात त्यांची उपस्थिती मर्यादितच राहते... असे का झाले ? हा प्रश्न केवळ “वैदर्भीय स्त्रिया कुठे चुकतात?” इतकाच नाही, तर तो संपूर्ण साहित्यिक संरचनेचा आणि संधींच्या असमानतेचाही आहे. यामागे बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, तितकीच अंतर्गत मानसिकताही कारणीभूत आहे, हे मान्य करावे लागेल. तरीही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करायचे झाल्यास काही मुद्दे नक्कीच पुढे येतात:
नागपूर आणि विदर्भातील अनेक लेखिका आपल्या लेखनगुणांनी सक्षम असतानाही, त्या व्यापक पातळीवर पुढे येण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करताना दिसत नाहीत. स्थानिक पातळीवर मिळणारा मान, कौतुक आणि ओळख यावर समाधान मानण्याची प्रवृत्ती दिसून येते. “आपल्या वर्तुळात मान मिळतो आहे, तेवढे पुरे” ही मानसिकता दीर्घकालीन दृष्टीने मर्यादा घालणारी ठरते. साहित्य हे केवळ सर्जनशीलतेचे क्षेत्र नसून, ते संवाद, नेटवर्किंग, संघटनात्मक सहभाग आणि नेतृत्व यांचेही क्षेत्र आहे याची जाणीव अजून व्यापकपणे झालेली दिसत नाही.
याच संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जबाबदारीच्या पदांवर येऊन काम करण्याबाबत लेखिका वर्ग निराशावादी का आहे? नेतृत्व स्वीकारण्याची भीती, संघटनात्मक राजकारणापासून दूर राहण्याची वृत्ती, किंवा “आपल्याकडून काय फरक पडणार?” अशी आत्मसंशयाची भावना, हे घटक यामागे असू शकतात. पण या वृत्तीमुळेच विदर्भातील लेखिकांचा आवाज व्यापक पातळीवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात हे आपल्या लक्षात येत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर केवळ बाह्य व्यवस्थेवर टीका करून उपयोग नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवरूनच सजग, संघटित आणि धाडसी प्रयत्नांची गरज आहे. विदर्भातील लेखिकांनी स्वतःहून पुढे येऊन साहित्यिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, निवडणुकांमध्ये उभे राहावे, निर्णयप्रक्रियेत आपला ठसा उमटवावा ही काळाची गरज आहे. तसेच, परस्परांमध्ये सहकार्य, मार्गदर्शन आणि एकमेकांना पुढे नेण्याची वृत्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. एकट्याने यश मिळवण्यापेक्षा, सामूहिक बळ उभारणे अधिक प्रभावी ठरते. साहित्यिक गुणवत्ता ही नक्कीच महत्त्वाची आहे, पण त्यासोबतच दृश्यमानता, उपस्थिती आणि सहभाग हेही तितकेच आवश्यक घटक आहेत.
एकंदरीत, नागपूरची “सारस्वतांचे माहेर” ही ओळख अभिमानाची असली, तरी त्या अभिमानाला साजेशी साहित्यिक आणि संघटनात्मक ताकद उभी करण्याचे आव्हान आजच्या पिढीसमोर आहे. संस्था संघटनेतील पुरुष सदस्यांनीही या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल; शिवाय स्त्री लेखकांनी स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवत, मर्यादित चौकटी मोडून व्यापक व्यासपीठांवर आपली भूमिका ठामपणे मांडली, तरच हा असमतोल दूर होईल. अन्यथा, समृद्ध परंपरा असूनही योग्य प्रतिनिधित्व न मिळण्याची ही तफावत कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शांता शेळके यांच्या ओळींत सांगायचे तर—
“स्वतःचा दिवा आपणच पेटवायचा असतो.”
याच भावनेतून हा विषय केवळ चर्चेपुरता न राहता, बदलाची ठोस सुरुवात ठरो आणि उद्याच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय लेखिकांची ओळख केवळ उपस्थितीची नव्हे, तर नेतृत्वाची नांदी ठरो हीच आशा आजच्या या मासिक स्तंभातील शेवटच्या लेखाद्वारे करते.... धन्यवाद !
No comments:
Post a Comment