ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली.
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Tuesday, 12 May 2026
नसरापूर घटनेच्या निमित्ताने...
गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक्यच वाटायला लागलं आहे. माणूसपण संपत चाललंय का…? चांगुलपणा आता फक्त शब्दात उरलाय का…? असे प्रश्न मनात वारंवार येतात. नसरापूरच्या त्या चिमुकल्या जीवावर जे अत्याचार झाले, त्याची वेदना खूप आत खोलवर जाऊन भिडली आहे. मन कळवळलं, आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं… चार दिवस झाले पण त्या वेदनेलाही आवाज फुटत नाहीये, असं जाणवलं.
आजकाल सगळेच “व्यक्त व्हा” म्हणतात. पण कुणासाठी व्यक्त व्हायचं…? आणि व्यक्त होऊन काय बदलणार आहे…? गेली कित्येक वर्षें सगळेच ओरडत व्यक्त होत आहेत, लिहित आहेत, बोलत आहेत… तरीही जग तसंच आहे. उलट अधिकच घसरणीला लागलं आहे. जर केवळ व्यक्त होण्यानं बदल झाला असता, तर आजपर्यंत सगळं काही वेगळं, चांगलं दिसलं असतं. आता असं वाटायला लागलं आहे की व्यक्त होणंही एक दिखावा झाला आहे. केवळ सोशल मीडियावरील मुखवट्यामागचं दिखाव्याचं व्यक्त होणं. कारण शेवटी प्रत्येक जण आपल्याला जे पटतं, तेच घेतो. कितीही सांगितलं, कितीही समजावलं… तरीही ते कुणापर्यंत पोहोचत नाही. शब्द हवेतच विरघळून जातात.
सरकार येतात, जातात… बदलाचे आश्वासन देतात. पण हे सगळं वरवरचं आहे. खरा बदल तर माणसांच्या मनात व्हायला हवा आहे. आणि तोच आता सर्वात कठीण वाटतो आहे. माणसांच्या आत साचलेली घाण… ती कुठलंही सरकार साफ करू शकत नाही. तो बदल प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या आतून करायला हवा.
आज माणूस माणसापासून दूर जातोय… काही ठिकाणी तर माणूस राक्षस होत चाललाय. सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे. आणि अशा वेळी एकच वाटतं ; आता खूप झालं… आता थांबायला हवं.
आपण सतत बोलतो, व्यक्त होतो… कृतीशून्य असतं सगळं.. कोलाहल वाढत चाललाय. कुणालाच काही समजून घ्यायचे नाहीये प्रत्येकाला व्यक्त व्हायची घाई. शांतता हवी न. सहिष्णुता वाढवावी लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इन्स्टंट का हवी ? मारून टाका, कापून टाका, जाळून टाका ? उद्याच्या उद्या आरोपीचा खात्मा केला पाहिजे म्हणताना उद्या एखाद्यावर खोटे आरोप झाले तर ते सिद्ध करायचा पण वेळ घ्यायला नको ? हे नाही का मनात येत. संयम बाळगायला हवा. कायद्यावर विश्वास ठेवायला हवा. संयम आणि समंजस शांतता राखली गेली पाहिजे.. सोल्युशन शोधायचे आहे. आयुष्य म्हणजे काही दोन तासांची थ्रिल देणारी फिल्म नाही.
म्हणूनच कदाचित आता सगळ्यांनी थोडं शांत होण्याची गरज आहे. गुन्हा करण्यापासून शांत होणं…
समाजात विष पसरवण्यापासून शांत होणं… जाती-धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्यापासून शांत होणं… ही शांतता पळून जाण्याची नाही… ही शांतता आत डोकावण्याची आहे. थोडं थांबण्याची, स्वतःला विचारण्याची की, “मी नेमके काय करतोय…?”
कदाचित मोठे बदल लगेच होणार नाहीत. पण प्रत्येकाने स्वतःत थोडासा चांगुलपणा जपला…थोडा समजूतदारपणा वाढवला… तरच काहीतरी बदल शक्य आहे. आपण जग बदलायचा प्रयत्न करतोय, पण कदाचित आता वेळ आली आहे, स्वतःकडे परत वळायची. कारण बदल घोषणा, आंदोलनं, चित्कार करून होत नाही; ओरडण्यापेक्षा, थोडं थांबणं गरजेचं आहे… थोडं स्वतःला ऐकणं, स्वतःला समजावणं गरजेचं आहे… जर प्रत्येकाने एक क्षण जरी थांबून स्वतःच्या मनात डोकावलं, तर कदाचित आपल्या आतलाच कुट्ट अंधार, इतकी घाण, इतका राग, इतकी हिंसा पाहता येईल, प्रयत्नपूर्वक कमी करता येईल. स्वतःपासून केलेली हीच खरी सुरुवात असेल थोडंसं तरी पुन्हा माणूस होण्याची..हे जग किमान चिमुकल्या जीवांसाठी विश्वासार्ह, जगण्यालायक, आनंदी राहण्यायोग्य बनवता येईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी
प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...
-
एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे प...
-
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...
No comments:
Post a Comment