तांबडा संधिप्रकाश डोकाऊ लागला होता. आकाशात अजूनही सूर्य त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार तळपत होता. प्रवासभर बंगाली सौंदर्य न्याहाळण्यात मी गुंगून गेले , रस्त्याच्या कडेने लागणारे अगणित छोटे छोटे तळे, त्याभोवताल पसरलेली समृद्ध हिरवळ, हवा तसा वेढा घेत वळणावळणाने उंची गाठत ताल धरत डोलणारी, तळ्यांची कडा शोभिवंत करणारी नारळाची आकृतीबद्ध झाडे.
अधून मधून वाटेत लागणारी छोटी चौकटीपूर्ण खेडी, झोपडीवजा घरे, बाजार आणि माणसांची रेलचेल..... कलकत्त्याहून दीडशे किलोमीटरचा प्रवास जवळ जवळ आटोपत आलेला. हळूहळू वस्तींची झुंबड कमी होऊ लागली. कुठे सपाट मैदान तर कुठे वाळूचा पसारा दिसू लागला. आपण अपेक्षित डेस्टीनेशनच्या जवळ पोचतोय असे आभास आता होऊ लागले होते. मन अंदाज लावू पाहत होते अगाध-अथांग अश्या नजरेला न पेलणाऱ्या अखंड अमर्याद पाणेरी बेटाचा. एका निमुळत्या अर्धवक्राकृती वळणावरून गाडी वळली आणि डाव्या बाजूने दूरवर फेसाळती पांढरीशुभ्र पुसटशी रेषा दिसू लागली. ते शुभ्र सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न करते न करते तोच गाडी कच्च्या दगडी रस्त्यावरून चढावाला लागली. गाडीच्या काचा उतरवून मी डाव्या बाजूच्या त्या फेसाळत्या हलत्या रेषा न्याहाळत होते. काहीश्या दमट उष्ण वाऱ्याचा झोत अंगाला स्पर्शून वाहत होता. केस भुरभूर उडून चेहेऱ्यावर येत होते वातावरणात मंद सुगंध पसरू लागला, 'हात अलगद बाहेर काढून हे न दिसणारं सौंदर्य ओंजळीत घेऊन चटकन मुठीत बंद करावे अन जवळच्या कुठल्याश्या कुपीत जपून ठेवावे का?' तेवढ्यात गाडी वळून उताराला लागली धक्का बसला आणि माझी एवढा वेळ लागलेली तंद्री तुटली स्वतःच्याच वेडगळ बाळबोध विचारांवर हसू आलं... हसतच नजर पुढच्या काचेतून बाहेर गेले आणि .......आणि पुढ्यात पसरलेली अथांग निळाई, दृष्टी पोचेल तिथवर.. बुद्धी स्तिमित करणारं, डोळे दिपवून टाकणारं तेच शुभ्र चंदेरी फेसाळत सौंदर्य.
पुढे दोनेक किलोमीटर समुद्राच्या अगदी काठावरून पाणी उडवत आम्ही आधीच बुक केलेले आमचे रीजोर्ट शोधत पुढे जात राहिलो ... मला न राहवून मी उतरले आणि निसर्गाचं गवसलेलं हे इतकं समृद्ध रूप मनाच्या कुठल्या कप्प्यात साठवू या संभ्रमात मुग्ध होऊन तिथेच किनाऱ्यावर उभी कितीतरी वेळ स्वतःपासून हरवत गेले.
राहण्यासाठी रीजोर्टशी संबंधित व्यावहारिक बाबी पूर्ण करून.. सामान गाडीतून काढून खोलीत हलवले. फ्रेश होऊन थोडी पोटपूजा, असे सगळे जैविक सोपस्कार आटोपेस्तोर सूर्य मावळतीला उतरला होता. आम्ही पुन्हा विशाल पसरलेल्या वाळूच्या गुळगुळीत गालिच्यावर येउन स्तब्ध उभे राहून समुद्र न्याहाळतो तोच चारही दिशा, अवकाश अन जमिनीवर पसरलेला हा अमर्याद सागर नारंगी पिंगट पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाला आहे हे लक्षात आले. पश्चिमेला दूर आकाशात तांबड फुटलं होतं. आणि जणू वर उंचावर अवकाशी बसून अश्या अद्वितीय सौन्दर्याच चित्रण करतांना त्यात इंद्रधनू रंग भरतांना एखाद्या देवदूताच्या हाताने रंगाचे पात्र उपडे पडावे अन त्यातील सारे रंग घरंगळत आसमंत व्यापून जमिनीवर उतरावे असे काहीसे चित्र या निसर्गाच्या कॅन्वोसवर प्रत्यक्षात अवतरले होते आणि आम्ही नेमक्या त्याचक्षणी तिथे या सृष्टीच्या अद्भुत अतुलनीय रूपाचे साक्षी ठरत होतो.
खेळ, गप्पा, हश्या, मस्ती अन जेवणं आटोपून गर्दी पांगू लागली. अगदी आपली मंडळी सुद्धा 'चल झोपायला जाऊया आता' असे विनंतीवजा दटावून दमून निघून गेलीत. मग उरली फक्त मी ..... 'मी अन तो' ... तो सागर अनाकलनीय, अनंत, अमर्याद, गूढ, अनेक गुपित दडवून ठेवलेला तरीही नम्र, संयमी. अन मी… मी मनात अनंत प्रश्नांची सरबत्ती घेऊन हिंडणारी, इवल्याश्या मनात आभाळभर जिज्ञासा बाळगणारी, जराशी हट्टी अन खट्याळ...दोघेही तसे पाहिले तर भिन्नच.…. आज सागराला बरंच काही सांगायचं होतं. त्याच्याकडून बरंच काही शिकायचं होतं...त्याच्या गूढ अनाकलनीय रूपाचं काही गुपित उलगडता येतं का ते बघायचं होतं. जसजशी रात्र चढत गेली लाटांची गती वाढत होती आताशा लाटा मी बघत बसलेल्या बाल्कनीच्या पायथ्याशी जडावलेल्या दगडांच्या तटबंदीवर येउन आदळू लागल्या. आधी एक … दुसरी… तिसरी, एक लाट येउन परत जात नाही तोच दुसरी लाट तिवरच तिसरी. मी मंत्रमुग्ध होऊन बघत राहते पापणीही न हलवता अप्रतिम असा देखावा.
कि मग तो काहीतरी दाखवू पाहतोय ...स्वतःला खूप काहीतरी समजणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाला सतत कुरवाळनाऱ्या मनुष्यास तो त्याचे प्रगाढ रूप दाखवण्याचा प्रयत्न करतोय का ? विश्वाच्या या विशाल विक्राळ रुपासमोर मनुष्य एका ठिपक्या प्रमाणेही नाही. त्याचे कर्तृत्व, त्याची प्रसृती या अगाध रुपासमोर वाळूचा कणही नाही. निसर्ग आपल्याहून विशाल, विस्तृत, अनंत, अखंड, अमर्याद आहे आणि हे रूप पाहून त्याला जाणीव होईल आणि मनुष्य गर्वाचा त्याग करेल असे काहीसे त्याला अपेक्षित असेल का ? आणि मग प्रयत्न करूनही यश न आलेले पाहून, दमून मग जरा शांत होत असेल, चार पावलं मागे सरकत विक्राळ रूप सोडून जरा नम्र होऊन दाखवत असेल का ?? कि मग दोन्ही बाजूची विरोधी रूपं दाखवून कसे असू नये अन कसे असावे ह्याचे धडे तो वर्षानुवर्ष मानवास गिरवून दाखवत असावा??
त्याचे विश्व वेगळेच. त्याचे हवे तेवढे राज्य, हवा तेवढा व्यास हवे तसे वाहने अन आपल्याच धुंदीत राहणे. त्याच्या लाटांचा ताल वेगळा. लाटांच्या स्वरांचे गीत वेगळे. त्याचे त्याचे असे सगळेच माझ्या जगावेगळे. सगळंच गूढ... अनाकलनीय, ज्याच्या मनाचा थांग लागत नाही असा हा सागर नेहेमीच काठाशी आणून अनुत्तरीत सोडतो. शेवटी माझ्या प्रश्नांची तृष्णा ह्या एवढ्या पाण्यानेही भागणार नसतेच .....नेहेमीप्रमाणेच. माझे प्रश्न मी माझ्याच मनाच्या गाठोड्यात पुन्हा गच्च बांधते आणि रात्री १.३० वाजता समुद्राचे क्रुद्ध रूप शांत होऊ लागले तसे उठून खोलीचा रस्ता धरते.
सागराचा रात्रीचा रासरंग बघून निवांत झोप येण शक्यच नव्हतं. काहीतास अर्धवट झोपेत काढून पहाटे ५ वाजता सूर्योदय पाहण्यास आम्ही बाहेर पडलो. नुकताच उगवू पाहणारा मंद प्रकाश नारळाच्या झाडांमधून डोकावू पाहणारा अर्धोन्मलीत सुर्य. आसमंत व्यापू पाहणारी सोनेरी किरणे. सृष्टीचे हे असे भरीव रूप उमलून येतांना पाहणे भाग्याचेच.
बीचवरून सवारी शोधत फिरणारे ओपन रिक्षा चालक अधून मधून तंद्रीत व्यत्यय आणतात पण यावेळी त्यांची गरजही होती. आम्ही निघालो रीजोर्ट पासून काही किलोमीटर अंतरावर सृष्टी अन जीव ह्यांचे एक वेगळेच नाते अनुभवायला.
त्याचे विश्व वेगळेच. त्याचे हवे तेवढे राज्य, हवा तेवढा व्यास हवे तसे वाहने अन आपल्याच धुंदीत राहणे. त्याच्या लाटांचा ताल वेगळा. लाटांच्या स्वरांचे गीत वेगळे. त्याचे त्याचे असे सगळेच माझ्या जगावेगळे. सगळंच गूढ... अनाकलनीय, ज्याच्या मनाचा थांग लागत नाही असा हा सागर नेहेमीच काठाशी आणून अनुत्तरीत सोडतो. शेवटी माझ्या प्रश्नांची तृष्णा ह्या एवढ्या पाण्यानेही भागणार नसतेच .....नेहेमीप्रमाणेच. माझे प्रश्न मी माझ्याच मनाच्या गाठोड्यात पुन्हा गच्च बांधते आणि रात्री १.३० वाजता समुद्राचे क्रुद्ध रूप शांत होऊ लागले तसे उठून खोलीचा रस्ता धरते.
सागराचा रात्रीचा रासरंग बघून निवांत झोप येण शक्यच नव्हतं. काहीतास अर्धवट झोपेत काढून पहाटे ५ वाजता सूर्योदय पाहण्यास आम्ही बाहेर पडलो. नुकताच उगवू पाहणारा मंद प्रकाश नारळाच्या झाडांमधून डोकावू पाहणारा अर्धोन्मलीत सुर्य. आसमंत व्यापू पाहणारी सोनेरी किरणे. सृष्टीचे हे असे भरीव रूप उमलून येतांना पाहणे भाग्याचेच.
बीचवरून सवारी शोधत फिरणारे ओपन रिक्षा चालक अधून मधून तंद्रीत व्यत्यय आणतात पण यावेळी त्यांची गरजही होती. आम्ही निघालो रीजोर्ट पासून काही किलोमीटर अंतरावर सृष्टी अन जीव ह्यांचे एक वेगळेच नाते अनुभवायला.
बीचवरच एक मोठाच मोठा वाळूतला परिसर दुरून बघतांना लालेलाल झालेला नजरेस पडतो. या भागात व्हेइकल्स अलाऊ नाहीयेत. दूरच आपली गाडी सोडून अलगद पाय उचलत आपण पुढे चालू लागतो आणि त्या लाल रंगांच्या हालचाली जाणवु लागतात. हा लाल दिसणारा परिसर म्हणजे अगणित केकडे असतात. पहाटेचे कोवळे उन्ह खाण्यास ते असे जमिनीतून वर अवतरले असतात. या वाळूमय भागात अनेक बारीक छिद्र दिसतात ते म्हणजे या केकड्यांचे बीळ. एक एक पाउल टाकत आपण जसजसे पुढे सरकतो ते लगेच बीळ शोधून आत उडी घेऊन गुडूप होतात. हा अत्यंत विलोभनीय असा देखावा असतो. केकड्यांच्या बीळा भोवताल ते असे काही वावरतात कि वाळूवर सुंदर नक्षी तयार झालेली दिसते.
पुन्हा एकदा पहाटेच्या रम्य वातावरणात समुद्र स्नान घेऊन. फ्रेश होऊन दिवसाच्या पहिल्या वहिल्या सागर भरतीची वेळ होण्याआधी आम्ही पूर्ण समाधानी आणि आनंदी मनाने 'मंदारमनी'चा निरोप घेतो.
कलकत्ता गाठण्याआधी दिघा बीच बघावा हि इच्छा पूर्ण करावी वाटली म्हणून गाडी इथून २८ किलोमीटरवर असणाऱ्या दिघाकडे वळवली. 'दिघा' हे बेट मंदारमनीच्या सर्वस्वी विरोधी. मंदारमनी संपूर्णतः वाळूचा बेट कुठेही दगड गोट्यांचा अवशेषही नसलेला, दिघा मात्र अजिबात वाळू नसलेला मोठ्या दगडांची तटबंदी रचलेला. हा जितका शांत संयमी दिघा तितकाच खवळलेला मोठमोठ्या लाटा कडावर येउन आदळणाऱ्या. तो स्वच्छ-निर्मळ हा तितकाच मळकट- गढूळ. दिघाचा सागर बघायला ठीकेय पण त्याला स्पर्श करावा असं वाटलंच नाही.
khup sundar rashmi.
ReplyDeleteThnk u Swati Tai :)
Deletenicely penned and clicks like ur write up. (Ana)
ReplyDeleteThnks a lot Ana
ReplyDelete