पु.ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलय
शेवटी संस्कॄती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुस-याचा पाय चुकुन लागल्यावरदेखील आपण प्रथम केलेला नमस्कार.... दिव्या दिव्या दीपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी.... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे.... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तस ह्या अदॄश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा....
शब्द फार छानं आहेत. परिटघडिचे शर्ट घातलें की मलाही आवडतील पण हे असं झालं माझ्या दरिद्री आयुष्यात.
बाजरीच्या भाकरी उरल्या तर आई त्याचे तुकडे करुन पुन्हा एकदा कडक भाजायची. सकाळच्या न्याहारीत चहाबरोबर बटरसाठी रोज दहा पैसे कुठले असायला? मगं हिचं आमची बिस्किटं. गणपतीबाप्पाची आरोळी आम्हीही ठोकली असती जर शाळा जेंव्हा मंदिरात भरायची तेंव्हा बाहेर न बसविता आत येउ दिले असते तर. मारुतीच्या देवळात नारळ फोडणारे हात आमचे नसायचे, पण खोबर्यासाठी पसरलेले लाचार हात आठवाल तर ते आमचेच होते. पाय लागुन आपआपसांत पाया पडणारे आम्हाला मात्र लाथाचं मारायचे. संध्याकाळ झाली म्हणजे आज धान्य आहे की नाही याच्या चिंता करायचो आम्ही, दिव्या दिव्या दीपत्कारला वेळ नसायचा. आमची आजी मजुरी करुन दमुन जायची. गोष्ट सांगत बसणे तिला परवडायचे नाही. मेलेली माणसे गाडण्याऐवजी जाळणे परवडायला लागल्यापासुन आम्हीपण दिवंगत आप्तांच्या अस्थी घेउन नाशकाच्या नदीवर जातो पण पुजेचं थोतांड बघवत नाही. पंढरपूरच्या चोखोबाच्या दगडाला बाहेर पाहुन आगोदर कससं वाटायचं आता रागं येतो. नाकारला असता विठ्ठलं त्या चोखोबाने तर असा दगड व्ह्यायची वेळं आली नसती.
हा असा पोसला गेलायं आमचा पिंड. हो हो छान विदेशी कपबशीचा आकार आलाय. मंदिराच्या पायरीवर पडुन रहाण्याच्या भानगडीतचं न पडता बाहेर थांबुन मोठं जगं पहायचं ठरवलयं आम्ही.
Rahul Bansode
No comments:
Post a Comment