Friday, 12 July 2019

*उत्तर*
वीज चमकते,
जांभूळ प्रकाश पसरतो
आणि
मी डोळे मिटून घेतो..
..मी डोळे मिटून घेतो
आणि असला नसला पाऊस
तरी घडत जातात
अपेक्षितपणे अनपेक्षित
गोष्टी
मग रेंगेंचं 'सावित्री'
पत्रांतील मचकूराला
घडी न पाडता
दुमडून ठेवतो
कडेने,
अगतिक
पसरलेले
पिकासोचे न्यूडही
सरते नजरेआड
आणि
कुंडलिनीचे चवथे
चक्र स्पर्षणारे
किशोरीचे
'सहेला रे' देखील
होते पॉज..
कॉफीचा मग
बुद्धाच्या अनुयायासारखा
शांत..
मी त्याच्या
कानात अडकवलेले
घट्ट बोटही सैल करतो.
जाणीव होते क्षणभर
अधांतरी टांगलेल्या
शरीराची,
तेव्हा
खुर्चीवर उसासे रेलून
सोडवून घेतो
स्वतःला.
डोळे असतात
अजून मिटलेले;
आणि मी
भासत असतो
अस्पर्शीत
आणि
निवांत..
अशातच
अनोळखी दुरातून
धडपडत येणारे
आवाजी उत्तर
सुचवून जाते;
'सावित्री'चे उलटे वाक्य
'न्यूड' मधला गर्भितार्थ
आणि
'सहेला रे' चा मखमल ध्यास
आता असतो बाहेर मी
आणि जांभूळ प्रकाश
आत..
खोल आत!
-आदित्य दवणे

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...