Tuesday 21 July 2015

स्वगत - आठवणींचे क्षण




तसा स्वतःसाठी म्हणून खास असा वेळ काढणं कठीण असतं जरा,पण स्व-संवाद किंवा चिंतन हा प्रगल्भ होण्याचा उत्तम मार्ग आहे . मनातल्या मनात, मनात येणाऱ्या विचारांचा मनाच्या साक्षीने असा मनोवेध घेता येतो अन रोज स्वतःच्याच बदलत्या विचारांचा आलेख अनुभवता येतो. तुम्ही घेतलाय कधी असा अनुभव ? आपल्याला काय हवंय ? काय आवडतं ? कधी काय नको असतं? काय समोर दिसलं कि गालात हसू खुलतं … कशानं चटकन मूड जातो … अश्या एकनाअनेक प्रश्नांची उत्तर शोधलीय का कधी ? कधी स्वतःच्याच समीप होऊन पाहिलंय ?

सुरेश भट म्हणतात

'मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.'

तसे बरेचदा मला माझ्याच प्रश्नांनी भन्नावून सोडलंय. मुळात जिज्ञासू प्रवृत्ती आणि सतत काहीतरी शिकण्याची, काहीतरी छान मिळवत राहण्याची हौस. मी माझ्याच जिज्ञासा शमवत शमवत दमते कधी कधी. सतत माझीच माझ्याशी होड लागलीय असं जाणवतं कधी. प्रत्येक विषयाबद्दल कसकाय आपल्याला ओढ असते… प्रत्येक कलेबद्दल आसक्ती कशी… कश्याही आणि कोणत्याही निसर्गदत्त सौंदर्याच आकर्षण का वाटतं? हे माझेच मलाच पडलेले प्रश्न आणि मी अजूनही उत्तर शोधत हिंडतेय. पण ह्याच प्रवृत्तीनं जगण्यातलं खरं मर्म कळलं. आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे, भेटणाऱ्या माणसांकडे अन येणाऱ्या अनुभवांकडे पाहण्याची वेगळी नजर, विरळा दृष्टीकोन प्राप्त झाला. आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवायलाच आयुष्यात येत असतो. आपण कसे जगावे, कसे असावे ह्याचा एखादा तरी धडा तो देऊन निघून जातो किंवा मग कसे जगू नये, कसे असू नये…  कसे वागू नये हे तरी शिकवून जातो. आयुष्यातल्या काही गोष्टी खूप हव्या हव्या वाटतात पण त्या हाती आल्यात कि आपण उगाच हिरा समजून कोळश्यापाठी लागण्यात आयुष्याचा वेळ खर्ची घातला अस वाटून जातं आणि काही मात्र गमावल्यावर आपण काहीतरी प्रेशिअस अस गमावलंय ह्याची जाणीव सतत होत राहते. म्हणून जे जवळ आहे ते निसटण्याआधी जपलं पाहिजे.  

एखाद्या कपाटाचे अनेक कप्पे असावे तसे मनाचेही हे असे असंख्य कप्पे असतात अन नाही म्हणता म्हणता त्यात हा असा विचारांचा, होकारांचा-नकारांचा, आठवणींचा, साठवणींचा पसारा जमत जातो. तो वर्षानुवर्ष असाच पडला असतो अडगळीत. कुठेतरी कोपऱ्यात दडून, एकाखाली एक दबून…  पुढेही दिवसेंदिवस त्यावर अनेकानेक विचारांचा, घटनांचा, माणसांचा, स्मृतींचा दांडगा भार येऊन पडत राहतो अन कळत नकळत आपण आपले ते आधीचे सर्व प्राणप्रिय जुने भास-आभास, जाणीवा, भावना, नाती-मैत्री त्यातील बंध, ते सहवास त्यांना आपण त्या त्या वेळी दिलेले श्वास, ते जपण्यासाठी केलेली धडपड, ती विरून गेल्यावर अखंड अनुभवलेली निराशा, काही सुखद क्षण, आनंदाच्या अनुभूती आणि बरच काही … सगळं सगळं नव्या ओझ्याखाली ढकलत जातो. ते जाउन पडतात मग अडगळीच्या खोलात. ते कुठेतरी आत दडलेले असतात, संपलेले मात्र नसतात. तसही म्हणतात ना या इथे कशालाही अंत नाही, सगळं शाश्वत आहे. जे जे घडून गेलंय ते संपत नाही पुन्हा पुन्हा इतिहास स्वतःला वेगवेगळ्या रुपात जागृत करत असतो. असे म्हणतात आवाज सुद्धा या पृथ्वी तलावर युगानुयुगे फिरत राहतात.….आणि आठवणी तर, आठवणी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पिच्छा पुरवतात .… कधीतरी दाटून भरलेले कपाट आवरायला घेतले अन धक्का लागला कि कसा कपड्यांचा ढीग असा भस्सकन अंगावर येउन पडतो अन आपण डुंबून जातो मग त्या पसाऱ्यात. त्यात एखादी जुनी वस्तू सापडते अन आपण हरवत जातो त्या त्या क्षणात कितीतरी वेळ.  तसेच असते या आठवणींचे देखील. एखाद्याच जुन्या आठवणीला चुकून धक्का लागावा अन सगळ्याच साठवणीतल्या त्या आठवणी मग अश्या अंगावर धावून यायला लागतात.. एक धक्का, एक चिमटा अगदी अगदी एक अलगदसा स्पर्शही पुरतो मग सगळं ओसंडायला ….

 पाऊस पडायला लागला कि  मैत्रिणींबरोबर एकत्र धमाल केलेला एखादा जुना पाऊस असाच स्मृतीपटलावर येऊन टिचकी मारून जातो. अन मग सगळेच क्षण भरभर सरकू लागतात सगळ्यांचे एका पानात जेवण,एकाच कपातला चहा अर्धा अर्धा, हसतांना तीच टाळी रडतांना तोच खांदा, ते लटके रुसवे फुगवे, तो राग आणि भांडण …चोरून पाहिलेला सिनेमा   मैत्रीचे दिवस जसे कसे असतात  सुखद असतात. नाही ?? चेहेऱ्यावर उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी अचानक कधीतरी समुद्रकिनारी हातात हात धरून प्रेमात तुडुंब बुडालेली एखादी सायंकाळ आठवते. तो खट्याळ कटाक्ष तो हळुवार स्पर्श आणि मग अश्या जागृत होणाऱ्या आठवणीनी सगळीच संध्याकाळ शांत क्लांत होत जाते. कित्ती काय काय शिकवत असतात न क्षण…. काही क्षण जगणं असह्य करणारे अन काही जगण्यासाठीचं सगळं अर्क एका क्षणात देऊन जाणारे. काही क्षण आयुष्यभरासाठी पुरेपूर जीवनामृत पुरवून निघून गेलेले असतात.

क्रमशः     

                         

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...