Wednesday, 11 November 2015

गिमिक...



''hey ! gd mrng mom..HANDA MU TC :)'' रमा काकूंचा जर्मनीला असणाऱ्या मुलाचा रोज सकाळी मेसेज येतो. सकाळची सुरुवात अश्या कुठल्याश्या गुंतलेल्या शब्दांच्या एसेमेसने होते. मुलाला सांगू वाटणाऱ्या सगळ्या भावना अश्या थोडक्या शब्दात पुरत्या तो आईपर्यंत पोचत्या करतो अगदी छानश्या स्माईली सकट. आता हे रोजचंच झालंय रमा काकुंनाही पत्राऐवजी आता हेच सोयीचं अन 'कु~~ल' वाटायला लागलंय. हि आजच्या पिढीची सांकेतिक भाषा. आता वाटलं तर भावना समजून गोड मानून घेता येते नाहीतर नुसताच गुंता समजून गुंडाळूनही ठेवता येते.… मला आमचं लहानपण आठवतं. आपण बोलतोय ते सगळ्यांना कळू नये म्हणून आम्ही भावंड काही निवडक जिवलग मित्रांसोबत मिळून स्वतःची भाषा तयार करायचो. शब्दांची मोडतोड, काही शब्दांची गुंतवणूक ,शब्द्फोड आणि लहेजा (टोन) बदलून आम्ही आमच्यात संवाद साधायचो. 'च' ची भाषा. रफरची' भाषा, उलटशब्दी किंवा 'म' ची भाषा अश्या अनेक सांकेतिक भाषा हि त्यांची जाहीर उदाहरणं. पण तेव्हा मोठ्यांच्या दुनियेत त्याची ती स्वीकारार्ह कि अस्वीरार्ह अशी जाहीर चर्चा होत नसे. बाललीला समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाई. आजच्या तरुण पिढीनेही त्यांना समजेल अशी अन उमजेल अशीच त्यांची त्यांच्या सोयीची अशी शोर्ट शाब्दिक भाषा तयार करून घेतली आहे तिला 'slang' असे म्हणतात. जी एसएमएस, व्हाटसअप, फेसबुक, ट्विटर सारख्या कुठल्याही सोशल मिडियासाठी वापरली जाते. 'इतकं हसायला येतंय कि मी हसून हसून जमिनीवर लोळायला लागलेय' असं लांबच्या लांब वाक्य म्हणण्यापेक्षा चार अक्षरांचं ROFL ( Rolling On Floor Laughing) किंवा तीनाक्षरी LOL (laughing out loud) म्हणणे त्यांना जास्त सोयीचे वाटते. यातून कमी शब्दात भावना पुढल्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवता येतात आणि मर्यादित जागेत संपूर्ण कथाही ऐकवता येते.


सोशल मीडियाचा परिणाम आज जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करतोय. नाण्याला दोन बाजू असतात तसे या माध्यमाला देखील आहेत. सोशल मिडीयाचा वापर कुणी कशासाठी करावा हे व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे. माध्यम चांगली किंवा चुकीची नसतात त्याला स्वतःचे गुणावगुण नाहीयेत ते व्यक्तीसापेक्ष आहे. पण भाषेच्या बाबतीत म्हणाल तर आजची नवपिढी वापरत असलेली सांकेतिक भाषा पाहिली आणि त्यांच्या पिढीची गरज ओळखून ते वापरीत असलेली साधनं म्हणजेच सोशल मिडिया हे आजच्या पिढीला मिळालेलं खणखणीत नाण ठरत. भाषा कधीच स्थायी नसते इतिहास पाहिल्यास लक्षात येते कि पिढीनुरूप आवश्यकतेनुसार भाषेत सोयीस्करपणे बदल घडत आले. फरक इतकाच कि आता ती पूर्वीपेक्षा जास्त गतीने बदलते आहे आणि हा बदल कुठलीही आडकाठी न आणता ना-नुकुर न करता आजच्या नव्या अन कालच्या युवा पिढीने हसत स्वीकारली आहे.


गेल्या पिढीत म्हणजे आमच्यावेळी अगदीच पाच-सात वर्षाआधी पर्यंत ...(हल्ली ज्या गतीने पिढींचे वागणे-बोलणे, आवडी-निवडी आणि विचार बदलतात त्या अनुषंगाने Generation Gap आता एवढ्याच वर्षांची झालीये म्हणलं तर वावगं ठरणार नाहीं) बालसुलभ गमती सोडल्यातर तरुण पिढीला प्रत्येकाला स्वतःचे असे भाषेचे स्वधर्म नसायचे तेव्हा भाषेचे दोनच प्रकार आम्हाला माहिती होते. एकतर 'बोलीभाषा' अन दुसरी शास्त्रशुद्ध, चौकटीतली मान्यताप्राप्त, साजूक तुपातली पुस्तकी 'प्रमाण' भाषा. यात अगदी ठप्पा मारून ठरवून दिलेली भाषाच वापरायची असा अलिखित कायदा असायचा. तुम्हाला तुमच्या मताचे स्वतः तयार केलेले शब्दांचे विविध वर्शन वगैरे वापरणे संस्कार बाह्य होते किंवा मग तसे काही करता येते अशी आईडियाची कल्पना एखाद्याच सुपीक डोक्यात त्यावेळी आलेली असणार. भाषेचा संबंध जाती-धर्माशी किंवा संस्काराशी जोडला जायचा. जन्मापासूनच बाळाच्या मानसिक जडणघडणीचा प्रवास असा भाषेपासून सुरु व्हायचा. पुढे भाषेची अनेकविध स्थित्यंतरे घडत गेली. खरतर भाषा हे माध्यम आहे संवादाचं ते साध्य नाहीये. साध्य गाठण्यासाठी, अविर्भाव व्यक्त करण्यासाठी किंवा विचार पोचवण्यापुरता तिचा उपयोग केला जात असेल तर ती कश्या पद्धतीने वापरली जाते आहे ह्यावर पिढ्यानपिढ्या इतका काथ्याकुट करणं कितपत योग्य आहे हा चर्चेचा विषय असू शकतो .. नाकारायचा मात्र नाही.


आज संपर्काचं लोकप्रिय माध्यम म्हणजे सोशल मिडिया. त्यात आजची तरुण पिढी तर या माध्यमाने भारावून गेली आहे. तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहिला आहे. सतत सायन्स ऍण्ड टेक्‍नोलॉजीत वाढणारी आजची युवा पिढी Gadget च्या नावाखाली हातातल्या घड्याळीपासून ते मोबाइलपर्यंत सतत टेक्नोलोजीच्या संपर्कात असते. जन्मापासून सुरु होणाऱ्या आयुष्याच्या धावपळीत वाढती कामे, अभ्यास,स्पर्धा आणि यासर्वात कमी पडणारा वेळ यात ताळमेळ बसवतांना त्यांची तारांबळ उडते. अश्यात समाजाशी जुळून राहण्यासाठी, अध्यायावत राहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांच्या देवाणघेवाण संबंधी संपर्काच माध्यम म्हणून त्यांनी हा सोप्पा सरळ मधला मार्ग शोधून काढलाय. आता तर शब्दांसोबत काही इमोटीकॉन्सही संवादाला मदत करतात हसणे, रडणे, हाव-भाव, थम्सप- थम्सडाऊन एवढेच नाहीतर गिफ्ट्स, केक, फुगे, प्राणी, पाऊस, खाणे वगैरे चित्र रुपात वापरता येतात. या तरुण पिढीच्या तरुण भाषेला त्यांच्या जीवन प्रणालीला नावे ठेवणाऱ्या महानुभावांनी एकदा हा बुद्धिवादी संवादाचा खेळ खेळून बघावा शेवटी काय आपल्या माणसाला समजून घ्यायला मौनाची भाषाही पुरते असे आपण मानतोच ना … मग मनापासून या पिढीच्या मनापर्यंत पोचायला या एसेमेस च्या भाषेचा गोडवाही चाखूया आणि त्यांच्यातलेच एक होऊन पाहूया. काय माहिती जनरेशन मधील हि gap अशीच भरून निघेल.


रश्मी(c)
१८ ऑग. २०१५



('दैनिक सकाळ' २०१५ ''सोशल मिडिया विशेष'' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...