सामाजिक कामाच्या अनुषंगाने वर्ष २००३ मध्ये नागपूर शासकीय मनोरुग्णालयात जाण्याचा योग आला. ओघाने झालेल्या चर्चेत मानसोपचारतज्ञ डॉ. सोनल देशमुख म्हणाल्या होत्या 'मानसिक आजार हि खरतर मुख्य समस्याच नाहीये, मुख्य समस्या आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची. मानसिक रोग बरा करता येतॊ पण समाजातल्या लोकांच्या मानसिकतेला औषध नाही ' किती खरंय ना… … एखादी विकलांगता किंवा मानसिक आजार हे ज्याचे त्याने स्वीकारले असते. अश्यातही त्यातून बाहेर पडण्याची आणि त्यांच्या परीने जमेल तसे चांगले जीवन जगण्याची धडपड त्यांची चालू असते. त्यांना फक्त मानाने वागवण्याची आणि खरतर सामान्य वागणूक देण्याची गरज असते. पण असे घडत नाही एखाद्याचे एखाद्या बाबतीत सामान्य नसणं किंवा आपल्यासारखं नसणं हे आपण सहज स्वीकारतच नाही. अमक्याला काहीतरी व्यंग आहे किंवा होते हे आपण विसरूच शकत नाही.
२००३ चे डॉ. सोनल यांचे वक्तव्य प्रकर्षाने आठवले त्याला कारण ठरली काल-परवा वाचलेली सोनाली मुखर्जी हिची बातमी आणि तिच्या नवरयाच्या कौतुकाने भरलेल्या आता या क्षणापर्यंत सुरु असलेल्या सोशल मिडिया वरच्या पोस्ट. जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोनालीवर एसिड अटॅक झाला. त्यात ती ७२ टक्के भाजल्या गेली पूर्वीचे देखणे स्वरूप क्षणात बदलले. त्यानंतर इच्छामृत्युची मागणी करणारी सोनाली मुखर्जी पुढे धैर्याने लढत राहिली तिचे हे धाडसी व्यक्तिमत्वच मग विकृतीला, क्रोर्याला आणि अन्यायाला बळी पडलेल्या पण न हारता लढा देणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक चेहेरा ठरला.
आता तिचे लग्न झाले. अतिशय सुस्वरूप, उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान पुरुष तिच्या आयुष्यात आला. हा विषय प्रेमाचा असू शकतो हा चांगल्या मैत्रीचा विषयही असू शकतो पण यासाठी त्या पुरुषाला साहसी म्हणून बघणे आणि हे लग्न सहानुभूतीतून अवतरले असावे असे तर्क करणे हे आपल्या संकुचित वृत्तीचे अतिउत्तम उदाहरण नाहीये का ? सोनालीच्या चेहेऱ्याशिवायही तिच्यावर प्रेम करावे असे अनेक गुण तिच्यात असावेत. तिचे धैर्य, तिचा आत्मविश्वास तिचे साहस आणि बरच काही. पण या कशाचाही विचार न करता जेव्हा आपण त्या पुरुषाला सलाम करायला धजतो, म्हणजेच सोनालीचे लग्न होणे शक्यच नव्हते किंवा तिच्यावर कुणी प्रेम करावे हे शक्य नाही …. का तर ती कुरूप आहे ?? म्हणजेच तिच्यावर अत्याचार झालाय त्यात ती भाजली गेलीय याहून अधिक ती आता कुरूप आहे हे आधी आपणच विसरलेले नाहीयोत का ? तिनं साधारण माणसासारखं आयुष्य जगावं हे आपण गृहीतच धरलेलं नव्हतं ? किंवा तिला ते जगता येऊ शकतं हेच आपल्याला पटत-पचत नाहीये. तिच्याकडे फक्त सहानुभूतीनेच बघितले पाहिजे, आणि तिने सुद्धा सहनुभूतीचीच अपेक्षा समाजाकडून केली पाहिजे हि आपली अपेक्षा असावी. त्यांतही तिच्यात प्रेम हि भावना अजून जागृत आहे तिच्यातील इतर चांगुलपणावर कुणीतरी प्रेम करू शकतं यात आपल्याला रस नाही आपल्याला रस आहे तो एखाद्याचे व्यंग दाखवण्यात ते स्वतःसकट जगाला विसरू न देण्यात.
खरतर असे काहीतरी आदर्श कृत्य करणाऱ्याचे कोण कौतुक करतोय आपण … पण असे आदर्श प्रस्तुत करण्याची वेळ आली कि आपल्या आत्ता दाखवत असलेल्या सर्व संवेदना लोप पावतात. म्हणजे हळवेपण जपावं ते शेजाऱ्याने संवेदना जोपासाव्या त्या इतरांनी आम्ही आयत्या वेळी येउन सहानुभूती तेवढी दाखवून जाणार. असंच काहीसं होतंय आपल्या बाबतीत का? संवेदना गमावतोय आपण आपल्याच जगण्यातल्या असं घडतंय का तपासून पाहायला हवे.
(फोटो आंतरजालावरून साभार)
सोनाली मुखर्जी मनस्वी अभिनंदन सखे तुझे ..Happy Married Life
No comments:
Post a Comment