महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.
या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजित सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.
एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.
No comments:
Post a Comment