Sunday, 4 July 2021

राधा-अनय



शिरीन कुलकर्णी यांचा एक आवडलेला लेख -




' त्रिधा राधा ' या पु.शि. रेग्यांच्या कवितेने मनावर घातलेली मोहिनी किती वर्षं कायम आहे. राधा-कृष्णाच्या अधिकाधिक तरल आणि सखोल होत जाणाऱ्या नात्याचे पदर अजूनही हळुवारपणे उलगडावेसे वाटणारे ! राधा - कृष्णाची जादू अजूनही भारतीय साहित्यावर पसरून राहिलेली ! अरुणा ढेरे यांची 'अनय ' ही कविता वाचली आणि सवयीच्या वाड्यातले एक अनोळखी दालन एकदम उघडावे, तसे काहीसे वाटले. राधेचा पती 'अनय ' याचे कायमच धूसर राहिलेले चित्र उजळून निघाले आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या या अनोख्या दर्शनाने मन चकित आणि हर्षभरित होऊन गेले . राधेला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श जितका उत्कट, तितकीच तीव्र अनयाची तिला समजून घेण्याची क्षमता !
राधा तर नक्षत्रांच्या गावातून अनयाच्या घरात उतरली होती. तिला तो दिव्य निळा स्पर्श लाभलेलाच होता आणि निळेपणाच्या मूर्त रूपावरून आपल्या जिवाची कुरवंडी करण्यासाठीच ती पृथ्वीतलावर अवतरली होती .
देवत्वाचे अधिष्ठान म्हणजे आभाळ असे जर म्हटले, तर कृष्णाचा रंग आभाळासारखा मेघश्याम असणेही ही स्वाभाविकच आणि नक्षत्रांच्या गावातून उतरलेल्या राधेच्या रक्तातच मेघश्याम आभाळाची अनावर ओढ असणेही साहजिकच. (पुन्हा पु. शि.रेगे - आकाश निळे तो हरि, अन् एक चांदणी राधा ) अनयाला हे सगळे 'पहिल्यापासून' समजले होते. पहिल्यापासून म्हणजे केव्हापासून? अनयाला स्वतःच्या जीवनाचा अर्थ आधीपासूनच ठाऊक होता ?
त्याला स्वतःच्या अगदी आतून आतून खोल मनातून राधेचा 'बाईपणा' कळला होता. आपण स्वीकारली आहे ती वीज आहे, तिला शेजेला घेण्याचा हट्ट आपण केला, तर आपल्याला जळून जायचे आहे. यापेक्षा तिचे तेज लांबूनच पाहावे. कृष्णाच्या मस्तकावर डोलणारे मोरपीस आणि राधेची स्वप्ने त्या मोरपिसासारखी; झिळमिळ करणारी, मृदू मुलायम ! नुसती बोटे फिरवली तरी सुखाची लवलव जाणवावी. पण अनयाचे समजूतदारपण जगावेगळेच. त्या मोरपिसांवर आपले डोळे कोरण्याचा प्रयत्न त्याने कधीच केला नाही; ना त्याने तिच्या शरीरात सतत हेलावणाऱ्या मदिरेप्रमाणे धुंद उन्मन करून टाकणाऱ्या कृष्णरूपी निळ्या तळ्याला गढूळ करण्याचा प्रयत्न केला.
त्याचे आयुष्य मातीचे होते ; तर तिला स्वर्गीय स्पर्श होता. त्याच्या घरात तिची पावले विशिष्ट उद्दिष्ट घेऊनच पडली होती ; पण त्या पावलांना चढलेला अळत्याचा लाल रंग हा अमरत्वाचा होता. म्हणूनच सर्वसामान्यांच्या समवेत असूनही त्यांच्या क्षितिजाच्या पलीकडे असणाऱ्या कृष्णाबरोबर तिचे नाव जोडले गेले आणि आणि ते अमर झाले. तिच्या अस्तित्वाचा गंध अविनाशी होता, म्हणूनच राधा अविनाशी ठरली . कृष्ण सगळ्यांचाच होता . राधा मात्र फक्त कृष्णाची होती तरीही अविनाशी , अमर होती .(पुन्हा पु.शि.- जलवाहिनी निश्चल कृष्ण; बन झुकले काठी राधा ) असे हे तेज आपल्याला सांभाळायचे आहे , असे हे दिव्यत्व आपल्या आसपास वावरत आहे ; या जाणिवेने त्याचे मन काठोकाठ भरून गेले होते . ही संधी त्याला मिळाली होती, म्हणून तो तिच्याशी कृतज्ञ होता.
तिचे कृष्णार्पण होणे त्याने फार जवळून पाहिले होते. रात्रीचा हा काळा अंधार म्हणजे जणू तिच्या कृष्णसख्याचा कृष्णवर्णच ! कसा आहे कृष्ण, तो तर 'रसज्ञ' आहे ! सर्व रस जाणणारा. त्या कृष्णवर्णाशी एकरूप होणारा राधेचा गौरवर्ण ही अनयाने पाहिला होता. खरे तर मधुर वाटणारे असे हे विष होते आणि आणि राधा ते खुळ्या ओठांनी तृप्त होईपर्यंत वेड्यासारखी पीत होती. ते विष जणू तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत होते आणि तिला आणखी धुंद करीत होते. स्वतःच्या प्रेमासाठी राधा स्वतःचे अस्तित्व झोकून देत होती , बेभानपणे ! ती तृप्तही होत होती आणि तरीही ती तृप्तीच तिला पुन्हा अतृप्तीकडे ओढत होती .


अनय हे सारे पाहत होता . रोजच्या वाटेवरील आयुष्यभर येणारे एकटेपण जणू त्याला जाणवले होते. तिच्या दुःखी, जखमी काळजाची पराकोटीची तडफड त्याला उमजत होती. दूर असूनही त्याला स्त्रीची प्रेमातली दोन्ही रूपे दिसली होती; भरून आलेली आणि सरून गेलेली ! त्याला जाणवले की, या वाटेवर ती हरली आहे ;पण निरर्थकतेच्या भरकटत्या वाटेवर हरवून गेली नाही. तिचे तेजच असे होते की, त्या तेजाचे मीपण जपत, धडपडत ती त्यातूनही शिल्लक राहिली, उरली. नाकारणारे, सोडून जाणारे , दुःखाच्या गर्तेत लोटणारे , आयुष्यभर दुःखाच्या चिमट्यात पकडून ठेवणारे पुरुष असतात. राधेला भेटलेला पुरुष हा स्वप्नवतच होता. तो तिला क्षमा करून उपकृत करत नव्हता , क्षमा करण्याच्या उपकारांचे ओझे तिच्यावर लादत नव्हता ; की तिला नाकारून कमीही लेखत नव्हता ; उलटपक्षी तिला समजून घेऊन तिला सावरत होता, छाती फुटून बाहेर येणाऱ्या तिच्या दुःखाला आवरत होता, आणि उराशी धरून तिला स्वतःच्या आधाराचा विश्वास देत होता. जी स्वप्ने त्याची कधीच नव्हती ; त्या स्वप्नांनाही तो स्वतःच्या काळजात घर देत होता. राधेचा पुरुष असा होता. तिच्या कोसळत्या स्वप्नांना आपल्या आधाराचे पंख देणारा असा हा राधेचा पुरुष स्वप्नवतच होता.
या कवितेने राधेच्या अनयाने मनात घर केले. राधा-कृष्णाच्या प्रेममय नात्याची ही अनोखी दिशा मनाला अस्वस्थ करणारी होती . हेही चित्र असू शकते , ही शक्यता सुखावणारी होती; पण कृष्ण सोडून गेल्यानंतरच्या राधेच्या जीवनाकडे , राधा- अनयाच्या नात्याकडे डोळ्यांत पाणी येईल तोवर पाहायला लावणारी होती आणि प्रत्येक नात्यांमधल्या वेगवेगळ्या दिशा , वेगवेगळ्या शक्यता शोधायला लावणारी, तपासायला लावणारी होती.
शिरीन कुलकर्णी


अनय
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.
त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.
कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!
– अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...