Tuesday, 10 December 2019

आसमान छुती लडकीया !!




पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे सर्विलांस एयरक्राफ्ट उडवणार आहे.


ह्यांच्याबद्दल जाणून घेणं प्रेरक आहे -

भावना कांत : भावना नोव्हेंबर २०१७ मध्ये फायटर स्क्वाड्रॉनमध्ये सामील झाली आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये मिग -21 बायसनवर प्रथमच तिने एकटीने उड्डाण केले होते. हे तेच विमान आहे ज्याने विंग कमांडर वर्तमान अभिनंदन ह्याने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाला मारून पाडले होते. भावना कांत सध्या राजस्थानमध्ये असणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवर तैनात आहेत. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपुर ब्लॉकमधील बाऊर गावची रहिवासी असणाऱ्या भावनानी एमएस कॉलेज बंगळुरू येथून बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले. भावना सामान्य कुटुंबातली असली तरी तिने आकाशापर्यंत उडण्याचे स्वप्न लहानपणापासूनच हृदयाशी बाळगले होते; स्वतःच्या स्वप्नासोबत देशाला गर्व वाटावा असे कार्य तिच्या हातून घडून आले आहे.

सब लेफ्टनंट शिवांगी : सिक्कीम-मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली शिवांगी बिहारच्या मुझफ्फरपूरची रहिवाशी आहे. एखाद्या शिक्षिकेची नोकरी किंवा गृहिणी होईल एवढीच तिच्याकडून अपेक्षा केली गेली होती मात्र, विद्यापीठाच्या प्रवेश योजनेचा एक भाग म्हणून बनविलेले नौदल सादरीकरण करतांना तिच्या उडण्याच्या सुप्त इच्छेला बळ मिळाले. त्यानंतर तिने जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये २०१८ साली एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. मुजफ्फरपूरमधल्या भारतीय नौदल अकादमीमध्ये सहा महिन्यांच्या नौदल ओरिएंटेशन कोर्सनंतर तिने एअरफोर्स अकॅडमी (एएफए) येथे पिलाटस बेसिक ट्रेनरवर उड्डाण करण्याच्या प्रॅक्टिससाठी आणखी सहा महिने प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यांपासून कोची स्थित भारतीय नौदल एअर स्क्वॉड्रॉन 550 ज्याला ‘फ्लाइंग फिश’ म्हणून ओळखली जाते तेथे भारतातील नौदल उड्डाणांचे अल्मा मॅटर, डोर्निअर सागरी विमान चालविणे शिकली. कोर्सचा एक भाग म्हणून तिने आतापर्यंत सुमारे 100 फ्लाइंग तास लॉग इन केले आहेत, त्यामध्ये 60 पेक्षा जास्त डॉर्नियर तिने उडवले आहेत.नौदलात सामील होण्यापूर्वी फक्त गोव्याचा समुद्र पर्यटक म्हणून पाहिलेली शिवांगी आता हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित ड्रोनिअर 228 सागरी विमान उड्डाण करणार आहे. हे विमान अल्प-अंतराच्या सागरी मिशनवर पाठविले जाते. त्यात रडारवर अ‍ॅडव्हान्स पाळत ठेवणे , इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि नेटवर्किंग सारख्या बर्‍याच उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांच्या मदतीने हे विमान भारतीय समुद्री भागावर नजर ठेवेल.



शिवांगीचे हे असाधारण यश पाहून तिला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली होती “विमान उड्डाण करण्यासाठी आपल्याकडे सुपर प्रतिभावान असण्याची गरज नाही, परंतु आपल्याला खरोखर कठोर परिश्रम करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे,” पुढे ती म्हणाली, “उडणे तुमच्या नैसर्गिक वृत्तीच्या विरूद्ध आहे. म्हणूनच फोकस आणि स्किल सेटचे महत्त्व जास्त आहे”


भावना आणि शिवांगी सारख्या महिलांमुळे इतर महिलांसाठी अनवट वाटा मोकळ्या होतायत, त्यांचं पहिलं पाऊल उमटलं आता या पाऊलखुणा अनेकींना नवनवे मार्ग दाखवतील. महिला ताकतवर आणि हीमतीही असतातच, त्यांच्या पंखांना हवा फक्त द्यायची असते. ते काम या दोघींनी उदाहरणासह करून दाखवलं आहे. आता याही क्षेत्रात महिलांना परचम लहरवता येईल आणि देशासाठी काहीतरी केल्याचं समाधानही मिळवता येईल.. या दोन्ही भारतभूच्या लेकींचे मनभरून कौतुक आणि शुभेच्छा.

- रश्मी पदवाड मदनकर


Saturday, 7 December 2019

मामाचं पत्र हरवलं ..





पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण  कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे.  पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा.
आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय.

पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराला, लेक माहेराला, शिष्य गुरूला, मित्र एकमेकांना अगदी कुणीही कुणाला ... ''मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं'' असा खेळ खेळायचो आम्ही आमच्या लहानपणी त्या खेळातूनही आलेलं पत्र हरवलं म्हणून किती शोधायची धडपड चालायची.  अश्या या पत्रांचं अनन्यसाधारण महत्व ओळखून पुढे ही पत्र साठवली जाऊन प्रकाशित होऊ लागली. संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी, स्वामी विवेकानंदांची तर कितीतरी पत्रं, महात्मा गांधींनी ॲनी बेझंटला, आचार्य विनोबा भावेंना लिहिलेली पत्रं,मग हल्लीच्या कवी अनिल आणि कुसुमावतींची पत्रं आणि अमृता प्रीतम आणि इमरोजची पत्रं ही पत्रं साहित्यप्रेमींच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. पुष्टी रेगेंच्या सावित्रीने तर साहित्य रसिकांना भुरळच पाडली होती.

पत्र व्यक्तीच्या आयुष्याचा आरसाच तर असतो जणू.
प्रेमचंद म्हणतात ''पत्र-साहित्य का महत्त्व इसलिए है कि उसमें ‘बने-ठने, सजे-सजाये’ मनुष्य का चित्र नहीं, वरन् एक चलते-फिरते मनुष्य का स्नैप शॉट मिल जाता है, लेखक के वैयक्तिक सम्बंध, उसके मानसिक और बाह्य संघर्ष तथा उसकी रुचि और उस पर पड़नेवाले प्रभावों का पता चल जाता है. जिन पत्रों के विषय और शैली दोनों ही महत्त्वपूर्ण हों, वे साहित्य की स्थायी सम्पत्ति बन जाते हैं और इस सम्पत्ति पर पाठक भी गर्व करते हैं!

याच भावभावनांचा संचय करायला पत्र वाङ्मयाची सुरुवात झाली असावी. साहित्यात आज पत्र वाङ्मयाचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी प्रकाशित होणाऱ्या पत्रिकांसाठी जी पत्रं यायची त्या पत्रांनाही साहित्यिक स्पर्शअसायचा व ती साठवली जायची, जसजसे साहित्यिकांमध्ये आत्मभान यायला लागले ते दिवंगत झालेल्या साहित्यिकांच्या पत्रांचे संकलन करून प्रकाशित करू लागले. हिंदी साहित्यात या परंपरेची प्रथम सुरुवात  पं. बनारसीदास चतुर्वेदी यांनी केली त्यांनी पत्रलेखनाचा जणू ध्यासच घेतलाआणिकही लेखकांसमवेत पत्रलेखन मंडळाची स्थापना केली. उर्दूतही अनेक पत्रसंग्रह आहेतच. सर्वप्रथम उर्दूतले संकलन रजब अली बेग ‘सरूर’ यांचं प्रकाशित झालं पण मिर्ज़ा गालिब यांचे खतूत प्रकाशित झाल्यानंतर तर अनेक पत्रसंग्रह येत राहिले. कराचीवरून प्रकशित होणारे 'नकुश'१९५७ नोव्हेंबरच्या अंकात १०४० पानात १५५ प्रसिद्ध व्यक्तींचे ३००० पेक्षा जास्त दुर्मिळ पत्र प्रकाशित झाले होते.

प्रसिद्ध अमेरिकी संत एमर्सन यांच्या पत्राचं संकलन तर जवळ जवळ 32 हज़ार पानांचं आणि पाच खंडांमध्ये व्याप्त आहे. स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला लिहिलेली तत्व चिंतनपूर्ण पत्रे असूदेत, स्वामी स्वरूपानंदचे ‘पत्र-प्रबोध’ पुस्तक किंवा ‘प्रेमचंद की चिट्ठी-पत्री... डॉ. वा.श. अग्रवाल म्हणतात - ‘मेरी समझ में किसी व्यक्ति की भारी-भरकम साहित्यिक कृति आंधी के समान है, पर उसके साहित्यिक पत्र उन झोंकों के समान हैं, जो धीरे से आते-जाते रहते हैं और वायु की थोड़ी मात्रा साथ लाने पर भी सांस बनकर जीवन देते हैं.’

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत, हे व्यवहार त्या पत्रांमार्फत करीत हि पत्रे हा इतिहासाचा आरसाच तर आहेत. त्या कालचे जगणे-वागणे त्यावेळचा कारभार-राजकारण या पत्रांतून सुस्पष्ट होतो.अस्सल पुराव्याखेरीज इतिहासाच्या नोंदी खऱ्या कश्या मानल्या जाणार. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही.  शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. हा मराठी इतिहासातील पत्रव्यवहार तर बुद्धिभेद करून राजकारण करण्याचे उदाहरण कायम करणारे ठरतात. 

अश्या या पत्रवाङ्मयाचा इतिहास आता संपुष्टात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. हल्ली कुणी कुणाला पत्रेच पाठवत नसल्याने हा वाङ्मयीन प्रकारचं भविष्यात बंद होणार असे स्पष्ट जाणवू लागले आहे. आणि निव्वळ हे बंद झाल्याने साहित्याचा तोटा होणार नसून इतिहास समजून घेण्याची पाळंमुळं देखील हलणार आहेत हे निश्चित.


रश्मी पदवाड मदनकर -
२४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित


Tuesday, 3 December 2019

लँड ऑफ होप - अंजा रिग्रेन



बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, दलाई लामा इत्यादी प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहेऱ्यांना मागे टाकून डेन्मार्कस्थित सामाजिक कार्यकर्ता अंजा रिंग्रिन लोवेन जगातील प्रेरणादायक लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या 'उम' नावाच्या जर्मन भाषेच्या लोकप्रिय मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून गेला होता. अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवून शेकडो नायजेरिअन मुलांना जीवनदान देणाऱ्या त्यांच्यासाठी त्यांच्याच देशात राहून जीव ओतून कार्य करीत असलेल्या अंजाची या दिशेने जाण्याची जीवनकहाणी तिच्या सुरुवातीच्या काळापासून मी पाहत आले आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या प्रेरणा स्थानांमध्ये अंजाचे नाव माझ्या यादीत अग्रगण्य आहे.

हो आता मोठा झालाय... इतर कुठल्याही सामान्य मुलांएवढाच तंदुरुस्त आणि आनंदी दिसतो. कोण आहे हा होप ? ही एका अश्या दुर्दैवी लहान मुलाची कहाणी आहे ज्याला अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या बेगडी समाजाने मरणासन्न अवस्थेत रस्त्यावरून टाकून दिले होते. दारिद्र्यामुळे जगण्यासाठीचा करावा लागणार संघर्ष, अशिक्षितपणा आणि त्यामुळे समाजातील घसरलेली मूल्य या गोष्टी माणसाला काय काय करायला भाग पाडू शकतात हे पाहिले कि आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना त्रास होणे साहजिक आहे.. पण बरेचदा आपण हळहळण्याशिवाय काहीच करू शकत नाही. नायजेरियात जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली दोषी मुलांवर होणारा हिंसाचार आणि अत्याचार ही सामान्य बाब आहे. अश्याच आरोपांनी ओढवलेल्या संकटात त्या चिमुकल्या जीवाला अत्यंत द्वेषपूर्ण वागणूक, छळ आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या .. हे कधी तर अगदी ३ वर्षे वयाचा असतांना. पण अश्या हजारो मुलांमध्ये होप सुदैवी होता ज्याला एका ममतामयी हळव्या महिलेच्या बिनशर्त प्रेमामुळे जीवनदान मिळाले. बचावानंतर लगेचच अंजाने स्वत:चा त्या चिमुकल्या जीवाला पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ सामायिक केला ज्यामुळे मुलाच्या जादूटोण्यांच्या दुःखद समस्येबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि होपच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी पैसे एकत्रित व्हावे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि होपची कथा लाखो लोकांच्या मनाला भिडली.










30 जानेवारी, 2016 चा तो दिवस होता मूळची डेन्मार्कची असणारी अंजा रिंगग्रेन लोव्हन सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने नायजेरियाच्या गल्लीबोळातून फिरून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होती. अचानक कुपोषणाने ग्रस्त अतिशय कृश शरीराचा ३ वर्षाचा चिमुकला मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर फिरत असलेला तिच्या नजरेस पडले. अफगाणिस्तानसारख्या बर्‍याच देशांमध्ये सामान्यपणे प्रचलित असलेल्या ‘जादूटोणा’ सारख्या अंधश्रद्धेवरून तास आरोप लावलेल्या मुलांना स्वतःचेच कुटुंब चक्क मरण्यासाठी म्हणून रस्त्यावर सोडून देतात. त्यावेळी मुलांचा द्वेष द्वेष केला जातो. त्यांना खायला प्यायला सुद्धा दिले जात नाही, त्यांच्या अंगावर कपडे नसतात.. त्यांच्या रस्त्यावरच मारून पडण्याची वाट पहिली जाते. होपचे हेच झाले होते .. तो दिसला तेव्हा चालण्यास अगदीच अक्षम तो आठ महिन्यांपासून रस्त्यावरच राहत होता आणि लोकांकडून फेकल्या जात असलेल्या अन्नावर जिवंत वाचला होता. अश्या परिस्थितीतल्या त्या चिमुकल्याला पाहून अंजाचे मन द्रवले तिने त्याला त्या क्षणी खायला प्यायला दिले आणि उचलून सोबत घेऊन आली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचे नाव अंजाने 'होप' असे ठेवले. आज होप ७ वर्षांचा आहे आणि इतर मुलांएवढाच तंदुरुस्त आणि सक्षम आयुष्य जगतो आहे. होपच्या प्रकृतीविषयी बोलताना अंजा म्हणाली होती की 'मी फक्त 20 महिन्यांपूर्वी आई बनले होते. मुलांच्या गरजा आणि आईची माया काय असते हे मला माहित होते, एका छोट्याश्या जीवाचे हाल मला बघवले नाहीत आणि मी त्याला दत्तक घेण्याचे ठरवले'.

होपबद्दल जिव्हाळा वाटणाऱ्या लोकांसाठी होपची सध्याची स्थिती वर्तवणारा फोटो जाहीर करतांना अंजाने 'तो क्षण' पुन्हा क्रिएट करणारा फोटो काढून बिफोर-आफ्टर परिस्थिती दाखवणारे फोटो टाकले आणि पुन्हा एकदा नेटिझन्स नॉस्टेल्जिक होत होप-अंजा च्या प्रेमात पडले आहेत. 






अंजा आणि तिचा नवरा डेव्हिड इमॅन्युएल अश्या दुर्दैवी मुलांसाठी 'आफ्रिकन चिल्ड्रन्स एड एज्युकेशन डेव्हलपमेंट फाउंडेशन' (एसीएईडीएफ) नावाचे अनाथालय दक्षिण-पूर्व नायजेरियात चालवतात, नायजेरियातच राहतात. 'लँड ऑफ होप' या नावाने अंजा एक सोशल मीडिया कॅम्पेन देखील चालवते आहे. या माध्यमातून अनेक नायजेरियन मुलांचे प्राण वाचवून त्यांना चांगले जीवन तिने दिले आहे. या मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि अश्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ती सध्या नायजेरियन सरकारशी लढा देते आहे. अश्या ममतामयीला मानाचा मुजरा.





- रश्मी पदवाड मदनकर



Wednesday, 27 November 2019

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं.

Image may contain: Himanshu Bagde, smiling, sitting, sky, ocean, outdoor, water and nature




आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे आणि त्याबदल्यात उदरनिर्वाहासाठी मनासारखा मोबदलाही मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?  मला नेहमीच वाटत आलंय… जगात सगळ्यात सुखद जॉब कुठला असेल तर तो भटकंतीचा .. कोणातरीसाठी कुठल्याही कारणाने, त्यांच्याच खर्चावर मुशाफिरी करावी, मनसोक्त हिंडावं, डोंगररांगा, समुद्र किनारे, हिरवाई, जंगल, प्राणी, किल्ले, लेण्या हुडकून काढाव्या. या भटकंतीतून निरनिराळ्या अनुभूती घ्याव्या, मनात साठवाव्या. मनसोक्त हिंडून झाले की घरी परतताना खिसाही भरला असावा. असे झाले तर ? स्वप्नील वाटतं ना सगळं. स्वप्न पाहायला हरकत नाही पण त्यानं पोट भरत नसते. स्वप्न बाजूला ठेवून वास्तवात जगता आलं पाहिजे. पण वास्तव म्हणजे काय शेवटी? तुमच्या इच्छा आकांक्षा मारून, स्वप्न बाजूला सारून प्रस्थापितांच्या मळलेल्या वाटेवरून मन मारून प्रवास करीत राहणे, मारून मुटकून स्वतःला एखाद्या साच्यात बसवणे आणि एक दिवस हे जग सोडून निघून जाणे .. एवढंच तर नव्हे ना?


असा विषय आला कि 'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life ' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) हमखास आठवतो. एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात.

हे अख्ख व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या अनेक भटक्यांबद्दल आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियेचे ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुख-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत. त्यातलाच एक हिमांशू बागडे.


तो तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी. एकेकाळी आर्मीत जाऊन देशसेवा करायचे स्वप्न पाहणारा.. वाचनाचे वेड असणारा, अध्यात्मात रुची असणारा, भर तारुण्यात फुगीर वाढीव पगाराच्या नोकऱ्या खुणावत असताना वर्षानुवर्षे प्रगतीच्या चढत्या पायऱ्यांचा आलेख नाकारून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले वेल सेटल कॉर्पोरेट करिअर सोडून वाट वाकडी करत गेली २० वर्ष निसर्गाचा ध्यास घेत जंगलं पालथी घालणारा हिमांशू फार कमी वयात देश विदेशात त्याच्या जंगलवेडासाठी आणि त्यासाठी केलेल्या कामामुळे नावारूपास आला.  वयाच्या अकराव्या वर्षीच मन-मेंदूने जंगलाच्या मोहात पडला. वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने सहज जंगलात जाणे व्हायचे. तिथला निसर्ग, वातावरण, प्राणी आदीची ओढ निर्माण व्हायला हळूहळू सुरुवात झाली असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा त्याने प्रत्यक्ष वाघ बघितला. हा अनुभव रोमांच उभा करणारा होता. त्या क्षणापासून वाघांवर त्याने निरातिशय प्रेम केले. वन्यजीव संवर्धन आणि व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाघांची काळजी घेणाऱ्या मोहिमेत हिमांशूने कळत नकळत मोठी भूमिका निभावली…तुमच्या जाणिवा जर सच्च्या आणि प्रामाणि‌क असतील तर तुम्हाला तुमच्याही नकळत मार्ग गवसत जातात ह्याचेच जिवंत उदाहरण हिमांशूच्या रूपात नावारूपास येत होतं,
जंगल अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या हिमांशुला नकळत जंगलावर प्रेम जडले. औद्योगिक विकास आणि अन्य विकासाच्या नावावर जंगलाची मोठ्या प्रमाणात होणारी वाताहत पाहून तो व्यथित होतो. यातूनच तो नि:स्वार्थीपणे ‘जंगल वाचवा’ मोहिमेत सहभागी झाला. हळूहळू या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला. जंगल वाचवा, पर्यायाने वाघ वाचविण्यासाठी तो आज दिवसरात्र धडपडतो आहे.

हिमांशुच्या याच कार्याने त्याला ‘जंगलतज्ज्ञ’ अशी नवी ओळख दिली. जंगलाशी संबंधित कुठलीही गोष्ट असेल, हिमांशुला त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. त्याचे मार्गदर्शनात जंगलाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून जंगलप्रेमी प्रयत्नरत असतात. येथूनच हिमांशुचा जंगल अभ्यासक, गाईड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असा नवा प्रवास सुरू झाला.



एकदा माया नावाची वाघीण तिच्या दोन शावकासोबत हिमांशुच्या पुढ्यात आली.  तिचं बेदरकार, तेजस्वी, स्वच्छंद वर्तन तिची दखल घेण्यास भाग पाडणारच होतं. तिला माणसांबद्दल संकोच नव्हता. इतर श्वापदांचे भय तिच्या वागण्यात जाणवत नव्हते. जंगलभर मुक्त संचार करणाऱ्या मायाच्या निर्भय वागण्यानं हिमांशु तिच्याकडे आकर्षित झाला. सतत मायाचेच विचार डोक्यात येऊ लागले. तिच्या अस्तित्वाभोवताल फिरु लागले. त्याने मायाचा माग घ्यायला सुरुवात केली. तिच्या हालचालीचा अभ्यास तो करु लागला.  म्हणतात ना, प्राण्याला ‘माया’ लावली की ते ही माणसाळतात. हिमांशुचे तिच्या अवतीभवती असणे आता ‘तिच्या’ही अंगवळणी पडले होते. तिलाही त्याची कदाचित सवय झाली होती.

वाघांचे वर्तन कसे असते, वाघांच्या हद्दी कशा ठरतात, त्याची आखणी कशी करतात, वाघ त्या कशा ठरवतात, त्यासाठी कशी भांडणे करतात याविषयीची अतिशय रंजन आणि  शास्त्रीय माहिती हिमांशुला आहेच. मात्र, याही पुढे जात माया कशी वागते. आपल्या बछड्यांच्या बचावासाठी काय-काय योजना आखते, त्यासाठी प्रयत्नपूर्वक काय कुटील कारस्थान खेळते, हे सगळं हिमांशुसाठीही नवीन होते. तो सांगतो ती तिच्या काळात जंगलाची सम्राज्ञी होती तरी त्याहून अधिक तिच्या बछड्यांची आई होती. पूर्वी अनेकदा साम्राज्य हासील करण्याच्या वाघांच्या लढाईत आपले शवक गमावलेली माया, त्यांच्याच राज्यात त्यांनाच गाफील ठेवून जगायला शिकली.  एकावेळी दोन नर वाघांपासून पिल्लांचा बचाव करायला म्हणून ती कुटीलपणे दोघांशीही संबंध ठेवून दोघांनाही हे तुमचेच पिल्लं आहे या भ्रमात ठेवून त्यांच्याच कडून पिल्लांचा बचाव करून घ्यायची.

‘माया’सोबतच्या भेटी जशा जशा वाढत गेल्या तशी ती हिमांशुला अधिकच उलगडत गेली. तिच्या स्वभावाचा अंदाज त्याला बांधता येऊ लागला. तिची पुढली चाल हिमांशुला ओळखता येऊ लागली. ती कोणत्या क्षणी कुठे असेल, कुठून प्रवास करेल, कुणाशी भांडेल, कुणाशी तह करेल ह्याचे आडाखे चपखल बसू लागले. एका क्षणी माया आणि हिमांशुचे नाते इतके प्रगाढ झाले कि, ‘टेलिपॅथी’ व्हायला लागली.



जंगलात भेटलेल्या हिमांशुला आता मायाच अनेक संकेत स्वतःहून देते. हिमांशुच्या हातात जेव्हा कॅमेरा असतो तेव्हा ती स्वत:हून पोज द्यायला सज्ज होते, असेच काहीसे वाटू लागले आहे. ह्या दोघांचे हे न समजणारे अनामिक नाते अनेक माध्यमसमूहांना खुणावत राहिले. ह्यातूनच 'लोनली प्लॅनेट'च्या निवडक लेखांच्या आवृत्तीत या दोघांवर सविस्तर लिहिले गेले. हिमांशुनेही 'माया इन्चान्ट्रेस' (माया एक जादूगारिणी) या नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये चरित्र मालिका लिहिली. त्याचे अनेक फोटोग्राफ्स आंतराष्ट्रीय पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आणि गाजलेही. त्याच्या कामातून, लिखाणातून च्याट्या छायाचित्रांतून त्याचे जीवनानुभव, संवेदनशील आणि तितकेच प्रगल्भ जीवनदर्शन घडते हे निश्चित.

जंगलांचा मागोवा घेत फक्त भारतच नव्हे तर विदेशातील अनेक जंगल पालथे घालून कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची अपेक्षा न करता तो अनेक वर्ष जंगलसेवा  निगुतीने करीत आहे.  दक्षिण भारत, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर-पूर्वेतले सगळे राज्य, मध्य भारतातील ताडोबा, मेळघाट, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगढ , सातपुडा, पन्ना, गोवा, कर्नाटका, तामिळनाडू, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि भूतान येथील जंगलांना त्याने भेट देऊन तिथल्या प्राण्यांचा, निसर्गाचा अभ्यास केला या प्रवासात अनेक जंगलप्रेमींच्याही भेटी घेतल्या आणि त्याचा हा मुलखावेगळा संसार अनेक पटींनी मोठा करीत नेला आहे.



हिमांशूच्या अतुलनीय कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१२ सालचा  ''Sanctuary Asia Wildlife Photographer', 'पुरस्कार, महाराष्ट्र राज्य बायोडाइव्हर्सिटी बोर्ड अवॉर्ड',  '२०१३ चा नॅशनल बायोडाइव्हर्सिटी फोटोग्राफर अवॉर्ड',  २०१९ साली UK ने आयोजित केलेला 'Winner of Lanka Challenge' अश्या अनेक पारितोषिकाचे तो मानकरी ठरला. त्याच्या श्रमसेवेच्या आस्थेपोटी मिळालेले अनेक सन्मान आणि सत्कार त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला अभिमान बाळगण्यास उद्बोधक असेच आहेत.

असे हे हिमांशु आणि जंगलाचे अतूट नाते म्हणजे मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गावर, वन्यजीवावर प्रेम करून त्याचे रक्षण करावे, हाच संदेश देणारे आहे. या गोड, अनामिक नात्यापासून आपणही प्रेरणा घेऊ या. नाही जंगल, किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एका प्राण्यावर तरी प्रेम करुया. झाडे लावून पक्षांना आमंत्रण देऊ या…त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी……!





मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर
(प्रतिबिंब-२०१९ च्या पर्यटन विशेष दिवाळी अंकात प्रकाशित )

Monday, 18 November 2019

लेखकांच्या गोष्टी



#लेखकांच्या_गोष्टी


''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.''


परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं.. शिवाय दोनेक वर्षाआधी पाहिलेला 'गॉन गर्ल' चित्रपटही आठवला. तसा हा सिनेमा गूढ कॅटेगरीतला डेविड फिंचर ह्याने २०१४ साली निर्देशित केलेला ह्याच शीर्षकाच्या कादंबरीवर बनवलेला स्मार्ट सिनेमा आहे. चित्रपटातली नायिका एमी (रोसमंड पाइक) ही तिच्या लहानपणी तिच्या आई-वडिलांनी लिहिलेल्या, प्रचंड गाजलेल्या, लोकप्रिय कादंबरीची खरीखुरी नायिका आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या तिच्याशी भावना जुळल्या आहेत. ती स्वतःही लेखिका आहे आणि त्याच अनुषंगाने तिला रोजनिशी लिहायची सवयही आहे. एमीचा नवरा निक डन (बेन अफ्लेक) त्याच्या जुळ्या बहिणीसोबत मिळून एक बार चालवतो. सगळं काही सुरळीत चालू असतांना लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला निक घरी पोचतो तेव्हा त्याला लक्षात येतं एमी गायब आहे .. सर्वत्र तूट-फूट, रक्ताचे शिंतोडे, पसारा घरातल्या एकंदरीत परिस्थितीवरून एमीसोबत काहीतरी भयंकर घडले असल्याचे लक्षात येते. इथून सुरु होतो रोमांच. इन्वेस्टीगेशन टीम, माध्यम समूहांची गर्दी, एमीचे चाहते ह्यांच्या भन्नावून सोडणाऱ्या प्रश्नांनी आणि तपासणीत पुढे येणाऱ्या विरोधातल्या पुराव्यांनी एमीचा खून झाला असल्याची आणि तिचाच नवरा निक त्याला कारणीभूत असल्याची खात्री पटत जाते. एमीच्या रोजनिशीवरून चित्रपट उलगडत जातो. काही क्ल्यू मिळतात आणि निक अधिकाधिक गाळात फसत जातो.


एमीच्या रोजनिशीवरून लक्षात येतं कि, एमीच्या लोकप्रियतेला भाळून निकने तिच्याशी लग्न केले असते परंतु त्यांच्यातले संबंध मात्र फार दिवस चांगले राहत नाही. निकचा बाहेरख्यालीपणा, दुर्लक्ष करणे शिवाय इतर महिलांशी संबंध एमीच्या दुःखाचं कारण असतं. तिच्या रोजनिशीतून निक कमालीचा विलन वाटायला लागतो. एमीच्या खुनाच्या आरोपात निकला शिक्षा होते .. गूढ मात्र काहीतरी वेगळंच असतं. ही लेखिकेशी प्रेम केल्याची किंवा तिला दगा देण्याची शिक्षा भोगल्याचीच योजनाबद्ध कहाणी असते. हे प्रेक्षकांना अगदी शेवटच्या एकमेव सीनवरून लक्षात येतं.


२०-२५ वर्षाआधी कधीतरी टीव्हीवर वेगवेगळ्या कथांचे एपिसोड असलेली सिरीयल पहिली होती. 'मिट्टी के रंग' मधेच असावी बहुदा नेमके आठवत नाही पण ती देखील अशीच काहीशी. एक लेखक असतो प्रचंड लोकप्रिय वगैरे. पण त्याच्या लोकप्रियतेमागे, त्याच्या पुस्तकांचा खप प्रचंड वाढण्यामागे त्याच्या लिखाणापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाच कारणीभूत असतात. अत्यंत साधी वेशभूषा, मितभाषी असणारा हा लेखक बायकोच्या अत्याचारांनी पिडलेला असतो. तिच्या अत्यंत वाईट वागणुकीचा तो बळी असतो. त्याच्या लिखाणाची किंमत ती ठरवते, त्यानं कुठल्या कार्यक्रमांना किती मानधन घ्यायचं हे ती सांगते .. मानधन न मिळणाऱ्या कार्यक्रमांना ती लेखकाला जाऊच देत नाही. एवढंच नाही तर दारावर आलेल्या आयोजकांना चक्क हाकलून लावते हे पडद्यावर दिसत राहते. लेखक महाशय कार्यक्रमांमध्ये डोळ्यातून आसवे गाळून या चर्चांना पुष्टी जोडत राहतो. जनतेत हळहळ पसरते, चर्चांना उधाण येतो, त्याच्या बायकोबद्दल समाजात प्रचंड घृणा पसरते.. लेखकाची प्रतिष्ठा मात्र वाढतच जाते. कार्यक्रमाला लेखक हवा पण बायकोकडून नकार येऊ नये म्हणून मानधन वाढवून दिले जातात, कार्यक्रमांना गर्दी वाढत राहते.. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा काहीतरी क्ल्यू मिळेल म्हणून वाचकांत जिज्ञासा शिगेला पोचते त्यांच्या पुस्तकांचा खप गगनाला जाऊन भिडत राहतो.


हे सगळं पाहून आपणही हळहळतो, बायकोचा राग राग येऊ लागतो, आपल्या संवेदना आपली सहानुभूती पूर्ती लेखकाच्या बाजूने झुकलीच असते आणि शेवटचा सिन येतो... गूढ उकलत..पचनी पडणार नाही असं सत्य समोर येतं, हा सगळा लेखकानेच रचलेला सापळा असतो..बायको स्वतःही त्यात पिडलेली प्यादीच असते.


लेखकांवर लिहिणारे लेखकही किती क्रिएटिव्ह असतात .. लेखक हा स्वप्नील विश्वात रमणारा.. सत्यही कल्पनेत रंगवून पाहणारा आणि शब्दांच्या जादूने वाचकांना असणाऱ्या - नसणाऱ्या दुनियेचीही सफर घडवून आणणारा. त्याचीही उलटी-सुलटी रूपे असू शकतात सत्यात किंवा एखाद्या लेखकाच्या कल्पनेतही हे बघणे गमतीशीरच आहे... नाही ?


- रश्मी पदवाड मदनकर







रश्मी पदवाड मदनकर -

Saturday, 16 November 2019




तसे रोजचेच तर असते जगणे 

अंधारातही उजाडले अंगण बघणे 
मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा ..

तेव्हा एक करावं  ..

रोज थोडं थोडं चांदणं 
मनातून काढून गोळा करावं 
कुपीत घालून जपून ठेवावं .. 

रात्र उलटेल .. दिवस पालटतील
कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन ..
आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर 

कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून, 
पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या 
उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या ..

मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या 
कारण 

मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा !

- रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 30 October 2019


 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर  
आरसा हवा हवा वाटत असला, तरी 
प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा 
डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा 
फिरवून घेतो आपण चेहेरा ..

अगदी आहे तशीच दिसणारी माणसे 
हवी हवी वाटतात..पण  
इतरांच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात 
त्यांचे हवे असणे नको असणे .. 

रश्मी पदवाड मदनकर.


Sunday, 20 October 2019

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

गाडली असतीस माझी नाळ ... आई ..

तर ..

तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती
आयुष्याचा सुर्य उगवण्याआत
पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची
परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा
संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा
सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून
परतवून लावता आल्या असत्या मलाही
रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून
ओतून देता आला असता ... आणि

आणि

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

नव्या जगण्याचा नवा उजेड
पांघरून घेतला असता मी  ... आई .. !

पांघरून घेतला असता मी आई !!






- रश्मी पदवाड मदनकर


Saturday, 19 October 2019

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !



एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.

‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,
पण वाती भिजलेल्या नसतील,
धुपारतीची वेळ होईल लवकर अन्
माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’

असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर

"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"

उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत


- रश्मी पदवाड मदनकर

Monday, 7 October 2019

'फ्रायडे फॉर फ्युचर' - ग्रेटाची ग्रेट चळवळ


तिने खरतर शाळेत असायला हवे होते.. खेळण्याबागडण्याच्या वयात जणू घराला आग लागली आहे आणि आपण सर्वांनी जागे होऊन ती विझवायला आता याक्षणी प्रयत्न करायला हवे असे तळमळीने सांगत फिरते आहे. कोण आहे ती?





गस्ट २०१८ पासून “स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट” नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले, ते ग्रेटाच्या 'हाऊ डेअर यु ?' असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या यूएनमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून ''फ्राइडेज फार फ्यूचर'' ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती जी जगातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते की बेजबाबदार राजकारणी आणि उद्योगांमुळे ही धरती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायला हवे ते होत नाहीये. हे जग ही धरती जलवायू प्रदूषणापासून वाचवण्याची लढाई काही विशिष्ट लोकांचीच नाही तर या एका कारणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. नवीन पिढीला आम्ही काय देऊ शकतो, तर.. पूर्वजांकडून मिळाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी जगण्यायोग्य, जलवायू प्रदूषणमुक्त पृथ्वी सोडू याची हमी आम्ही त्यांना द्यायला हवी असे तिचे म्हणणे आहे..फक्त १६ वर्षाच्या अल्पायुत जलवायू परिवर्तनाबाबत काळजी बाळगत त्या विरोधात उभे होऊन जगभर खळबळ माजवून देणाऱ्या स्वीडनच्या या इटुकल्या क्रन्तिकारीचे नाव आहे ग्रेटा थॅनबर्ग. यावर्षी ग्रेटा यांना प्रतिष्ठित अ‍ॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिची आंदोलनाची तीव्रता बघून प्रेरित होऊन हे लोण जगभर पसरत चालले आहे. तिला ‘युनो’ मध्येच नव्हे, तर अनेक ठिकाणी बोलायला बोलावलं जात आहे.

नेमके काय झाले होते ...

ऑगस्ट 2018 मध्ये एकदा ग्रेटाने कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे होणारी तापमानवाढ या संदर्भातला एक व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला आणि तिच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. लवकरच यावर काहीतरी करण्यात आले नाही तर ह्याचा अत्यंत विपरीत परिणाम या धर्तीवर होईल व ती जगण्यायोग्य राहणार नाही, स्वीडन सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करावे यासाठी प्रयत्न करावे असे तिला वाटू लागले. त्याच काळात स्वीडनमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार होत्या तेव्हा ग्रेटाने शाळेत जाणे बंद केले. त्याऐवजी, संसदेच्या बाहेर बसून जीवघेण्या हवामान बदलाच्या विरोधात एल्गार पुकारला. सुरुवातीला ती एकटी होती पण तिने धैर्य न गमावता आपला निषेध सुरू ठेवला, हळूहळू तिचा आवाज लोकांपर्यंत पोचू लागला. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बेल्जियममधील मुले या क्रांतीमध्ये सामील झाली, यूकेमध्ये शाळेतली मुले रस्त्यावर उतरली. या सगळ्यांच्या हातात फळी होती ज्यात असे लिहिले होते की 'आपण आपले काम प्रामाणिकपणे कराल तेव्हाच आम्ही आमचे गृहकार्य पूर्ण करू'. तेव्हापासून दर शुक्रवारी शाळेसमोर निदर्शने करीत हवामान बदलाच्या विरोधात हजारो विद्यार्थी आपापल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत जगातील 100 हून अधिक देशांतील एक हजाराहून अधिक धरणे ग्रेटाच्या समर्थनार्थ झाले आहेत. या चळवळीमुळे युरोपच्या निसर्गासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात आहे. युरोपमधील बर्‍याच देशांनी त्यांच्या हवामान बदलाच्या धोरणात चळवळीच्या दबावाखाली मोठ्या सुधारणा करायला सुरुवात केली आहे.




स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम यांनी १७३९ मध्ये लिहिले होते कि ''लोकप्रतिनिधिक सरकारांची सुरूवात करण्यात आली कारण माणूस आपल्या संकुचित विचारांमुळे स्वार्थापलीकडे पाहू शकत नाही, तो त्याच्या वर्तमानकालीन लाभांमध्ये आणि लोभांमध्ये गुरफटून असतो, तो भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवू शकत नाही'' त्यांचे मानाने होते कि सरकारी संस्था, संसदीय परंपरा आणि लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थाला आळा घालतील आणि समाजाला दूरदृष्टी देण्यासाठी काम करतील. पण आजच्या जगभरातील राजकीय वातावरणावर नजर टाकली तर परिस्थिती अगदी विपरित असल्याचे लक्षात येते. कोणताही पुढारी भविष्यातील पिढीच्या भवितव्याबद्दल विचार करतांना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्यात देशांचे स्वतःचे हितसंबंध बाधा बनताना दिसतात. डेव्हिड ह्यूमला लोकशाहीकडून असलेली आशा स्पष्टपणे भंग झालेली दिसते आहे. अश्या परिस्थितीत काहीतरी जादू घडेल अशी वाट न बघता प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवात कोणीतरी करायला हवी आहेच पण प्रत्येकाला अचंभित आणि आकर्षित करणारी गोष्ट हि आहे कि हे आंदोलन कुठल्या नावाजलेल्या बुद्धिवाद्यांनी नव्हे तर एका ‘अस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी असणाऱ्या किशोरवयीन बालिकेने छेडले आहे. हा स्वमग्नतेसारखा आजार आहे, अस्पर्जर सिंड्रोमने ग्रसित माणसे एखाद्या विशिष्ट विषयांबद्दल खूपच चिंतित होतात. ते त्या विषयांना अत्यंत गांभीर्याने घेतात आणि त्याच त्याच गोष्टींसाठी आग्रह लावून धरतात..असे लोक सहसा सामाजिक संवाद कमी करतात. पण ह्याच कारणामुळे ग्रेटा ला तिचे विचार सतत लावून धरणे ते लक्ष विचलित न होऊ देता लोकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. संपूर्ण जगातलेच पुढारी परिवर्तन घडवून आणण्यात फेल ठरले आहेत असे तिला वाटते, ती यूएसमध्ये अडीच लाख लोकांच्या गर्दीसमोर उभी राहून पुढाऱ्यांना उद्देशून एक प्रश्न विचारते '' जर तुमचे घर ढासळायला लागले तर तीन आपत्कालीन बैठकी आणि हवामान आणि पर्यावरणाच्या विघटना संदर्भात चमू बोलावून आपत्कालीन शिखर परिषद घेत तुम्ही बसणार आहात का ?" तापमानवाढीमुळे संपूर्ण जगच संकटाच्या सावटाखाली आले आहे, याचे परिणाम आपण भोगत असतांना यावर तात्काळ उपाययोजना व्हायला हवेत असे तिला वाटते. ती तिच्या एका भाषणात जनतेला संबोधून म्हणते '' तुम्ही तुमच्या मुलांवर अत्यंत प्रेम असल्याचा आव आणता, पण त्यांचे भविष्य आता त्यांच्या डोळ्यादेखत संकटात घालता आहात'' आपले आपल्या माणसांवर प्रेम असेल तर जलवायू परिवर्तनासंबंधी योग्य उपाययोजना आपणच शोधून काढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या देशांनी पॅरिस ठरावानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे, हे ती जगाला ठासून सांगते आहे.




ग्रेटासारख्या किशोरीला पर्यावरणाचे जे महत्व समजले आहे त्यासाठी जगभरातील किशोर, तरुणवर्ग तिच्या सोबतीला उभे राहत आहेत. आपणही निदान आपल्या हिस्स्याचे कर्तव्य पार पाडत पर्यावरणाला घटक ठरतील अश्या गोष्टी नाकारून पर्यावरणासाठी पूरक गोष्टींचा स्वीकार करायला हवा...निदान इतके योगदान शुभेच्छांसह तिच्या चळवळीला आपण देऊच शकतो... नाही?



- रश्मी पदवाड मदनकर

Monday, 30 September 2019

नायरा टू ग्रेटा... व्हाया मलाला - कहाणी अश्रूंची

कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं

( संदेश सामंत ह्यांचा एक विचार करायला लावणारा लेख)

दिवस होता १० ऑक्टोबर १९९० चा. अमेरिकेच्या काँग्रेशनल ह्युमन राईट्स कॉकसमध्ये एक साक्ष होणार होती. आणि साक्ष देणारी व्यक्ती होती एक १५ वर्षांची तरुणी. नायरा असं तिचं नाव सांगण्यात आलं. आपण कुवेती आहोत आणि इराकच्या सद्दामच्या सैन्याने कुवेतमध्ये अत्याचारांचं काहूर माजवलंय, असा तिचा आरोप.

साक्ष सुरू झाल्यावर तिने काही विधानं केली. ज्याने जगाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने केलेला एक गंभीर आरोप फार महत्त्वाचा होता. नायराच्या मते इराकी सैन्याने कुवेतमधील एका इस्पितळात घुसून इंक्युबेटरमधील काही नवजात बालकांची हत्या केली. हे सर्व सांगताना नायरा रडू लागली. आपलं दुःख आवरणं नायरला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच कठीण झालं. सद्दामकडून होत असलेले अत्याचार किती भीषण आहेत, याची जाणीव सर्वांना होऊ लागली. "आपण याआधी इतकं भीषण आणि वाईट काहीच ऐकलं नव्हतं," हे तिथे उपस्थित काही व्यक्तींनी नमूद केलं.

अमेरिकेने नायराचा साक्षीचा व्हिडीओ जगभर पसरवला. जगभरात कुवेतच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. सद्दामच्या विरोधात जनमत तयार झालं. अगदी मुस्लिम राष्ट्रांतही द्वेष वाढू लागला. याचाच फायदा घेऊन अमेरिकेने ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मला सुरुवात केली. अमेरिकेच्या विमानांनी बगदादवर हल्ला चढवला. इराकचा या युद्धात सपशेल पराभव झाला. अमेरिका जिंकली होती. इतिहास लिहिण्याची संधी जेत्याला मिळते. व्हिएतनामच्या युद्धात तोंड होरपळून गेल्यानंतर अमेरिकेने केलेलं हे पहिलं थेट युद्ध.

पण, याचा क्लायमॅक्स सुरू होतो तो नंतर. ABC नावाच्या अमेरिकी वृत्तसंस्थेच्या काही पत्रकारांनी नायराने नमूद केलेल्या हॉस्पिटलला भेट दिली. तिथे डॉक्टरांसह लोकांच्या मुलाखती घेतल्या. "नवजात बालकांसह अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, हे सत्य आहे. अनेक डॉक्टर्स आणि परिचरिकांनी देश सोडला आहे, हे त्याचे एक कारण आहे..... पण, इराकी फौजांनी नक्कीच कोणतेही इंक्युबेटर चोरून नवजात बालकांना जमिनीवर फेकून दिल्याने कोणत्याही बालकाचा मृत्यू झाला नाही" अशी बातमी पत्रकाराने प्रसिद्ध केली.

पुढे १९९२ मध्ये न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेल्या एका बातमीत एक धक्कादायक बाब प्रसिद्ध झाली. त्या बातमीनुसार नायरा ही कुवेतच्या अमेरिकेतील राजदूताची मुलगी होती. त्यांचं नाव होतं नासिर अल सबाह. तिने जी घटना घडल्याचं सांगितलं तेव्हा तर ती कुवेतमध्ये उपस्थितही नव्हती.

मग हे रामायण घडलं कसं?

तर त्यामागे होती एक PR कंपनी - हिल अँड नॉलटॉन. व्हिएतनामच्या युद्धात केलेल्या चुका अमेरिकेला पुन्हा करायच्या नव्हत्या. माध्यमांची आणि त्यांच्यात दिसणाऱ्या चित्रांची जादू अमेरिकन सरकार नक्कीच जाणून होते. म्हणूनच लक्षावधी डॉलर्स खर्च करून अमेरिकेने एक प्रपोगंडा उभा केला. यामागे अमेरिकेचं तेलाचं राजकरण आणि हितसंबंध होते. पहिलं आखाती युद्ध संपलं आणि यामागची खरी कथा बाहेर येऊ लागली. अमेरिकेने एखाद्या वस्तूप्रमाणे हे युद्ध जगाला विकलं होतं.

घटना दुसरी -

तारीख होती ९ ऑक्टोबर २०१२... पाकिस्तान. तालिबानी दहशतवाद्यांनी स्वात भागात एका शाळेच्या बसवर हल्ला केला. दोन मुली त्यात जखमी झाल्या. एकीच्या डोक्यात गोळ्या लागल्या. या मुलीने काही वर्षांपासून मुलींच्या शिक्षणासाठी एक आंदोलन उभं केलं होतं. या हल्ल्याची बातमी जगभर पसरली. तालिबानी कृष्णकृत्यांची जगाला घृणा वाटू लागली. पाकिस्तान सरकारवर दबाव वाढू लागला. या जखमी मुलीला विमानाने लंडनला नेण्यात आलं. तिचं नाव मलाला युसूफझाई. पुढे तिला तिच्या 'साहसासाठी' शांततेचा नोबेल पुरस्कार 'एका भारतीय व्यक्तीसोबत विभागून देण्यात आला.'

मलाला बरी झाली; पण, पुढे इंग्लंडच्या बरमिंगहॅममध्येच ती राहू लागली. पाकिस्तानात पुन्हा गेली नाही. महिलांचे प्रश्न, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न किंवा मानावाधिकारांचे प्रश्न यावर संयुक्त राष्ट्रांसह जगभर व्याख्यानं देऊ लागली. हजारो डॉलर्सचं मानधन यासाठी घेऊ लागली. सर्वच प्रसिद्ध व्यक्तींप्रमाणे मलाला फाउंडेशनची स्थापना झाली आणि समाजकार्याचा आवाका वाढू लागला. पाकिस्तानातच्या बलुचिस्तानात होणाऱ्या अनन्वित मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना असताना काश्मीर प्रश्नावर मलाला जागतिक समुदायात बोलू लागली. पण, तिला मानणाऱ्या एकाही गटाला तिच्याच पश्तून समाजाच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाविषयी विचारण्याची मती झाली नाही, हे नवलच.

मलालावर हल्ला झाला तो काळ होता तेलांच्या वाढत्या दरांचा आणि अरब जगात घडणाऱ्या क्रांतीचा. पाश्चात्य देशांना अनेक अरब देशांत सत्ताबदल करायचे होते. म्हणूनच, एकामागोमाग एक 'क्रांती'चा वणवा या भागात पसरू लागला. तालिबान्यांशी वाटाघाटी होत नव्हत्या. तेव्हा त्यांच्याविरुद्ध अजून कठोर पावलं उचलायची तर जगमान्यता हवी होती. मलालाच्या हृदयद्रावक कथेने ती मिळाली. मलाला पाश्चात्य माध्यमांची हिरो झाली. ओबामांनी अफगाणिस्तान यथेच्छ बॉम्ब वर्षाव केला. पुढे त्याच 'गांधीवादी' ओबामांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.

यात एक बाब सारखी होती तो म्हणजे टीन एज मध्ये असणाऱ्या, जगाच्या समस्येच्या चिंतेचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन चालणाऱ्या आणि अश्रू ढाळत आपलं दुःख, आपली कळकळ जगापुढे मांडणाऱ्या दोन मुली.

हे सांगण्याचं निमित्त म्हणजे सध्या इंटरनेटवर चर्चेत आलेली एक १६ वर्षीय स्वीडिश मुलगी ग्रेटा थुनबर्ग. संयुक्त राष्ट्रांत "हाऊ डेअर यू!" म्हणत या मुलीने जागतिक समुदायाला आणि देशांच्या प्रमुखांना वातावरण बदलाविषयी प्रश्न विचारला आहे. तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात तिचा चेहरा उद्विग्न आहे. डोळ्यांत राग आहे आणि अश्रूही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिच्याविषयी उपहासात्मक ट्विट केलं आणि (नेहमीप्रमाणे) ते जनतेच्या रोषाचे धनी झाले आहेत.

वातावरण बदल आणि पर्यावरणीय धोके यावर सध्या जगात बरीच आंदोलनं घडताना दिसतायत. जगभरात तरुण रस्त्यांवर उतरून आंदोलन करतायत. एक नवी 'क्रांती' घडतेय असं चित्र निर्माण होतं आहे. पण, याला कदाचित दुसरी बाजू असेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना आणि तुर्की या देशांनी तापमानवाढीस वेसण घालण्यासाठी मूलभूत प्रयत्न न केल्याने कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चिल्ड्रेनच्या अंतर्गत मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करून तिने संयुक्त राष्ट्रांत याचिका दाखल केली आहे. यात चीनचा साधा उल्लेखही नाही.

गेली अनेक वर्ष जागतिक तापमान वाढीने हैराण झालेल्या जगाने आपलं कार्बन उत्सर्जन कमी करावं यासाठी आंतरराष्ट्रीय आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, प्रत्येक देशाच्या समस्याच वेगळ्या आहेत. भारत आणि अनेक विकसनशील देशांनी आपल्या कार्बन उत्सर्जनात घट करावी, असा विकसित देशांचा आग्रह आहे. तर विकसित देशांनी विकासाची एक पातळी गाठल्यानंतर आता विकसनशील देशांना उपदेश करून दबाव आणू नये, असा भारतासह अनेक देशांचा प्रतिकार आहे.

पोट भरल्यावर इतरांना उपोषणाचे सल्ले देणं सोपं असतं. गरिबाला उपासाचे फायदे ढेकर देणाऱ्याने सांगू नये. सत्तरच्या दशकात पर्यावरण रक्षणासाठी कागद सोडून प्लास्टिक वापरण्याचा प्रचार करणारे आज कागद वापरायला सांगत आहेत, ही हास्यास्पद बाब आहे.

या सर्वाला बऱ्याच तांत्रिक बाबींची किनार आहे. शाश्वत विकासाची टूम जगभर आली आहे. पण, शाश्वत विकासाचं तंत्रज्ञान बहुतांशी विकसित राष्ट्रांकडे आहे. त्याची किंमत मोठी आहे. बहुतेक गरीब राष्ट्रांना ते आजच्या घडीला परवडणारं नाही. आणि त्याचे परिणाम पाहण्यासाठी लागणारा वेळ देण्याची तिथल्या लोकसमुदायाची तयारीही नाही. तयार असलेल्या तंत्रज्ञानाला 'बाजारपेठ' हवी आहे. ती किंमत देण्यासाठी जनमानस तयार करण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत.

यात सोपं लक्ष आहे ती क्रांतीचं सळसळतं रक्त अंगात असलेली तरुणाई. आणि त्यांना साथ आहे ती त्याच भांडवली अर्थव्यवस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक आधुनिकतेची.

लहान मुलांचा प्रचारात वापर करणं हा तर राजकारण्यांचा आवडता उद्योग. इतिहासात डोकावलं तरी सर्वच लोकशाही ते हुकूमशाही प्रवृत्तीच्या प्रत्येक नेत्याला ही मुलं फार भावतात, असं दिसून येतं. सोव्हिएतच्या स्टॅलिन पासून जर्मनीच्या हिटलर पर्यंत प्रत्येकाने तरुण मुला-मुलींचा वापर आपल्या फलकांवर केला.

मुलं ही देशाचं 'भविष्य' असतात. त्यांना वाढवण्याची जबाबदारी ही वर्तमानातील पिढ्यांवर असते. हा झाला सृष्टीचा नियम. पण, आजच्या पिढ्यांना भविष्याच्या ओझ्याखाली दाबून आपले हितसंबंध जपणं हा मानसिक युद्धाचा उत्तम मार्ग असतो. तो जगभर सर्वत्र अवलंबला जातो... अगदी दररोज.

प्रगतीचे आणि विकासाचे टप्पे पार करून मग जगाला तत्वज्ञान शिकवणं, हे तसं सोपंच. शिवाय, घरात, मोबाईलवर आणि सर्वत्र इंटरनेट असलेल्या व्यक्तींना आता जग वाचवण्याची आस लागणं, हे काही विशेष नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या लाखोंच्या या मूलभूत गरजा पूर्ण होणार आहेत की नाहीत, याचा साधा विचारही तेव्हा मनात येत नाही. "विकास म्हणजे नक्की काय?" यावर चर्चासत्र घेणं हा तर विकासाचा सर्व परीने उपभोग घेतलेल्या लाभार्थींचा लाडका उद्योगच जणू!

इंटरनेटने जगात एक क्रांती आणली. समाजमाध्यमांनी पेटवलेल्या वातावरणाने सरकारं उलथवली. लोकशाही व्यवस्थांमध्ये जनमत निर्मिती करणं सोपं झालं. एका विशिष्ट विचारसरणीच्या हातांमध्ये एकवटलेल्या माध्यमांचं आणि परिणामी माहितीचं लोकशाहीकरण झालं. बदल झाले. पण, आज त्याच्यापुढेच आव्हानं निर्माण झाली आहेत. भांडवली विचारांच्या पाठिंब्यावर जन्मलेल्या या माध्यमांवरही ताबा मिळवून (वैचारिक) शोषणाची खोटी चित्र रंगवून पुन्हा विचारांचं युद्ध जागतिक पटलावर भडकताना दिसत आहे.

पडद्यामागे असणारं चित्र फार वेगळं आहे. पडद्यावर ओघळणाऱ्या अश्रूंना विविध छटा आहेत. त्या पाहून सारासार विचार करणं ही येत्या काळाची गरज आहे.

- संदेश स. सामंत

Wednesday, 25 September 2019

लढा स्त्रीवादाचा !


'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' - sonam kapoor
- रश्मी पदवाड मदनकर



'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करणारी सिने अभिनेत्री सोनम कपूर हिने पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर आणला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,’ असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. गेले वर्षभर महिलांशी जुळलेल्या प्रश्नांनी सोशल मीडिया ओसंडून वाहत होता, गेल्या वर्षभरात 'हैशटैग मी टू' ने सोशल मीडियाचा फार मोठा भाग आणि काळ व्यापला होता. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते आणि तिथून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आंदोलनाच्या स्वरूपात जगभर पसरत गेले, वर्ष सरता सरता हे आंदोलन फक्त चित्रपट सेलिब्रिटीजपुरते मर्यादित न राहता, लेखक, पत्रकार, सैन्यातले अधिकारी, राजकारणापासून ते न्यायमूर्तीपर्यंत चिघळत गेले. अंतर्राष्ट्रीय खेळाचे रिपोर्टींग करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ वायरल झाले, अनेक एमएमएस, ऑडिओ नोट, मॅसेजेस चव्हाट्यावर आणले गेले. पण हे किती महत्वाचे होते हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि ही साधी दिसणारी मोहीम जगव्यापी आंदोलनात परावर्तित झाली. हा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाला होता, हे आठवण्याचे विशेष कारण म्हणजे सोनम कपूरने लग्नानंतर सासरचेही नाव तिच्या नावासह जोडले आणि स्त्रीवादींनी तिच्या नावाने शंख फुंकायला सुरुवात केली. त्याचे प्रत्यत्तर म्हणून हल्लीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनमने 'स्त्रीवाद' म्हणजे फेमिनिज्मचा खरा अर्थ काय हे प्रत्येकीने समजून घेणे आवश्यक आहे स्त्रीवादाचे ढोंग करणे म्हणजे स्त्रीवाद नाही असे परखडपणे सांगितले. स्त्रीवादी असण्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत समानता. तुम्ही तुमची ब्रा जाळून मिशा वाढवणे हा काही स्त्रीवादाचा अर्थ नाही. अनेक अभिनेत्रींना स्त्रीवादाचा खरा अर्थच माहीत नाही. आता बदलत्या काळानुसार सर्वांनीच स्त्रीवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा हा फरक दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.' 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' तिच्या या वाक्याचा बुरा-भला प्रभाव व्हायचा तो झालाच आणि सोशल मीडिया पुन्हा एकदा ढवळून निघाले. स्त्रीवादाचा जो काही नवा अर्थ सोनमच्या वक्तव्यातून उद्धृक्त होतो आहे त्याचे महत्व समजून घेणे महत्वाचे ठरते.


योगायोगाने १९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता.

काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरण पाहणं महत्वाचं ठरेल.

> २०१० ऑगस्टमधे लॉस अ‍ॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.

> या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते !

पुरुषप्रधानतेच्या इतर सिद्धांतांच्या इतिहासात उदारमतवादी स्त्रीवादाचा इतिहास खूप जुना आहे. अठराव्या शतकाच्या सुरूवातीस, स्वातंत्र्य आणि समानता या लोकशाही मूल्यांनुसार स्त्रियांच्या बाबतीतला विरोधाभास उदारमतवादी स्त्रीवादींनी अधोरेखित केला. मेरी वॉलस्टोन क्राफ्टने १७९० च्या दशकात लंडनमधून पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या 'सपोर्टिंग द राईट्स ऑफ वुमन' या लेखात महिलांच्या हक्कांसाठी परखडपणे लिहिले. संयुक्त राष्ट्रात १८४८ मध्ये सेनेका फल्स संमेलन झाले ज्यात महिलांच्या अधिकारांसाठी पहिल्यांदाच आंदोलन झाले होते. भारतीय स्त्रीवादाची सुरुवात मात्र त्यामानाने सुदैवी होती एकतर ती स्त्रीवादापेक्षा स्त्रीमुक्तीची लढाई होती आणि त्यासाठी महिलां पुरुषांचा सहभाग होता, अनेक बुरसटलेल्या प्रथा परंपरेच्या जोखडातून इथल्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मानसिकता बदलण्याचा संघर्ष तिचा अजून संपलेला नाही. मुस्लिम समाजातील महिला त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या तो अगदी आत्ता आत्ताचा काळ, याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात एका राष्ट्रस्तरीय बैठकीत ३० महिलांनी एकत्र येऊन केली होती. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली.


गेल्या अनेक वर्षात स्त्री पुरुष असमानतेचे कवच भेदून हे दोन्ही वर्ग सहशिक्षण, सहकारी म्हणून एकत्र कार्य करीत आहेत. स्त्री-पुरुष मैत्री हा देखील आता अचंभित करणारा विषय राहिला नाही. पण म्हणून एवढ्याने परिस्थिती बदलली आहे का? महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पूर्वीपेक्षा तिच्या स्वातंत्र्यताही वाढ झाली असली तरी स्त्रीकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात-मानसिकतेत बदल झाला आहे का? हा कळीचा मुद्दा आहे. आजही निरनिराळ्या कवितांमधून लेखांमधून ' आई -बहिण-पत्नी-सखी' अश्या अपेक्षा अधोरेखित करत 'स्त्रीत्त्व' बंदिस्त करण्यात येतेच.. ते बदलून मुळात आधी एक 'माणुस' म्हणून समाजाने स्त्रीचा आदर करणे महत्वाचं आहे. पात्रता असताना समाजात समान वागणुक न मिळणे, रुढी परंपरांच्या नावाखाली आपेक्षांची ओझी लादणे, हुंडा, सेक्शुअल हॅरेसमेन्ट, विचार आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसणे, या गोष्टी आधी बदलल्या पाहिजेत. आजही एकविसाव्या शतकात तिला तिच्या हक्कांसाठी, तिच्यावर झालेल्या अन्यायांसाठी-अत्याचारांवर शासनाने, समाजाने दखल घ्यावी म्हणून आंदोलनं करावे लागणार असतील. तिच्या हक्कांसाठी न्यायासाठीचे निर्णय पुरुषांच्या संघटना घेणार असतील तर आमचा समाज कितीही विकसित झाला तरी काय उपयोग, खरच, स्त्रियांचे समान ह्क्क खूप दूरची गोष्ट आहे मुळात मुलीने जन्म घ्यावा कि नाही, मुलगी जन्मलेली जगू द्यायची कि नाही, तिच्या अथपासून इतिपर्यंत समाज मुलीला मुठीत ठेवू इच्छितो. स्त्रीच्या आयुष्याचं, तिच्या अस्त्तित्त्वाचं दृष्य थोडंफार बदललं असलं, तरी इथे 'पेला अर्धा भरलाय' म्हणून समाधान मानता येत नाही. खूप काही व्हायचं आहे. एकूणच वैश्विक समाजाची मानसिकता बदलण्याची, या दिशेनं सुसंस्कार घडवलेली पिढी तयार होण्याची नितांत गरज आहे. म्हणजेच अजून थकून थांबता येणार नाहीये .. प्रवास अजून चालू आहे.

हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. हि जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून तिच्या चारित्र्याची मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचं अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे. 

(२५ सप्टेंबर २०१९ च्या  दैनिक सकाळ 'मी' पुरवणीत प्रकाशित )



- रश्मी पदवाड मदनकर

Monday, 23 September 2019

मला वाटलं ...
की तू मला
आता माझी जात विचारशील.

कुसवाआतली की कुसवाबाहेरची.
वाडीतली की वाड्यातली.
माणूस की बाईमाणूस.

माझ्या नावाचं
लेबलही तस निश्क्रीयचं.
कुठल्याच चौकटीत न बसणारं.
बसवताही न येणारं.

मैला वहाणारी मी
दैवपुजेत रमणारी.
तुमच्या भातुकल्या
दूरुनच बघणारी.

तिन्ही सांजेला
दिवा लावणारी.
भुकेल्या कावळ्यांसाठी
गिधडांना शमवणारी.

डोई झाकल्या पदरात
जट वाढवणारी,
वीतभर कपड्यात पण
रामायण वाचणारी.

गळ्यातल्या धडुत्यात
तान्हूल निजवणारी,
पाळणाघराच्या पाय-यांवर
नकळत थबकणारी.

मी कालची, मी आजची.
कधी गर्भात खुडलेली,
कधी उमल्याआधी
श्वापदांनी कुस्करलेली.

मी रमा , मी आनंदी.
मी जिजा, मी सावित्री .
मी सिंधू , मी किरण,
मी अहिल्या .मी अभया......
            मी......मी......फक्त माणूस...
                                 बाईमाणूस......

...............डॉ भाग्यश्री यशवंत............

Thursday, 19 September 2019

वेड्या माणसांच्या गोष्टी !! - 4



#भेटलेलीमाणसं


सातेक वर्षाआधीची गोष्ट. नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास केवळ अकरा दिवसात यशस्वीपणे पार पाडला होता विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली ही मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते. त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या, काही दुःखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जावं लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे ही मुलं कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्यात त्यांनी केलेल्या साहसी कृत्याच्या अभिमानाची झळक जाणवत नव्हती तर जाणवत होता तो त्यांचा ओथंबून वाहणारा आनंद...


या थरारक प्रवासाचे अनुभव जो मुख्यतः माझ्याशी शेअर करीत होता तो होता स्वप्नील.. स्वप्नील समर्थ. दिसायला मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा मला त्या क्षणीच भावला होता. नंतर कुठल्या कुठल्या निमित्ताने कुठकुठल्या कार्यक्रमात भेटी होत राहिल्या अनेकदा एकत्र कार्य केले आणि स्वप्निलच्या खेळाडू वृत्तीची, चांगल्या स्वभावाची, समाजसेवेच्या कर्तव्यबुद्धीची, सतत उत्साही आनंदी मूर्तीची चुणूक लागत राहिली. स्वप्निलच्या आजोबांनी केलेल्या अनेक समाजसेवेच्या व्रताचा वारसा हा पुढे चालवतो आहे, त्यासाठी वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवतो त्यांच्यासारख्याच अनेक तरुणांना फक्त उद्बोधनातून नाही तर कृतीतून प्रोत्साहित करीत राहतो. समाजातील माणसांसाठी संस्थेद्वारा उपयोगी कामे करतोच शिवाय इतरांच्या सामाजिक संस्थेसोबत मिळून जास्तीत जास्त चांगली कामे हाताने व्हावे यासाठी सतत प्रयत्नरत असतो. हा सार्वजनिक विवाह सारखे कार्य घडवून आणतो, समाजातील बांधवांना एकत्र आणून, विद्यार्थ्यांना बरोबरीने घेऊन पर्यावरणासाठी कामं करतो. 'रा. पै. समर्थ स्मारक समिती' या स्वतःच्याच संस्थेद्वारा समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव 'विदर्भ रत्न' पुरस्कार देऊन करीत असतो. स्वाप्निल उत्कृष्ट स्केटर आहे पण ह्याचा उपयोग त्याने स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांना ते देत राहण्याचे ठरवले .. या खेळाच्या माध्यमातून तो निव्वळ खेळाडू नाही तर समाजोपयोगी, वैचारिक समंजस अशी एक पिढीचं घडवतो आहे असं मला सतत वाटतं. त्याचे छान चौकोनी छोटे कुटुंब आहे .. म्हणजे आई, बायको आणि एक गोडुली लेक. संपूर्ण परिवारच सामाजिक कार्यात समरस होऊन त्याला साथ देणारे. आता तर त्याची लेक त्याचा हात धरून या कार्यात उतरतांना दिसते आहे.


स्वप्नील बद्दल बोलावे तेवढे कमीच. तो मला माझ्या लहान भावासारखा वाटतो. हाच हक्क मी स्वतःच घेऊन वेळोवेळी त्याचा कान धरून त्याला दटावत असते पाठीत रट्टाही घालत असते.. पण तो मात्र नेहेमी नम्र असतो.. माझ्या कार्यातही माझ्या मदतीसाठी अगदी अर्ध्या रात्रीही एका पायावर उभा असतो.


आपल्या आयुष्यात भेटलेल्या काही लोकांना पाहून आपल्याला अभिमान दाटतो त्यातलाच स्वप्नील एक आहे तेवढंच कौतुक मला ममताचंही करावं वाटतं सहचारिणी असावी तर ममतासारखी असे म्हणावे इतकी ती गुणी आहे..आणि हे सगळं काकूंच्या संस्कारात घडत आहे यात वाद नाही.. माझ्यापेक्षा खूप लहान असला तरी त्याच्याकडे पाहून खूप शिकायला मिळाले आहे हे सांगायला मला कधीच कमीपणा वाटणार नाही...


स्वप्नील आज तुझा वाढदिवस, तू अशीच चांगली कामे करत राहा.. खूप प्रगती कर आनंदी राहा. खूप शुभेच्छा !













- रश्मी पदवाड मदनकर

Thursday, 22 August 2019

रूपाताई कुलकर्णी-बोधी


काही माणसांचा जन्म कुठल्यातरी कारणासाठी घडून आलेला असतो. त्यांच्या जीवितकार्यासाठी नियतीशी जन्माआधीच ठरलेला करार असावा यावर विश्वास बसावा इतके एखाद्याचे आयुष्य कार्याशी करार असल्यागत प्रामाणिक पुढे सरकत राहतं त्यांच्या हातून आयुष्याला पुरून उरणारी महत्कार्य होत जातात. आणि हे कार्य वाचतांना किंवा ऐकतांना पुढल्या पिढीचा नियतीवरचा विश्वास फिका पडतो कारण या माणसांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर नियतीही भाळलेली दिसते आणि आपला त्यांच्या कर्तृत्वावरचा विश्वास अधिक प्रगाढ होत जातो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे वाईट वाटणार नाही असा माणूस विरळाच पण या घटनांसाठी संवेदनशील होत परिस्थितीशी तह करत, वंचितांच्या आयुष्याची नवी घडी बसवण्याचे मनसुबे रचवत,  अक्ख्या समाजातच मन्वंतर घडवून आणण्याच्या आर्त तळमळीने अग्निकुंडात उडी किती जण घेत असतील? 

'एखादा विचार दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला म्हणून महत्वाचा नसतो असे नाही, निव्वळ बहुमताच्या जोरावर  त्याला डावलण्याची युक्ती कोणीतरी वापरते आणि मग तीच वहिवाट बनून जाते' असे रूपाताई म्हणतात पण मग अश्या या धगधगत्या जगाच्या उंबरठ्यावरून बाहेर पडत एकल वाट चोखाळणाऱ्या, नवस्त्रीवादाची संकल्पना आणि पुनर्मांडणी करणाऱ्या रूपाताई कुलकर्णी म्हणूनच तर जगावेगळ्या ठरतात. केवळ एखाद्या आयुष्याचे नाही तर एका पिढीच्या अर्ध्या लोकसंख्येची यातना त्यांनी जगासमोर करुणेने मांडली आणि ती बदलून आणण्याच्या आंतरउर्मीने संघर्ष करण्याची प्रमाथी ताकद मिळवून तळपत्या वाटेने चालत पेटते पलितेच पदरी ओढून घेत राहिल्या पण हा मार्ग मात्र कधीच बदलला नाही.  

रुपाताई जन्मभूमीने आणि कर्मभूमीनेही तश्या नागपूरच्याच, कार्यक्षेत्र मात्र विदर्भापर्यंतच्या व्याप्तीचं. ८० च्या दशकात स्त्री चळवळीतल्या मुख्य सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आजही रुपाताईंचे नाव अग्रगण्य आहे. वडील अप्पासाहेब हे त्याकाळचे डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते. आईचे नाव प्रमिला नोकरीपेशा हळव्या मनाची स्त्री, सर्व त्यांना बाई म्हणत. व्यक्ती आणि समाज यांच्यामधले नाते सूक्ष्मांतिसूक्ष्म जिवंत धाग्यांनी विणले गेलेले असते तसेच जाणीव आणि आत्मभान हे आंतरिक आणि बाह्य अशा अनेक घटकांमधून आकाराला येत असते तसेच झाले. सतत घरात होणाऱ्या चर्चा, मैत्री परीवारातली संगत, बौद्धिक, वैचारिक वातावरणात घडलेल्या जडणघडणेने फार लहान वयात त्यांची सामाजिक जाण जागृत झाली होती. आज गेल्या ४० वर्षांपासून त्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. विशेषतः असंघटित महिला कष्टकऱ्यांची संघटनबांधणी आणि त्यांच्या हक्कांसाठीचा लढा त्या अविश्रांत देतायेत. मोलकरणींच्या समस्यांबाबत काहीतरी करायला हवे ही ठिणगी मनात कधी अन कशी पेटली या प्रश्नांवर त्या कातर हळव्या होतात आणि या सर्व चळवळींची त्यांच्या आयुष्यातली पहीली खरी नायिका असणाऱ्या लक्ष्मीचा किस्सा सांगू लागतात ...  

तो ६६-६७ चा काळ होता रूपाताई नुकतंच हिस्लॉप महाविद्यालयात नोकरीला लागल्या होत्या वय होते २१ वर्ष. त्यांच्याघरी नियमित येणारी मोलकरीण होती तुळसाबाई पण हिच्याशिवाय पंच्याहत्तरीतली पाठीतून वाकलेली, पार थकलेली जक्ख म्हातारी लक्ष्मी खूप दुरून फुटाळावरून रवीनगरपर्यंत चालत यायची, व्हरांड्यात येऊन बसून राहायची. 'बाई पालव दे' अशी हाक घालायची, मग बाई (आई) तिला बसायला बारदान द्यायची, पोटभर खायला द्यायची, चहा-पाणी द्यायची, कपडे द्यायची. त्या साऱ्याची परतफेड म्हणून लक्ष्मी अंगण झाडून द्यायची, कधी तांदूळ निवडून द्यायची, रुपाताईंना प्रेमाने बोलावून डोक्यात तेल लावून द्यायची, काळजीनं विचारपूस करायची. लक्ष्मीशी हळूहळू ममत्वेचे, जिव्हाळ्याचे नाते होत गेले. महाविद्यालयातून परत आले कि तिचे व्हरांड्यात बसून दिसणे सवयीचे होत गेले. एक दिवस मात्र अचानक लक्ष्मी येईनाशी झाली.. खूप दिवस गेले. एकदा तिच्या शोधात तिची झोपडी असणाऱ्या वस्तीत रूपाताई गेल्यावर कळले कि म्हातारपणामुळे इतक्या दूर चालत येणे जमत नाही म्हणून नजीकच्या रस्त्यावर-देवळात ती भीक मागून उदरनिर्वाह करते .. पुढे कधीतरी कळले ती आता या जगातच राहिली नाहीये. या प्रसंगाने रूपाताईंच्या मनावर प्रखर परिणाम केला. स्वतःचा गुजराण करणंही कठीण असणाऱ्या या स्त्रियांच्या एकलकोंड्या आयुष्याचे कसे धिंडवडे उडतात हे पाहणे असह्य होऊन त्यांनी या महिलांसाठी काहीतरी करायचे ठरवले आणि हि चळवळ उभी राहिली. नंतर ग्रुप चळवळी सुरु झाल्या पण या सर्वांच्या सुरु होण्यामागे 'लक्ष्मी' ही नायिका होती असे रूपाताई निक्षून सांगत राहतात. 

मोलकरणीची संघटना बांधल्यानंतर रवीनगर सोडून टिळक नगरला राहायला आल्यानंतर रीतसर आणि जोमाने या चळवळीचे काम सुरु झाले होते. त्यावेळी त्या नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात प्राध्यापिका होत्या. कॉलेज संपले कि कधीच सरळ घरी न जाता या कामकरी महिलांच्या वेगवेगळ्या भागातल्या वस्तीत जायच्या तिथल्या स्थितीचे, त्या महिलांच्या जगण्याचे अवलोकन करायच्या; त्यांच्या अडचणी-समस्या समजून घ्यायच्या. मग टिळक नगरच्या मैदानात बैठक व्हायच्या त्या समस्यांवर किंवा त्यांच्या गरजांवर तोडगे शोधले जायचे. या वेळपर्यंत मोलकरणींना ह्यांची ओळख पटू लागली होती. त्यांच्या गोटात रुपाताईंचा आदर वाढू लागला होता. या महिला स्वतःहून समस्या घेऊन ताईंपर्यंत पोचू लागल्या होत्या. 

हा सर्व संघर्ष चालू असताना कुठल्या मुख्य अडचणी येत असतील हा प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होता, वाटलं शासनापासून प्रशासनापर्यंत अडचणींची जंत्री लागेल. या कामामध्ये तोंड द्याव्या लागणाऱ्या माणसांच्या यादीत नामवंतांची नावे समोर येतील; पण असे झाले नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकंच होते 'मध्यम वर्गीय लोकांची मानसिकता'.. अरेच्छा ! हे कसे ? माझा प्रश्न ... उत्तरादाखल रूपाताई एक किस्सा सांगत्या झाल्या..

अजनीनजीकच्या झोपडपट्टी वस्तीतली एक म्हातारी मोलकरीण जवळच्याच सुखवस्तू एरियातल्या एका इमारतीत कामाला जात असे. आजीला मदत म्हणून १२ वर्षांची चिमुकली नातही सोबत जात असे. एकदा मालकिणीचा कुठलासा दागिना गहाळ झाला. मागचा पुढला कुठलाही विचार न करता मालकिणीने नातीवर आळ घेतला.. पोलिसांनीही सख्तीने विचारपूस केली. ह्याचा परिणाम त्या चिमुकलीवर असा काही झाला कि तिने झोपडीबाहेरच्या छोट्या मोरीमध्ये स्वतःला जाळून घेतले..नंतर तो दागिना मालकिणीला घरच्याच कुठल्या सदस्याजवळ सापडला... ती निष्पाप पोर मात्र जीवानिशी गेली...हा एक प्रसंग..दुसरा.. एकदा मालकिणीच्या घराबाहेर उघड्या मोरीवर काम करणाऱ्या एका मोलकरणीवर रस्त्याने जाणाऱ्या ट्रकने भिंत तोडून गाडी चढवली. तिचाही जागीच मृत्यू झाला. अश्या घटनांमध्ये विशेषतः चोरीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलीस प्रशासनांमार्फतही या मोलकरणींना मदत करायची सोडून उलट त्याच लोकांना, त्यांच्या घरच्यांना जास्तीत जास्त त्रास होईल असे घडत राहते. त्यांच्या घरची झाडाझडती होते त्यांचे जगण्यासाठी महत्प्रयासाने जमवलेले सामान फेकफाक केले जाते, नासधूस होते, सगळं काही विस्कटतं. या विरुद्ध आवाज उठवला की या मध्यम वर्गाला मात्र त्रास होतो. चमडी बचाओ प्रवृत्ती बाहेर येते. या गरीब महीलांना सहकार्य करायचे सोडून विरोधासाठी मात्र हे संघटित होऊ लागतात. त्याकाळी तरुण भारतात रूपाताई विरुद्ध जवळपास शंभरेक पत्र आली असतील. त्यातले अनेक त्यांच्यावर वैयक्तिक ताशेरे ओढणारी, नको ते आरोप करणारी पत्र देखील असायची. हा काळ खूपच मानसिक त्रासाचा होता.    

या देशाचा सर्वात मोठा रोग म्हणजे गरिबी! स्वातंत्र्य, सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क आहेत. फार मोठ्या प्रमाणात सामान्य भारतीय स्त्री या तिन्ही हक्कांपासून वंचित आहे. उदा. मोलकरणी, बांधकाम मजूर स्त्रिया, कचरा चिवडणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या महिला ! केस गोळा करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांसमोर तर माणसा माणसांच्या उंचीचे ढीग लागलेले असतात. त्या केसांच्याच ढिगावर तिथली मुलं खेळतांना दिसतात. वस्तित दूरवर घाणीचे साम्राज्य असते. रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे पसरलेला असतो. या सगळ्या महिलांना कशाचेच संरक्षण नसते. यांच्या आरोग्याची कोणी दखल घेत नाही. कुठली घटना झालीच तर कुणीच जबाबदारीही घेत नाही. सरकार दरबारी कसले धोरण यांच्या बाजूने नाही. प्रशासनाला यांच्याबद्दल कुठलीच आपुलकी नाही. ह्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. यांच्या कामाचे स्वरूप पाहता आरोग्याच्या अनेक समस्या ह्यांना असू शकतात याकडे कुणाचेच लक्ष नाही. ह्यांच्या मुलांना शिक्षण नाही, त्यामुळे भविष्याची काहीच तरतूद नाही. यासगळ्यांचा विचार करता या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर, स्त्रीरोग कँसर तपासणी, आपतग्रस्त महिला सेल, भरोसा सेल सारख्या पोलीस खात्याची मदत घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेच्या समस्या सोडवणे अश्या अनेक प्रकारची मदत रूपाताईंची संघटना आजतागायत करत राहिली. आपत्कालीन प्रसंगी हि माणसे राहत असणाऱ्या जागी मदत पुरवणे फार महत्वाचे असते. त्या सांगतात २००६ चा काळ होता त्यावेळी पूर आला होता. कुंभार टोळी वस्तीत तेथील माणसांच्या मदतीला गेले असतांना अचानक अंगात ताप भरून आला.. नंतर तपासणीत लक्षात आले चिकन गुनिया झाला होता. पुढला बराच काळ शारीरिक वेदनांचा गेला. अश्या अनेक समस्यांशी त्या झुंजत राहिल्या. पण थांबल्या कधीच नाही.. नागपूरातल्या अनेक वस्तींवर वंचीतांच्या मुलांकरीता ओसरीवरच्या शाळा सुरू केल्या..नावही तेच ठेवलं 'ओसरी'. या महिलांच्या हक्कासाठी संघटनेने अनेक आंदोलनं केलीत. अतिक्रमण विभागाविरुद्ध 'चुल्हा जलाओ आंदोलन, सर्व स्तरातील विस्कळीत कामगारांना एका छत्रछायेत आणा हे सांगणारं छत्री आंदोलन, रेल रोको/रास्ता रोको आंदोलन. २०११ ते २०१४ या काळात 'घरगुती कामगार कल्याणकारी बोर्ड' स्थापन करण्यात आले त्यात सदस्य म्हणून काम करीत असतांना अनेक धोरणं पास करवून घेऊन राबवली गेलीत. त्यानंतर मात्र तो बोर्डच सरकारने बरखास्त केला ही खंत रूपाताईंना आजही सतावते. 

या चळवळीच्या काळातच वर्ष १९९२ मध्ये रुपताईंनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. समाजात पितृसत्ताकता, वर्ग, जात, धर्म आणि भांडवली दमनयंत्रणातुन होणारे अन्याय, ज्यातून लैंगिकतेचे ढाचे प्रस्थापित झाले, आणि स्त्रियांमध्ये असमान सत्तासंबंधातल्या उतरंडी रचल्या गेल्या ..धार्मिक विद्वेषाच्या विखारी वातावरणात होरपळत घडत जाणाऱ्या बाईच्या जगण्याकडे कुणाचे लक्ष क्वचितच गेलेले दिसते. अश्यात स्वतःतील प्रतिकारी जाणीव प्रत्ययाला येऊन रुपाताईंनी त्यांचा स्वतःचा मार्गच बदलला. लोकांनी त्यांना 'बोधी' अशी पदवी बहाल केली. त्याच वर्षी 'दलितमित्र' हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुढे बौद्ध धम्माचा, संविधानाचा, बाबासाहेबांच्या थिअरीचा त्यांनी अभ्यास केला. स्त्री-स्वातंत्र्याची बुद्ध विचारांच्या अंगाने मांडणी करणारे थेरीगाथांचे संशोधन केले. अनेक वैचारिक पुस्तकं, समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित केले. विविध वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले. त्यांचे सगळे लेखनच क्रांतिकारी उर्जेने भारलेले आहे. 39 वर्ष त्यांनी संस्कृतचे अध्यापन केले. रुपाताईंना सावित्रीबाई फुले पुरस्कार, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी पुरस्कार, इंडियन मर्चंट चेंबर प्लॅटिनम ज्युबिली आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

रूपाताईंचे वय आज जवळजवळ ७० वर्ष. लग्न करून स्वतःचा संसार मांडून चार माणसांचे घर चालवण्यापेक्षा या लाखो महिलांच्या कुटुंबालाच आपले मानून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यास झटणाऱ्या रूपाताई आजही त्यांचे सणवार, त्यांच्या मुलांचे वाढदिवस या महिलांच्या घरी जाऊन साजरा करतात. पांढरपेशा लोकांमध्ये त्यांचे मन लागत नाही. मी सहज त्यांना विचारले ''रूपाताई एवढ्या मोठ्या संख्येच्या महिलांमध्ये तुम्ही वावरता..या अशिक्षित बायकांना जगण्याचे कायदे कदाचित माहिती नसणार.. तुमच्या लढ्याची जाणीव त्यांना असेल नसेल त्या कधी पावतीही देत नसतील, सभ्यता-दाक्षिण्य न समजणाऱ्या या गटाच्या  वागण्याचा कधी त्रास झाला नाही का??'' त्यावर रूपाताई गोड हसतात, म्हणतात ''या सगळ्या असंघटित कामगार महिला अशिक्षित असतीलही पण असभ्य कधीच नसतात. त्यांच्या सान्निध्यात आपणच अनेक गोष्टी शिकत राहतो, इतर सुखी वर्गापेक्षा या वर्गाची सोबत जास्त समाधानकारक आहे'' असे त्या सहज शैलीत सांगत राहतात.       

गेल्या तीस वर्षांच्या प्रवासात कितीतरी कार्यकर्ते, अनेक महिला जुळत गेल्या आणि १ लाख सदस्यांचे हे संघटन आजमितीस सुदृढपणे उभे झाले आहे. यातल्या अनेक महिला आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने, स्वबळावर जगतात आहेत. त्यातल्या कितीतरी व्यासपीठावरून हक्कांची मागणी करायला, आपल्या समस्या ठासून सांगायलाही शिकल्या आहेत. त्या म्हणतात हा लढा शेवटपर्यंत कायम राहणार आहे. ६० वर्षांच्या पार असलेल्या कामगार महिलांसाठी पेन्शन योजनेत तरतूद असावी, समता, स्वतंत्रता, एकोपा समाजात रुजावयास हवे. असंघटित कामगारांच्या  निदान अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात. मूलगामी उपाययोजना, पॉलिसी योजना लागू व्हाव्या. मुख्यतः बजेटमध्ये यांच्यासाठी महत्वपूर्ण वाटा असावा ह्या प्रखर मागण्या आहेत. परंतु नेमके आंदोलन कोणत्या तत्वांवर आधारित आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. 

स्त्रीसशक्तीकरणाच्या ज्या नऊ सूत्रांवर प्रामाणिकपणे व्यावहारिक तत्वांवर हे आंदोलन चालवण्याचे, यशस्वी करण्याचे प्रयत्न होतायेत ते खालीलप्रमाणें 
१.पारंपरिक श्रमविभागणीला छेद देणे. स्त्रियांना समान हक्क मिळवण्यासाठी संधी देणे. 
२.गृहिणींनाही अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणे. 
३. श्रमिक महिलांसाठी उत्पादक श्रमाचा मान राखून समान कामाला समान दाम देणे. 
४. श्रमिक स्त्रियांसाठी स्वतंत्र आरोग्य धोरण आखणे 
५.मुलींची शाळागळती थांबवणे     
 ६. पुरुषप्रधान व्यवस्था व पितृसत्ताक मूल्यांचा सातत्याने विरोध करणे
७. पुरुष व आजची तरुण पिढी यांच्यात स्त्री विषयक दृष्टिकोनात वैचारिक बदल घडवून आणणे 
८. मुलींच्या वाढीसाठीचे निकष बदलणे 
९. स्त्रियांची पुरुषावलंबी मानसिकता बदलणे. आत्मविश्वास वाढवणे. 
हे व असे ग्राउंडलेव्हलवर  काम करतांना स्त्रीचळवळीला उपयुक्त असे अनेक मुद्दे एकत्र करून व्यापक पातळीवर 'नवस्त्रीवाद' घडवून आणण्याचा प्रयत्न ही संघटना रुपाताईंच्या मार्गदर्शनात गेली कित्तेक वर्ष करतेच आहे. संघटनेचे सचिव श्री विलास भोंगाडे शिवाय सुरेखा डोंगरे, छाया चवळे, सुभद्रा धकाते, छाया सोमकुंवर, कांता मडामे, वंदना फुले, ममता पाल, सुजाता भोंगाडे, सरीता,सुहास, ज्योती ही सगळी मंडळी या संघटनेची शिलेदार आहेत.  

कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणानुसार जगण्याचे येणारे आत्मभान काळाच्या त्या त्या बिंदूवर महत्वाचे होत असते. काहींचे थोडे अपुरे, अप्पलपोटे आणि काही वेळा मतलबी होते आणि काही संवेदनशील माणसांची जगण्याची तऱ्हा त्यामुळे बदलते. `जग बदल घालुनी घाव, गेले सांगून मला भीमराव’ असे म्हणत समाज बदलायला पदर बांधून उठलेल्या या रणरागिणीचा लढाऊ बाणा आंबेडकरी आणि बुद्धवादी विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या रूपाताईंसारख्या लढाऊ आयुष्याचे आकलन करण्यात माझी बौद्धिक झेप कदाचित कमी पडेल. पण रुपाताईंनी मांडलेल्या या नव्या भूमिका, एक नवी विजिगीषु परंपरा आणि परिवर्तनाच्या लढयातून स्त्रियांना देऊ केलेले स्वत:च्या स्त्री पणाचे क्षमतेचे ओजस्वी भान अख्या समाजाला यापुढेही प्रेरणादायी ठरणार आहे हे निश्चित.

- मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर 



(महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ Gravittus Foundation या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.
या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजितShripad Vinayak Aparajit सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी Megha Shimpi, हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.
एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...