शहाण्या माणसांच्या गजबजाटात काही चेहरे असे असतात, जे पहिल्या नजरेत “वेडे” वाटतात. विस्कटलेले केस, मळकट कपडे, असंबद्ध बडबड, तटस्थ नजरा; आपण त्यांना एका क्षणात वेडे ठरवून मोकळे होतो. पण कधी थांबून त्यांच्या जगण्याच्या पायवाटा शोधल्या, त्यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं की वेडेपणाच्या आवरणाखाली काही विलक्षण शहाणपण जपलेलं असतं. या शहाण्या दुनियेत जी माणसं वेडी ठरवली जातात, तीच कधी कधी आपल्याला माणूसपणाचा आरसा दाखवतात. त्यांच्या अस्ताव्यस्त रूपामागे लपलेला असतो स्वाभिमान, कर्तव्याची जाणीव, नात्यांनी दिलेल्या जखमा आणि तरीही जगण्याची हट्टाग्रही ओढ... हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडते.
मनोविकार जडलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या माणसांना समाजाने अव्हेरली असली; तरीही त्यांच्यात माणुसकीची, विचारांची, चांगुलपणाची लव अखंड धगधगत असते. कुणी स्वच्छतेला आपला धर्म मानून झाडू हातात घेऊन रस्ते झाडतो; कुणी शब्दांविना शांतपणे उपाशीपोटी बसूनही आत्मसन्मान जपतो; कुणी भूतकाळाच्या चुकांची शिक्षा स्वतःलाच देत, तीन विटांच्या चुलीवर आपलं आयुष्य पुनःपुन्हा पेटवत राहते. त्यांच्याकडे मोठमोठ्या पदव्या नसतात, घोषणाबाजी नसते, अजेंडे नसतात; पण असतं ते जगण्याचं एक निर्मळ तत्त्वज्ञान. कदाचित म्हणूनच या लेखात आपण भेटणार आहोत अशाच काही “वेड्या” माणसांना ज्यांच्या वेडेपणात दडलेलं शहाणपण आपल्याला पुन्हा एकदा स्वतःकडे पाहायला भाग पाडेल.
माझ्या घरातून ऑफिसकडे निघाले की पहिल्यांदा लागतो तो नरेंद्रनगर पूल. आणि त्या पुलाखाली बऱ्याचदा एक माणूस बसलेला दिसतो. शांत… संयमी… जणू जगाकडे तटस्थ नजरेने पाहत. त्याच्या चेहऱ्यावर ना कुठली तक्रार, ना आकांडतांडव, ना मस्तीचा लवलेश. मिळालं तर खातो, नाही मिळालं तर तसाच शांत बसून राहतो. मिळाल्याचा माज नाही, आणि न मिळाल्याचा रागही नाही; साऱ्या जगावर सूड उगवण्याची तर गोष्टच नाही. तुम्ही बोललात तरी तो नुसताच पाहत राहतो. शब्द जणू त्याने वापरणं सोडून दिलं आहे. पण तुम्ही त्याच्या शेजारी काही ठेवून गेलात, तर ते तो कधीतरी भूक लागल्यावर शांतपणे खातो. रात्री परत येताना कधी कधी तेच डबे धुतलेले, उपडे करून त्याच्या शेजारी ठेवलेले दिसतात, नीटनेटके. त्या उपड्या डब्यांत त्याचे मूक आभार दडले असावे असे वाटते.
त्याच मार्गावर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही गेलात, तरी एक चित्र हमखास नजरेस पडतं. नरेंद्र नगर चौकाच्या अलीकडे, एका चहाच्या ठेल्याभोवती, एक कृश देहाची, पाठीत वाक गेलेली, भ्रमिष्ठ भासणारी महिला अखंड झाडू मारताना दिसते... ती जणू थांबायलाच विसरली आहे...रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, पुन्हा पुन्हा, न थकता, न कंटाळता. तिला काळजीपोटी, “मावशी, इतकं वाकून दिवसभर झाडू नका, त्रास होईल,” असं म्हटलं की ती थांबते, क्षणभर सरळ उभी राहते आणि अगदी मनापासून स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगते. तिच्या डोळ्यांत वेडेपणा नसतो; असतो तो केवळ प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभाव. तिचं नाव आहे अलकाबाई कांबळे.
गजानन नगरहून देवनगरकडे जाताना डावीकडच्या एका अरुंद गल्लीत ती नेहमी दिसते; पिंजलेले केस, विरलेली साडी, मळकट अंग आणि आरपार पाहणारे डोळे. पहिल्या नजरेत “वेडी” वाटते. सतत काहीतरी बडबडत रस्त्याच्या टोकापासून टोकापर्यंत फेऱ्या मारत राहते. सगळे तिला “मालाबाई” म्हणून ओळखतात. पण सहज दिलेले पैसे किंवा खाणं ती घेत नाही. तीन विटांच्या चुलीवर ती स्वतः स्वयंपाक करते आणि आसपासची छोटी कामं करून धान्य मिळवते.
मालाबाईला दोन मुलं आहेत. अजनीत त्यांचं मोठं, तीन मजली घर आहे; पण तिच्यासाठी त्या घराचे दरवाजे बंद आहेत. कारण? लहान मुलं आणि नवरा असताना ती कुणासोबत तरी निघून गेली होती, असं लोक सांगतात. काही वर्षांनी ती परतली; पण तोवर मुलांनी आयुष्याचे चटके सोसलेले, त्यांनी तिला घरात घेतलं नाही. आणि मग रस्ता हाच तिचा पत्ता ठरला. हळूहळू तिच्या मनावर परिणाम झाला. लोकांनी तिला “वेडी” म्हणायला सुरुवात केली. पण त्या वेडेपणातही एक शिल्लक राहिलेला स्वाभिमान आहे. कदाचित ती तिच्या चुकांचं प्रायश्चित्त करत असेल; कदाचित जगण्याची शिक्षा भोगत असेल. दान नाकारणारी, श्रमाचा मोबदला स्वीकारणारी, स्वतःची चूल पेटवणारी मालाबाई अजूनही ताठ मानेने जगते.
वंजारी नगरच्या रस्त्यावरच्या एका बेकरीसमोर कट्ट्यावर बसलेले एक दिव्यांग आजोबा दिसतात . मी खाण्याचं एक पॅकेट दिलं, तर त्यांनी शांतपणे विचारलं, “Expiry date पाहिलीस का?” पाहिलं तर खरंच ते पॅकेट एक्सपायर झालेलं! त्या क्षणी त्यांच्या जागरूकतेचं आणि स्वाभिमानाचं आश्चर्य वाटलं. गप्पांत कळलं. ते अमरावतीचे, सरकारी नोकरीतून निवृत्त. मोठ्या आजारात पाय कापावे लागले आणि घरच्यांनी त्यांना मेडिकलमध्ये आणून सोडून दिलं. तेव्हापासून रस्ताच त्यांचा संसार. कुणाकडे भीक मागत नाहीत; कुणी दिलं तर खातात, नाहीतर उपाशी राहतात. पण बोलायला कोणी थांबलं, तर त्यांच्या शब्दांतून ज्ञानाची धार अजूनही तितकीच ओघवती वाहते.
हल्ली वारंवार असं ऐकू येतं की, आपण समाज म्हणतो ती आपल्याभोवतालची माणसं दिवसेंदिवस कोडगी, असहिष्णू आणि असंवेदनशील होत चालली आहेत; आणि दुर्दैवानं त्यात काही अंशी सत्यही दिसतं. काळ बदलतो तसं माणसाचं जगणंही बदलतं, पण या बदलात माणूस अधिक एकलकोंडा, आपलपोटी आणि स्वार्थी होत चालल्याची जाणीव वारंवार होते. प्रमोशन, इन्क्रिमेंट, अचिव्हमेंट, मोठं पॅकेज, परदेशात शिक्षण या स्वप्नांच्या मागे धावताना जगण्यातील साधेपण आणि मोठेपण दोन्हीही कुठेतरी हरवत चालल्यासारखं वाटतं. काहीजण तर दिखाव्याच्या फसव्या आभासात स्वतःलाच हरवून बसलेले दिसतात. आज कुणाच्या मृत्यूचं, कुणावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचं जर समाजाला सोयरसुतक उरलं नसेल, तर मग एखाद्याच्या वेडेपणाचं किंवा त्यांच्या भुकेचं काय वाटणार? ही जाणीव मनाला खोलवर चटका लावते. कधी कधी निराशेची दाट छाया मनावर पसरते; आपण अशा क्रूर, निष्ठुर आणि फसव्या जगात जन्मलो आहोत का? पण विडंबन असं की, हीच ‘शहाण्यांची दुनिया’ म्हणून मान्य केली जाते.
या सगळ्या कहाण्या मनात साचत जातात आणि एक प्रश्न सतत उभा राहतो या लोकांसाठी शासन नेमकं काय करतं? त्यांना निवारा केंद्रात, शेल्टर होममध्ये नेण्याचे प्रयत्न होतात का? कागदोपत्री योजना आहेत, पुनर्वसनाच्या तरतुदी आहेत. नागपुरात तर महापालिकेची सहा निवारा केंद्रे आहेत; काही वैयक्तिक पातळीवर, काही स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवली जातात. मग या रस्त्यावरच्या निवारा नसणाऱ्या माणसांकडे त्यांची नजर का जात नाही? की नजर जाते, पण हात पुढे सरकत नाहीत? की हात पुढे सरकतात, पण ही माणसं विश्वासाने तो हात धरायला तयार नसतात? काहींची ओळखच हरवलेली असते, काहींची कागदपत्रं नसतात, काही भावनिक जखमांनी इतकी विदीर्ण असतात की चार भिंतींचा आधारही त्यांना कैद वाटतो. प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही; तो आपल्या सामूहिक संवेदनांचा देखील आहे. आपण त्यांना पाहतो, क्षणभर हळहळतो, आणि पुढच्या वळणावर विसरून जातो. म्हणूनच कदाचित ते अजूनही रस्त्यावर आहेत... आपल्या शहाण्या समाजाच्या सावलीत, पण त्याच्या संवेदनशील नजरेच्या टप्प्याबाहेर.
या सगळ्यांचा विचार आला की मला मंगलेश डबरालच्या ओळी आठवतात...
''पागल होने का कोई नियम नहीं है
इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं
वे भूल चुके होते हैं कि पागल होने से
बचे रहने के कई नियम हैं....''
रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com
(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत प्रकाशित लेख)
No comments:
Post a Comment