Wednesday, 31 July 2019

चंद्रयान-२ च्या यशाच्या मानकरी महिलाशक्ती -




प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं आजवर ऐकलंय, पण स्त्री केवळ कुणाच्यातरी मागे असते असे नव्हे तर अनेक यशासाठी प्रत्यक्ष कारणीभूतही ठरते. हे लक्षात यायचे कारण म्हणजे भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-२ या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण २३ जुलै रोजी दुपारी २:४३ वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून (एसडीएससी) पार पडले ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आणि त्यात या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले ही त्यातही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद असलेली बाब आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बा भ बोरकर म्हणतात ''देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे !'' या प्रमाणेच निर्मितीच्या डोहाळ्यांचे रूपांतर सुंदर सोहळ्यात करणाऱ्या या वैज्ञानिक महिलांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

कोण आहेत या दोघी, तर मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अश्या चंद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक, ज्यांनी या मिशनमध्ये अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. भारतातल्या या दुसऱ्या आंतरग्रहीय मोहिमेच्या यशाच्या मागे असणाऱ्या अनेक वैज्ञानिकांमध्ये ३०% महिलांचा समावेश आहे त्यात वनिता या मिशनच्या प्रकल्प निर्देशक (प्रोजेक्ट डायरेक्टर) म्हणून नेतृत्व करीत होत्या तर रितू ह्यांनी मोहीम निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) धुरा उचलून धरली होती.

मूळ चेन्नई येथील असणारी प्रकल्प निर्देशक वनिथाने ३२ वर्ष इसरो येथे आपली सेवा दिली आहे. सुरुवातीला ज्युनिअर इंजिनिअरच्या पदावर भरती झालेली वनिता पुढे लॅबोरेटरी, टेस्टिंग कार्ट्स, हार्डवेयर तयार करणे, डिजाइनिंग, डेवलपिंगसारखी कामे करत व्यवस्थापनाच्या पोजीशनपर्यंत पोचली. सुरुवातीला चंद्रयान-२ मध्ये असणाऱ्या प्रकल्प निर्देशांकाच्या भूमिकेसाठी ती आनंदी नव्हती, परंतु कुठेही खंड न पडू देता दिवसाला १८ तास जबाबदारीने आणि कष्टाने आपले कार्य चालू ठेवले. या कार्यात केवळ कष्टाचं नाही तर मोठी जोखीम घेऊनही कार्य करावे लागते या सगळ्या जबाबदाऱ्या निगुतीने निभावत वनिथा या प्रकल्पाच्या यशात सहचारी ठरली.

इसरोमध्य अनेक समस्या अडचणींना विचारपूर्वक सोडवणारी रितू मूळची लखनौ येथील. इंडियन इंस्टिट्यूटमधून एरोस्पेस इंजीनियरिंग केलेली रितू 'रॉकेट वुमेन ऑफ इंडिया' या नावानेही ओळखली जाते. २००७ साली पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इसरो यंग साइंटिस्ट अवॉर्डनेही ती सन्मानित झाली आहे. मिशन मार्स ऑर्बिटर हे तिच्या आजवर केलेल्या अनेक महत्वपूर्ण मिशनपैकी एक महत्वपूर्ण मिशन होते. ज्यात तिने डिप्टी ऑपरेशंस डायरेक्टरची भूमिका निभावली होती. चंद्रयान-२ या महत्वपूर्ण प्रकल्पातील मोहीम  निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) भूमिका देखील तिने यशस्वीपणे पार पाडली आहे.



काय आहे चंद्रयान-२ -

दोन वर्षांपूर्वी काही तांत्रिक कारणाने अयशस्वी झालेले चंद्रयान-१ लक्षात घेऊन काळजीपूर्वक चंद्रयान-२ या प्रकल्पाच्या मोहिमेचा पाय रचला गेला. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द झाले होते ते २३ जुलैला अंतराळात झेपावले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर ते आता ६-७ सप्टेंबरला  चंद्रावर उतरणार आहे. ऑर्बिटर, 'विक्रम' लैंडर, 'प्रज्ञान' रोवरने परिपूर्ण असणारे चंद्रयान-२ पहिल्यांदाच चंद्राच्या भूमीवर 'सॉफ़्ट लैंडिंग' करणार आहे जे अत्यंत कठीण कार्य मानलं जातं. यापूर्वी कधीही कोणतेही चंद्रयान न उतरलेल्या उपग्रह चंद्राच्या दक्षिणी भागावर उतरून तेथील नमुने गोळा करणार आहे. चंद्रयान-२ हा अत्यंत महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह आहे कारण यात  एक ऑर्बिटर, एक 'विक्रम' नावाचा लैंडर आणि 'प्रज्ञान' नावाचा रोव्हर आहे. जीएसएलवी मार्क-तीनच्या माध्यमाने अंतरिक्षात जाणाऱ्या या चंद्रयान-२ चे वजन ३.८ टन इतके आहे, तर सहाशे करोड रुपयांपेक्षा जास्त खर्च या मोहिमेसाठी होणार आहे.  चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडून या महिलाशक्तींनी आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची मान अधिक उंचावून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

-रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...