Monday 30 November 2015

पांढरे डाग- समज गैरसमज



वैद्यकीय कामानिमित्त एकदा कुठल्याश्या गावी जावे लागले. काम वगैरे आटोपून परतीच्या प्रवासाच्या वेळी नेमकी गाडी बंद पडली आणि नाईलाजास्तव बस ने प्रवास करावा लागला. नेमकी संध्याकाळची वेळ असल्याने बरीच गर्दी होती. बस गच्च भरलेली आणि बरीच माणसं उभी देखील होती. इतक्या गर्दीतही एक सीट मात्र खाली होती. येताजाता लोक त्याकडे बघत होती, बसायला म्हणून जात होती पण तिथे बसत मात्र नव्हते. असं का होतंय? मुळात जिज्ञासू असणारी वृत्ती जागृत झाली आणि मी प्रत्यक्षच तिथे बघायला गेले. तिथे जे काही बघितले ते आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक देखील होते. तिथे एक मध्यमवयीन इसम बसलेले होते, त्यांच्या शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागांनी व्यापला होता. आणि म्हणूनच कुणीही त्यांच्याजवळ बसायला तयार नव्हते. पांढरे डाग ज्याला बोलीभाषेत 'कोड' असे संबोधतात. अश्या व्यक्तीला स्पर्श झाला तर ते डाग आपल्यालाही होतील अश्या बिनबुडाच्या कल्पनेने, भ्रामक विचारांनी लोकं किती ग्रासली आहेत या विचाराने मन सुन्न झाले.

 आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रापर्यंत भरारी मारत असतांना. पांढऱ्या डागांसारख्या अतिशय साधारण अन अजिबात घातक नसलेल्या विकाराबद्दल लोकांमध्ये किती गैरसमज अजूनही कायम आहेत. अनेक घातक, जीवघेणे रोग येतात आणि कित्तेकांचा जीव घेऊन जातात. पण त्या रोगाहूनही जास्त आपण या अश्या साधारण त्वचारोगास अवास्तव महत्व देतो त्याविषयी टोकाचे गैरसमज पाळतो. आजारपण आणि विकार दोन्हीत फरक आहे. पांढरे डाग म्हणजे रोग किंवा आजारपण नाही तो एक विकार किंवा उणीव आहे आणि त्याकडे खरतर त्याच दृष्टीने बघितले जायला हवे. पण असे घडत नाही.

पांढरे डाग (कोड) ज्याला इंग्रजीत 'ल्युकोडर्मा' असे म्हणतात. 'पांढरे डाग' बस एवढ्या नावातच ह्या विकाराचा खरा अर्थ गर्भित आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे आडवे-उभे पसरणारे डाग म्हणजे हे 'कोड'. या विकारामुळे शरीराच्या अंतर्गत संस्थानांवर काहीही प्रभाव पडत नाही. शारीरिक अंतर्बाह्य सर्व क्रिया सुरळीत चालू असते हा फक्त त्वचेवर होणारा पिग्मेटेशन विकार आहे जे शरीरातील मिलानोसाईट्स नावाचे सेल्स नष्ट झाल्याने किंवा हे मिलानीन सेल्स उत्पन्न न करू शकणाऱ्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला विकार आहे. हे सेल्स नष्ट का होतात किंवा अचानक उत्पादन का मंदावते ह्याचे वैद्यकीय विषयात दार्शनिक असे स्पष्ट कारण देता येत नाही. परंतु आयुर्वेदानुसार विरुद्धदर्शी आहार किंवा पचनसंस्थेतील बिघाड हि दोन मुख्य कारणे सांगण्यात आली आहेत.
हा विकार पूर्णतः अनुवांशिक नसला तरी वंशपरंपरेने हा विकार पुढल्या पिढीत उतरण्याची शक्यता वाढलेली  असते. श्वेतवर्णाचे हे डाग शरीरावर दिसायला लागले कि रुग्ण शारीरिक व्याधीपेक्षाही जास्त मनाने खचतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आणि समाजात वावरण्यास त्यांना संकोच वाटू लागतो. समाजही त्यांना सहज स्वीकारत नाही म्हणून ते सतत मानसिक दडपणातच जगत असतात.

आज आयुर्वेदाने या विकारासाठी अनेकानेक उपचार शोधून काढले आहेत. आता पांढऱ्या डागांसाठी रुग्णांनी निराश होण्याची गरज नाही, गरज आहे ती पूर्ण धैर्याने सामोरे जाण्याची आणि योग्य ते उपचार घेण्याची. साधारणतः फोटोकिमोथेरपी, कॉस्मेटिक सर्जरी, स्टीराईड थेरपी असे काही नामी उपचार वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत परंतु शरीर शास्त्रानुसार हे उपचार करवून घेण्यावर काही मर्यादा आहेत आणि त्यांचे दुष्परिणाम देखील असतात. आयुर्वेद हि प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे आणि कुठलाही जटील रोग सुद्धा मुळातून घालवण्यासाठी प्रचलित आहे. पांढरे डाग विशेषज्ञ (ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट) या नात्याने मी आजवर अनेक क्लिष्ट रुग्णांना बरे केले आहे. योग्य उपचार आणि पथ्य पाळून या विकारातून पूर्णतः बरे होता येते आणि पुन्हा डाग होण्याची शक्यता देखील कमी असते हे मला माझ्या प्रयत्नांनी दाखवता आले. ह्याचे मला समाधान आहे अनेक वर्षांच्या परिश्रमाने चांगल्या उपचार पद्धती शोधून काढता आल्या आणि आता मी फक्त पांढऱ्या डागांवर उपचार करण्यात कार्यरत आहे. रुग्णांना बरे करण्यात मिळणारे सुख इतर कुठल्याही सुखापेक्षा माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.


डॉ. स्नेहा राठी
(ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट)
शब्दांकन :- रश्मी प. म.

(सकाळ वृत्तपत्रात 'ल्युकोडर्मा डे' ला प्रकाशित झालेला लेख)

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...