Thursday 16 April 2015

फुटपाथवर पसरलेली वाचनसंस्कृती !

ग्रंथालयं, बुक शॉप`पहिलीत कि लहानपणी फार हेवा वाटायचा.  वाटायचं आपल्या भोवतालही अशी विविधांगी,  विविधरंगी विविध विषयांची पुस्तकं पसरलेली असावी आणि वाटेल तेव्हा वाटेल ते पुस्तक उचलून वाचता यावे. असे झालेच तर किती सुखी होऊ आपण लहानपणाच्या सुखाच्या कल्पना अश्याच स्वप्नील तरीही वास्तववादी असायच्या.  वाचनाची प्रचंड आवड पण सगळच छान छान वाचायला ते आपल्याजवळ असायला लागतं आणि आपल्या जवळ असायला ते विकत घ्यायला लागतं आणि त्याहून महत्वाचं त्यासाठी पैसा देखील लागतो. पैसा कमवायला कष्ट लागतात आणि जमवायला तडजोड करणे गरजेचेच आहे हे संस्काराने समजायला लागले. पण उमजायला कठीणच गेले… वाचनाची ओढ काही कधी कमी झाली नाही किंबहुना ती वाढतच गेली. इतकं वेड होतं वाचनाचं कि मी मोठी झाले ना कि एखाद्या पुस्तकाच्या दुकानदाराशी लग्न करेन म्हणजे मग पुस्तक वाचायला मला पैसे मोजावे लागणार नाही अश्या बालपणीच्या बाळबोध कल्पना देखील तेव्हा तेव्हा करून झाल्या. मला आठवतं सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व सख्या एका मैत्रिणीकडे खेळायला जमायचो. भातुकली, घर-घर, ऑफिस- ऑफिस, लपाछापी असे काहीबाही खेळत असायचो. त्या मैत्रिणीकडे मराठी मासिकं किंवा विशेष त्या भावडांना सुट्टीत वाचता यावेत म्हणून मागवलेली बालसुलभ विशेष पुस्तकं टेबल खाली ठेवलेली असायची. आमच्या आईबाबांना असं काही का सुचत नाही ह्याचं वैषम्य तेव्हाही वाटायचं पण त्यामागची कारणं समजून घ्यायची किंवा निदान तशी मागणी तसा हट्ट करून बघायचा अशी समज तेव्हा त्या वयात नव्हतीच.….  तर खेळायला नेमके आम्ही (मीच हो) त्याच मैत्रिणीचे घर निवडायचे. मग खेळाखेळात मी ऑफिस ची क्लार्क व्हायचे, कधी टीचर, कधी पुस्तक विक्रेता तर कधी गृहिणी कधी ग्रंथपाल सुद्धा … म्हणजे अशीच भूमिका ज्याच्याशी वाचनाचा संबंध असायचा … नव्हे तो तसा निर्माण करायचा आणि इतर काहीही न करता निव्वळ वाचत बसायचे…. वाचनाची असोशी एवढी असायची कि उद्या यायला मिळाले नाहीतर हे पुस्तक पुन्हा जणू मिळणारच नाही, म्हणून ते आजच संपवायला हवं हि ओढ लागून राहायची. पुढे पुढे तर माझ्या या अश्या वागण्याची मैत्रिणीनी इतकी धास्ती घेतली कि मी पोचायच्या आत दिवाण खोलीतली मासिकं, कॉमिक्स, पुस्तकं कुठेतरी अडगळीत लपवून ठेवली जायची.… मी पुस्तकांच्या नाहीतर त्यांच्या सान्निध्यात वेळ घालावा अशी त्यांची निर्मळ निरागस अशी इच्छा असायची .… आज हे सारं आठवलं कि खरंच हसायला येतं.

नंतर शाळा, कॉलेजेसमधून तिथल्या तिथल्या ग्रंथालयांचा, परिसरातल्या सार्वजनिक ग्रंथालयांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. बरीच पुस्तकं वाचली. अनेक भाषेतील अनेक विषयांची पुस्तकं. अनेक नावाजलेल्या लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या, लोकप्रिय कवी-कावियीत्रींच्या कवितेचा आस्वाद घेतला. जगप्रसिद्ध बेस्टसेलर पुस्तकांचा साठा केला. पण ते सर्व मर्यादितच. स्वतः कमावती असतांना आजही एखाद्या बेस्टसेलर पुस्तकाची किमत बघून हात आखडता घ्यावा लागतो. आणि बरेचदा ते पुस्तक वाचण्याची प्रचंड इच्छा पुढल्या महिन्यापर्यंत थोपवून धरावी लागते. आईने न घेऊन दिलेल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाची तेव्हाची ती आठवण मग पुन्हा जागृत होते. 

वाचनप्रेम आणि पुस्तकांच्या किमतीचे गणित बसवण्यात, ते प्रयत्नपूर्वक जुळवून आणण्यात बराच काळ काढल्यानंतर आयुष्याची गाडी मुंबईकडे वळली. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या नौकरी पाण्याचा जोम बसवतांनाच कधीतरी आपल्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पुस्तकांच्या बाबतीत घटना घडली ….  मुंबईच्या फुटपाथवर पसरलेली वाचनसंस्कृती पाहून एकवेळ हादरलेच. मुंबईच्या मुख्य काही परिसरातल्या लोकल स्टेशनला उतरून आपण बाहेर पडलो कि रस्त्यालगतच्या फुटपाथवर मोकळी जागा बघून किंवा एखाद्या ब्रिजच्या खाली एखाद्या मॉलच्या शेजारी रस्त्याच्या कडेने, कपड्याच्या मार्केट मध्ये सिग्नलच्या ओट्यावर कुठेही कशीही आणि कितीही ,,,, अगाध प्रतिष्ठेची युगं पाहिलेली, लोकप्रियतेची गोडी चाखलेली वर्षानुवर्ष वाचकांच्या मनाचा ठाव घेतलेली, बुद्धिवंतांच्या चर्चेचा विषय ठरलेली. आणि कितीतरी दिवस तुमच्या आमच्या उशीखालची जागा हक्काने ओक्युपाय करणारी अशी हि बेस्टसेलर पुस्तकं फाटक्या साडीत, मळकट चादरीत पसरून पडलेली दिसली.

 'अरेरेरे काय होतंय हे' एक पुस्तक हातात घेऊन पाहतांना ते समजायच्या आत 'फक्त पन्नास रुपये' शब्द  कानावर पडले आणि पुस्तकही हातातून पडलंच … 'पन्नास रुपये फक्त' अहो सातशे पानांचं किमान साडे चारशेच पुस्तक आहे हे. हा वेडगळ काहीतरीच सांगतोय मूर्ख आहे कि काय असाच काहीसा डोळ्यातल्या एका कोपऱ्यातला जरासा रागातला कटाक्ष मी त्याच्यावर टाकला आणि मानेला हलकीच लचक देऊन पुस्तकाचे पहिले पान उघडले. आता दचकायची पाळी माझीच होती ...आणि 'पता नही कहा कहा से चले आते है' अश्या नजरेने ओठांच्या कोपऱ्यातली खवचट स्माइल देण्याची पाळी त्या चालत्या फिरत्या वाचनसंस्कृतीचा डोलारा डोईवर उचलून फिरणाऱ्या विक्रेत्याची होती.... त्याने तसे काहीही न करता 'पचास रुपये, पचास रुपये' म्हणणे सुरु ठेवले. एक एक पान पुढे पुढे पालटत असतांना खऱ्या जिवंत  पुस्तकांची डमी मी हाताळतेय हे भान येत गेले. तेव्हा वाटलेले आश्चर्य आज कधीतरी निराशेचं रूप घेतं. कुठेतरी कुणाच्यातरी आयुष्याचं सार ठरलेलं, कुणाच्या आयुष्याची कमाई असणाऱ्या, कुठल्या लेखकाच्या भावनांशी बांधल्या गेलेलं आयुष्यभर कष्ट घेतलेलं कुणाचतरी प्रसृत हे असं कवडी मोलानं विकलं जावं. आणि ज्याला खरच त्याचा मोबदला मिळायला हवा त्याला न मिळता दोन पैशांसाठी तत्व, नियम आणि माणुसकी सगळंच गहाण टाकून ती अशी रस्त्यावर आणून पसरवाव हे दुखद आहे तितकंच चीड आणणारं … काही गोष्टींवर मात्र आपलं नियंत्रण नसतंच हे जरी मानलं तरी निदान आपल्या सारख्या संवेदनशील वाचकांनी तत्व पाळावेत. आणि आपल्याला आदरणीय अश्या लेखकांची पुस्तकं पायरेटेड होऊन जमिनीवर आली तरी ती वाकून विकत न घेता त्यांचा मान राखून अन आपली मानही ताठ राखून ती ओरीजनल कॉपी दुकानातूनच विकत घ्यावी महाग असली तरी तिचे महत्व समजून घ्यावी.  सृजान वाचक म्हणून आणि सुजाण नागरिक म्हणून वाचनसंस्कृतीचे जतन म्हणून किमान एवढा नियम आपण आपल्या पुरता पाळू शकतोच …होय ना ??        


  

(''विकासकर्मी अभियंता मित्र'' या पुण्यावरून प्रकाशित होणाऱ्या मासिकात ऑक्टो. २०१५ या अंकात प्रकाशित झालेला लेख. )  

2 comments:

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...