Thursday, 10 December 2015

ये मोह मोह के धागे...



आयुष्यातली सगळी नाती आणि नात्यांना जोडणारा भावनिक संवेदनेचा धागा. हा धागा बांधला गेलाय दोघांत किंवा त्या एका धाग्यात दोघे गुंतले गेले आहेत तोपर्यंत सगळं आलबेल असतं. धागाच गुंतायला लागला कि मात्र नात्यांचाही गुंता होत जातो. गुंत्याचं शेवटचं टोक शोधत मग भरकटत राहतो बांधून घेतलेला जीव. हे भरकटनं पण मग गोड वाटू लागतं प्रेमाचा मोहच तसा असतो .


जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू



एकाचा मोह दुसऱ्याची फरफट होऊ नये एवढे मात्र जपले गेले पाहिजे. असा हा नात्यात बांधणारा न दिसणारा धागा मोहाचा. आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आकर्षणाचा अन प्रेमाचाही… मोह दोन्ही बाजूला समान असेल तर आयुष्याच गणित चोख बसतं....गणित बिघडलं कि शिल्लक उरतो फक्त शून्य .…पण तरीही आशेवर तर दुनिया कायम आहे ना मग मोह का असू नये. मी तर म्हणेन मोह असावाच. मोह आयुष्याला दिशा देतो. मोह जगण्याचो उर्मी देतो. मोह निराश आयुष्यात आनंदाची भरती आणतो. सुस्त पडलेल्या कोऱ्या करकरीत आयुष्यात मोहाचा रंग चढला कि प्रेमाची प्रचीती येते. मनाचे मनाशी बांधलेले बंध हवेहवेसे वाटत राहतात. जगणे सार्थकी ठरवतात. सुख सुख म्हणतात ते हेच असतं.


ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुज़रे


चांद , बादल, बारीश ,तितली किती मधुर किती मोहक असतात ना काही कल्पना .वाटतं जीव ओवाळून टाकावा या स्वप्नांवर. कल्पनेत- स्वप्नात असली तरी ते जगणं प्रत्यक्षात जगतात हे प्रेमी युगल. प्रेमात माणूस अस्तित्वाच्या दुनियेत नसतोच जणू स्वप्नील जगात हरवलेला असतो .जमिनीच्या वर अन अवकाशाच्या पलीकडे उडत असतो. एकमेकांचे अस्तित्व जाणवून घेण्यासाठी अश्या प्रतीकांमधून , प्रतिबिंबां मधून एकमेकांना शोधण्याची दोन जीवांची तगमग संवेदनशील मनाला ओळखता आली नाही तरच नवल.


आ नींद का सौदा करें एक ख्वाब दे एक ख्वाब ले
एक ख्वाब तो आँखों में है एक चाँद के तकिये तले
कितने दिनों से ये आसमां भी सोया नहीं है इस को सुला दें

बोल ना हल्के ...



नजरेतून होणारे इशारे अन नजरेतूनच एकमेकांना देऊ केलेले कसमे-वादे . शब्दाविन संवादू अशी  मधुर मनस्वी मौनातली भाषा . जगण्याची हि कसली सुंदर प्रतिमा असते ना . खरतर असं जगता यायला हवं आयुष्यभर … नाही ??

Sunday, 6 December 2015

जरतारी वस्त्र



लोकलच्या गेटवर उभी रितू शून्यात बघत होती. नवऱ्यानं दगा दिला आपल्याला या दुःखानं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकलं होतं तिचं. गाडीच्या वेगाचे, अंगावर येउन भिडणाऱ्या सुसाट वाऱ्याचे, वेगात मागे पडणाऱ्या झाडांचे, बाहेर दिसणाऱ्या परिसराचे, गाडीच्या आतल्या कोलाहलाचे कसले कसले भान नव्हते तिला. भरदुपारची वेळ, गर्दीही नव्हतीच फारशी …. गाडी थांबली कि जरा बाजूला व्हायला लागायचं आणि गर्दीचा डोंब आत उसळायचा तेवढ्यापुरतंच काय ती तंद्री तुटायची. हे असेच चालले होते महिन्यांपासून. मागल्या कित्तेक महिन्यात ती खळखळून हसली नव्हती. मैत्रिणींशी मज्जा मस्ती केली नव्हती. मनमोकळं बोलली नव्हती, रडली नव्हती. अजब अवस्था होती मनाची कुणी कुणीच नको असायचं भोवताल. अलिप्त करून घेतलं होतं तिनं स्वतःला. जणू एकटीच वावरते आहे जगात.…त्यातल्या त्यात लोकलने प्रवास करतांना हा मधला दीड तास तिचा आवडता वेळ. जगापासून तुटण्याचा.गाडीच्या वेगात स्वतःला वाहवून घेण्याचा. आपल्याच विचारांत. नको त्या हव्या त्या विश्वात गढून जाण्याचा.


अधून मधून कधीतरी एक साठीतली आजी बसायची वडाळा स्टेशन वरून. सगळे केस पिकलेले. ओठांवर मात्र सतत स्मित. असेल नसेल त्या साऱ्यांची मस्करी करत, बोलत.. नेहेमीच्या सख्यांची विचारपूस करत आजी खुश असायची. या वयातही सुंदर दिसायची. ........ रितूला फार अप्रूप वाटायचं आजीचं. स्टेशन कमी होत गेले तशी गर्दी ओसरली आज आजी आणि रितू दोघीच उरल्या. कापसाच्या वाती करण्यात मग्न आजीच्या शेजारी रितू येउन बसली. ती मुसमुसत होती.

आजीनं विचारलं तिला 'बाळा काय झालंय, रोज असा जीव जाळतांना का दिसतेस ?'
अन रीतुचा बांध फुटला…रडून घेतलं तिन मनसोक्त, म्हणाली ''आजी कुणाला सांगावं वाटतंय म्हणून सांगतेय तुम्हाला, पण जगावंसं वाटत नाही हो मला. ज्याच्या आधारानं तग धरून होते त्यानंच दगा दिला, ६ महिन्यात नवरा सोडून निघून गेला . आईवडिलांना सोडून आले होते. आता त्यांच्याकडेही परत जावसं वाटत नाही. एकटं जगतेय,कशासाठी-कुणासाठी काहीच माहिती नाही. कुठे जातेय का जगतेय काहीच कळत नाही. नको वाटतं हे सगळं … तुमचा हसरा चेहेरा बघते रोज आणि विचार येतो मनात वयाच्या पंचविशीत मी वैतागलेय आयुष्याला, …. आणि आयुष्याचे इतके वर्ष इतकी दशकं अन कितीतरी उन्हाळे पावसाळे पाहिल्यावरही तुम्हाला निराशा नाही का आली कधी? दुःखाचे वलय चिकटून नाही बसले… अडचणींचे ओझे नाही आले डोईवर?? का दुःखच नाहीये तुम्हाला कसले ??'



आजीनं रितुचे डोळे पुसले. जवळच्या बाटलीतले पाणी दिले तिला प्यायला आणि मंद स्मित करत मवाळ आवाजात बोलती झाली. आजी, ''वेदना अडचणी समस्या नसतात असे नव्हे राणी, ते का कुणाला चुकले आहेत ? ते असतातच …. अगदी प्रत्येकाला. ते असतात तेव्हा आपण त्यांना कसे वागवतो यावर त्यांचे आपल्यासोबत राहणे किंवा निघून जाणे ठरले असते. दुःखाचेही बघ तान्ह्या बाळासारखे असते अगं, ओंजळीत घेऊन सतत गोंजारले कि ते बाळसे धरू लागते. जितके कोड-कौतुक तितके ते चिकटून बसते. वेदनेचा हात धरून हिंडू नये… ते येतंय का मागे सतत वळून वळून बघू नये सोडून द्यावं मागे तसंच … आपण आपल्याच मस्तीत शिळ वाजवत चालत राहावं पुढे मागं मागं यायचा कंटाळा आला कि मागल्या मागे ते कधी निघून जाईन कळणार हि नाही. दुःखालाही शोध असतो गं … त्यालाही फटकारनारा नको, गोंजारणारा हवा असतो…. दुःख गोंजारण सोडून दे, अन बघ मग काय होतंय?''


आजीने रीतुचा हात थपथपला डोळ्यानेच स्मित करत ती बाहेर खिडकीकडे बघत गुणगुणू लागली …


'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे
करी जरतारी वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे'



रितू गाण्यांच्या ओवीत गुंतत गेली अन लोकलच्या वेगात मुग्ध होऊन जरतारी वस्त्र विणण्याच्या योजना आखू लागली.

Monday, 30 November 2015

पांढरे डाग- समज गैरसमज



वैद्यकीय कामानिमित्त एकदा कुठल्याश्या गावी जावे लागले. काम वगैरे आटोपून परतीच्या प्रवासाच्या वेळी नेमकी गाडी बंद पडली आणि नाईलाजास्तव बस ने प्रवास करावा लागला. नेमकी संध्याकाळची वेळ असल्याने बरीच गर्दी होती. बस गच्च भरलेली आणि बरीच माणसं उभी देखील होती. इतक्या गर्दीतही एक सीट मात्र खाली होती. येताजाता लोक त्याकडे बघत होती, बसायला म्हणून जात होती पण तिथे बसत मात्र नव्हते. असं का होतंय? मुळात जिज्ञासू असणारी वृत्ती जागृत झाली आणि मी प्रत्यक्षच तिथे बघायला गेले. तिथे जे काही बघितले ते आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक देखील होते. तिथे एक मध्यमवयीन इसम बसलेले होते, त्यांच्या शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागांनी व्यापला होता. आणि म्हणूनच कुणीही त्यांच्याजवळ बसायला तयार नव्हते. पांढरे डाग ज्याला बोलीभाषेत 'कोड' असे संबोधतात. अश्या व्यक्तीला स्पर्श झाला तर ते डाग आपल्यालाही होतील अश्या बिनबुडाच्या कल्पनेने, भ्रामक विचारांनी लोकं किती ग्रासली आहेत या विचाराने मन सुन्न झाले.

 आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रापर्यंत भरारी मारत असतांना. पांढऱ्या डागांसारख्या अतिशय साधारण अन अजिबात घातक नसलेल्या विकाराबद्दल लोकांमध्ये किती गैरसमज अजूनही कायम आहेत. अनेक घातक, जीवघेणे रोग येतात आणि कित्तेकांचा जीव घेऊन जातात. पण त्या रोगाहूनही जास्त आपण या अश्या साधारण त्वचारोगास अवास्तव महत्व देतो त्याविषयी टोकाचे गैरसमज पाळतो. आजारपण आणि विकार दोन्हीत फरक आहे. पांढरे डाग म्हणजे रोग किंवा आजारपण नाही तो एक विकार किंवा उणीव आहे आणि त्याकडे खरतर त्याच दृष्टीने बघितले जायला हवे. पण असे घडत नाही.

पांढरे डाग (कोड) ज्याला इंग्रजीत 'ल्युकोडर्मा' असे म्हणतात. 'पांढरे डाग' बस एवढ्या नावातच ह्या विकाराचा खरा अर्थ गर्भित आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे आडवे-उभे पसरणारे डाग म्हणजे हे 'कोड'. या विकारामुळे शरीराच्या अंतर्गत संस्थानांवर काहीही प्रभाव पडत नाही. शारीरिक अंतर्बाह्य सर्व क्रिया सुरळीत चालू असते हा फक्त त्वचेवर होणारा पिग्मेटेशन विकार आहे जे शरीरातील मिलानोसाईट्स नावाचे सेल्स नष्ट झाल्याने किंवा हे मिलानीन सेल्स उत्पन्न न करू शकणाऱ्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला विकार आहे. हे सेल्स नष्ट का होतात किंवा अचानक उत्पादन का मंदावते ह्याचे वैद्यकीय विषयात दार्शनिक असे स्पष्ट कारण देता येत नाही. परंतु आयुर्वेदानुसार विरुद्धदर्शी आहार किंवा पचनसंस्थेतील बिघाड हि दोन मुख्य कारणे सांगण्यात आली आहेत.
हा विकार पूर्णतः अनुवांशिक नसला तरी वंशपरंपरेने हा विकार पुढल्या पिढीत उतरण्याची शक्यता वाढलेली  असते. श्वेतवर्णाचे हे डाग शरीरावर दिसायला लागले कि रुग्ण शारीरिक व्याधीपेक्षाही जास्त मनाने खचतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आणि समाजात वावरण्यास त्यांना संकोच वाटू लागतो. समाजही त्यांना सहज स्वीकारत नाही म्हणून ते सतत मानसिक दडपणातच जगत असतात.

आज आयुर्वेदाने या विकारासाठी अनेकानेक उपचार शोधून काढले आहेत. आता पांढऱ्या डागांसाठी रुग्णांनी निराश होण्याची गरज नाही, गरज आहे ती पूर्ण धैर्याने सामोरे जाण्याची आणि योग्य ते उपचार घेण्याची. साधारणतः फोटोकिमोथेरपी, कॉस्मेटिक सर्जरी, स्टीराईड थेरपी असे काही नामी उपचार वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत परंतु शरीर शास्त्रानुसार हे उपचार करवून घेण्यावर काही मर्यादा आहेत आणि त्यांचे दुष्परिणाम देखील असतात. आयुर्वेद हि प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे आणि कुठलाही जटील रोग सुद्धा मुळातून घालवण्यासाठी प्रचलित आहे. पांढरे डाग विशेषज्ञ (ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट) या नात्याने मी आजवर अनेक क्लिष्ट रुग्णांना बरे केले आहे. योग्य उपचार आणि पथ्य पाळून या विकारातून पूर्णतः बरे होता येते आणि पुन्हा डाग होण्याची शक्यता देखील कमी असते हे मला माझ्या प्रयत्नांनी दाखवता आले. ह्याचे मला समाधान आहे अनेक वर्षांच्या परिश्रमाने चांगल्या उपचार पद्धती शोधून काढता आल्या आणि आता मी फक्त पांढऱ्या डागांवर उपचार करण्यात कार्यरत आहे. रुग्णांना बरे करण्यात मिळणारे सुख इतर कुठल्याही सुखापेक्षा माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.


डॉ. स्नेहा राठी
(ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट)
शब्दांकन :- रश्मी प. म.

(सकाळ वृत्तपत्रात 'ल्युकोडर्मा डे' ला प्रकाशित झालेला लेख)

Thursday, 19 November 2015

तृष्णा ...!!

'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय श्रावणी.. हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज '

'…… हम्म   ' 

'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस' 

श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला' 
बराच वेळ कॉटवर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली

 तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.   
तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले. 
भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवाज सावरत बोलु लागली

 ' रावी हे बघ ऐक एकदा माझे…हे बघ मला राहवत नाहीये गं , तू तरी समजून घे, अक्खी रात्र पालटली आता दुपार झालीय पण तनुलचा काहीच पत्ता नाही… काहीतर बोल गं ' 

 ' हे बघ श्रावणी या विषयाला काहीच अर्थ नाहीये आता … जे व्हायचं ते होऊन गेलंय'

 ' अस नको म्हणूस ना ग … प्लीज … माझ्यासाठी एकदा तू … हेलो हेलो … रावी… हेलो रावी'

ती पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. हातातला फोन तिने बेड वर फेकून दिला … रडत रडत खाली बसली आणि भिंती लगत डोकं मागे टेकून शून्यात ध्यान लावून बसून राहिली तशीच कितीतरी वेळ … डोळ्यातून अश्रू वाहत राहिले तसेच .डोळे सताड उघडे …  

दरवाजा वाजला … तिची पापणी सुद्धा हलली नाही… दरवाजा जोरजोरात वाजू लागला. ती नाही हलली जागची

आईने आवाज दिला बराच अन बाहेर ये अशी ताकीद देऊ लागली…. 

विजेच्या ताकदीने श्रावणी उठली जागची…  झपझप पावले टाकत दाराजवळ आली, झर्रकन हात कडी जवळ नेत कडी उघडली आणि हवेच्या गतीने दार उघडलं  …. आई भयचकित होऊन दारात उभी होती. श्रावणीने लालेलाल अश्या भरल्या डोळ्याने काळीज चिरत जाणारी करारी पण रागीट नजर टाकली आईवर …. काही सेकंद तसेच खिळलेले …. आणि आईला काही कळायच्या आत तिने तेच दार प्रचंड वेगाने भिरकावले बंद करण्याकडे …. खा~~डड  असा आवाज झाला आणि ते पुन्हा त्याच वेगाने सुरु होण्याआधी तिने दुसऱ्या हाताने लगेच कडी लावून घेतली. दाराच्या पलीकडल्या आईची काय मनःस्थिती झाली असेल ह्याची जणू तिला जराही पर्वा नव्हती. 

जेवढ्या वेगाने गेली तेवढ्याच संथपणे ती हुंदके देत कॉट जवळ आली. विखुरलेले केस हाताने वर करून तिने फोन उचलला आणि पुन्हा श्रेयस ला फोन लावला. फोन उचलला गेला हे कळताच ती रडतच बोलू लागली

 'श्रेयस ऐक रे एकदा फोन ठेवू नकोस … प्लीज जीव जाईल माझा '
 'काय बोलायचं शिल्लक ठेवलायेस श्रावणी ? आणि का ऐकायचं तुझं? कोण आहेस तू ?'
'श्रेयस अरे मी मैत्रीण आहे तुझी निदान आजपर्यंत मैत्रीच्या खातर तरी …'
 'मैत्री~ ~ मैत्री …. तू बोल् तेयेस हे श्रावणी ?' 
 'श्रेयस अरे चुकले रे मी, माझा नाईलाज झालेला आई- बाबांसमोर, त्यांच्या बोलण्यात आले. त्यांचा त्यांच्या त्या सो कॉल्ड समाजाचा विचार केला ,…. आणि … आणि '
'आणि तनुलला चक्क तुझ्या घरच्या लोकांसमोर अपमानित केलंस, तुझ्या आईने नको नको ते काय काय घालून पाडून नाही बोलून घेतलं त्याला….  आणि तू … तू गप्प होतीस ? घरच्यांनी अपमानित केलं म्हणून नाही ग तो दुखावला … तुझं वागणं … तुझं वागणं दुखावून गेलं त्याला, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय काहीही सुचायचं नाही त्याला तुझ्या सुखासाठी, चैनीसाठी पैसा हवाय त्याला म्हणून नौकरी साठी धडपडत राहिला तो … तीच जगण्याचं एकमात्र माध्यम असणारी त्याची जिवलग त्याला ऐन वेळेवर निघून जा सांगते?? मी माझ्या पालकांच्या शब्दाबाहेर नाही अस बोलते…. तुझा माझा संबंध नाही यापुढे … मला विसरून जा म्हणते?? …. कसं , कसं जमलं गं हे सर्व तुला? '

 'श्रेयस अरे मला कळलंच नाही रे हे सर्व कसं घडून गेलं, मी घाबरले होते… त्याच्या जीवाला काही नको व्हायला होतं मला …  मला वाटलं तनुल सावरेल स्वतःला … पण काल संध्याकाळी हे सगळं घडल्यापासूनच त्याचा काहीच पता नाहीये, तो फोनही उचलत नाहीये, त्याच्याशिवाय जगण्याचे हे काही तास मी मरण यातना सहन करतेय…. माझा तनुल मला परत कर रे … सांग एकदा तो कुठे आहे ? सुखरूप आहे तो बोल एकदा … एकदाच हवं तर' 

'अगं जा~~ गं, तुझ्या कुठल्याच शब्दांवर आता विश्वास ठेवावा वाटत नाही…. फक्त तनुलचंच नाही माझं अन ओवीचहि मन तोडलंय तू… तनुल चे अश्रू बघवले नाही आम्हाला त्याला एकांत हवा होता म्हणूनच त्याला तसेच सोडून निघून आलोय आम्ही सकाळी तृष्णेवरून …. त्यानंतर तर त्याने आमचाही फोन उचलला नाहीये. …… हेल्लो … ह … हेल्लो श्रावणी'

श्रावणी ने फोन ठेवला होता … तिला आता निव्वळ तृष्णा दिसत होती. अंगावरल्या घरच्याच कुर्त्यावर तिने नुसताच स्कार्फ ओढून घेतला, खोलीच्या दाराबाहेर पडतांना टेबलवरच्या गाडीची किल्ली उचलुन घेतली आणि 'कुठे निघालीस' अस विचारणाऱ्या आईच्या एकही शब्दाला उत्तर न देता धावतच घराबाहेर पडली. 

'तृष्णा'  तनुल-श्रावणीचा आवडता स्पोट. एका चौकोर तलावाच्या मध्यभागी हिरवाई असणारी बाग, छोटेखानी बेटंच जणू … तिथल्या पुलावरील तालावाशेजारच्या झाडांच्या सावलीतल्या दगडांवर बसायला फार आवडायचं तनुलला…श्रावणीची वाट बघत आणि ती उशीरा आल्यावरही न रागावता तिचा हात हातात घेऊन तासान तास  बसायचा तो तिथे. 

 तो पूल ते एकावर एक रचलेले दगड श्रावणीच्या डोळ्यासमोर गिरक्या घेऊ लागले.  १५ KM दूर … पण श्रावणीच्या डोळ्यांना आणि गाडीच्या चाकांना आज वेग लागला होता. दोघांनाही काही केल्या थांबता येईना…. तृष्णेवर  पोचायला लागेल तेवढा संपूर्ण वेळ तिच्या भरलेल्या डोळ्यासमोर तनुल दिसत राहिला, आपल्या चेहेर्यावर एक स्मित दिसावं म्हणून धडपडणारा तनुल…. सालस -समंजस-हुशार तनुल, मित्रांमधला लाडका तनुल … आई-बाबांनी एवढा अपमान केल्यावरही एका शब्दानेही त्यांना उलट न बोलणारा तनुल …. मी आई बाबांचं ऐकायचं ठरवलंय अस सांगितल्यावर मौन झालेला आणि दुखावला गेलेला तनुल.' 

ती तृष्णेवर पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर तापलेलं उन्ह उतरणीला आलेलं. पश्चिमेला जरा जरा तांबड फुटलं होतं. आणि तृष्णे वरून वाहणाऱ्या वाऱ्यांत जरा गारवा जाणवत होता…या कशातही लक्ष नसणाऱ्या श्रावणीचे डोळे फक्त तनुलला शोधत होते. मिळेल त्या जागेवर गाडी पार्क करून ती धावतंच आत शिरली. पुलापर्यंत जायला आणखी पाच मिनिट लागणार होते. तेवढा त्राणही आता तिच्यात उरला नव्हता. ती पोचली पुलावर तिची नजर भिरभिर शोधत राहिली तनुलला …. पण नाही … नाही दिसला तनुल. नजर जाइल तिथपर्यंत शोध घेऊन झाला आणि श्रावणीचे उरले सुरले सगळेच धैर्य खचले. ती गुढग्यांवर मट्टकन  खाली बसली …. आणि 'तनुल~~ ' अशी आर्त हाक घालून हुंदके देऊन रडू लागली. वातावरणात प्रचंड शांतता, पाण्यावरून वाहणाऱ्या हवेचा हलकासा हुंकार आणि हुंदक्याचा आवाज ……….  

……… शाणु 

श्रावणी च्या कानावर शब्द पडलेत तिने मान उचलली …. पुढ्यात तनुल उभा होता. त्याला बघून ती अधिकच हुंदके देऊन रडू लागली. 

तनुलच्या डोळ्यातूनही टपकन थेंब ओघळला गालावर …. त्याने दोन्ही हात पुढे केले अन भरल्या डोळ्याने स्मित दिले तिला … 

क्षणाचाही विलंब न करता श्रावणी धावतच कुशीत शिरली त्याच्या …….          




(सकाळ जळगाव एडिशनच्या 'शब्ददीप 2016' दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा.)   


Saturday, 14 November 2015

भरून आलेले आभाळ पहिले कि
पावसाचे अंदाज बांधतोस तू ..
वेधशाळेच्या बड्या कारभारावर
तिरकस ताशेरे ओढतोस तू...

माझं मनाचं आभाळ ओसंडू लागूनही
कळत नाहीत अंदाज तुला
बुद्धीच्या खुळ्या कारभारावर
भावनांची गळचेपी करतोस तू

सगळं समजल्याचा आव आणू नकोस
नाहीच कळत काही तुला ...

Wednesday, 11 November 2015

गिमिक...



''hey ! gd mrng mom..HANDA MU TC :)'' रमा काकूंचा जर्मनीला असणाऱ्या मुलाचा रोज सकाळी मेसेज येतो. सकाळची सुरुवात अश्या कुठल्याश्या गुंतलेल्या शब्दांच्या एसेमेसने होते. मुलाला सांगू वाटणाऱ्या सगळ्या भावना अश्या थोडक्या शब्दात पुरत्या तो आईपर्यंत पोचत्या करतो अगदी छानश्या स्माईली सकट. आता हे रोजचंच झालंय रमा काकुंनाही पत्राऐवजी आता हेच सोयीचं अन 'कु~~ल' वाटायला लागलंय. हि आजच्या पिढीची सांकेतिक भाषा. आता वाटलं तर भावना समजून गोड मानून घेता येते नाहीतर नुसताच गुंता समजून गुंडाळूनही ठेवता येते.… मला आमचं लहानपण आठवतं. आपण बोलतोय ते सगळ्यांना कळू नये म्हणून आम्ही भावंड काही निवडक जिवलग मित्रांसोबत मिळून स्वतःची भाषा तयार करायचो. शब्दांची मोडतोड, काही शब्दांची गुंतवणूक ,शब्द्फोड आणि लहेजा (टोन) बदलून आम्ही आमच्यात संवाद साधायचो. 'च' ची भाषा. रफरची' भाषा, उलटशब्दी किंवा 'म' ची भाषा अश्या अनेक सांकेतिक भाषा हि त्यांची जाहीर उदाहरणं. पण तेव्हा मोठ्यांच्या दुनियेत त्याची ती स्वीकारार्ह कि अस्वीरार्ह अशी जाहीर चर्चा होत नसे. बाललीला समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाई. आजच्या तरुण पिढीनेही त्यांना समजेल अशी अन उमजेल अशीच त्यांची त्यांच्या सोयीची अशी शोर्ट शाब्दिक भाषा तयार करून घेतली आहे तिला 'slang' असे म्हणतात. जी एसएमएस, व्हाटसअप, फेसबुक, ट्विटर सारख्या कुठल्याही सोशल मिडियासाठी वापरली जाते. 'इतकं हसायला येतंय कि मी हसून हसून जमिनीवर लोळायला लागलेय' असं लांबच्या लांब वाक्य म्हणण्यापेक्षा चार अक्षरांचं ROFL ( Rolling On Floor Laughing) किंवा तीनाक्षरी LOL (laughing out loud) म्हणणे त्यांना जास्त सोयीचे वाटते. यातून कमी शब्दात भावना पुढल्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवता येतात आणि मर्यादित जागेत संपूर्ण कथाही ऐकवता येते.


सोशल मीडियाचा परिणाम आज जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करतोय. नाण्याला दोन बाजू असतात तसे या माध्यमाला देखील आहेत. सोशल मिडीयाचा वापर कुणी कशासाठी करावा हे व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे. माध्यम चांगली किंवा चुकीची नसतात त्याला स्वतःचे गुणावगुण नाहीयेत ते व्यक्तीसापेक्ष आहे. पण भाषेच्या बाबतीत म्हणाल तर आजची नवपिढी वापरत असलेली सांकेतिक भाषा पाहिली आणि त्यांच्या पिढीची गरज ओळखून ते वापरीत असलेली साधनं म्हणजेच सोशल मिडिया हे आजच्या पिढीला मिळालेलं खणखणीत नाण ठरत. भाषा कधीच स्थायी नसते इतिहास पाहिल्यास लक्षात येते कि पिढीनुरूप आवश्यकतेनुसार भाषेत सोयीस्करपणे बदल घडत आले. फरक इतकाच कि आता ती पूर्वीपेक्षा जास्त गतीने बदलते आहे आणि हा बदल कुठलीही आडकाठी न आणता ना-नुकुर न करता आजच्या नव्या अन कालच्या युवा पिढीने हसत स्वीकारली आहे.


गेल्या पिढीत म्हणजे आमच्यावेळी अगदीच पाच-सात वर्षाआधी पर्यंत ...(हल्ली ज्या गतीने पिढींचे वागणे-बोलणे, आवडी-निवडी आणि विचार बदलतात त्या अनुषंगाने Generation Gap आता एवढ्याच वर्षांची झालीये म्हणलं तर वावगं ठरणार नाहीं) बालसुलभ गमती सोडल्यातर तरुण पिढीला प्रत्येकाला स्वतःचे असे भाषेचे स्वधर्म नसायचे तेव्हा भाषेचे दोनच प्रकार आम्हाला माहिती होते. एकतर 'बोलीभाषा' अन दुसरी शास्त्रशुद्ध, चौकटीतली मान्यताप्राप्त, साजूक तुपातली पुस्तकी 'प्रमाण' भाषा. यात अगदी ठप्पा मारून ठरवून दिलेली भाषाच वापरायची असा अलिखित कायदा असायचा. तुम्हाला तुमच्या मताचे स्वतः तयार केलेले शब्दांचे विविध वर्शन वगैरे वापरणे संस्कार बाह्य होते किंवा मग तसे काही करता येते अशी आईडियाची कल्पना एखाद्याच सुपीक डोक्यात त्यावेळी आलेली असणार. भाषेचा संबंध जाती-धर्माशी किंवा संस्काराशी जोडला जायचा. जन्मापासूनच बाळाच्या मानसिक जडणघडणीचा प्रवास असा भाषेपासून सुरु व्हायचा. पुढे भाषेची अनेकविध स्थित्यंतरे घडत गेली. खरतर भाषा हे माध्यम आहे संवादाचं ते साध्य नाहीये. साध्य गाठण्यासाठी, अविर्भाव व्यक्त करण्यासाठी किंवा विचार पोचवण्यापुरता तिचा उपयोग केला जात असेल तर ती कश्या पद्धतीने वापरली जाते आहे ह्यावर पिढ्यानपिढ्या इतका काथ्याकुट करणं कितपत योग्य आहे हा चर्चेचा विषय असू शकतो .. नाकारायचा मात्र नाही.


आज संपर्काचं लोकप्रिय माध्यम म्हणजे सोशल मिडिया. त्यात आजची तरुण पिढी तर या माध्यमाने भारावून गेली आहे. तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहिला आहे. सतत सायन्स ऍण्ड टेक्‍नोलॉजीत वाढणारी आजची युवा पिढी Gadget च्या नावाखाली हातातल्या घड्याळीपासून ते मोबाइलपर्यंत सतत टेक्नोलोजीच्या संपर्कात असते. जन्मापासून सुरु होणाऱ्या आयुष्याच्या धावपळीत वाढती कामे, अभ्यास,स्पर्धा आणि यासर्वात कमी पडणारा वेळ यात ताळमेळ बसवतांना त्यांची तारांबळ उडते. अश्यात समाजाशी जुळून राहण्यासाठी, अध्यायावत राहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांच्या देवाणघेवाण संबंधी संपर्काच माध्यम म्हणून त्यांनी हा सोप्पा सरळ मधला मार्ग शोधून काढलाय. आता तर शब्दांसोबत काही इमोटीकॉन्सही संवादाला मदत करतात हसणे, रडणे, हाव-भाव, थम्सप- थम्सडाऊन एवढेच नाहीतर गिफ्ट्स, केक, फुगे, प्राणी, पाऊस, खाणे वगैरे चित्र रुपात वापरता येतात. या तरुण पिढीच्या तरुण भाषेला त्यांच्या जीवन प्रणालीला नावे ठेवणाऱ्या महानुभावांनी एकदा हा बुद्धिवादी संवादाचा खेळ खेळून बघावा शेवटी काय आपल्या माणसाला समजून घ्यायला मौनाची भाषाही पुरते असे आपण मानतोच ना … मग मनापासून या पिढीच्या मनापर्यंत पोचायला या एसेमेस च्या भाषेचा गोडवाही चाखूया आणि त्यांच्यातलेच एक होऊन पाहूया. काय माहिती जनरेशन मधील हि gap अशीच भरून निघेल.


रश्मी(c)
१८ ऑग. २०१५



('दैनिक सकाळ' २०१५ ''सोशल मिडिया विशेष'' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

Monday, 31 August 2015

जन्मदिन कि बधाई अमृताजी...

अमृता प्रीतम उत्कृष्ट लेखिका पण त्याहून अधिक एक हळव्या मनाची स्त्री स्वप्न बघणारी आणि ते तसेच जगून दाखवणारी. स्त्री म्हणून तिच्यात असणाऱ्या प्रेम, ममता, जिव्हाळा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराची नुसतीच मैत्रीण म्हणून किंवा तिच्या मनात वसलेल्या पण कधीही तिचा न झालेल्या प्रियकराची प्रेयसी म्हणून या सगळ्या उत्कट भावनांतून अनुभवलेल्या जीवन घटना आणि त्यातून निर्माण झालेली हि संवेदनशील कवियित्री. तिचे सारेच रूप मला फार आकर्षित करतात अन प्रभावितही. आज तिच्या जन्मदिनी तिला आदरांजली म्हणून तिच्या मला अतिशय आवडणाऱ्या या दोन कविता.



मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं

शायद तेरे कल्पनाओं

की प्रेरणा बन


तेरे केनवास पर उतरुँगी

या तेरे केनवास पर

एक रहस्यमयी लकीर बन

ख़ामोश तुझे देखती रहूँगी

मैं तुझे फिर मिलूँगी


कहाँ कैसे पता नहीं


या सूरज की लौ बन कर

तेरे रंगो में घुलती रहूँगी

या रंगो की बाँहों में बैठ कर

तेरे केनवास पर बिछ जाऊँगी


पता नहीं कहाँ किस तरह

पर तुझे ज़रुर मिलूँगी


या फिर एक चश्मा बनी

जैसे झरने से पानी उड़ता है

मैं पानी की बूंदें

तेरे बदन पर मलूँगी

और एक शीतल अहसास बन कर

तेरे सीने से लगूँगी


मैं और तो कुछ नहीं जानती

पर इतना जानती हूँ

कि वक्त जो भी करेगा

यह जनम मेरे साथ चलेगा

यह जिस्म ख़त्म होता है

तो सब कुछ ख़त्म हो जाता है


पर यादों के धागे

कायनात के लम्हें की तरह होते हैं

मैं उन लम्हों को चुनूँगी

उन धागों को समेट लूंगी

मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं


मैं तुझे फिर मिलूँगी!!





मैं- एक निराकार मैं थी

यह मैं का संकल्प था, जो पानी का रुह बना
और तू का संकल्प था, जो आग की तरह नुमायां हुआ
और आग का जलवा पानी पर चलने लगा
पर वह पुरा-ऐतिहासिक समय की बात है .....

यह मैं की मिट्टी की प्यास थी
कि उस ने तू का दरिया पी लिया
यह मैं की मिट्टी का हरा सपना
कि तू का जंगल उसने खोज लिया
यह मैं की माटी की गन्ध थी
और तू के अम्बर का इश्क़ था
कि तू का नीला-सा सपना
मिट्टी की सेज पर सोया ।
यह तेरे और मेरे मांस की सुगन्ध थी -
और यही हक़ीक़त की आदि रचना थी ।

संसार की रचना तो बहुत बाद की बात है ......

अमृता प्रीतम



सच तू -सपना भी तू
गैर तू -अपना भी तू

खुदा का इक अंदाज तू
और फज्र की नमाज़ तू
जग का इनकार तू
और अजल का इकरार तू

फानी हुस्न का नाज़ तू
रूह की इक आवाज़ तू
जोग की इक राह तू
इश्क की दरगाह भी तू

आशिक की सदा भी तू
अल्लाह की रज़ा भी तू
सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू

वाह सजन ...वाह सजन !!
वाह सजन ...वाह सजन !!

अमृता प्रीतम

Thursday, 13 August 2015

स्वगत .. डेस्टीनेशन !

पावसाळ्याचे दिवस अतिशय देखणे, ओले-गार अन हिरवाईने नटलेले असतात पण कधी लक्षात आलंय का तुमच्या ह्याच दिवसात अनेकदा एक अनामिक उदासीनता जाणवते. जसजसे वातावरण आर्द्र होत जाते उन्ह गळून पडतं अन भरदिवसा अंधारून येतं. घरातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले असतात आणि खिडकीत बसून सारख्या पडणाऱ्या पावसाकडे पाहण्याचाही कंटाळा येतो. घरात दडून बसावं वाटत नाही आणि बाहेर पडणेही शक्य नसते अश्यावेळी मरगळ येते. इकडे आकाशात ढग अन मनावर मळभ एकत्रच दाटून येऊ लागतात. विचारांचे वारे वाहू लागतात आणि आपण आपल्याही नकळत आयुष्याचे वादळ आपल्याच पुढ्यात मांडून बसतो. काय चाललंय आपलं नेमकं आपल्यालाच कळत नाही. प्रचंड आवडणारा पाऊस; हवाहवासा वाटणारा, वर्षभर वाट बघायला लावणारा पाऊस आज असा उदासवाणा का वाटतोय ह्याचं उत्तर आपलंच आपल्याकडे नसतं. मग आणखी बऱ्याच गोष्टी आठवू लागतात. आयुष्यात कधीपासून आपल्याला काय काय 'इगरली' हवं होतं. आयुष्याकडून आपली हट्टाची मागणी काय होती? ह्याची यादी मनात-डोक्यात जागा घेऊ लागते. एक एक मागणी एक एक गरज.. अश्या गोष्टी ज्याशिवाय मला जगणे शक्य नाही किंवा जगायचेच नाही असे वाटायचे.. ते ते सगळे मिळाले का ? सगळ्या नसतील झाल्या मागण्या पूर्ण पण..पण बऱ्याचअंशी झाल्यातच कि .... ज्या नाही झाल्यात त्या शिवायही आज जगता येतयच ना आपल्याला. मग ते 'न' मिळवून असं काय गमावलंय? नाहीच काही... मग का त्रास करून घेतला आपण मनाला-जीवाला त्या त्या वेळी. कित्तेक महिने कित्तेक काळ दुःखात काढले ....आणि 'त्या' न मिळालेल्या गोष्टींशिवायाही आज सुखी असू तर तो तेव्हाचा त्रास ती जीवाची तगमग सारं फुकटच गेलं म्हणायचं का ??
 
आणि ज्या गरजा ज्या मागण्या पूर्ण झाल्यात त्याचं काय केलं आपण ?? 'त्या' मिळवून असा काय तीर मारून घेतलाय किंवा 'जे' मिळालंय त्या मागे लागलेली धावपळ, केलेले कष्ट, तीव्र इच्छाशक्ती या सर्वांना प्रामाणिक जागतोय का आपण. 'ते' मिळवण्यासाठी आयुष्याचा वेळ, श्रम अन एनर्जी घालवलीय त्याची आजही तितकीच Value आहे का आपल्या लेखी ? कि जी काही धडपड होती, जीवाची तगमग होती, जेवढे दिवस कष्ट घेतलेत जेवढ्या रात्री काळजीत काढल्या ते सगळं सगळं केवळ अन केवळ 'हवं ते' मिळेपर्यंत / मिळवेपर्यंतच होतं. ते मिळाले अन तत्क्षणीच त्याचे पूर्वी असलेले महत्व, ती गरज आपल्यालेखी संपुष्टात आली होती. मग पुन्हा नवी मागणी, नवी इच्छा, नवी गरज घेऊन आपण नव्याने आतुर झालो. नव्याने बेचैन होऊन कामाला लागलो. पुन्हा रात्र जागल्या अन दिवसा दगदगीत काढू लागलो. कष्ट उपसु लागलो... तहान भूक विसरलो.

हो ... होतंय खर असंच ना ?? जे आता या क्षणी आहे जे मिळालंय ते मिळाल्याचं सुख तर त्या त्या वेळी उपभोगायचं राहूनच गेलं. ज्या सुखासाठी तडफडत होतो ते सुख दारात असतांना आपण एक पायरी ओलांडून व्हरांड्यातून पुढे निघून गेलोत. ते प्रचंड हवं असलेलं, गरजेचं, आवडीचं  आपल्या दारात आलंय एवढंच कसकाय पुरे होतं आपल्याला. एवढी जीवाची तगमग बस एवढ्याचसाठी होती...असं कस? ह्याचा विचार केलाच नाही कधी. जे मिळालंय त्याचा आनंद उपभोगायचा नव्हताच तर कशासाठी जीवाला एवढा त्रास दिला? आपण नुसतेच धावतोय का? कुठे जातोय, कशासाठी, कुठे पोचणार ह्याचा विचार न करता पळतोय नुसते. डेस्टीनेशन माहितीच नसेल तर धावण्याचाही उपयोग काय ?  जे मिळालं नाही त्यासाठी भोगलेलं दुःख अन जे मिळालंय त्यासाठी उपसलेले कष्ट सारंच कसं पाण्यात जातंय आपलं का ?

ऊम्म्म्हं ! असं नाहीये खरतर ..जे मिळालं नाही त्याशिवायही जगता आलं सर्व्हाइव केलं हीच आपण त्या क्षणांतून मिळवून घेतलेली 'स्ट्रेन्थ' आहे... जीवन जगण्यासाठी शिकलेला एक नंबरी 'फोर्मुला' जो आयुष्यभर कामी येणारेय. अन जे मिळवलंय त्याचा आनंद घेताच आला नसेल तर मिळवूनही स्वतः स्वतःच्या हातानं स्वतःच सुख आपण घालवलंय, मिटवून टाकलंय . म्हणजेच मिळवणे हे नेहेमी मिळवणे असतेच असे नाही आणि गमावणे म्हणजे मिळवणे नसतेच असेही नाही. किंवा अगदी ह्या उलट देखील.

हे सगळं असंच आहे कि मी उगाच बडबडतेय ... बापरे ...  वेडगळ विचार ऐकून पाउसही थांबलाय आता. निघायला हवं खूप कामं पडलीत ... बाकी पुन्हा कधीतरी

क्रमशः          


रश्मी / 12-08-15       

दैनंदिनी !!

रंग उडालेल्या काळपटलेल्या टेबलच्या
खिळखिळ्या झालेल्या ड्रॉवरच्या आत
अस्ताव्यस्त पसरलेल्या जुन्या बिनकामाच्या वस्तूंच्या
भाउगर्दीत , धुळीने माखलेल्या अवस्थेत पडलेय मी
टाचण्या पिना टोचल्यात, पेपरवेट, वस्तू येऊन आदळलेत अंगावर
कुणाला सोयर सुतक नाही ...आतातर तुलाही नाही …

कधी बैठकीतल्या काचेच्या कप्प्यातली शोभा वाढवायचे मी …
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच कौतुक ऐकायचे मी
कधीतरी इथली माणसं प्रेमानं हाती घ्यायचे
अंगावरची धूळ पुसून काळजाशी लावायचे
पान पान पालटतांना हळवी होऊन सुखावायचे मी
अन रात्र होताच उशाशी तुझ्या विसावायचे मी

तासंतास माझ्याशी बोलायचीस तू
शब्द शब्द पेरतांना किती गुंतायचीस
तुझ्या भावनांचा ओघ ओंजळीत सामावून घेतांना मीही मग रमून जायचे
तुझ्या अनुभवांची निर्जीवी पण एकमेव जिवंत साक्ष ठरायचे.

तुझे अश्रू अंगावर झेलतांना उर भरायचा माझाही
तू दुःखात असतांना क्षणभरही साथ सुटायचा नाही तुझाही
तुझे मन हलके व्हायचे माझ्याशी बोलून
मीही मग धन्य व्हायची तुझे हसू बघून

तुझे दिवस सरले अन माझेही
तू सुखी झालीस तुला हवं ते मिळवून
अन मला विसरलीस असे अडगळीत सोडून
आता दैनंदिनी लिहायची गरज नाहीये ना तुला
जीवाचा सखा मिळालाय असं ऐकलंय परवाला

मी मानेन समाधान तुझ्या जुन्या आठवणीत
क्षण ठेवेन जपून तसेच साठवणीत
ये एकदा भेट मला एवढीच इच्छा आहे सखे
तू सदा सुखी रहावीस हेच मागणे अखेरचे …

हेच मागणे अखेरचे …




Wednesday, 12 August 2015

अज्ञानात सुख

कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या कलेची आवड असायला हवी त्याबद्दलची जाण असायला हवी पण त्याचे ज्ञान मात्र असायला नको. फार ज्ञान असले कि कलेतील उणीवा, खाणा-खुणा आणि चुका आधी नजरेला, कानाला अन स्पर्शाला जाणवतात. आस्वाद घ्यायचे दूरच राहते. बघण्या, ऐकण्या अन वाचण्याच्या बाबतीत एक हमखास होतं अधिक चांगल्या गोष्टी बघत वाचत ऐकत गेलो की आपल्या अपेक्षा आपल्या आवडी-निवडीपेक्षाही जास्त वाढतात. दर्जेच्या उद्देशाने नसलेल्या अगदी शुद्ध मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा आपण ज्ञान आणि दर्जा अश्या कसोटी वर घासून बघतो. आपले ज्ञान आपली आवड आपल्यालाच मुक्त गोष्टींचा मुक्तपणे आस्वाद घेऊ देत नाही. पुन्हा पुन्हा असे घडत राहिले कि मिळेल तिथून आनंद मिळवण्याच्या स्वभावात कमी येते अन रुक्षपणा वाढत जातो. ह्याची परिणीती काहीही न आवड्ण्यामध्ये होते. अन कुठेतरी मानसिक एकाकीपण जाणवू लागते. अज्ञानात सुख असते म्हणतात ते हेच.  

Sunday, 9 August 2015

स्मिता



स्मिता = सावळ्या (offbeat) भूमिका बजावणाऱ्या या गोऱ्यांच्या चाहत्या दुनियेतल्या सावळ्या अभिनेत्रीचे विचारही असे सावळे (out of crowd) असावेत ....हा निव्वळ योगायोग नाही हा तर सावळा योग ... नाही ??




Saturday, 1 August 2015

पिंड



पु.ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलय
शेवटी संस्कॄती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुस-याचा पाय चुकुन लागल्यावरदेखील आपण प्रथम केलेला नमस्कार.... दिव्या दिव्या दीपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी.... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे.... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तस ह्या अदॄश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा....
शब्द फार छानं आहेत. परिटघडिचे शर्ट घातलें की मलाही आवडतील पण हे असं झालं माझ्या दरिद्री आयुष्यात.
बाजरीच्या भाकरी उरल्या तर आई त्याचे तुकडे करुन पुन्हा एकदा कडक भाजायची. सकाळच्या न्याहारीत चहाबरोबर बटरसाठी रोज दहा पैसे कुठले असायला? मगं हिचं आमची बिस्किटं. गणपतीबाप्पाची आरोळी आम्हीही ठोकली असती जर शाळा जेंव्हा मंदिरात भरायची तेंव्हा बाहेर न बसविता आत येउ दिले असते तर. मारुतीच्या देवळात नारळ फोडणारे हात आमचे नसायचे, पण खोबर्‍यासाठी पसरलेले लाचार हात आठवाल तर ते आमचेच होते. पाय लागुन आपआपसांत पाया पडणारे आम्हाला मात्र लाथाचं मारायचे. संध्याकाळ झाली म्हणजे आज धान्य आहे की नाही याच्या चिंता करायचो आम्ही, दिव्या दिव्या दीपत्कारला वेळ नसायचा. आमची आजी मजुरी करुन दमुन जायची. गोष्ट सांगत बसणे तिला परवडायचे नाही. मेलेली माणसे गाडण्याऐवजी जाळणे परवडायला लागल्यापासुन आम्हीपण दिवंगत आप्तांच्या अस्थी घेउन नाशकाच्या नदीवर जातो पण पुजेचं थोतांड बघवत नाही. पंढरपूरच्या चोखोबाच्या दगडाला बाहेर पाहुन आगोदर कससं वाटायचं आता रागं येतो. नाकारला असता विठ्ठलं त्या चोखोबाने तर असा दगड व्ह्यायची वेळं आली नसती.
हा असा पोसला गेलायं आमचा पिंड. हो हो छान विदेशी कपबशीचा आकार आलाय. मंदिराच्या पायरीवर पडुन रहाण्याच्या भानगडीतचं न पडता बाहेर थांबुन मोठं जगं पहायचं ठरवलयं आम्ही.


Rahul Bansode 

Saturday, 25 July 2015

 

मध्ये व्हाटस्आप वर एक विनोद वाचलेला.

' भलाई कर और दरिया में डाल या फिर कुछ भी कर और फेसबुक पर डाल' 

खरतर विनोदच. पण होतंय असंच ना हल्ली , मानूया कि सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमाने डोक्यातलं सगळं मांडायला मन हलकं करायला एक छान मंच मिळालाय. कल्पनेतले रंग शिंपडायला केन्वास मिळालाय पण म्हणून रंगबिंग सोडून, काहीतरी छान लिहायचं सोडून उठसूट कुणावरतरी तुटून का पडतो आपण. नात्यांमध्ये तुटलेले बंध साहवत नाही म्हणून एकटेपणा घालवायला येतात कित्तेकजण मग इथल्या लोकांनाही तोडत का सुटतात. एकतर तोडायला नाहीतर सनसनी पसरून लोकांना लाईक अन कॉमेंटसाठी जोडायला हाच हेतू…  आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय यातून काय साध्य होणार आहे कशाकशाच भान नसतं. राजकारणाला किती मनावर घेतोय आपण? यापूर्वी परिस्थिती फार काही वेगळी नव्हती पण आपल्या रोजच्या जीवनावर खरच एवढा प्रभाव होता का राजकारणाचा? आपल्या आयुष्यात एवढी खळबळ माजायची का? दिवसरात्र वैचारिक-बौद्धिक खल मांडत बसायचो का आपण? आणि यासर्वातून निर्माण होणारे मानसिक-भावनिक त्रास व्हायचे का इतके? हल्लीतर सोशल नेट्वर्किंग साईट्सवर धुमाकूळ माजलाय अस वाटायला लागलंय. काहीतरी चांगलं वाचायला यायचं म्हटलं तरी त्रास होतो हल्ली. सतत रागराग, तिरस्कार, राजकारण.  अचानक जाती-पातीची जळमटं तर प्रत्येकाच्या भिंतीवर वाढू लागली आहेत. प्रत्येकाच्या धार्मिक अस्मिता अचानक जाग्या झाल्या आहेत. जातीचे मेळावे काय भरतात इथे आणि इथेच आंदोलनही व्हायला लागलीत. इंग्रजांनी आम्हाला एकात्मतेचे नकळत धडे शिकवले होते, बाहेरच्यांशी लढायला आम्ही जात-धर्म विसरून एक झालो होतो आणि आज देशात एकात्मता, बंधूभाव कायम राहणे प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतांना आम्ही सुशिक्षित होऊनही सुसंकृतीच्या पलीकडे जातोय, धर्माच्या नावाखाली आमच्याच घरात आमच्याच लोकांशी वैर घेत सुटतोय. ज्या गोष्टींचा उपयोग एकमेकांशी अधिक जवळ येण्यासाठी व्हायला हवा होता त्याचा उपयोग स्वतःला अधिक बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात नुसताच दुरावा वाढवत नाहीये तर कडवटपणा पसरवण्यास जबाबदार ठरत चालले आहे.    
         
काय कमाल आहे नाही....इथे जिकडे तिकडे ज्याला पाहावे तो दुसऱ्याला शिकवायला निघालाय. काय चूक, किती चूक, काय करायला हवं, काय करायला नको . कोण चुकीचा, कसा चुकीचा? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्या विषयात अन देश सोडून विदेशापर्यंत सगळ्या घटनात, वातावरणाविषयी, परिस्थितीबद्दल, वागणुकीबद्दल... संस्कारापासून ते शिक्षणापर्यंत तर राजकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत लोक नाक खुपसून हुशारी पाजळायला लागलेत. इतकं शहाणपण इतकी हुशारी आणि इतक तत्वज्ञान प्रत्येकात अचानक कुठून आलं? बरं सगळेच इतके 'शहाणे' झालेत तरी देशाची नैतिकता इतकी का खालावतेय मग?? राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत कोणी कुणाशी कसे वागावे ह्याचे ज्ञान प्रत्येकात येऊनही एकमेकांविषयीची दरी इतकी का वाढतेय? स्वतःला बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात सर्वच मूर्ख का ठरताहेत...अन मरमर करत आयुष्यभर आनंदाच्या मागे धावणारा माणूस हल्ली स्वतःच स्वतःसाठी दुःख का ओढवून घेत आहे ?  

हा सगळाच संशोधनाचा विषय आहे ... नाही ?        

Thursday, 23 July 2015

सखे … !

बयो … अगं
हुंदका अलबत गिळायचा नाही
सुख सुख मागून मिळायचे नाही
मनास टाचून असंख्य धागे
मनातला मेघ काही विरायचा नाही

मनातल्या मनात कुढायचं नसतं
डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं
मुक्याने एकांत जगतांनाही
गर्दीत अलगद शिरायचं असतं

स्वप्नांचे रंग पुसायचे नाही
उगाच हळहळायचे नाही
क्षितीज देऊन स्वप्नांना...मग
पुन्हा मागे बघायचे नाही

रीत जगाची विसरून बघ
ओंजळीत घे सारे ढग
आनंदाची गाणी गा
तुझ्याच मनासारखे जग ...

सखे …
तू तुझ्याच मनासारखे जग



(C) रश्मी
  २४/०७/१५








Tuesday, 21 July 2015

स्वगत - आठवणींचे क्षण




तसा स्वतःसाठी म्हणून खास असा वेळ काढणं कठीण असतं जरा,पण स्व-संवाद किंवा चिंतन हा प्रगल्भ होण्याचा उत्तम मार्ग आहे . मनातल्या मनात, मनात येणाऱ्या विचारांचा मनाच्या साक्षीने असा मनोवेध घेता येतो अन रोज स्वतःच्याच बदलत्या विचारांचा आलेख अनुभवता येतो. तुम्ही घेतलाय कधी असा अनुभव ? आपल्याला काय हवंय ? काय आवडतं ? कधी काय नको असतं? काय समोर दिसलं कि गालात हसू खुलतं … कशानं चटकन मूड जातो … अश्या एकनाअनेक प्रश्नांची उत्तर शोधलीय का कधी ? कधी स्वतःच्याच समीप होऊन पाहिलंय ?

सुरेश भट म्हणतात

'मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.'

तसे बरेचदा मला माझ्याच प्रश्नांनी भन्नावून सोडलंय. मुळात जिज्ञासू प्रवृत्ती आणि सतत काहीतरी शिकण्याची, काहीतरी छान मिळवत राहण्याची हौस. मी माझ्याच जिज्ञासा शमवत शमवत दमते कधी कधी. सतत माझीच माझ्याशी होड लागलीय असं जाणवतं कधी. प्रत्येक विषयाबद्दल कसकाय आपल्याला ओढ असते… प्रत्येक कलेबद्दल आसक्ती कशी… कश्याही आणि कोणत्याही निसर्गदत्त सौंदर्याच आकर्षण का वाटतं? हे माझेच मलाच पडलेले प्रश्न आणि मी अजूनही उत्तर शोधत हिंडतेय. पण ह्याच प्रवृत्तीनं जगण्यातलं खरं मर्म कळलं. आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे, भेटणाऱ्या माणसांकडे अन येणाऱ्या अनुभवांकडे पाहण्याची वेगळी नजर, विरळा दृष्टीकोन प्राप्त झाला. आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवायलाच आयुष्यात येत असतो. आपण कसे जगावे, कसे असावे ह्याचा एखादा तरी धडा तो देऊन निघून जातो किंवा मग कसे जगू नये, कसे असू नये…  कसे वागू नये हे तरी शिकवून जातो. आयुष्यातल्या काही गोष्टी खूप हव्या हव्या वाटतात पण त्या हाती आल्यात कि आपण उगाच हिरा समजून कोळश्यापाठी लागण्यात आयुष्याचा वेळ खर्ची घातला अस वाटून जातं आणि काही मात्र गमावल्यावर आपण काहीतरी प्रेशिअस अस गमावलंय ह्याची जाणीव सतत होत राहते. म्हणून जे जवळ आहे ते निसटण्याआधी जपलं पाहिजे.  

एखाद्या कपाटाचे अनेक कप्पे असावे तसे मनाचेही हे असे असंख्य कप्पे असतात अन नाही म्हणता म्हणता त्यात हा असा विचारांचा, होकारांचा-नकारांचा, आठवणींचा, साठवणींचा पसारा जमत जातो. तो वर्षानुवर्ष असाच पडला असतो अडगळीत. कुठेतरी कोपऱ्यात दडून, एकाखाली एक दबून…  पुढेही दिवसेंदिवस त्यावर अनेकानेक विचारांचा, घटनांचा, माणसांचा, स्मृतींचा दांडगा भार येऊन पडत राहतो अन कळत नकळत आपण आपले ते आधीचे सर्व प्राणप्रिय जुने भास-आभास, जाणीवा, भावना, नाती-मैत्री त्यातील बंध, ते सहवास त्यांना आपण त्या त्या वेळी दिलेले श्वास, ते जपण्यासाठी केलेली धडपड, ती विरून गेल्यावर अखंड अनुभवलेली निराशा, काही सुखद क्षण, आनंदाच्या अनुभूती आणि बरच काही … सगळं सगळं नव्या ओझ्याखाली ढकलत जातो. ते जाउन पडतात मग अडगळीच्या खोलात. ते कुठेतरी आत दडलेले असतात, संपलेले मात्र नसतात. तसही म्हणतात ना या इथे कशालाही अंत नाही, सगळं शाश्वत आहे. जे जे घडून गेलंय ते संपत नाही पुन्हा पुन्हा इतिहास स्वतःला वेगवेगळ्या रुपात जागृत करत असतो. असे म्हणतात आवाज सुद्धा या पृथ्वी तलावर युगानुयुगे फिरत राहतात.….आणि आठवणी तर, आठवणी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पिच्छा पुरवतात .… कधीतरी दाटून भरलेले कपाट आवरायला घेतले अन धक्का लागला कि कसा कपड्यांचा ढीग असा भस्सकन अंगावर येउन पडतो अन आपण डुंबून जातो मग त्या पसाऱ्यात. त्यात एखादी जुनी वस्तू सापडते अन आपण हरवत जातो त्या त्या क्षणात कितीतरी वेळ.  तसेच असते या आठवणींचे देखील. एखाद्याच जुन्या आठवणीला चुकून धक्का लागावा अन सगळ्याच साठवणीतल्या त्या आठवणी मग अश्या अंगावर धावून यायला लागतात.. एक धक्का, एक चिमटा अगदी अगदी एक अलगदसा स्पर्शही पुरतो मग सगळं ओसंडायला ….

 पाऊस पडायला लागला कि  मैत्रिणींबरोबर एकत्र धमाल केलेला एखादा जुना पाऊस असाच स्मृतीपटलावर येऊन टिचकी मारून जातो. अन मग सगळेच क्षण भरभर सरकू लागतात सगळ्यांचे एका पानात जेवण,एकाच कपातला चहा अर्धा अर्धा, हसतांना तीच टाळी रडतांना तोच खांदा, ते लटके रुसवे फुगवे, तो राग आणि भांडण …चोरून पाहिलेला सिनेमा   मैत्रीचे दिवस जसे कसे असतात  सुखद असतात. नाही ?? चेहेऱ्यावर उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी अचानक कधीतरी समुद्रकिनारी हातात हात धरून प्रेमात तुडुंब बुडालेली एखादी सायंकाळ आठवते. तो खट्याळ कटाक्ष तो हळुवार स्पर्श आणि मग अश्या जागृत होणाऱ्या आठवणीनी सगळीच संध्याकाळ शांत क्लांत होत जाते. कित्ती काय काय शिकवत असतात न क्षण…. काही क्षण जगणं असह्य करणारे अन काही जगण्यासाठीचं सगळं अर्क एका क्षणात देऊन जाणारे. काही क्षण आयुष्यभरासाठी पुरेपूर जीवनामृत पुरवून निघून गेलेले असतात.

क्रमशः     

                         

Tuesday, 14 July 2015

Stories By Rabindranath Tagore .... on Epic !!

दिवसभराचे काम पाहता २४ तास कमी पडतात एक दिवस निदान ३६ तासांचा हवा अस वाटतं. अश्यात कमी पडलेल्या २४ तासात टीव्हीवर चालणाऱ्या फाल्तू सिरिअल बघणे म्हणजे काहीतरी चांगले गमावनेच नव्हे तर काहीतरी वाईट मिळवणे सुद्धा ठरते. त्यामुळे मी बातम्या आणि काही गायनाच्या किंवा हलक्या फुलक्या विनोदी सिरिअल सोडल्या तर शक्यतोर टीव्ही बघतच नाही. आणि म्हणून कुठे कोणत्या चानलवर काय चालू आहे वगैरे (अति)ज्ञान नसतच कधी. हा रोजचा तसा अनुभव पण गेल्या दोन दिवसापासून आजारी आहे. बाहेर येणेजाणे बंद. ऑफिस नाही किंवा घरकामहि नाही. मुलगा काळजी म्हणून स्वतःच स्वतः आवरून घेतोय. नवराही कामात भरून मदत करतोय. अश्यावेळी विश्रांती झाल्यावर मिळणाऱ्या निवांत वेळेत काय करावं म्हणून टीव्ही वर काहीतरी शोधत होते.काहीतरी म्हणजे रोज २४/७ दाखवतात तसलं नाही. काहीतरी छान दर्जेदार...आपल्या टेस्टच

आणि मिळालेच ...

नवे सुरु झालेले 'एपिक' नावाचे चानल. त्यावर सगळंच्या सगळं युनिक अन दर्जेदार असतं. आपल्या इतिहासाशी आपल्या परंपरेशी आपल्या पूर्वजांशी जुळलेली आपली पाळं -मूळं ते दाखवतात. अगदी सगळे विषय हाताळतात हा गेल्या दोन दिवसाचा अनुभव. पण मी विशेष आकर्षित झाली ती ' Stories By Rabindranath Tagore ' या सिरीजने. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथा मनाच्या ठाव घेणाऱ्या आहेत. त्यांची 'काबुलीवाला' कथा लहानपणी वाचलेली अजूनही लक्षात आहे जशीच्या तशी. त्यांच्या लिखाणाचा करावा तेवढा  अभ्यास कमीच आणि कौतुक करावं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं.... त्यांच लिखाण म्हणजे एक भूलभुलैया आहे त्यात रमत जाऊ तितके अडकत जातो आपण. पण त्यासाठी पूर्वी ते वाचायला लागायचे. पण 'एपिक' ने आपल्याला ते अनुभवण्याची संधी उपलब्ध करवून दिली आहे. आतापर्यंत तीनेक एपिसोड पाहीले आणि तिन्हीच्या प्रेमात पडले. कमालीचे निर्देशन, बंगाली परंपरांनी-सौंदर्याने नटलेल्या कथा, अप्रतिम लोकेशन, कथा मांडणी आणि बरंच काही ... इतके सुंदर कलाविष्कार अनुभवण्यास मिळण ह्याला नशीब लागतं.

ज्यांना खरच काहीतरी चांगलं सौंदर्य-बुद्धी-कलेशी समांतर शुद्ध हिंदीत असणारं, अप्रतिम बांधणी असलेल्या कथांची यथोचित मांडणी बघायची इच्छा असेल तर नक्की बघा ' Stories By Rabindranath Tagore ' एपिक चानलवर.                               

Friday, 10 July 2015

काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी काही घटना, काही माणसे, काही विचार, काही रिती, काही नावे, काही आवाज, काही स्थळ आणि बरच काही. एक क्लिक आणि काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. एखाद्या शब्दाने जखम ताजी होते तर एखाद्या गंधाने विस्मरणात गेलेला माणूस मनात जागा होतो …… एखादे गाणे कानावर पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं. रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. गाण्याची एक एक ओळ स्पर्शत जाते, जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक. काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या पण वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही.
आणि अश्या आठवणींशी चिकटून बसतात … कधीतरी ऐकता ऐकता दूर लोटावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी ठरतात.

Saturday, 27 June 2015

'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)

 अंबर हडप या गुणी लेखकाचा सकाळला वाचलेला अप्रतिम लेख. 
..........................................................................................................................................
'स्वप्न' एक 3D Movie (अंबर हडप)


‘स्वप्न‘ या गोष्टीवर आजवर बरंच काही लिहून आलंय. अनेकांनी त्याचे अर्थ लावलेत. काही जणांना स्वप्न ही गोष्ट काल्पनिक वाटते आणि काही जणांनी स्वप्नाला एन्कॅश केलंय. मला कोणी विचारलं की स्वप्न म्हणजे काय, तर मी म्हणेन, स्वप्न म्हणजे आपल्या मनाने तयार केलेला एक थ्रीडी सिनेमा असतो. असा सिनेमा, ज्याचे मेकर आपण असतो आणि प्रेक्षकही. काही स्वप्नं एखादा प्रोमो असतात आणि काही स्वप्न डेलीसोप. ही झाली झोपेत पडणारी स्वप्नं.

माझ्या मते हा स्वप्नांचा शो आपल्या हातात नसतो. आपला मेंदू आपल्या नकळत स्वप्नांचा शो लावून आपल्याला चकित करत असतो; पण जी दुसरी स्वप्नं असतात, ती स्वप्नं सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्‍यक असतात आणि ती म्हणजे आपण जागे असताना जी स्वप्नं पाहतो ती. लहानपणी या स्वप्नांची संख्या खूप जास्त असते... मला पायलट बनायचंय. मला आकाशात उडायचंय. मला सुपरस्टार व्हायचंय वगैरे वगैरे. पुढे वर्तमानकाळ या स्वप्नांच्या सिनेमाची मेकिंग कॉस्ट सांगतो आणि मग आपण तो स्वप्नांचा सिनेमा परत बघायची हिंमत करत नाही. कारण परिस्थितीने आपल्याला तोवर एक शिकवण दिलेली असते, "जे परवडत नाही त्याची आशा धरू नये, म्हणजे त्रास होत नाही.‘ आणि माझ्या मते आपण इथेच चुकतो.

जगात आजवर ज्या ज्या लोकांनी स्वप्नांचा अशक्‍य सिनेमा पाहिलाय, त्यांचेच सिनेमे मनातही रिलीज झाले आणि जगातही. निसर्ग जितका भव्य, क्रिएटिव्ह आणि कलेच्या बाबतीत सुंदर आहे, तितकंच त्याने आपल्याला मनही क्रिएटिव्ह दिलंय. देवाने माणसाला मेंदूच यासाठी दिलाय की त्याने जे जगात नाही ते आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या जगात तयार करावं. म्हणून तर आयफेल टॉवर बनला. म्हणून तर पिरॅमिड्‌स बनली. म्हणून ताजमहाल बनला आणि अशा कितीतरी वास्तू उभ्या राहिल्या, ज्यांना जगात आश्‍चर्य म्हटलं जातं. हे माणूसच करू शकतो. नाही तर जंगलात काही वाघ, सिंह, हत्ती काही तरी घडवताना दिसले नसते का? तरी माणसाच्या कल्पनाशक्तीला कॉम्पिट करायला देवाने काही पशू-पक्ष्यांना तयार केलंय... जशी कोळ्याची जाळी आहेत, गया पक्ष्याचे खोपे आहेत; पण तरीही माणूस तो माणूसच... वॉल्ट डिझ्ने... ज्याने जगातल्या पहिल्या ऍम्युझमेंट पार्कचं स्वप्नं पाहिलं. 100 हून अधिक बॅंकांनी या संकल्पनेला विरोध दाखवत त्याला कर्ज नाकारलं; पण जेव्हा ते उभं राहिलं, तेव्हा आज आपण म्हणतो, ते स्वप्नं कधी तरी पाहिलं म्हणून तर ते उभं राहू शकलं. आजवर लागलेला प्रत्येक शोध हा कधी ना कधी एक स्वप्नं होता आणि तो स्वप्नं होता म्हणून तो सत्यात येऊ शकला.
एक वेळ खरा सिनेमा पाहायला कोटी रुपयांची गरज असेल; पण स्वप्नं नावाचा सिनेमा पाहायला आपल्याला एका दमडीच्या इन्व्हेस्टमेंटची गरज नसते. डोळे बंद केले की काळोख होतो आणि मग सुरू होतो मनातल्या इच्छांचं टेलिकास्टिंग. अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नं नावाचा सिनेमा नुसता बघून चालत नाही. तो सिनेमा सत्यात आणायला मेहनत तितकीच गरजेची आहे.

कोणी म्हणतं, काही स्वप्नं खरी होत नाहीत. मी म्हणतो, आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं खरं होऊ शकतं; पण त्यासाठी हातपाय हलवायला लागतात. हा फ्री ऑफ कॉस्ट सिनेमा आपल्याला Impossible चं स्पेलिंग I m possible आहे हे सिद्ध करतो. जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाने हा स्वप्न नावाचा सिनेमा तो शून्यावर असताना पाहिलाय. मग आपण का मागे राहायचं?
कॅमेरा-रोलिंग ऍक्‍शन म्हणा आणि सुरू करा सिनेमा. अर्थात कोणाचं वाईट चिंतून सिनेमात व्हिलन नका होऊ, तर कोणाचं तरी भलं चिंतून स्वप्नात हीरो व्हा; तर सत्यात हिरो होऊ शकाल.
मेल्यानंतर देव विचारेल, सिनेमा पाहिलास का? आपण नाही म्हणालो तर तो म्हणेल... तुला टॉकीज दिलं, वेळ दिला, सगळं दिलं आणि तू सिनेमाच पाहिला नाहीस... तेव्हा उत्तर द्यायला वेळ लागू नये म्हणून आत्ताच बघायला लागा "स्वप्नं‘ ...एक थ्रीडी मूव्ही.


Thursday, 11 June 2015

भेटी लागी जीवा.....

तांबडा संधिप्रकाश डोकाऊ लागला होता. आकाशात अजूनही सूर्य त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार तळपत होता. प्रवासभर बंगाली सौंदर्य न्याहाळण्यात मी गुंगून गेले , रस्त्याच्या कडेने लागणारे अगणित छोटे छोटे तळे, त्याभोवताल पसरलेली समृद्ध हिरवळ, हवा तसा वेढा घेत वळणावळणाने उंची गाठत ताल धरत डोलणारी, तळ्यांची कडा शोभिवंत करणारी नारळाची आकृतीबद्ध झाडे.



अधून मधून वाटेत लागणारी छोटी चौकटीपूर्ण खेडी, झोपडीवजा घरे, बाजार आणि माणसांची रेलचेल..... कलकत्त्याहून दीडशे किलोमीटरचा प्रवास जवळ जवळ आटोपत आलेला. हळूहळू वस्तींची झुंबड कमी होऊ लागली. कुठे सपाट मैदान तर कुठे वाळूचा पसारा दिसू लागला. आपण अपेक्षित डेस्टीनेशनच्या जवळ पोचतोय असे आभास आता होऊ लागले होते. मन अंदाज लावू पाहत होते अगाध-अथांग अश्या नजरेला न पेलणाऱ्या अखंड अमर्याद पाणेरी बेटाचा. एका निमुळत्या अर्धवक्राकृती वळणावरून गाडी वळली आणि डाव्या बाजूने दूरवर फेसाळती पांढरीशुभ्र पुसटशी रेषा दिसू लागली. ते शुभ्र सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न करते न करते तोच गाडी कच्च्या दगडी रस्त्यावरून चढावाला लागली. गाडीच्या काचा उतरवून मी डाव्या बाजूच्या त्या फेसाळत्या हलत्या रेषा न्याहाळत होते. काहीश्या दमट उष्ण वाऱ्याचा झोत अंगाला स्पर्शून वाहत होता. केस भुरभूर उडून चेहेऱ्यावर येत होते वातावरणात मंद सुगंध पसरू लागला, 'हात अलगद बाहेर काढून हे न दिसणारं सौंदर्य ओंजळीत घेऊन चटकन मुठीत बंद करावे अन जवळच्या कुठल्याश्या कुपीत जपून ठेवावे का?' तेवढ्यात गाडी वळून उताराला लागली धक्का बसला आणि माझी एवढा वेळ लागलेली तंद्री तुटली स्वतःच्याच वेडगळ बाळबोध विचारांवर हसू आलं... हसतच नजर पुढच्या काचेतून बाहेर गेले आणि .......आणि पुढ्यात पसरलेली अथांग निळाई, दृष्टी पोचेल तिथवर.. बुद्धी स्तिमित करणारं, डोळे दिपवून टाकणारं तेच शुभ्र चंदेरी फेसाळत सौंदर्य.



पुढे दोनेक किलोमीटर समुद्राच्या अगदी काठावरून पाणी उडवत आम्ही आधीच बुक केलेले आमचे रीजोर्ट शोधत पुढे जात राहिलो ... मला न राहवून मी उतरले आणि निसर्गाचं गवसलेलं हे इतकं समृद्ध रूप मनाच्या कुठल्या कप्प्यात साठवू या संभ्रमात मुग्ध होऊन तिथेच किनाऱ्यावर उभी कितीतरी वेळ स्वतःपासून हरवत गेले.



तशी समुद्राशी माझी भेट काही नवीन नाही. समुद्र माझा लाडका जरा जिव्हाळ्यचाच विषय. समुद्रावर जितकं भरून बोलता येतं तितकं खुद्द समुद्राशी देखील. पहिल्यापासून समुद्राची ओढ वाटायची. लग्नानंतर मुंबईला जायचं ठरलं तेव्हा कोण खुश झाले होते मी. आता सागराच्या सान्निध्यात राहता येईल हवे तेव्हा त्याची भेट घेता येईल. मग तासनतास समुद्राच्या लाटांकडे मन्त्रमुग्ध होऊन बघत बसेन. असे स्वप्न रंगवले होते. मुंबईत बरेचदा तसे प्रसंग आलेही पण हा असा मनसोक्त, शांत विशेष म्हणजे तिन्ही सांजेचा अन रात्रीचाहि समुद्र कधी अनुभवता आलाच नाही. ती इच्छा अपूर्णच राहिली .. पण या इथल्या समुद्राची बातच काही निराळी. आजपर्यंत पाहिलेले अनुभवलेले सर्व बेटं आणि आज 'ह्याची देही ह्याची डोळा' मी अनुभवत असलेलं हे बेट निराळं आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.



कलकत्तापासून पुढे जवळ जवळ २०० किलोमीटरवर असणारे 'मंदारमनी' बीच. आशिया खंडातले तिसरे मोठे, १४ किलोमीटर लांबीचे मोटरेबल बीच आहे. सौम्यशांत अश्या समुद्री लाटांसाठी प्रसिद्ध बेट. १९२३ मध्ये इंग्रज पर्यटक 'जॉन फ्रैंक स्मिथ' ह्याने इथे सगळी जुळवाजुळव करून सौन्दर्यीकरण केले. इथे ह्या सागराच्या काठावरच अगदी १०० पावलांवर अनेक उत्तमोत्तम रीजोर्ट अन हॉटेल आहेत. सागराला भरती असतांना लाटा या रीजोर्टच्या पायथ्याशी येउन धडकतात. रीजोर्टच्या बाल्कनीत बसून हा देखावा अनुभवणं हे स्वर्गसुखाहून विरळा नक्कीच नसावं हे जाणवत राहात.


राहण्यासाठी रीजोर्टशी संबंधित व्यावहारिक बाबी पूर्ण करून.. सामान गाडीतून काढून खोलीत हलवले. फ्रेश होऊन थोडी पोटपूजा, असे सगळे जैविक सोपस्कार आटोपेस्तोर सूर्य मावळतीला उतरला होता. आम्ही पुन्हा विशाल पसरलेल्या वाळूच्या गुळगुळीत गालिच्यावर येउन स्तब्ध उभे राहून समुद्र न्याहाळतो तोच चारही दिशा, अवकाश अन जमिनीवर पसरलेला हा अमर्याद सागर नारंगी पिंगट पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाला आहे हे लक्षात आले. पश्चिमेला दूर आकाशात तांबड फुटलं होतं. आणि जणू वर उंचावर अवकाशी बसून अश्या अद्वितीय सौन्दर्याच चित्रण करतांना त्यात इंद्रधनू रंग भरतांना एखाद्या देवदूताच्या हाताने रंगाचे पात्र उपडे पडावे अन त्यातील सारे रंग घरंगळत आसमंत व्यापून जमिनीवर उतरावे असे काहीसे चित्र या निसर्गाच्या कॅन्वोसवर प्रत्यक्षात अवतरले होते आणि आम्ही नेमक्या त्याचक्षणी तिथे या सृष्टीच्या अद्भुत अतुलनीय रूपाचे साक्षी ठरत होतो.






सळसळनारया लाटा अंगावर झेलत पाण्यात मनसोक्त खेळूनही मन भरत नव्हते पण अंधारायला आले तसे बाहेर पडणे आवश्यक होऊ लागले पाण्याची पातळी हळू हळू वाढतेय आणि मघाच्या शांत सौम्य लाटांची गती सुद्धा वाढतेय हे लक्षात येत होते रात्री आठ नंतर भरतीला सुरुवात होणार होती. मी त्याच क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते. खोलीवर येउन आंघोळ वगैरे आटोपून आम्ही पुन्हा बाल्कनीत येउन बसलो. … एक मोठी कॉमन बाल्कनी. कॅरम, पूल सारख्या विविध खेळांचे मंच सजलेले. सगळ्यांच्या प्राइवसिजचा विचार करत प्रत्येकाची स्पेस जपत केलेली बैठक व्यवस्था. नारळपाणी ते विंग्रजी दारू असे पिण्यापासून ते वेज अन नॉनवेज खाण्यापर्यंतची सुविधा अन दिमतीला पाच पन्नास पुढे मागे फिरणारे सेवक अश्या सर्व सुखसोयींनी युक्त असे रीजोर्ट, आणि हे समुद्राच्या अगदी पुढ्यात पन्नास पावलांवर, आता आम्ही बसलोय ती त्याची ओपन टेरेस अर्थात बाल्कनी. डोक्यावर अवकाशीय पोकळी, मिणमिणते अगणित तारे, भिरभिर वाहणारे सुगंधी वारे, भोवताल काळोख अन पुढ्यात पसरलेला भरतीने रूप बदललेला फसफसनारा, शुभ्र जीवघेण्या लाटांनी अंगावर धाऊन येणारा पण तरीही सौंदर्याने नटलेला अगाध-अथांग सागर. आपण असं काहीतरी आगळं अनुभवतो आहे आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसायला अजून वेळ लागणार असतो.


खेळ, गप्पा, हश्या, मस्ती अन जेवणं आटोपून गर्दी पांगू लागली. अगदी आपली मंडळी सुद्धा 'चल झोपायला जाऊया आता' असे विनंतीवजा दटावून दमून निघून गेलीत. मग उरली फक्त मी ..... 'मी अन तो' ... तो सागर अनाकलनीय, अनंत, अमर्याद, गूढ, अनेक गुपित दडवून ठेवलेला तरीही नम्र, संयमी. अन मी… मी मनात अनंत प्रश्नांची सरबत्ती घेऊन हिंडणारी, इवल्याश्या मनात आभाळभर जिज्ञासा बाळगणारी, जराशी हट्टी अन खट्याळ...दोघेही तसे पाहिले तर भिन्नच.…. आज सागराला बरंच काही सांगायचं होतं. त्याच्याकडून बरंच काही शिकायचं होतं...त्याच्या गूढ अनाकलनीय रूपाचं काही गुपित उलगडता येतं का ते बघायचं होतं. जसजशी रात्र चढत गेली लाटांची गती वाढत होती आताशा लाटा मी बघत बसलेल्या बाल्कनीच्या पायथ्याशी जडावलेल्या दगडांच्या तटबंदीवर येउन आदळू लागल्या. आधी एक … दुसरी… तिसरी, एक लाट येउन परत जात नाही तोच दुसरी लाट तिवरच तिसरी. मी मंत्रमुग्ध होऊन बघत राहते पापणीही न हलवता अप्रतिम असा देखावा.


वर आकाशात पाऊन चंद्राचा ढगाआड लपाछपीचा खेळ चाललाय तो बाहेर आला कि त्याचं प्रतिबिंब पडतं तेवढाच फक्त तेवढाच सागर पिवळसर पांढऱ्या चंदेरी रंगात चमकू लागतो. त्यापलीकडचा उरलेला दूरचा अमर्याद सागरी भाग काळोखात निव्वळ लहरींशी झटपटतांना मंद हलतांना दिसतो. अलीकडचा नजरेच्या टप्प्यातला समुद्र मात्र कुठल्याश्या विचारांच्या आवर्तनात अवरुद्ध होऊन बेचैन झालेला अन म्हणून विचारांच्या लहरींच्या हालचाली गतीत करतांना दिसतो. जणू त्याच्या येरझाऱ्या सुरु आहेत. मनात विचारांचे काहूर वाढले कि त्याची गती वाढते अन कुठल्याश्या विचाराने काही काळ अचानक जरा शांतता .... कितीतरी वेळ त्याची हि अशीच विचारांची कंपने अविरत सुरु असतात.



कि मग तो काहीतरी दाखवू पाहतोय ...स्वतःला खूप काहीतरी समजणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाला सतत कुरवाळनाऱ्या मनुष्यास तो त्याचे प्रगाढ रूप दाखवण्याचा प्रयत्न करतोय का ? विश्वाच्या या विशाल विक्राळ रुपासमोर मनुष्य एका ठिपक्या प्रमाणेही नाही. त्याचे कर्तृत्व, त्याची प्रसृती या अगाध रुपासमोर वाळूचा कणही नाही. निसर्ग आपल्याहून विशाल, विस्तृत, अनंत, अखंड, अमर्याद आहे आणि हे रूप पाहून त्याला जाणीव होईल आणि मनुष्य गर्वाचा त्याग करेल असे काहीसे त्याला अपेक्षित असेल का ? आणि मग प्रयत्न करूनही यश न आलेले पाहून, दमून मग जरा शांत होत असेल, चार पावलं मागे सरकत विक्राळ रूप सोडून जरा नम्र होऊन दाखवत असेल का ?? कि मग दोन्ही बाजूची विरोधी रूपं दाखवून कसे असू नये अन कसे असावे ह्याचे धडे तो वर्षानुवर्ष मानवास गिरवून दाखवत असावा??





त्याचे विश्व वेगळेच. त्याचे हवे तेवढे राज्य, हवा तेवढा व्यास हवे तसे वाहने अन आपल्याच धुंदीत राहणे. त्याच्या लाटांचा ताल वेगळा. लाटांच्या स्वरांचे गीत वेगळे. त्याचे त्याचे असे सगळेच माझ्या जगावेगळे. सगळंच गूढ... अनाकलनीय, ज्याच्या मनाचा थांग लागत नाही असा हा सागर नेहेमीच काठाशी आणून अनुत्तरीत सोडतो. शेवटी माझ्या प्रश्नांची तृष्णा ह्या एवढ्या पाण्यानेही भागणार नसतेच .....नेहेमीप्रमाणेच. माझे प्रश्न मी माझ्याच मनाच्या गाठोड्यात पुन्हा गच्च बांधते आणि रात्री १.३० वाजता समुद्राचे क्रुद्ध रूप शांत होऊ लागले तसे उठून खोलीचा रस्ता धरते.




सागराचा रात्रीचा रासरंग बघून निवांत झोप येण शक्यच नव्हतं. काहीतास अर्धवट झोपेत काढून पहाटे ५ वाजता सूर्योदय पाहण्यास आम्ही बाहेर पडलो. नुकताच उगवू पाहणारा मंद प्रकाश नारळाच्या झाडांमधून डोकावू पाहणारा अर्धोन्मलीत सुर्य. आसमंत व्यापू पाहणारी सोनेरी किरणे. सृष्टीचे हे असे भरीव रूप उमलून येतांना पाहणे भाग्याचेच.








बीचवरून सवारी शोधत फिरणारे ओपन रिक्षा चालक अधून मधून तंद्रीत व्यत्यय आणतात पण यावेळी त्यांची गरजही होती. आम्ही निघालो रीजोर्ट पासून काही किलोमीटर अंतरावर सृष्टी अन जीव ह्यांचे एक वेगळेच नाते अनुभवायला.



बीचवरच एक मोठाच मोठा वाळूतला परिसर दुरून बघतांना लालेलाल झालेला नजरेस पडतो. या भागात व्हेइकल्स अलाऊ नाहीयेत. दूरच आपली गाडी सोडून अलगद पाय उचलत आपण पुढे चालू लागतो आणि त्या लाल रंगांच्या हालचाली जाणवु लागतात. हा लाल दिसणारा परिसर म्हणजे अगणित केकडे असतात. पहाटेचे कोवळे उन्ह खाण्यास ते असे जमिनीतून वर अवतरले असतात. या वाळूमय भागात अनेक बारीक छिद्र दिसतात ते म्हणजे या केकड्यांचे बीळ. एक एक पाउल टाकत आपण जसजसे पुढे सरकतो ते लगेच बीळ शोधून आत उडी घेऊन गुडूप होतात. हा अत्यंत विलोभनीय असा देखावा असतो. केकड्यांच्या बीळा भोवताल ते असे काही वावरतात कि वाळूवर सुंदर नक्षी तयार झालेली दिसते.







पुन्हा एकदा पहाटेच्या रम्य वातावरणात समुद्र स्नान घेऊन. फ्रेश होऊन दिवसाच्या पहिल्या वहिल्या सागर भरतीची वेळ होण्याआधी आम्ही पूर्ण समाधानी आणि आनंदी मनाने 'मंदारमनी'चा निरोप घेतो.





कलकत्ता गाठण्याआधी दिघा बीच बघावा हि इच्छा पूर्ण करावी वाटली म्हणून गाडी इथून २८ किलोमीटरवर असणाऱ्या दिघाकडे वळवली. 'दिघा' हे बेट मंदारमनीच्या सर्वस्वी विरोधी. मंदारमनी संपूर्णतः वाळूचा बेट कुठेही दगड गोट्यांचा अवशेषही नसलेला, दिघा मात्र अजिबात वाळू नसलेला मोठ्या दगडांची तटबंदी रचलेला. हा जितका शांत संयमी दिघा तितकाच खवळलेला मोठमोठ्या लाटा कडावर येउन आदळणाऱ्या. तो स्वच्छ-निर्मळ हा तितकाच मळकट- गढूळ. दिघाचा सागर बघायला ठीकेय पण त्याला स्पर्श करावा असं वाटलंच नाही.









शेवटी दिघा डोळ्यात तर मंदारमनी हृदयात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सागर मनात भरून आणलाय कि मनच सागराजवळ सोडून आलीये ह्याचा शोध मात्र अजूनही सुरूच आहे ....


             

                                                               

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...