Thursday 11 July 2019

शिरस्ता !!


नीलिमा खरतर एक सुसंस्कृत, सोज्वळ सदगृहिणी. नोकरी करायला, मैत्रिणीत रमायला, समाज कार्य करायला खूप आवडायचं तिला. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना सगळ्या आवडी-निवडीचे करकचून गाठोडे बांधून खुंटीला टांगले होते तिने. नवऱ्याच्या गरजा, त्याची नोकरीतली प्रगती, मुलांचं संगोपन, शिक्षण, गणगोतांचे येणेजाणे- देणेघेणे ... कुठलीही खंत न बाळगता संसाराची २० वर्ष जबाबदारया खुबीने निभावल्या होत्या तिने. दिवसभर घरात राहूनही कसलं सुख, कोणाची सोबत अशी नव्हतीच. व्यवसायाच्या नावानं नवरा दिवसरात्र बाहेर. तीन सगळं सांभाळून घेतलं होतं म्हणून तो अधिकच निष्काळजी, बेजबाबदार होत गेला. घराला लागणारा पैसा पुरवण्यापर्यंतच घराशी संबंध संपर्क असलेला. बायको म्हणजे निव्वळ गृहीत धरण्याची चीजवस्तू.. तिच्या मनाचा, भावनांचा, गरजांचा विचार तर दूर ते ध्यानीमनीही येऊ नये इतकी अलिप्तता बाळगणारा. तिच्याप्रती त्याचं काहीच देणं लागत नव्हतं जणू. तिनं मात्र असं अलिप्त-बेदरकार राहून चालणार नव्हतं. तिनं सगळं करावं, सगळ्यांचं करावं हा थोपलेला अलिखित नियम. ती सुद्धा माणूस आहे याच घरात राहते हे तो चक्क विसरून जायचा. स्त्रिया घरात घुसमटायला आणि पुरुष हा बाहेर जगण्यासाठी, बाहेरचच बघण्यासाठी जन्माला आलाय हि अव्यक्त विचारप्रणाली घेऊन जगणारा. त्याच्यालेखी घर म्हणजे फक्त जेवून आराम करण्यासाठीचं ठिकाण.

ती दिवसभर वाट बघून दमायची तो अर्ध्या रात्री अवतारायचा.

वर्षानुवर्षे हाच शिरस्ता.

हल्लीच दोन्ही मुलं शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात राहायला गेलेत. . जरा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि तिच्या आयुष्याला नाही म्हंटलं तरी जरा रिकामपणच आलं. मोठ्या घरात एकटपण खायला उठायचं. आता स्वतःसाठी काहीतरी करावं असं सारखं तिला वाटत असायचं. मैत्रिणीच्या संपर्कातून हळूहळू सामाजिक कार्याशी जुळली गेली आणि नीलिमा उंबरठा ओलांडून बाहेर पडू लागली. घराची फारफार काळजी न करता आवडीच्या कामात रमू लागली...छंद जोपासायचे, बाहेर अनेक मित्र-मैत्रिणींकडून त्याचे गोगोड़ कौतुक ऐकायचे; घरी आली कि खुश राहायचे...तिचं राहणीमान बदललं. बोलण्याचा ढब बदलला. संपर्क वाढू लागले.

आता त्याचं मन बाहेर लागत नाही. तिच्यातले ठळक होत चाललेले गुण त्याच्या नजरेच्या टप्प्यातून सुटत नाही. तो सतत तिचा विचार करतो. तिच्या बाहेर रमणाऱ्या छबीभोवती घुटमळत बसतो. संध्याकाळ होण्याआधीच घरी येतो .. तीची वाट बघतो. ती किती उशीर करते, कितीवेळ घराबाहेर असते, कुणाशी बोलते ह्याचं गणित मांडत बसतो ….

आता तो असतो … ती नसते.

तू नसलीस कि घर कसं खायला उठतं तो तिला समजाऊन सांगतो. तुझ्याच हातचा स्वयंपाक कसा रुचकर लागतो हे पटवून देतो… तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही हे रुजवून देतो … घराला तुझी गरज असल्याचे रंगवून रंगवून सांगतो....आणि ती पाघळते. चार महिन्यात मिळवलेल्या आवडत्या कामाच्या समाधानाचे पुन्हा एकदा अलगद गाठोडे बांधते.. खुंटीला टांगते. आणि पुन्हा घराला घरपण द्यायला उंबरठ्यावरूनच उजवा पाय आत ठेवते.


दुसरे दिवशी सकाळी तिला दारात सोडून शिळ घालत तो कामावर निघतो …व्यवसायाच्या नावानं दिवसरात्र बाहेर काढू लागतो. ती सुद्धा घरात राहते हे तो चक्क विसरून जातो... पुन्हा ती दिवस दिवस वाट बघत बसते … तो अर्ध्या रात्री अवतरतो....

रश्मी पदवाड मदनकर

29 jan. 2015

























No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...