Thursday, 13 August 2015

दैनंदिनी !!

रंग उडालेल्या काळपटलेल्या टेबलच्या
खिळखिळ्या झालेल्या ड्रॉवरच्या आत
अस्ताव्यस्त पसरलेल्या जुन्या बिनकामाच्या वस्तूंच्या
भाउगर्दीत , धुळीने माखलेल्या अवस्थेत पडलेय मी
टाचण्या पिना टोचल्यात, पेपरवेट, वस्तू येऊन आदळलेत अंगावर
कुणाला सोयर सुतक नाही ...आतातर तुलाही नाही …

कधी बैठकीतल्या काचेच्या कप्प्यातली शोभा वाढवायचे मी …
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच कौतुक ऐकायचे मी
कधीतरी इथली माणसं प्रेमानं हाती घ्यायचे
अंगावरची धूळ पुसून काळजाशी लावायचे
पान पान पालटतांना हळवी होऊन सुखावायचे मी
अन रात्र होताच उशाशी तुझ्या विसावायचे मी

तासंतास माझ्याशी बोलायचीस तू
शब्द शब्द पेरतांना किती गुंतायचीस
तुझ्या भावनांचा ओघ ओंजळीत सामावून घेतांना मीही मग रमून जायचे
तुझ्या अनुभवांची निर्जीवी पण एकमेव जिवंत साक्ष ठरायचे.

तुझे अश्रू अंगावर झेलतांना उर भरायचा माझाही
तू दुःखात असतांना क्षणभरही साथ सुटायचा नाही तुझाही
तुझे मन हलके व्हायचे माझ्याशी बोलून
मीही मग धन्य व्हायची तुझे हसू बघून

तुझे दिवस सरले अन माझेही
तू सुखी झालीस तुला हवं ते मिळवून
अन मला विसरलीस असे अडगळीत सोडून
आता दैनंदिनी लिहायची गरज नाहीये ना तुला
जीवाचा सखा मिळालाय असं ऐकलंय परवाला

मी मानेन समाधान तुझ्या जुन्या आठवणीत
क्षण ठेवेन जपून तसेच साठवणीत
ये एकदा भेट मला एवढीच इच्छा आहे सखे
तू सदा सुखी रहावीस हेच मागणे अखेरचे …

हेच मागणे अखेरचे …




No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...