Saturday, 25 July 2015

 

मध्ये व्हाटस्आप वर एक विनोद वाचलेला.

' भलाई कर और दरिया में डाल या फिर कुछ भी कर और फेसबुक पर डाल' 

खरतर विनोदच. पण होतंय असंच ना हल्ली , मानूया कि सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमाने डोक्यातलं सगळं मांडायला मन हलकं करायला एक छान मंच मिळालाय. कल्पनेतले रंग शिंपडायला केन्वास मिळालाय पण म्हणून रंगबिंग सोडून, काहीतरी छान लिहायचं सोडून उठसूट कुणावरतरी तुटून का पडतो आपण. नात्यांमध्ये तुटलेले बंध साहवत नाही म्हणून एकटेपणा घालवायला येतात कित्तेकजण मग इथल्या लोकांनाही तोडत का सुटतात. एकतर तोडायला नाहीतर सनसनी पसरून लोकांना लाईक अन कॉमेंटसाठी जोडायला हाच हेतू…  आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय यातून काय साध्य होणार आहे कशाकशाच भान नसतं. राजकारणाला किती मनावर घेतोय आपण? यापूर्वी परिस्थिती फार काही वेगळी नव्हती पण आपल्या रोजच्या जीवनावर खरच एवढा प्रभाव होता का राजकारणाचा? आपल्या आयुष्यात एवढी खळबळ माजायची का? दिवसरात्र वैचारिक-बौद्धिक खल मांडत बसायचो का आपण? आणि यासर्वातून निर्माण होणारे मानसिक-भावनिक त्रास व्हायचे का इतके? हल्लीतर सोशल नेट्वर्किंग साईट्सवर धुमाकूळ माजलाय अस वाटायला लागलंय. काहीतरी चांगलं वाचायला यायचं म्हटलं तरी त्रास होतो हल्ली. सतत रागराग, तिरस्कार, राजकारण.  अचानक जाती-पातीची जळमटं तर प्रत्येकाच्या भिंतीवर वाढू लागली आहेत. प्रत्येकाच्या धार्मिक अस्मिता अचानक जाग्या झाल्या आहेत. जातीचे मेळावे काय भरतात इथे आणि इथेच आंदोलनही व्हायला लागलीत. इंग्रजांनी आम्हाला एकात्मतेचे नकळत धडे शिकवले होते, बाहेरच्यांशी लढायला आम्ही जात-धर्म विसरून एक झालो होतो आणि आज देशात एकात्मता, बंधूभाव कायम राहणे प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतांना आम्ही सुशिक्षित होऊनही सुसंकृतीच्या पलीकडे जातोय, धर्माच्या नावाखाली आमच्याच घरात आमच्याच लोकांशी वैर घेत सुटतोय. ज्या गोष्टींचा उपयोग एकमेकांशी अधिक जवळ येण्यासाठी व्हायला हवा होता त्याचा उपयोग स्वतःला अधिक बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात नुसताच दुरावा वाढवत नाहीये तर कडवटपणा पसरवण्यास जबाबदार ठरत चालले आहे.    
         
काय कमाल आहे नाही....इथे जिकडे तिकडे ज्याला पाहावे तो दुसऱ्याला शिकवायला निघालाय. काय चूक, किती चूक, काय करायला हवं, काय करायला नको . कोण चुकीचा, कसा चुकीचा? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्या विषयात अन देश सोडून विदेशापर्यंत सगळ्या घटनात, वातावरणाविषयी, परिस्थितीबद्दल, वागणुकीबद्दल... संस्कारापासून ते शिक्षणापर्यंत तर राजकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत लोक नाक खुपसून हुशारी पाजळायला लागलेत. इतकं शहाणपण इतकी हुशारी आणि इतक तत्वज्ञान प्रत्येकात अचानक कुठून आलं? बरं सगळेच इतके 'शहाणे' झालेत तरी देशाची नैतिकता इतकी का खालावतेय मग?? राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत कोणी कुणाशी कसे वागावे ह्याचे ज्ञान प्रत्येकात येऊनही एकमेकांविषयीची दरी इतकी का वाढतेय? स्वतःला बुद्धिवादी सिद्ध करण्याच्या नादात सर्वच मूर्ख का ठरताहेत...अन मरमर करत आयुष्यभर आनंदाच्या मागे धावणारा माणूस हल्ली स्वतःच स्वतःसाठी दुःख का ओढवून घेत आहे ?  

हा सगळाच संशोधनाचा विषय आहे ... नाही ?        

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...