Tuesday, 18 June 2019

आईपण कसं स्वार्थी असतं ना ..

तसंतर पुर्वीपासूनच आपल्या काही सवयी असतात त्या हळूहळू स्वभाव होत जातात. जित्याची खोड म्हणतात तशा.

रस्त्यानं जाताना मध्येच पडलेले दगड उचलून कडेनं फेकून येणं.

शाळेत जाणारी मुलं रस्ता क्राॅस करायचा प्रयत्न करताना दिसली की थांबून रस्ता क्राॅस करून देणं.

आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कुणी गरजू दिसलं तर वाटेत शक्य असेल तिथपर्यंत लिफ्ट देऊन सोडणं.
अपघात झालेला दिसला की थांबून मदत करणं

मी कित्तेकदा भर उन्हात माझी पाण्याची बाटली किंवा कुणी भणंग दिसलं तर डबाही देऊन देते गरजुला..

उन्हाळ्यासाठी चपला अन हीवाळ्यासाठी स्वेटर वर्षभर गोळा करत राहते.

पुर्वी हे स्वानंदासाठी असायचं.. मनात स्वार्थाचा लवलेशही नसायचा.

पण लेक जसजसा मोठा होतोय पदरा बाहेर वावरू लागला आहे  तेव्हापासूनच ह्याचा मोबदला मिळावा असं वाटू लागलंय आणि ह्याची जाणीव झाली तेव्हापासून वाईटही वाटतंय पण 'आई' असण्याची भावना जागृत होते अन स्वतःच स्वतःला माफ करून घेते.

हल्ली रस्यात मध्ये पडलेले दगड बाजुला करताना वाटतं माझा लेकही कधीतरी या रस्त्याने जाणार आहे. त्याच्या सायकलीखाली असा कुठला दगड येऊ नये. तो पोचण्याआधीच कुणी तो अडथळा दुर करावा.

परीक्षेला जाणारया एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नोकरीवरून लगबगीनं घरी परत जाणारया एखाद्या आईला मुलांपर्यंत पोचवायला थांबते त्यांना लिफ्ट देताना वाटतं कधी पोरावर अशी वेळ आलीच तर आपल्यासारख्या एखाद्या मनस्वी आईनं यावं असंच मदतीला धावून. आई लेकाला भेटवून द्यावं.

शिक्षण नोकरीसाठी बाहेर पडेल कधीतरी. माझ्यापासून दुर असताना उपाशी राहण्याची तहानेनं व्याकुळ होण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून वाटतं..भुक-तृष्णेनं तृप्त करावे गरजुवंतांना माझ्या बाळासाठी त्याच्या सुख समृद्धीसाठी द्यावे त्याने अनंत आशिर्वाद.

 प्रत्येक अडल्या नडल्या क्षणी काळजात मायेचा सागर घेऊन कुणीतरी माझ्यासारखीच आई भेटावी त्याला  आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर. आज आपण केलेली गुंतवणूक त्याला कुठल्याही कठीण प्रसंगात संकटात तारूण नेणारी ठरावी.

लेकाला क्षणाक्षणाला टप्याटप्प्यावर आई भेटत राहावी म्हणून  मी हल्ली प्रत्येक क्षणावर पावलापावलावर आईपणाच्या खुणा पेरत जगते आहे.

आईपण कसं स्वार्थी असतं नाही ??  ...

© रश्मी मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...